अभिनंदन थोरात
अभिनंदन थोरात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मित्रमैत्रिणींचे फोन कॉल्स सुरु होते, मेसेजेस सुरु होते आणि अचानक एक अनोळखी कॉल आला, तिकडून आवाज आला, दीपा मॅडम बोलताय ना? आमचे सर तुमच्याशी बोलू इच्छितात. मी उत्सुकतेनं तिकडून कोण बोलणार याची प्रतीक्षा करू लागताच तिकडून एक शांत, धीरगंभीर आवाज कानावर पडला, 'नमस्कार, मी अभिनंदन थोरात बोलतोय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.' मी 'थँक्यू' म्हटलं. फोन बंद झाला.
मी विचार करत होते, अभिनंदन थोरात नाव आपण खूप वेळा ऐकलंय, पण यांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख कुठे झाली नाही. तरी इतक्या आपुलकीनं फोन केल्याबद्दल मनात आदराची भावना निर्माण झाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांचा न चुकता फोन येत असे. पुढे अभिनंदन थोरात यांचा भाऊ स्वागत याच्याशी मैत्री झाली. जिवावर बेतलेल्या एका प्रसंगातून तो बाहेर आला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचले. तो पत्ता होता, अभिनंदन थोरात यांचा. स्वागतची चौकशी केली, त्याला आराम करायला सांगितलं. स्वतः अभिनंदन थोरात आमच्याशी गप्पा मारत थांबले. निघायचं म्हणताच, 'थांबा आता कांचन येईलच इतक्यात' असंही म्हणाले. अभिजीत आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. त्यांनी मला हेमा मालिनीचं पुस्तक भेट दिलं. 'माझं लिखाण आवडतं' अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुढे नाशिकलाही आमची भेट झाली. बुद्ध पोर्णीमेसाठी स्वागत,सुचित्रा, तेजसी आणि मी येवल्याला जाणार होतो. नाशिकला थांबलो तेव्हा त्यांनी तितक्याच आत्मीयतेनं गप्पा मारल्या. रात्रीचं जेवण बरोबर घेऊया असा आग्रहही केला. त्याही भेटीत एक पुस्तक भेट दिलं. भेटणार्या प्रत्येकाला पुस्तक भेट देणारा हा माणूस खरोखरंच मनापासून भावला.
त्यानंतर मग कांचन थोरात यांच्या आग्रहामुळे चिंतन आदेशमध्ये लिहायला लागले. संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिक्रिया येत राहिल्या. मध्यंतरी एकदा अचानक काही घाणेरड्या मेल यायला सुरुवात झाली. त्या वेळी मी कांचन थोरात आणि अभिनंदन थोरात यांच्याशी बोलले. सायबर क्राईमला तक्रारही नोंदवली. त्या वेळी कांचन थोरात यांनी 'आम्ही बरोबर आहोत' असे आश्वासक शब्द उच्चारले, तर अभिनंदन थोरात यांनी 'कुठलीही मदत हवी असल्यास विनासंकोच सांगा आणि आम्ही बरोबर आहोत हे लक्षात ठेवा' असं सांगितलं. कठीण प्रसंगात खंबीरपणे या नवरा-बायकोनं साथ दिली होती. काही लोक सतत आपलीशी वाटतात, कारण त्यांनी ते नातं निर्माण केलेलं असतं. अभिनंदन थोरात ही अशीच व्यक्ती होती. जाईल तिथे मैत्र निर्माण करणारी, तीही निरपेक्षपणे! असं अचानक ते जातील अशी कल्पनाही केली नव्हती आणि काल सायंकाळी स्वागतच्या मेसेजनं मन अस्वस्थ झालं. आज सकाळी कांचनताईंना, चिंतनला भेटून आले, पण तिथलं त्यांचं शांतपणे चिरनिद्रेत असणं, वातावरणातला 'श्रीराम जयराम जयजय राम' हा गंभीर नाद डोळ्यात आसवांना घेऊन आला. आता येणार्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनदंन थोरात यांचा तो धीरगंभीर शुभेच्छा देणारा आवाज पलीकडून येणार नाही!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment