जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा लातूर दौरा
लातूरच्या दिशेनं गाडी धावत होती आणि मनही. मी शाळेतही जात नव्हते त्या वेळी दादा म्हणजे माझे वडील लातूरला तहसिलदार या पदावर होते. खूप मोठं क्वार्टर होतंच, पण आईच्या प्राणिप्रेमामुळे आमच्याकडे म्हैस, पिंकी नावाची अल्सेशियन कुत्री, पोपट, कोंबड्या असे प्राणी-पक्षी होते. आई स्वत: म्हशीचं दूध काढायची. बहुतेक शुक्रवारी आईबरोबर मी रेल्वेपटरीचं गेट ओलांडून एका मंदिरात/मठात/आश्रमात जायची. तिथे बालाजी किंवा देवीची आरती व्हायची. तिथल्या महाराजांनी आईला कुंकवाचा एक करंडा भेट दिला होता. लालबुंद रंगाचा, त्यावर सोनेरी आडव्या वर्तुळाकार रेषा असलेल्या तो लाकडी करंडा आईने खूप भक्तिभावाने देवघरात ठेवला होता. आजही तो देवघरात असणार. ही आठवण मी ज्या वेळी माझ्या एका मैत्रिणीला सांगितली, तेव्हा ती म्हणाली, अग, लातूरला रेल्वेस्टेशनच नाहीये. मला मात्र लख्ख आठवत होतं. या आठवणीतून मी बाहेर आले, कारण आमच्या गाडीच्या समांतर चक्क एक रेल्वे धावताना मला दिसली आणि नंतर गप्पा मारताना इथे एक जुनं रेल्वेस्टेशन कसं होतं हेही समजलं. आता मात्र शहर किती बदललंय, हे दिसत होतं. रेश्मा या तरुणीचे आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय याबद्दल संपर्क सुरू होता.
तर – लातूरच्या रस्त्यांवरून मनाचं धावणं सुरू असताना मी माझ्या बालपणीच्या आठवणी शोधत होते. लोकेशन पाठवल्यामुळे आम्ही हरिती बुक गॅलरी इथे जाऊन पोहोचलो. रणजीत लोंढे, रेश्मा यांनी आमचं स्वागत केलं. दोघंही अतिशय हुशार, विचारी असल्याचं जाणवलं. हरिती बुक गॅलरी बघून मी हरखून गेले. आठच दिवसांपूर्वी हरितीचे अनिल जायभाई यांच्याशी मी संपर्क केला होता आणि सुधीर बेडेकर लिखित एक पुस्तक मागवलं होतं. मात्र अनिल जायभाये यांना मी प्रत्यक्ष आजवर भेटले नव्हते. मी नजर फिरवली, तर माझी सगळी पुस्तकं भिंतीवर दिमाखात विराजमान झालेली दिसली. तेवढ्यात आणखी एका तरुणाने आत प्रवेश केला. अनिल जायभाये म्हणजे एखादी प्रौढ म्हणजे वयाने ज्येष्ठ व्यक्ती असावी असं मला वाटलं होतं. मात्र माझा समज या तरुणाने चुकीचा ठरवला होता. अरविंद पाटकर यांनी अनिल जायभाये यानं पुस्तक व्यवसायात काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याला या क्षेत्रात का यावंसं वाटलं हे ऐकून तर त्याचा अभिमान जास्तच वाटला. समाजभान, नागरिक म्हणून असलेली जबाबदारी आणि वाचनातून इतरांना बदलण्याचा, दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करणारा अनिल जायभाये खरोखरंच ग्रेट आहे. राहूल, अनिल यांची तळमळ कळल्यामुळे हरिती बुक गॅलरीची जागा त्यांना एक पै किराया न घेता देण्यात आली होती. अनिल जायभाये याने नुकतंच प्रकाशित केलेलं लातूर या शहराची परिपूर्ण ओळख करून देणारं बहुचर्चित पुस्तक मला आणि पाटकरांना भेट दिलं.
अरविंद पाटकर यांचे फेविकॉल फ्रेंड असलेले लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आम्हाला भेटायला आले होते. सहा फूट उंच, रंगाने गोरा, देखणा असलेला हा अधिकारी हसून आमचं स्वागत करत होता. मुख्य म्हणजे इतका डाऊन टू अर्थ की अधिकारपदाची असलेली गुर्मी कुठेही जाणवत नव्हती. त्यांचं साधेपण भावलं. आम्ही सगळेच तिथून संजय क्वालिटी नावाच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो. माझा मित्र आणि लातूर वेधचा संयोजक धनंजय कुलकर्णी तिथे येऊन पोहोचला. जवळपास ३५ वर्षांपूर्वी आमची मैत्री झाली. धनंजय मला त्या वेळी लातूरहून ह. मो. मराठेंपासून अनेकांचे लेख, वर्तमानपत्राची कात्रणं पोस्टाने आवर्जून पाठवायचा. तो औरंगाबादला आला, की आम्ही भरभरून गप्पाही मारायचो. त्याने पाठवलेली पुस्तकं, लेख, कात्रणं आणि त्याच्या गप्पा यामुळे माझ्या निर्हेतूक चाललेल्या आयुष्याला नकळत एक वाट खुणावायला लागली होती. आजही आमची मैत्री तितकीच पक्की आहे.
ज्वारीची गरमागरम भाकरी, ग्लास भरून ताक, मिरचीचा लसूण घातलेला ठेचा, एसर आमटी, लसुणी मेथी, आणि जेवणानंतर पॉटसारखं चविष्ट मँगो आईस्क्रीम…‘अहाहा’ असं जेवण झालं. जेवण जरा तिखट होतं, पण आईस्क्रीममुळे तिखटानं निमूटपणे पळ काढला. त्यातही एसर आमटी आणि वडा हा प्रकार अफलातून. आई करत असलेला एसर ढोकळा मला आठवला. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या लग्नात येणाऱ्या प्रत्येक नातलगाला मेतकूट, एसर, चिवडा-लाडूचं पाकीट आठवणीने दिलं जायचं (आताही दिलं जातं की नाही माहीत नाही!) याचीही आठवण झाली.
अरेच्च्या, हे सगळं सांगत असताना एक महत्वाची गोष्ट नमूद करायची राहूनच गेली. ती म्हणजे जेवण सुरू होण्याआधीच मुसळधार पावसानं तांडवनृत्य करायला सुरुवात केली. तो सरळ रेषेत आणि इतक्या गर्जना करत कोसळत होता की त्याचं हे रूप चकित होऊन बघतच राहावं. रणजीत, रेश्मा यांना आता कार्यक्रमाचं कसं होणार याची काळजी वाटायला लागली. मला मात्र कार्यक्रम झाला नाही तरी चालेल, पण पावसानं त्याच्या त्याच्या मर्जीनं कोसळत राहावं असंच वाटत होतं.
पावसाचा जोर जरा कमी होताच अरविंद पाटकर आणि युवराज पाटील वेगळ्या दिशेनं रवाना झाले आणि धनंजयबरोबर मी त्याच्या घरी पोहोचले. धनंजयकडे पाहुणे आलेले असतानाही त्यानं मला आग्रहाने घरी नेलं होतं. त्याच्या बायकोनं – वर्षाने मी आल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. बघता बघता कार्यक्रमाची वेळ झाली. मात्र पावसाच्या आक्रमक धोरणामुळे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहातली लाईट गेलेली होती. लाईट नसल्यामुळे अर्थातच लिफ्ट बंद होती. आधीचा पाच वाजेपर्यंत चाललेल्या कार्यक्रमाने इन्व्हर्टरची सगळी वीज वापरून टाकली होती. पावसामुळे लोकांची येण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. आयोजक म्हणून अनिल जायभाये, रणजीत लोंढे, रेश्मा आणि टीम धावपळ करत होते. अखेर लाईट आली आणि ठरलेल्या वेळेपेक्षा दीड तास उशिरा कार्यक्रम सुरू झाला.
छानसा हॉल, लोकांनी भरलेला हॉल, त्यात युवराज पाटील, अरूणा दिवेगावकर, मिलिंद पोतदार, सुनिल कुलकर्णीसह लातूरचे अनेक मान्यवर, विशेषत: तरुणांची संख्या अधिक, अगदी शाळेत शिकणारी काही मुलंही दिसत होती.
लातूरचा कार्यक्रम हरिती आणि लातूर वेध तर्फे आयोजित करण्यात आला होता. धनंजय कुलकर्णीने प्रास्ताविक केलं आणि त्यानंतर हरिती प्रकाशन आणि हरिती बुक गॅलरी विषयी अनिल जायभायेनं माहिती दिली. तरुणांचा एक गट नियमितपणे जमून पुस्तकांवर चर्चा करत असल्याचंही सांगितलं. अरविंद पाटकर यांनी वाचन संस्कृतीचं विस्तारणं का आवश्यक आहे याविषयी सांगितलं आणि त्याचबरोबर अनिल जायभाये सारख्या पुस्तकाच्या विश्वात आलेल्या तरुणांचं खूप कौतुकही केलं.
मी बोलण्यासाठी उभी राहिले आणि लातूरकरांशी आपण पहिल्यांदाच संवाद साधतो आहोत हे लक्षात आलं. लहानपणापासून परी, राजाराणी, जादूगार यांच्य कथांपासून आपण एक एक पायरी चढत कशी वेगवेगळी पुस्तकं वाचतो, त्या त्या प्रकारची पुस्तकं आपल्या जाणिवांना कशा रीतीने प्रगल्भ करतात, काय वाचायला हवं, कसं वाचायला हवं, माझा स्वत:चा वाचनाचा अनुभव आणि त्यातून लिखाणाची झालेली सुरुवात, लिखाण करण्यासाठी/संदर्भ मिळवण्यासाठी किती वाचावं लागतं आणि त्यातूनही आपल्याही नकळत आपल्यात किती बदल ही पुस्तकं घडवतात हे सांगत सांगत मी लेखन प्रवासाबद्दल बोलत ‘ग्रंथ’ या पुस्तकावर बोलले. जग बदलणारे हे ग्रंथ महत्वाचे का आहेत, त्यांनी जगावर प्रभाव कसा पाडला, हे ग्रंथकर्ते कसे होते, त्यांचं वेगळेपण काय होतं याविषयी मी बोलून थांबले. कार्यक्रम संपल्यानंतरही तरुणांनी गोलाकार बसून मला अनेक प्रश्न विचारले.
मी मात्र समाधानी नव्हते. पाऊस असेल, कार्यक्रमाला सुरू होण्यासाठी झालेला विलंब असेल किंवा आणखी काही कारणं असतील किंवा नसतील. अनेकदा तर सगळं काही आलबेल असूनही मैफील रंगतच नाही. तसं माझ्या मनात सजवलेली मैफील रंगलेली नाही असं माझं मन म्हणत राहिलं. इतर बाह्य कारणांपेक्षाही मला जे सांगायचंय ते मला सांगताच आलेलं नव्हतं. अर्थातच हा माझा माझ्या मनाशी चाललेला संवाद होता.
लातूरच्या कार्यक्रमासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर येणार होते, पण अचानक त्यांना रात्री साडेदहा वाजता पुण्यात पालकमंत्र्यासोबत होणाऱ्या मिटिंगसाठी जावं लागणार असल्यानं ते येऊ शकले नव्हते. मात्र कौस्तुभची लेखिका/कवयित्री असलेली आई अरूणा दिवेगावकर कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांनी आग्रहाने त्यांच्यासोबत घरी चलण्याचं आमंत्रण दिलं. अनिल जायभाये, युवराज पाटील, अरविंद पाटकर आणि मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी पोहोचलो. कौस्तुभ दिवेगावकरा आणि त्याची पत्नी यांनी आमचं स्वागत केलं. वेधमध्ये दोन वेळा फॅकल्टी म्हणून आलेला हा तरुण मी बघत होते. नुकतीच थिंक बँकवर त्याची मुलाखतही ऐकली होती. पुण्याकडे निघायचं असतानाही त्यानं आम्हाला वेळ दिला. वाचकांची संख्या वाढावी यासाठी मदतीला आपण नेहमीच तयार असल्याचं त्यानं पाटकरांना सांगितलं आणि हवी ती मदत करू असा शब्द दिला. आम्ही त्यांचा निरोप घेऊन आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.
धनंजयच्या घरी रेश्मा हिलाही मी आग्रहाने बोलावलं होतं. रात्री एक ते दीडपर्यंत धनंजय, रेश्मा आणि मी अनेकविध विषयांवर गप्पा मारल्या. त्यानंतर झोप कधी लागली कळलंच नाही.
27 जूनची सकाळ उजाडली. मी लातूरला येणार असं कळल्यामुळे धनंजयशी बोलून लातूरच्या ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानचे संचालक सतीश नरहरे यांनी माझा कार्यक्रम ठरवला होता. सकाळी साडेआठ वाजता धनंजय आणि मी त्यांच्या प्रयोगशील शाळेत पोहोचलो. सतीश नरहरे यांनी आमचं स्वागत केलं. मराठवाड्याचा खास पदार्थ सुशिला, शिरा यावर मी ताव मारला. सुशिला म्हणजे मुरमुऱ्याला भिजवून पोह्यासारखी दिलेली फोडणी. चवीला अप्रतिम. खरं तर इथला अतिशय स्वादिष्ट असा शिरा मी गेल्या दहा हज्जार वर्षांत खाल्ला नसल्याचं मला जाणवलं. नरहरे यांनी आपली कल्पकता आणि परिश्रम यांतून उभारलेली शाळा मी बघत होते. अनेक प्रयोगशील शाळा बघितलेल्या असल्या तरी या शाळेचं वैशिष्ट्य वेगळंच होतं. शिक्षणाबरोबरच मुलं जगणं जगताना जी कौशल्यं लागतात, जे व्यवहारज्ञान लागतं, ज्या गोष्टींची जाणीव व्हावी लागते ते ते सगळं इथे शिकत होती. मुलांचं भाजीपाला पिकवणं असो, वा त्यांच्या अर्थपूर्ण सहली असोत, मलखांब पासून ते इतर पारंपरिक खेळ असोत, वा आपापल्या वयोगटापर्यंत अनेक जबाबदाऱ्यांचं येणारं भान असो….ही मुलं या शाळेत आपला सर्वांगीण विकास करत घडत होती.
ब्रेकफास्ट होताच, तृप्त झालेली मी नरहरे सरांपाठोपाठ चालत त्यांच्या नव्या इमारतीच्या दिशेनं निघाले. ही इमारत बघताना लॉरी बेकर या आर्किटेक्टची आठवण वारंवार होत होती. कारण ही इमारतही विटांनी बांधलेली, पण प्लास्टर असणार नव्हतं. मोठमोठ्या खिडक्या, प्रशस्त वर्गखोल्या आणि हॉल, चढायला उतरायला सुटसुटीत अशा पायऱ्या….हॉलमध्ये प्रवेश करण्याआधीच माझ्या कानावर संगीतातले आरोह अवरोह पडत होते. विशेष म्हणजे साग, रेम, गप, मध, पनि, धसां, सांध, निप, धम, पग, मरे, गसा असं ही सगळी मुलं सामूहिकरित्या पण कुठेही बेसूर न होता गात होती. मी अक्षरश: तिकडे खेचली गेले. हॉलमध्ये प्रवेश करताच मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी संगीताच्या लयीत आमचं स्वागत केलं. मन प्रसन्न झालं होतं.
निवेदनकर्त्याही दोन अतिशय गोड चुणचुणीत मुली होत्या. माझ्या आणि धनंजयच्या स्वागतासाठी सगळ्यांनी मिळून एकापाठोपाठ एक गुंफलेली गाणी तालासुरात गायली. ते १० ते १२ मिनिटं आम्ही स्तब्ध होऊन, कानात ते सूर साठवून घेत होतो. हा अनुभव संपूच नये असं वाटत होतं.
धनंजय बोलायला उभा राहिला आणि आज जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीबरोबर तुमचा संवाद होणार आहे असं म्हणाला. तो अगदीच खरं बोलत होता. कारण त्या क्षणी त्या वातावरणाने आपण जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असल्याचा अनुभव दिला होता. मी बोलायला उभी राहिले. मी बोलत होते, मुलं भरभरून प्रतिसाद देत होती. त्यांना माझं बोलणं आवडत होतं. जमलेला शिक्षक वर्गही मनापासून प्रतिसाद देत होता. माझं सगळं बोलणं त्यांच्या मनापर्यंत पोहोचत होतं आणि त्याचा मला आनंद होत होता. उस्मानाबादच्या कार्यक्रमाने रंगत आणली होती, आदल्या दिवशीच्या लातूरच्या कार्यक्रमाने काहीतरी कमी असल्याचा संदेश माझ्या मनापर्यंत माझा मीच पोहोचवला होता. पण ती खंत, ती अस्वस्थता ज्ञानप्रकाशमध्ये दूर झाली होती. मी समाधानाने भरून पावले होते. माझं वय, माझं मन पुन्हा एकदा लहान होवून या शाळेत प्रवेश करण्यासाठी आग्रह करत होतं.
कार्यक्रम संपल्यानंतरही माझी पावलं परत वळण्यास तयार होत नव्हती. सतीश नरहरे सर, तुम्हा पती-पत्नी आणि सहकाऱ्यांचे अपार कष्ट आणि साकारलेलं नंदनवन यांना माझा सलाम. ही वाटचाल सोपी तर मुळीच नसणार, पण आज शिक्षणविश्वात तुम्ही लातूरसारख्या शहरात नंदनवन उभं केलं आहे, त्याची खूप खूप गरज आहे. तुमच्यासारखे हजारो/लाखो सतीश नरहरे आज शिक्षणक्षेत्रात यायला हवेत. तुम्हाला, शाळेला, मुलांना, शिक्षकांना भेटण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि तुम्हा साऱ्यांकडून भरभरून ऊर्जा घेऊन जाण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येणार आहे. सतीश नरहरे ज्या वेळी मला त्यांच्या शाळेतल्या अनेक उपक्रमांची माहिती देत होते, त्या वेळी मला त्यांनी दाखवलेल्या अल्बममध्ये माझी मैत्रीण उज्ज्वला आचरेकर दिसली. उज्ज्वला, तू या शाळेला भेट दिल्याचं बघून मला खूप खूप आणि खूप मस्त वाटलं ग. तू दिशा या कार्यक्रमासाठी आल्याचं नरहरे यांनी सांगितलं.
जडावलेल्या पावलांना दटावून धनंजय आणि मी गाडीत बसलो. केपीज फूड मॉल इथे पोहोचलो. तिथे अरविंद पाटकर, युवराज पाटील प्रतीक्षा करत होते. केपीज फूड मॉल हा युवराज पाटील यांच्या एमबीए झालेल्या करण या मुलाचा असून त्याची तिथे भेट झाली. पदार्थांमध्ये विशेष रूची आणि प्रेम असलेला करण एकदम भारी तरुण. त्याने आग्रहाने अनेक पदार्थ खाऊ घातले. दयानंद कॉलेजच्या बाजूलाच असलेला केपीज फूड मॉल चांगलाच स्थिरावणार हे दिसत होतं. युवराज पाटील यांच्या पत्नीशीही भेट झाली. त्यांना भेटून आनंद झाला. आम्ही तिथून युवराज पाटील यांच्या जिल्हा माहिती कार्यालयात गेलो. तिथे त्यांनी अरविंद पाटकर यांना स्वत: फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. आम्हाला शाल, श्रीफळ, आणि लातूर शहराची माहिती देणारं पुस्तक भेट दिलं. आम्ही लातूरमध्ये प्रवेश केल्यापासून ते लातूर बाहेर निघेपर्यंत त्यांनी आम्हाला अतिशय अगत्याने सोबत केली होती.
वेळ पुढे पुढे सरकत होता, राहिलेली काही कामं आटोपून आम्ही उमरग्याच्या दिशेनं गाडी वळवली. हो वळवली कारण उमरगा पुण्याच्या वाटेवर नव्हतं. अरविंद पाटकर यांचे कॉम्रेड मित्र अरूण रेणके आणि सुनिता चावला त्यांना २५ ते ३० वर्षांनी भेटणार होते आणि त्यासाठी ते तिथे त्यांची प्रतीक्षा करत होते.
आम्ही सायंकाळी पाच वाजता उमरगा इथे पोहाचलो. मी अगदीच लहान म्हणजे अडीच तीन वर्षांची असताना आमचे दादा उमरगा इथेही होते. तिथे त्यांनी सार्वजनिक गणपतीउत्सव सुरू केला होता. तिथे असतानाच माझा मोठा भाऊ नंदू याला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता आणि डॉक्टरांनी त्याला ताबडतोब नांदेडला घेऊन जा सांगितल्यामुळे नंदू, आई आणि मी नांदेडला तशा अस्वस्थ मनस्थितीत पोहोचलो होतो. दादा त्या वेळी दौऱ्यावर असल्यामुळे ते येईपर्यंत त्यांची वाट पाहत थांबणं शक्य नव्हतं. नांदेडला दादांचे मित्र खरोसेकर यांच्या घरी आम्ही महिनाभर राहिलो होतो. नंदूच्या पोटात १४ इंजेक्शन्स देण्यात आली होती वगैरे वगैरे. तर याच उमरगा शहरात मी कितीतरी वर्षांनी प्रवेश करत होते.
उमरग्यात अरविंद पाटकर आणि अरूण रेणके यांची अर्थातच कडकडून गळाभेट झाली. सुनिता चावला या हसतमुख स्त्रीने आमचं स्वागत केलं. त्यांचं घर म्हणजे अक्षरश: तीन डोम उभारलेले होते. मला सोलापूर जवळ असलेल्या अंकोली गावातल्या अरूण देशपांडेची आठवण झाली. निर्माणच्या शिबिरात बांबूचे डोम उभारण्याचा अयशस्वी प्रयत्न निर्माणींनी केला होता. आत शिरताच सुनिता आणि अरूण यांनी अरूण देशपांडे यांच्या आग्रहामुळेच डोमरूपी घर अस्तित्वात आल्याचं सांगितलं. अरविंद पाटकर आणि रेणके यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्या वेळात सुनिता यांनी गरमागरम भाकरी, मटण, तिथली प्रसिद्घ अशी खोबऱ्याची आमटी, उडदाची आमटी, कारल्याची चटणी असं जेवण काहीच वेळात तयार केलं. त्यांच्या डोममध्ये पुस्तकांनी भरलेली कपाटं मला ‘ये इकडे’ असं म्हणत खुणावत होती. त्या कपाटात आ. गोरेव आणि व्ला. झिम्यानिन या रशियन लेखकद्वयींनी लिहिलेलं आणि मॉस्कोमध्ये प्रकाशित झालेलं नेहरूंचं चरित्र दिसलं. अरूण रेणकेंनी वाचायला बरोबर घेऊन जा असं उदारमनाने मला सांगितलं.
अरूण आणि सुनिता यांच्या घराबाहेर वृक्षाचं रूप घेतलेल्या आणि फुलांनी आच्छादून टाकलेल्या झाडाकडे मी बघत होते. मला ते रातराणीचं झाड आहे असं कळलं, पण फेसबुकवरच्या सविता कांबळे या मैत्रिणीने मात्र ते कामिनीचं झाड असल्याचं सांगितलं. अतिशय सुरेख अशी दुधी रंगाची फुलं असून मी या झाडाच्या अक्षरश: प्रेमात पडले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. आम्ही रेणके पती-पत्नी, त्यांचा डोम आणि कामिनी वृक्ष यांचा निरोप घेत पुण्याकडे निघालो. मध्यरात्री पुण्यात पोहोचलो, मात्र उस्मानाबाद – लातूर – उमरगा आणि नेहरू यांना बरोबर घेऊन!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
(उस्मानाबाद, लातूर या दौऱ्याचं आयोजन करणारे सरस वाचक चळवळीचे सुनील बडूरकर यांचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे हा अनुभव मिळाला. )
Add new comment