माझ्यातला किशोर जागा ठेवणारा ‘किशोर’
लहानपणी दादांचे (वडिलांचे) मित्र राघवेंद्र नळगीरकर यांच्याघरी (औरंगाबादल इथे आदर्श नगरमध्ये त्यांचं घर दुमजली घर होतं.) पहिल्यांदा ‘किशोर’चं दर्शन झालं आणि रोज त्यांच्या घरी जाऊन किशोरचे सगळे अंक हावरटसारखे वाचून काढले होते. नळगीरकाकूंनी अत्यंत व्यवस्थितपणे बांधून ठेवलेले माळ्यातले ते गठ्ठे मला खुणावत असत आणि मग रोज एक गठ्ठा काढून त्या माझ्यासमोर ठेवत. प्रत्येक अंकातल्या सगळ्या गोष्टी, कविता वाचून झाल्याशिवाय मला चैनच पडत नसे. चांदोबाप्रमाणेच ‘किशोर’ हे माझं अत्यंत आवडतं मासिक होतं....तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की एक वेळ अशी येईल की या किशोरमध्ये मी लिहीन, मुलं वाचतील, त्यांचे पालक वाचतील आणि इतकंच नाही तर मला फोन करून आवडल्याचंही सांगतील.
किशोरमध्ये ज्या वेळी मी रंगांचे राजे मालिका लिहिली, तेव्हा गावागावांतल्या शाळांमधून मला इतका सुरेख प्रतिसाद मिळाला की आम्हाला टर्नर हा चित्रकार खूप आवडला, त्याच्याविषयी आणखी माहिती सांगा ना असं म्हणणारी मुलं भेटली. ऑनलाईन त्या मुलांशी, त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधता आला.
त्यानंतर भारतीय साहित्यिक या मालिकेत प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र, फणीश्वरनाथ रेणू, हरिवंशराय बच्च्न, महाश्वेतादेवी, अशा हिंदी आणि बंगाली साहित्यिकांच्या गोष्टी मुलांना सांगता आल्या. प्रत्येक अंकाच्या वेळी किशोरच्या खास वाचकांच्या प्रतिक्रिया येत गेल्या. मात्र या वर्षीचा किशोरच्या दिवाळी अंकातल्या लेखाने काही औरच आनंद दिला.
दिवाळी सुरू होण्याआधी मी जेव्हा अनिल अवचट यांना भेटायला त्यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या ज्योतीने किशोरचा अंक आला असून आभासकुमारची गोष्ट मी वाचली आणि मला खूप आवडली असल्याचं सांगितलं. किशोर दिवाळी अंकातल्या गोष्टीची प्रतिक्रिया देणारी ज्योती ही पहिली वाचक. त्यानंतर औरंगाबादच्या शहागंजमधल्या अब्दुल या पुस्तकविक्रेत्याचा फोन आला आणि त्यांनी आपण स्वत: दूर का राही या शीर्षकातल्या आभासकुमारची गोष्ट वाचली आणि मग आपल्या मुलीलाही वाचून दाखवली असं सांगितलं. आपल्या मुलीप्रमाणेच आता आभासकुमारची गोष्ट आपण अनेक मुलांना वाचून दाखवणार असंही त्यांनी सांगितलं. नाशिकजवळच्या सिन्नरमधूनही एका शिक्षकाने आवर्जून फोन करून आभासकुमार आवडल्याचं सांगितलं, तर कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावातल्या एका पेंटरने आभासकुमारबद्दलची ही माहिती पहिल्यांदाच कळल्याचं सांगितलं. मुंबईच्या एका बँकेत काम करणाऱ्या मनोज तुळसकर यांनी किशोरचा दिवाळीअंक उघडताच तुमचंच पान समोर आलं आणि आभासकुमारला पुन्हा पुन्हा वाचल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे मनोज, त्यांची बायको, त्यांची मुलं सगळेच आभासकुमारचे चाहते असून ते जाहीर कार्यक्रमात त्याची गाणी गात असल्याचं सांगितलं. आपल्याला आभासकुमार खूप आवडत असून त्याच्याविषयीच्या अनेक नव्या गोष्टी या अंकातून कळल्याचं ते म्हणाले. एकूणच रोज जवळजवळ तीन ते चार फोन या आभासकुमारच्या चाहत्यांचे येत आहेत आणि मला अर्थातच खूप आनंद होतो आहे. तर हा आभासकुमार कोण आहे हे तुम्हाला कळलंच असेल!
हे सगळं सांगतेय याचं कारण आभासकुमार (तसा तो जगभर केव्हाच पोहोचला आहे!) शहरापासून ते खेड्यापर्यंत सर्वदूर पोहोचतोय ते किशोरमुळे. किशोरचं जाळं किती दूरपर्यंत पसरलंय याचा प्रत्यय येतो. नेहमीप्रमाणेच याही वेळी किशोरचं मुखपृष्ठ चंद्रमोहनचं असून मुलं वेगवेगळ्या खेळांमध्ये गुंग झालेली बघायला मिळतात. जीवनातलं खेळाचं महत्व, शरीराचं त्यामुळे तंदुरूस्त असणं किती महत्वाचं आहे हे या कोरोना काळात खूप चांगलं समजलं. किशोरचा दिवाळीअंक देखणा आणि दर्जेदार करण्यासाठी संपादक किरण केंद्रे यांचं खूप खूप अभिनंदन!
जशी चांदोबातली राजा-राणी, राजपुत्र-राजकन्या, राजा, भूतं, सर्वसामान्य पुरुष आणि स्त्रिया, प्राणी, बाग-बगिचा यांची चित्रं बघत राहावीत अशी असत, तसंच या वर्षीच्या दिवाळीअंकाच्या किशोरमधली आधुनिक वर्तमानाचं दर्शन घडवणारी चित्रं मनाला आकर्षून घेणारी आहेत. चारुहास पंडित, घनश्याम देशमुख, अंबिका करंदीकर, योगिता धोटे, धनश्री केळकर, राजेंद्र गिरधारी, अजय विभुते आणि माधुरी भोसले या तरुणाईने ही चित्रं रेखाटली आहेत. अतिशय बोलकी चित्रं आपल्याला त्या त्या कथेचा वेध घ्यायला भाग पाडतात.
या अंकातली कोडी, घनश्याम देशमुखांची ‘हुशार मूर्ख’ ही चित्रकथा बघताना आणि वाचताना खूप खूप मजा आली.
दिवाळीच्या पारंपरिक पद्घतीचा आकाशकंदील आणि दिवे यांनी वाचकाचं स्वागत करत किशोरचं अंतरंग दिसतं. सुरुवातीलाच दासू वैद्य यांची एक होता भातखाऊ ही कविता लैच आवडली. हा भातखाऊ मला खूपच आवडला. आई आणि जाई यांच्यातलं साम्य दाखवणारी संगीता बर्वे यांची कविताही झकासच. आपल्या चुका आपणच दुरुस्त करणाऱ्या खोडरबराची सुरेश सावंत यांची कविताही छानच आहे. पुस्तकांच्या पानापानांमध्ये गोळा झालेली फुलपाखरं वीरा राठोड यानं आपल्या कवितेतून दाखवली आहेत. शिवकन्या शशी हिने खेळ, खेळाडू आणि त्यांच्या परिश्रमाविषयी सांगितलंय. आमच्या वेळी न....असं म्हणणाऱ्या पिढीला आताची मुलं काय सांगताहेत ते मृणालिनी वनारसे यांच्या कवितेतून उलगडलं गेलं आहे. मंदा नांदूरकरचा किल्ला ही कविताही झकासच.
त्यानंतर चक्क गुलजार यांची सविता दामले यांनी अनुवाद केलेल्या ऑनलाईन क्लासरुमची मौज अनुभवायला मिळाली. कोरोना काळात आई-बाबांना क्वारंटाईन व्हावं लागलं, तेव्हा कुठल्याही कामाची सवय नसलेल्या धीरजने आई-बाबांना कसा धीर दिला आणि स्वयंपाकघराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेत समर्थपणे पेलली याची गोष्ट प्रवीण दवणे यांनी सांगितली. ब्युटिक्विन पर्सिस मेहरो, अंबी आणि तिची गँग यांची गोष्ट दिलीप प्रभावळकर यांनी खुद्द सांगितली आहे. मला यातल्या फुग्याची गोष्ट खूप खूप आणि खूप आवडली. लेखक आहेत विजय पाडळकर. अनिल अवचट यांची देवराईची गोष्ट आहे. डॉ. प्रदीप आवटे यांची गणपतीची बाईक आणि खलील यांची गोष्ट नकळत बरंच काही मोठं सांगून जाते. निसर्गातल्या घडामोडींची गोष्ट मनोज बोरगावकरने सांगितली आहे, तर महावीर जोंधळे यांनी आपल्या आठवणींना जागवत खिडकीचं महत्व अधोरेखित केलं आहे.
मनोज बोरगावकर लिखित नदीवरच्या गोष्टी वाचत असताना जिम कार्बेट अणि त्याच्या रॉबिन या कुत्र्याचा किस्सा वाचताना मला माझ्या आणि मांजरांच्या अनेक गोष्टी आठवल्या. यात खंड्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न बघून संवेदनशीलता अबाधित राखणारी आणि निसर्गाला जपत त्याच्याशी तादात्म्य पावणारी व्यक्ती मला भेटली. आणि लिहिता लिहिता एक गंमतच झाली. मनोज बोरगावकरांविषयी लिहीत असतानाच मोबाईलची रिंग वाजली आणि चक्क त्यांचाच फोन आला. मग त्यांच्या नदीने आणि माझ्या आभासकुमारने आमची दोस्ती करून दिली.
थँक्यू किशोर, आमच्यातल्या ‘किशोर’ला जिवंत ठेवल्याबद्दल!
दीपा देशमुख, पुणे.
(या अंकातले वंदना भागवत, एकनाथ आव्हाड, राजीव तांबे, मल्हार अरणकल्ले, रेणुका कल्पना, प्रमोद धायगुडे, डॉ. ऊर्जिता कुलकर्णी, अनघा तांबोळी, श्रीकांत बोंजेवार, बबन मिंडे, जाई देवळालकर, मेघश्री दळवी, फारूक काझी, अनिल साबळे, स्वाती राजे, संजय भास्कर जोशी, उत्तम कोळगावकर, रेणू गावस्कर आणि डॉ. शंतनू अभ्यंकर या दिग्गजांच्या गोष्टी वाचायच्या आहेत, त्या वाचून होताच पुनश्च लिहीनच!)
Add new comment