वाढदिवस पाटकरांचा
आज आमच्या अरविंद पाटकर यांनी 67 व्या वर्षांत पदार्पण केलं. या कोरोनाच्या काळात त्यांचा वाढदिवस असा मोबाईलवरूनच साजरा करण्याशिवाय पर्यायच नाही. पण यानिमित्तानं मागच्या काही वाढदिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
मागच्या वाढदिवशी मी जेव्हा मनोविकासच्या ऑफीसमध्ये पोहोचले, तेव्हा मनोविकासच्या स्टाफनं एक सुरेख केक आणून ठेवला होता, त्याशिवाय आणखी एक पिल्लू केकही आणून ठेवला होता. मोठ्या केकवर आमचा ताबा नंतर असणार होता. हसत खेळत हा वाढदिवस साजरा झाल्यावर भरपूर गप्पाही रंगल्या. वाढदिवसाचं यथेच्छ खावून झाल्यावर पुन्हा गरमागरम मूगभजी आणि ताजं ताक असा बेतही सजला.
अरविंद पाटकर यांची भेट खरं तर अनेक वर्षांपूर्वी मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ऑफीसमध्ये झाली होती. पण ती भेट आठवणीत राहण्यासारखी नव्हती. अगदी धावती भेट होती. त्या भेटीतच त्यांच्या मंत्रालयात असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलविषयी देखील समजलं होतं. पुढे गुलाम या पुस्तकाच्या पूर्वतयारीच्या वेळी वाडेश्वरमध्ये त्यांची भेट झाली आणि मग या भेटींचा आणि पुस्तकांचा सिलसिला सुरूच राहिला.
मनोविकासमुळेच मी पुस्तक निर्मितीच्या तांत्रिक गोष्टीत बरीच तरबेज झाले. खूप काम, नंतर पुना गेस्ट हाउस किंवा ताराचंद अशा ठिकाणी जेवण आणि मध्येच परत काम करता करता गप्पाही रंगत. तुमचे आमचे सुपरहिरो मालिकेतून माझ्या पुस्तकांना सुरूवात झाली. मात्र मला हे नातं प्रत्येक वेळी आणखी वेगळ्या पातळीवर पोहोचल्याचा अनुभव येतो. अरविंद पाटकर, आशिश पाटकर, रीना पाटकर आणि छोटी बाहुली आहना पाटकर इतकंच काय पण गणेश दीक्षित हे सगळेच माझ्या विस्तारित कुटुंबाचा भाग केव्हाच झाले आहेत. आमचं हे नातं आता हक्काचं झालं आहे. एकमेकांची भाषा आता फार काही न सांगता कळते.
या स्नेहातूनच आमची प्रत्येक पुस्तकाची निर्मिती अतिशय देखणी होत राहते. आपल्याच घरातलं कार्य असल्यासारखे आमचे प्रकाशन समारंभही थाटात होतात. पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर पुढल्या पुस्तकाविषयीची चर्चा सुरू होते आणि खूप दिवसांत भेट नाही असं म्हणत आम्ही वाडेश्वर असो, किमया असो वा एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जेवायला जमतो. सगळेच खवैये असल्यानं जेवणाच्या टेबलवर मैफील आणखीनच रंगते. त्यांच्या ऑफीसमध्ये गेल्यावर कामाव्यतिरिक्त चहा/कॉफी घेतल्याशिवाय आणि गप्पा मारल्याशिवाय येणारा कुठलाही माणूस बाहेर पडू शकत नाही.
डाव्या विचारसरणीचे अरविंद पाटकर हे अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे विचार आणि भूमिका यांच्यात स्पष्टता आहे. अत्यंत साधी राहणी असलेल्या (बाराही महिने पांढरा शर्ट आणि पँट असा पेहराव) अशा आमच्या अरविंद पाटकरांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment