'श्रीनिवास रामानुजन' - भारतीय जीनियस !!!!
सारं जग रामानुजनला एक महान गणितज्ञ म्हणून ओळखतं. गणिताच्या क्षेत्रात रामानुजनची तुलना न्यूटन, ऑयलर आणि याकोबी यांच्यासारख्या महान गणितज्ञांबरोबर केली जाते. रामानुजनला जगासमोर आणण्याचं काम इंग्लंडमधल्या जी. एच. हार्डी या गणितज्ञानं केलं. ‘‘इतक्या लहान वयात रामानुजनमध्ये अफाट सुप्त शक्ती होती. त्यानं गणितक्षेत्रात जेवढी भर घातली तेवढी कोणीही या शतकात घातलेली नाही.’’ असं हार्डी रामानुजनबद्दल सांगत. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग याला शिक्षण, विज्ञान, बुद्धिमत्ता आणि करिअर याविषयी जगभरातल्या लोकांनी प्रश्न विचारले असता, त्यानं श्रीनिवास रामानुजन या भारतीय गणितज्ज्ञानं प्रतिकूल परिस्थितीतून आज जगासाठी काय करून ठेवलंय हे आवर्जून सांगितलं.
हाच रामानुजन कॉलेजमध्ये जायला लागला तेव्हाची गोष्ट! त्याच्या एका गणिताच्या प्राध्यापकांचं नाव रामानुजचरिअर असं होतं. बीजगणित किंवा भूमिती शिकवताना त्यांना नेहमीच दोन फळं लागत असत. तसंच ते गणित सोडवताना किमान १० तरी पायर्या वापरून गणित सोडवायचे. रामानुजनला इतका वेळ चाललेलं ते गणित पाहून इतका कंटाळा यायचा, की त्याचा संयम संपायचा आणि तो तीन किंवा चार पायर्या झाल्या की लगेचच आपल्या जागेवरून उठायचा आणि प्राध्यापकांच्या हातातला खडू घेऊन तेच गणित फळ्यावर जास्तीत जास्त चार पायर्यांमध्ये सोडवून दाखवायचा. त्या प्राध्यापकांसहित सगळा वर्ग चकित होऊन एकदा फळ्याकडे तर एकदा रामानुजनकडे बघत राहायचा. नंतर मात्र वर्गाला आणि त्या प्राध्यापकांनाही रामानुजनच्या हस्तक्षेपाची इतकी सवय झाली होती की नवीन गणित शिकवताना, ते शिकवून झाल्यानंतर ते प्राध्यापक आधी रामानुजनकडे बघून ‘बरोबर आलंय ना रे गणिताचं उत्तर?’ असं म्हणून खात्री करून घेत असत. मग काय, विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनाही रामानुजन फारच ग्रेट वाटायचा. पण काही विद्यार्थ्यांना मात्र रामानुजनचं गणित गोंधळात पाडायचं. याचं कारण रामानुजन गणित सोडवताना इतका अधीर व्हायचा की गणिताच्या मधल्या अनेक पायर्या तो मनातल्या मनातच सोडवून मोकळा व्हायचा आणि निवडक पायर्या फळ्यावर सोडवून दाखवायचा. त्यामुळे उत्तर बरोबर असलं तरी ते कसं आलं हे काही केल्या त्यांना कळत नसे. रामानुजनच्या वह्यांमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टींवर आजही केंब्रिजसह जगातल्या अनेक ठिकाणी संशोधनपर अभ्यास सुरू आहे.
एकदा रामानुजन शरीरशास्त्र या विषयात नापास झाला. गणित सोडून त्याला कुठलाही विषय फारसा आवडत नसे. लहान आतड्याची रचना, मोठ्या आतड्याची रचना हे विषय प्राध्यापक जेव्हा वर्गात शिकवत तेव्हा रामानुजन जांभयामागून जांभया देत असे. कट्टर शाकाहारी असलेल्या रामानुजनला डिसेक्शनविषयीची वर्णनं तर मुळीच आवडत नसत. पचनसंस्था आणि पचनक्रिया या संबंधात परीक्षेत रामानुजनला पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्यानं ‘‘हा विषय मला पचलेला नाही.’’ असं उत्तर लिहिलं होतं. या उत्तराचा परिणाम अर्थातच काय झाला असेल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीच!
दीपा देशमुख
भारतीय जीनियस : आर्यभट, वराहमिहीर, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्ही. रामन, दामोदर कोसंबी, होमी भाभा, चंद्रशेखर, विश्वेश्वरैया, रामानुजन, स्वामीनाथन, लॉरी बेकर आणि डॉ. जयंत नारळीकर
Add new comment