मुंबई

मुंबई

तारीख

जीनियस मालिकेतल्या १२ पुस्तिकेंचं लिखाण संपलं म्हणून नव्या पुस्तकाच्या तयारीसाठी मुंबईत जाऊन पोचले. मुंबईत NCPA आणि JJ मध्ये जायचं होतं. NCPA मला खूप आवडतं. तिथली लायब्ररी इतकी मस्त आहे की तिथेच राहून २४ तास वाचावं किंवा लिहावं असं वाटतं.   पण काय, नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या मुंबईत मात्र सगळीकडे शुकशुकाट बघायला मिळाला. कारण बखरी ईदची सुट्टी होती असं चौकशी केल्यावर कळालं. मन खट्टू झाल, पण काहीच क्षण...कारण गर्दी नसलेली मुंबई तरी कधी बघायला मिळाली असती? 
मग खूपच धमाल केली. एका इराण्याच्या हॉटेलमध्ये शिरताच त्याने वेटरला सांगितलं, "इनको अभी बना हुआ ताजा अॅपल केक देदो." त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच तो म्हणाला, "खाके तो देखो पसंद नही आया तो पैसे मत दो..." त्याच्या आग्रहामुळे तो अॅपल केक खाऊन रस्त्यावरती असलेली पुस्तकं बघितली आणि काही विकत घेतली. तिथेच त्या फूटपाथवर एका पुस्तकवाल्याने पुस्तकांचा संसार खूप कुशलतेने मांडला होता. प्रत्येक पुस्तकाला प्लास्टिक लावून सुरक्षित ठेवलेलं...जगभरातलं कुठलंही पुस्तक मागितलं तरी तो त्या रचलेल्या उतरण्डीमधून काढून देत होता. एवढंच काय पण काही चांगली पुस्तकं सुचवतही होता. चेहऱ्यावर आळस नाही, वैताग नाही....की कंटाळाही नाही. त्यामुळेच की काय पण एकाऐवजी अनेक पुस्तकांची खरेदी झाली. तो विक्रेता तृप्त समाधानी असावा. कारण घासाघीस करून पैसे कमी करतानाही त्याने खळखळ केली नाही. 'पुन्हा घरी या' म्हटल्यासारखा त्याने 'फिर आना' चं आमंत्रणही निघताना दिलं.
मग दोन्ही हातात पुस्तकांचं ओझं वाहत काहीच अंतरावर फौंटन इथे असलेल्या किताबखान्याला भेट दिली. मंद आवाजातलं वाद्यसंगीत वाजत होतं आणि त्या वातावरणात अगदी तुरळक पुस्तकप्रेमी पुस्तकं चाळत होते. त्यात एक सुरेख बागबान जोडी होती. तो असेल ७५ चा आणि ती पण त्याच्या एवढीच. ती नाजूक बाहुलीसारखी आणि तो पांढर्याशुभ्र पिंजारलेल्या मऊ केसांचा...बोलक्या डोळ्यांचा....हसऱ्या मिश्कील चेहऱ्याचा...मला तो चक्क आईनस्टाईनसारखाच दिसायला लागला. (जीनियस लिहिताना झालेला ....परिणाम असावा!!!) जवळ जाऊन बोलावंसं वाटलं पण त्या दोघांना distrubed करावसं वाटेना. त्या जोडीला डोळ्यात साठवून भरपूर किताबे घेवून बाहेर..... रस्त्यावरची तुरळक रहदारी न्याहाळत....एव्हाना पोटात कावळे भुकेची सूचना देत होते. मग बांद्रा इथे असलेल्या लेमन लीफ या सुंदरशा रेस्तारंटमध्ये खाण्यावर ताव मारून घरी ...!!!! 
दुसर्या दिवशी पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्यावर समुद्रकिनारी कोणी योगा करतंय, तर कोणी शांतपणे बसून समुद्राच्या लाटा मोजतंय..एकामागून एक अशा लाटांमधून झेपावत येणारा समुद्र त्या क्षणी खूप भावला. त्याच्यातलं अवखळ मूल, त्याच्यातलं स्थितप्रज्ञ असणं, त्याच्यातली अथांगता मला खेचत राहिली कितिक वेळ ....परततानाही मन तिथेच रेंगाळत होतं.
त्या समुद्रासारखीच मुंबई वाटली या वेळी....पुन्हा एकदा वेगळ्याच रूपात ....तिची वेगवेगळ्या रूपातली अफाट ऊर्जा मला प्रेमात पाडते नेहमीच - पुनःपुन्हा!!!!
दीपा

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.