भारतीय जीनियस - एम. एस. स्वामीनाथन!!!!!

भारतीय जीनियस - एम. एस. स्वामीनाथन!!!!!

'मृत व्यक्तींची स्मारकं बांधण्यापेक्षा भूकेल्यांच्या पोटासाठी काही करणं मी जास्त पसंत करेन' असं आल्फ्रेड नोबेल यानं म्हटलं होतं आणि ते काम भारतात स्वामीनाथन या भारतीय जीनियसनं करून दाखवलं.
स्वामीनाथन हे भारतातल्या हरित क्रांतीचे जनक !!! देशातल्या भुकेल्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला आणि आपलं आख्खं आयुष्य याच कामासाठी खर्च केलं !
२३ ऑगस्ट १९९९ या दिवशी ‘टाईम’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकानं आशिया खंडातल्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या २० महान व्यक्तीं आणि त्यांचं कार्य यावर विशेषांक काढला. यात महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एम. एस. स्वामीनाथन या भारतातल्या तीनच व्यक्तींचा समावेश होता. स्वामीनाथन यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना टाईमनं म्हटलं होतं, 'दूरदृष्टी, समर्पण, प्रचंड ऊर्जा आणि पाठपुरावा करण्याची वृत्ती असे एखाद्या क्रांतिकारकामध्ये असणारे सगळे महान गुण स्वामीनाथन यांच्यात एकवटले आहेत.’ एकूण ७३ डॉक्टरेटच्या पदव्या जगभरातल्या प्रसिद्ध विद्यापीठांकडून  स्वामीनाथन यांना मिळाल्या आहेत.  भारत सरकारतर्फे विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल स्वामीनाथन यांना १९६७ साली 'पद्मश्री', १९७२ साली 'पद्मभूषण' आणि १९८९ साली 'पद्मविभूषण' या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी बघितली तरी अवाक् व्हायला होतं.
 याच स्वामीनाथन नामक व्यक्तीला ऐकण्यासाठी ७ ऑगस्ट २००६ या दिवशी चेन्नईच्या ट्रेड सेंटरच्या सभागृहात लोक दाटीवाटीनं गर्दी करून बसले होते. आपली अशी वारेमाप प्रशंसा होत असताना आपल्याला नेमकं काय वाटतं असा त्यांना प्रश्‍न विचारला गेला होता. त्या वेळी ते हसून म्हणाले, 'असाच प्रश्‍न भारताचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनाही विचारला गेला होता, तेव्हा ते म्हणाले होते की माझ्या डोक्यावर असलेल्या पगडीच्या कवचामुळे अहंकार, गर्व आणि मीपण आत शिरत नाही. कुठल्याही व्यक्तीच्या प्रगतीमधला सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल तर तो म्हणजे त्याचा अहंकार! कुठलंही काम मी एकट्यानं करू शकतो हा अहंकार माणसानं कधीच बाळगू नये. शेतकरी, वैज्ञानिक, व्यवस्थापक आणि सरकार या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आणि एकत्र येण्यातून जी सुरेख सिंफनी निर्माण झाली तिचंच नाव हरितक्रांती.’ 
स्वामीनाथन ईश्‍वरी शक्तीला मानतात, मात्र ही श्रद्धा वैयक्तिक पातळीवर असावी असं त्यांना वाटतं. त्यांच्या आयुष्यात कर्मकांडाला अजिबात महत्त्व नाही. ते कधीही कुठल्याही मंदिरात जात नाहीत वा कुठल्या तसविरीच्या पाया पडून दर्शन घेत नाहीत. मानवजातीच्या कल्याणसाठी काम करणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट ते मानतात. भारतीय आणि तसंच पाश्‍चिमात्य संस्कृतीतल्या अनेक परंपरा आणि ज्ञान याबद्दल त्यांना अभिमान वाटतो.जगभरातले वैज्ञानिक आणि कलावंत आपल्याला केवढं अमोघ ज्ञान देतात याविषयी त्यांना खूप कौतुक वाटतं. भुकेल्या आणि अर्धपोटी असलेल्या कुणालाही स्वामीनाथन विसरू शकत नाहीत. 
स्वामीनाथन गरिबी दूर करण्यासाठी, विषमता दूर करण्यासाठी आजही झटत आहेत. आजही त्यांच्या स्वतःच्या गरजा अत्यंत कमी असून ते अतिशय काटकसरीनं जगून आपल्या जवळ अतिरिक्त जे काही असेल ते मुक्तहस्तानं देऊन टाकतात. आपल्याला मिळालेल्या आजपर्यंतच्या पुरस्काराची रक्कम (जवळजवळ दोन कोटी इतकी) त्यांनी आपल्या संस्थेच्या कामकाजासाठी देऊन टाकली. निवृत्त होईपर्यंत स्वामीनाथन यांना स्वतःचं मालकीचं घर देखील नव्हतं. खरेदी करायला गेल्यावर आपल्या वडिलांना भाजी नेहमीच महाग मिळते असं त्यांची मुलगी हसत सांगते. खरं तर स्वामीनाथन यांना त्या गरीब भाजीवालीशी हुज्जत घालून कमी भावात भाजी विकत आणणं मान्यच नाही. त्यामुळे ती सांगेल त्या किमतीत ती भाजी विकत घेतात. कारण त्या भाजी पिकवण्यामागचे कष्ट आणि त्यातून मिळणारा तुटपुंजा फायदा (बहुतांश वेळा तोटाच!) त्यांना ठाऊक आहे.
 'The future belongs to nations who have grains not guns.' असं म्हणणारे डॉ. स्वामीनाथन म्हणजे चालतीबोलती दंतकथा आहेत असं भारताचे माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी म्हटलं ते उगीच नाही!
 दीपा देशमुख.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.