अक्षरस्पर्श
अक्षरस्पर्श वाचनालय हे भोंडे कॉलनी, कर्वेनगर रोडवर असून जास्तीत जास्त सजग वाचक तयार व्हावेत यासाठी दृष्टीमंचतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सायंकाळी 6.00 वाजता पुण्यातल्या इंद्रधनुष्य या महानगरपालिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो. यात जागतिक सर्वोत्कृष्ट चित्रपट असतात, नाटक असतं, वेगळ्या वाटेवर धडपडणार्या युवांशी संवाद असतो.
आज शनिवार, ५ सप्टेंबर २०१५ या दिवशी अक्षरस्पर्श वाचनालय, दृष्टी मंचतर्फे आयोजित ‘केकेय’ आणि ‘क्लोन’ या मूकनाट्यांचं व्यक्ती या संस्थेतर्फे सादरीकरण झालं. या दोन्ही मूकनाट्यांचं लेखन धनंजय सरदेशपांडे यांनी आणि दिग्दर्शन सुयश झुंझुर्के या युवकानं केलं होतं.
आदिवासी भागात जंगलतोड झाल्यानं नवनवीन बांधकाम होत असताना आदिवासींच्या जगण्यावर त्याचे कसे दुष्परिणाम होतायेत, तर ‘क्लोन’ या मूकनाट्यात माणूस यंत्रांच्या किती आहारी गेलाय आणि त्यात त्याची स्वप्नं कशी भरडली जाताहेत हे दाखवलं गेलं.
दोन्ही मूकनाट्यं सादरीकरण करताना दिग्दर्शकानं केलेली अफाट मेहनत जाणवली. तसंच मोठ्या संख्येनं पात्रं स्टेजवर वावरत होती, पण त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग आणि टायमिंग सेन्स जबरदस्त होता. माकडाला काठीवर लटकवून घेऊन जाणं असो, की सायकल चालवणं असो, लोकल ट्रेनमधला जीवघेणा प्रवास असो, की अग्नीच्या लपलपत्या ज्वाला असोत, पाळीव कुत्र्याचं वावरणं असो, की आईचं मुलाला मोठं करताना एक एक गोष्टी शिकवणं असो, सगळंच अप्रतिम होतं!
प्रगतीचं चाक गती वाढवतंय की कमी करतंय असा प्रश्न पडावा अशा अनेक गोष्टी खूपच सुंदररीत्या सुयशनं दाखवल्या. दोन्ही मूकनाट्यांचं संगीतही उत्कृष्टच होतं. क्लोन बघताना एकच गोष्ट थोडी खटकली, ती म्हणजे दिग्दर्शकानं पूर्ण गाणी दाखवायचा मोह थोडा टाळला असता तर बरं झालं असतं! तसंच ती दोन्ही गाणी आणि आरती इन्स्टु्रमेंटल घेतली असती, तर आणखी लज्जत वाढली असती. यापुढील भावी संकल्पांना धनंजय, सुयश आणि सार्याच कलावंतांना अक्षरस्पर्श दृष्टी मंचतर्फे खूप खूप शुभेच्छा!
आजचा कार्यक्रम बघण्यासाठी अच्युत गोडबोले, विद्या बाळ, आशा साठे, राजेंद्र बहाळकर आणि अनिल फळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!
आमच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सादर होणार्या कार्यक्रमाला अवश्य या, तसंच अक्षरस्पर्श वाचनालयालाही जरूर जरूर भेट द्या!
दीपा
Add new comment