पुरुष उवाच दिवाळी अंक २०२०

पुरुष उवाच दिवाळी अंक २०२०

तारीख

गीताली आणि मुकुंद हे माझे अगदी जवळचे मित्र. गीताली वयानं, अनुभवानं, अभ्यासानं सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठी असूनही तिने मला कायम मैत्रीण मानलं. आणि म्हणूनच  पहिल्याच भेटीपासून मी तिला कधी अहो-जाहो म्हटल्याचं आठवत नाही. गीतालीला भेटलं म्हणजे मनातलं सगळं काही बोलून त्याचा निचरा करावा असं ठिकाण. मला वाटतं मी २००९ पासून पुरूष उवाचच्या दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये सक्रिय आहे. प्रत्येक वेळी अंतर्मनात डोकावून बघायला लावणारा नवा विषय,... त्यानिमित्त मग कधी किशोरवयीन मुलांशी, तर कधी तरुणांशी, कधी ज्येष्ठांशी तर कधी सेलिब्रिंंटींशी संवाद साधून त्या त्या विषयाकडे ते कसे बघतात हे अनुभवलं. पौगंडावस्थेतल्या मुलांनी त्या वयात काय करामती केल्या किंवा त्यांच्या स्वभावात काय बदल घडत गेले, त्यांना ते कसे कळले, त्यांना त्या वेळी काय वाटलं हेही त्यांचाशी मारलेल्या गप्पांमधून समजत गेलं...याच वेळी माझ्या जवळच्या अनेक मुलांची लग्नं झाली होती आणि त्यांना बोलतं करताना मधुचंद्राची रात या विषयावर त्यांच्या अनुभवाबद्दल भरभरून ऐकता आलं. मी त्यांची दीपाताई कम मैत्रीण असल्यामुळे त्यांनी मला मनातलं सगळं काही सांगायला सुरुवात केली..कोणाची फजिती, तर कोणाची  पॅरिस टूर आणि त्यातल्या गमतीजमती...कधी एकल पालकांच्या मुलांची मानसिकता जाणून घेता आली, तर कधी पालक आपल्या मुलींकडे कसे बघतात हे बघता आलं. एकूण काय पुरुष उवाच हा फक्त दिवाळी अंक नसून आपल्या जुन्या विचारांची जळमटं काढून नव्या स्वच्छ विचारांना रुजवणारा, समृद्घ करणारा एक अनुभव आहे.
या वेळी पुरुष उवाचच्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ बघितलं आणि मनात चर्र झालं. स्थलांतरितांचा एक अस्वस्थ करणारा फोटो हेच या अंकाचं मुखपृष्ठ...तसंही मला वर्षातले ३६५ दिवस सारखेच असतात, वेगळं सेलिब्रिलेशन नसतं. पण तरीही आसपासचं दिव्यांच्या रोषणाईनं उजळून गेलेलं वातावरण हे चार दिवस वेगळे आहेत हे जाणवून देतं. तसंच या दिवाळीत कोरोनाचं संकट अजूनही डोक्यावर असताना काहींनी दिवाळी अंक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत प्रकाशित केले. त्यातलाच पुरुष उवाच दिवाळी अंक. आम्ही गेली १० वर्षं हे अंक संग्रही ठेवले आहेत असं अनेकजणांनी मला सांगितलं. 
या वेळच्या अंकात कथा आहेत, धर्म, अध्यात्म, आजचे संदर्भ, पुरुषार्थ यावर लेख आहेत, पुरुषपणाचं ओझं कसं असतं यावर काहींनी मनोगत व्यक्त केलं आहे, काहींनी चळवळींचं सामर्थ्य कशात असतं, कसं असतं यावर संवाद साधला आहे, तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कोण असतं याविषयी भाष्य केलं आहे, कविता आहेत, सहजीवन, समलैंगिकता, कोव्हिड, घराघरातला बबड्या, होमोफोबिया अशा अनेक विषयांवरचे लेख यात समाविष्ट आहेत. आणि हो आमचा कामसूत्र आणि वात्स्यायन हाही लेख यात सामील झाला आहे. लवकरच येणार्‍या जग बदलणार्‍या ग्रंथात हा लेखही अर्थातच असणार आहे.
मुकुंद किर्दत आणि गीताली यांच्यासोबत पुरुष उवाच दिवाळी अंकाचं घरगुती प्रकाशन करता आलं, त्यामुळे खूप खूप आनंद झाला. गीताली आणि मुकुंद यांनी घरी बनवलेल्या फराळाला सोबत दिल्यानं दिवाळीची रंगत आणखीनच वाढली.
जरूर वाचा, पुरुष उवाच दिवाळी २०२०.
दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.