कंबोडायण
२०१८ मध्ये प्रकाशित झाल्याझाल्या ‘कंबोडायण’ हे पुस्तक विकत घेतलं होतं. वेळ आल्यावर वाचू असं ठरवलं होतं. याचं कारण आर्किटेक्चर या विषयावर लिहायचं ठरवल्यापासून अनेक पुस्तकं गोळा केली होती. त्यातच संदर्भासाठी म्हणून हेही पुस्तक आणलं होतं. कोरोनाकृपेमुळे जग बदलणारे ग्रंथ, डॉ. शांतिस्वरूप भटनागर, असे एक एक प्रकल्प लिहून पूर्ण झाले असताना आर्किटेक्चरवरचं पहिल्या टप्प्यातलं लिखाण संपलं. आता फिनिशिंग सुरू केलं होतं. ५० जगप्रसिद्घ मॉन्युमेंट्स, आर्किटेक्चरचा इतिहास आणि जगप्रसिद्घ असे १० आर्किटेक्ट असं सगळं लिहून झालं होतं. प्रत्येक लेखावर काम करत असताना त्यातलाच पुढला लेख होता कंबोडियातला ‘अंगकोर वाट’.... हा लेख दोन वर्षांपूर्वीच लिहून झाला होता. त्यामुळे आता त्यात आणखी काही बघायची गरज नाही असं एक मन सांगत होतं, पण तरीही एकदा संदर्भासाठी इतर राहिलेली पुस्तकं वाचू असं वाटलं आणि ‘कंबोडायण’ हे रवी वाळेकर या लेखकाचं पुस्तक समोर आलं. पुस्तक हातात घेतलं, पेन्सिलीनं हवे ते संदर्भ शोधू आणि खुणा करू असं ठरवलं आणि .............आणि माझ्या हातातली पेन्सिल गळून पडली. मी कॅप्युटरवरची अंगकोर वाटची आधी लिहिलेली फाईल आणि कम्प्युटर बंद केला. माझ्या हातांवर, माझ्या डोळ्यांवर इतकंच नव्हे तर संपूर्णपणे माझ्यावर या पुस्तकानं कब्जा केला होता. मी ‘कंबोडायण’ वाचण्यात गुंग होऊन गेले. आशियामधला कंबोडिया नावाचा एक गरीब देश, भातशेती आणि पर्यटन यावर उपजिविका करणारा, अचानकपणे अंगकोर वाटमुळे जगासमोर आलेला, आख्ख्या जगाला चकित करणारं अंगकोर वाट हे अतिभव्य मंदिर...मंदिर म्हणायचं की जगातलं पहिलं आश्चर्य...कळत नाही, पण लेखकानं कंबोडियाचा प्रवास केला, तो अंगकोर वाट आणि आसपासची मंदिर बघण्यासाठी...त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. यू ट्यूबवर मी अंगकोर वाटचे अनेक व्हीडीयो यापूर्वी बघितले होते, पण हे पुस्तक वाचताना मी अक्षरश: झपाटून गेले. पुस्तकातलं प्रत्येक मंदिर मला ‘ये लवकर आम्हाला भेटायला’ असं म्हणत आग्रह करू लागलं. हातात पुस्तक घेतल्यापासून मला ते खालीच ठेवता आलं नाही आणि दुसरं कुठलंही काम देखील करता आलं नाही. मी वाचत होते, पानागणिक लेखकानं केलेल्या कोट्या मला हसवत होत्या, अनेक प्रसंग मला कातर करून सोडत होते, त्या त्या मंदिरांची भव्यता मला दीपवून टाकत होती, जयवर्मन, सूर्यवर्मन, ख्मेर साम्राज्याचा इतिहास मला त्या काळाची सैर करून आणत होता, वृक्षवेलींमध्ये दडलेली ती मंदिरं मला त्यांच्याशी असलेलं माझं नातं सांगण्याचा प्रयत्न करत होती, अप्सरा कशा असतात यांचं खरंखुरं दर्शन ही मंदिरं करून देत होती, पुस्तक वाचताना चहाबाज असणाऱ्याचं व्यसन घालवायचं असेल तर त्याला कंबोडियाला पाठवावं, नृत्यात शिस्त आली की मजाच जाते, सियम रिपला जाऊन अप्सरा नृत्य न बघणं म्हणजे नाशिकला जाऊन मिसळ न खाता परतणं, इंद्राविषयीची लेखकानं व्यक्त केलेली मतं, पहाटे कंबोडियण कोंबड्यानं बांग दिल्यावर खानदानी परंपरा जपणाऱ्या कोंबड्याचं लेखकानं केलेलं कौतुक, २४ तास उघडी असणारी मंदिरं बघून इथले देव दुपारी वामकुक्षी, आराम कसे करत नाहीत याबद्दलचं लेखकाचं आश्चर्य, स्त्री-पुरुष दोघांनाही राहण्यासाठी जागा देताना एकाच खोलीत जागा देऊन त्यांना समतेनं वागवणारं हॉस्टेल बघून चकित झालेला लेखक, ऑस्ट्रियातली सायकलनं जगभर प्रवास करणारी तरुण मुलगी आणि तिला मुलगी म्हणून न वाटणारी कुठलीही भीती किंवा पालकांच्या परवानगीची रीत, त्याच वेळी तिच्याच वयाच्या भारतातल्या तरुणींची मानसिकता, एकाकी मंदिरांना भेट दिल्यावर - वृद्घाश्रमात एकाकी, उदास असलेल्या आजोबांना भेटायला अचानकपणे आलेल्या नातवांना बघून जसे ते सुखावतील तसे त्या मंदिरांना वाटलं असणार असं म्हणणारा लेखक, देवळात नसलेल्या एका मूर्तीने मला आस्तिक बनवलं म्हणणारा लेखक, कंबोडियातल्या लोकांनी कुठलाही आकस न ठेवता इतिहास कसा जतन केलाय, अशा अनेक गोष्टी या पुस्तकात अंगकोर वाट आणि इतर मंदिरांविषयी जाणून घेताना उलगडत जातात. हे प्रसंग चेहऱ्यावर हास्य फुलवतात पण त्याचवेळी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. पुस्तक वाचता वाचताच मी लेखक रवी वाळेकर यांना फोन केला आणि अहो आश्चर्यम्, बोलताना मला जाणवलं की आपण तर एकमेकांना गेल्या १० हजार वर्षांपासून ओळखतो आहोत, आता औपचारिकतेची गरजच काय? पुस्तक वाचताना मला लेखकाची संवेदनशीलता केव्हाच लक्षात आली होती. एका अनोळखी कंबोडियन मुलीनं भीक मागितल्यावर तिला पैसे न देता तुला काय हवंय ते घेऊन देतो असं म्हणत तिची इवलीशी स्वप्नं पूर्ण करणारा रवी वाळेकरमधला माणूस आणि लेखक मला भावला, चाकीच्या निरागस मुलीला भेटण्याकरता त्याच्या झोपडीत जाणारा लेखक मला आवडला आणि या प्रवासात जो जो भेटेल त्यांच्याशी मैत्री करत चालणारा लेखक मला जाणवला. काही वेळा प्रवासवर्णनपर पुस्तकं वाचताना भूगोलाचं रुक्ष, कोरडं पाठ्यपुस्तक वाचतोय असा भास होतो. त्या पुस्तकातली सगळी माहिती फेर धरून नाचायला लागते आणि भूगोलाचे शिक्षक छडी घेऊन खारेवारे-मतलई वारे, अंशांश-रेखांश, दक्षिण गोलार्ध-उत्तर गोलार्ध, कुठली पीकं कुठल्या ठिकाणी, आग्नेय-नैऋत्य दिशा सांगा असं म्हणत वर्गातल्या बाकावर उभं राहण्याची शिक्षा ठोठावताना दिसतात. पण हे पुस्तक त्याला छेद देणारं आहे. प्रवासाची ज्याला किंवा जिला आवड नाही, हे पुस्तक वाचल्यावर ती किंवा तो आपली सॅक पाठीला लावून लगेचच प्रवासाला निघेल हेही नक्की. ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी फ्रान्स, भारत देश साहाय्य करत आहेत. कुठलाही देश किंवा कुठलंही ठिकाण बघताना केवळ त्याचा भूगोल महत्त्वाचा नसतो, तर तो प्रदेश, ते ठिकाण, ती माणसं, ते अनुभव, ती संस्कृती सारं काही आवश्यक असतं आणि तेच ‘कंबोडायण’ हे पुस्तक सांगतं. कंबोडायण हे पुस्तक का वाचावं असं मला कोणी विचारलं तर मी सांगेन, बौद्ध धर्मीय असलेल्या कंबोडिया या देशाबद्दल माहीत करून घेण्यासाठी वाचावं, अंगकोर वाट आणि इतर देखण्या मंदिरांसाठी वाचावं, त्याचबरोबर लेखकाला इथे भेटलेल्या टमटम (टुकटुक) च्या चाकी नावाच्या ड्रायव्हरबद्दल जाणून घेण्यासाठी वाचावं, इथे येऊन इथल्या गरिबांची मोफत सेवा करणाऱ्या फ्रेंच डॉक्टर डॅडाबद्दल माहीत करून घेण्यासाठी वाचावं, अनोळखी ठिकाणी वाढदिवसाला जाऊन माणुसकीचं एक नातं निर्माण कसं होतं याचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं, नास्तिकाला अस्तिक बनवणारं अंगकोर वाट तसं का आहे याचा प्रत्यय येण्यासाठी म्हणून हे पुस्तक वाचावं, कंबोडियाचं अभ्यासपूर्ण पण रोचक वर्णन कसं असावं हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं, प्रवास वर्णन कसं असावं याचं अप्रतिम उदाहरण देणारं पुस्तक कसं असतं हे माहीत करून घेण्यासाठी म्हणूनही वाचावं, भोज्जा म्हणत, किंवा केवळ फोटो काढत प्रेक्षणीय स्थळं पाहायची नसतात, तर आपल्यातला माणूस जागा ठेवून, माणुसकी जपत, संवेदनशीलतेनं अशी ठीकाणं बघण्यासाठी वाचावं, लेखक कसा आहे हे कळण्यासाठी वाचावं आणि एक रसरसता जिवंत अनुभव घेण्यासाठी ‘कंबोडायण’ जरूर जरूर वाचावं आणि आयुष्यात बाकी काही नाही बघितलं तरी चालेलं पण अंगकोर वाट आणि त्यानिमित्ताने कंबोडियादर्शन करण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं. इतक्या सुरेख पुस्तकाची भेट वाचकांना दिल्याबद्दल धन्यवाद रवी वाळेकर आणि धन्यवाद कॉन्टिनेन्टल प्रकाशन टीम ! दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com
Add new comment