एबारो बारो - सत्यजीत रे - अनुवाद विलास गिते
एबारो बारो - सत्यजीत रे - अनुवाद विलास गिते
कालपासून 'एबारो बारो' हा सत्यजित रे (राय) यांचा कथासंग्रह ज्याचा अनुवाद विलास गिते यांनी केला आहे वाचत होते. ‘एबारो बारो’ म्हणजे आणखी बारा! साकेत प्रकाशनानं १९९२ साली प्रकाशित केलेला हा अनुवाद आजही तितकाच ताजा वाटतो. विलास गिते यांची आणि आमची (मी आणि अच्युत गोडबोले) भेट अहमदनगर इथे एका कार्यक्रमात झाली होती. ते आमच्या कार्यक्रमाला आवर्जून आले होते. त्यांची ओळख आयोजकांनी जेव्हा करून दिली, तेव्हा त्यांचं साधेपण बघून मी थक्क झाले. खरं तर त्या भेटीत त्यांनी प्रेमानं ‘एबारो बारो’ हे पुस्तक भेट दिलं होतं. पण वाचायला अखेर आज उजाडला.
विलास गिते यांनी इतका सुरेख अनुवाद केला आहे की मूळ तपशील कधी वाचता आला नाही तरी त्याचं दुःख नाही. विलास गिते हे महाराष्ट्रातले अत्यंत आघाडीचे आणि महत्त्वाचे अनुवादक आहेत. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचा केलेला अनुवाद असो वा सत्यजीत रे यांच्या कथांचा, वाचक त्यात पूर्णपणे गुंगून जातो. नाहीतर काही अनुवाद इतके कोरडे असतात की ते वाचताना त्यात समरस होताच येत नाही. ‘एबारो बारो’ हा बारा कथांचा कथासंग्रह!
यातली ‘गणिताचे सर, गुलाबीबाबू आणि टिपू ही पहिलीच गोष्ट मनाला रंजकपणे आपल्याकडे खेचते पण त्याचबरोबर ती डोक्याला ताणही देते. एका नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या भावविश्वात पुस्तकांनी प्रवेश केलेला असतो. दिसतील ती पुस्तकं वाचता वाचता टिपूला (तर्पण) परिकथा आवडायला लागतात. फॅन्टसीच्या विश्वातला थरार, अद्भुतरम्यता त्याला आवडायला लागते. मात्र नव्यानं गणित शिकवायला आलेले गुलाबीबाबू हे शिक्षक त्याला अशा पद्धतीचं वाचन काहीही उपयोगाचं नाही सांगून त्याचं वाचन बंद करतात. या गोष्टीचं पूर्ण कथानक मी सांगत नाही. पण फॅन्टसी आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे, तीच आपल्याला अनेक गोष्टीतून कशी तारू शकते हे खूप तरल पातळीवर सत्यजीत रे म्हणजेच विलास गिते वाचकाला सांगतात.
याच पुस्तकातली साधनबाबूंचा संशय ही कथा संशयावर आधारित असून कधी खुसखुशीतपणा, तर कधी गूढ वातावरण, कधी हेरगिरी करावी असंही वाटावं असं सगळं चित्र उभं करत करत या संशयी वृत्तीनं ते स्वतःचं काय नुकसान करतात ते खूपच अनोख्या रीतीनं यात सांगितलं आहे. ‘अंबर सेन बेपत्ता हेातात’ ही कथा देखील अशीच रहस्याची उकल करत करत कशी पुढे जाते आणि कोण कोणाला कशा रीतीनं शह देतं हे अतिशय हलक्याफुलक्या शैलीत सत्यजीत रे वाचकाला सांगतात. ‘कःपदार्थ’ नावाच्या कथेत आपण बिनकामाच्या व्यक्तीला कःपदार्थ किंवा कस्पटासमान लेखतो आणि अशा वेळी अशा व्यक्तीही कशा असू शकतात याचं सुंदर चित्रण या कथेत बघायला मिळतं.
यातली 'गगन चौधरींचा स्टुडिओ' ही एक गूढकथा असून शेवटपर्यंत एक थरार आणणारं वातावरण ती आपल्याभोवती तयार करते. सत्यजीत रे यांचं वैशिष्ट्य म्हणजे कथेतलं वातावरण हुबेहूब उभं करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. हवेलीचं वर्णन, मिणमिणता उजेड, समोरच्याच्या आवाजातली धार, त्याचा पोशाख, खेचून घेणारं चुंबकीय व्यक्तिमत्व आणि स्तब्ध करणारा शेवट या सगळ्यांनी आपण कितीतरी वेळ कथानकाच्या वातावरणातून बाहेरच येऊ शकत नाही. विलास गिते यांनी केलेला सकस अनुवाद हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य! तसंच सत्यजीत रे यांचं साहित्य का वाचावं असा प्रश्न मनाला विचारला तर त्याचं उत्तर म्हणजे त्यांचा व्यापक दृष्टिकोन तर त्यांच्या लिखाणातून बोलतोच, पण त्याचबरोबर ते वाचकाची बौद्धिक उंची हळूहळू कशी वाढवतात याचा खुद्द त्या वाचकालाही पत्ता लागत नाही. म्हणूनच मुलांना ही पुस्तकं वाचायला दिलीच पाहिजेत. ही पुस्तकं लिहिणारे सत्यजीत रे कोण होते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
तरीही या पुस्तकाच्या निमित्तानं.......सत्यजीत रे किंवा सत्यजीत राय हे नाव घेतलं की भारतीय चित्रपटसृष्टीतला प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून डोळ्यासमोर येतं. सत्यजीत रे यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं गेलं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारासह भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आला. ३० मार्च १९९२ या दिवशी त्यांना ऑस्कर पारितोषिकानं गौरवलं गेलं. कधी रवींद्रनाथाचं संगीत आणि साहित्य त्यांना मोहिनी घालत असे तर कधी मुन्शी प्रेमचंदांचं कथानक ओढ लावत असे. कधी इब्सेनची नाटक त्यांना खेचून घेत, तर कधी स्वतःचे वडील सुकुमार राय यांच्या कथाही त्यांना खुणावत असत. अनेक प्रतिभावंत बंगाली साहित्यिकांच्या कलाकृती त्यांना आवडत असत. या कथानकांमधून त्यांनी स्वतःच बहुतांश चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. दिसायला देखणे असलेल्या सत्यजीत रे यांची उंची सहा फूट साडेचार इंच इतकी होती. ते केवळ एक उत्तम दिग्दर्शकच नव्हते तर एक लेखक, संपादक, चित्रकार, छायाचित्रकार, संगीतकार असे सबकुछ होते.
त्यांना पुस्तक निर्मिती करताना त्याचं ले-आऊट करता येत असे. मुखपृष्ठ असो वा आतली रेखाचित्रं त्यातही ते माहीर होतेच. कधी ते बंगालीमध्ये कथा, कादंबर्याही लिहीत तर कधी रहस्यकथाही लिहीत. त्यांच्या अनेक कथांचं इंग्रजीतूनही भाषांतर झालं आहे आणि त्या लोकप्रिय झाल्या आहेत. ‘संदेश’ नावाच्या मुलाच्या मासिकाचे ते संपादकही होते. मराठीतून त्यांचे कथासंग्रह रोहन, साकेत आणि सकाळ प्रकाशनानं केले आहेत. मराठीतून अनुवाद विलास गिते आणि काही पुस्तकांचा अशोक जैन यांनी केला आहे.
बालसाहित्यात आचार्यांच्या खुनाचं प्रकरण, अनुबिसचं रहस्य, बादशहाची अंगठी, चालत्या प्रेमाचं गूढ, दफनभूमीतील गूढ, देवतेचा शाप, फॅन्टॅस्टिक फेलुदा (रहस्यकथा १२ पुस्तकांचा संच), गंगटोकमधील गडबड, इंडिगो आणि निवडक कथा, जय बाबा फेलूनाथ, कैलासातील कारस्थान, काठमांडूतील कर्दनकाळ, केदारनाथची किमया, मृत्युघर, मुंबईचे डाकू, नंदनवनातील धोका, प्रा. शेंकू यांच्या साहसकथा, रॉबर्टसनचं माणिक, असं असतं शूटिंग, एक डझन गोष्टी असे मोजता येणार नाहीत इतके अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. आणि सगळेच दर्जेदार! ही सगळी पुस्तकं अक्षरधारा, पुस्तकपेठ, रोहन, साकेत किंवा बुकगंगामध्ये सहजपणे उपलब्ध आहेत. जरूर वाचा. आपल्या मुलांना वाचायला द्या.
दीपा देशमुख,
२ नोव्हेंबर २०१७.
Add new comment