सम्राट भेट आणि मनोविकास

सम्राट भेट आणि मनोविकास

तारीख

दोन दिवस मनोविकासच्या कार्यालयात अतिशय व्यस्ततेत गेले. 'तंत्रज्ञ जीनियस'ची छपाईची गडबड, 'कॅनव्हास' देखील आता नव्या स्वरूपात दिवाळीत दाखल होत आहे. पुढल्या प्रकल्पावरची चर्चा असं बरंच काही मनोविकासमध्ये या दोन दिवसांत घडलं. 

मनोविकासमध्ये गणेश दीक्षित या तरुणाबरोबर काम करताना वेळ भुर्रकन उडून जातो. कामात रस घेणारा, कंटाळा न करणारा आणि आमच्या पुस्तकांविषयी विशेष स्नेह असलेल्या गणेशबरोबर काम करण्याचं टयूनिंग खूप चांगलं जमलेलं आहे. लंच टाईम झाला की वडिलकीच्या धाकानं अरविंद पाटकर डोळे मोठे करत जेवायची आठवण देतात आणि मग आशिशबरोबर पुना बोर्डिंग हाऊस किंवा इतरत्र गप्पा मारत, चेष्टा करत जेवण होतं आणि पुन्हा परत येऊन नव्यानं कामाला लागता येतं. 

काम आटोपून निघताना पाटकरांना ‘बाय’ करूया म्हणून केबिनमध्ये डोकावले, तर तिथं सम्राट महाशय बसलेले! सम्राट आणि मी अर्थपूर्ण या यमाजी मालकरांच्या अंकासाठी मी लेखक म्हणून आणि सम्राट सहसंपादक म्हणून काम करताना अनेकदा आमच्या भेटी होत असत. सम्राटचा अर्थशास्त्र विषय आवडीचा. तसंच त्याची आणखी एक ओळख - त्याचे वडील म्हणजे रहस्यकथा लिहिणारे  सुप्रसिद्ध साहित्यिक सुहास शिरवळकर! मध्यंतरी त्यांच्या कादंबरीवरचा 'दुनियादारी' चित्रपट खूपच गाजला होता. 

तसंच मागच्या वर्षीच्या 'पुरोगामी जनगर्जना' या दिवाळीअंकात माझा लेख प्रसिद्ध झाला आणि तो अनेक वाचकांना खूप आवडला होता. या नियतकालिकाचा आणि दिवाळीअंकाचा कार्यकारी संपादक सम्राट आहे. या दिवाळीअंकाचं लेआऊट अर्थातच सौंदर्यपूर्ण, सकस मजुकराला साथ देणारं आणि अंक वाचत राहावा असं झालं होतं आणि याही वेळेस असेल. सम्राटच्या भेटीनं आनंद झाला आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. 

पुरोगामी जनगर्जना दिवाळी अंक-२०१८ जरूर वाचा. 

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.