मी हिजडा...मी लक्ष्मी!

मी हिजडा...मी लक्ष्मी!

हिजडा’ हा शब्द मोठ्यानं उच्चारणंही ज्या समाजाला नकोसं वाटतं. तो शब्द आपल्या जगण्यातला एक भाग बनवणार्‍या लक्ष्मीचं आत्मकथन म्हणजेच ‘मी हिजडा...मी लक्ष्मी!’ हे मनोविकास प्रकाशननं प्रसिद्ध केलेलं पुस्तक. टीव्हीच्या अनेक चॅनेल्सवरून आपण या लक्ष्मीला बघितलं आहे. पण दुरूनच. या आत्मकथनाद्वारे ती आपल्या खूप जवळ येऊ पहातेय किंबहुना आली आहे.
अनेक हिन्दी सिनेमात हिजड्याचे पात्र आपण पाहतो. बहुतांशी हिजडे त्यांच्या त्या खास शैलीत टाळ्या वाजवताना किंवा एखाद्या घरात जन्मलेल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असंच ते ठरावीक चित्र असतं. प्रत्यक्ष जीवनात मात्र काही खास सणांच्या वेळी, कधी ट्रेनमधून प्रवास करताना हे हिजडे टोळ्यांनी/समुहानं जवळ येतात. चौकटीतल्या स्त्री-पुरुषांपेक्षा हे हिजडे वेगळे दिसणारे - वाटणारे त्यामुळे त्यांचा तो भडक वाटणारा पेहराव बघून - बघणारा काहीतरी वेगळं जाणवून थोडा भीतीनं, थोडं टाळायचं म्हणून दूर सरकतो. पिच्छा सुटत नाही असं लक्षात आलं तर पटकन खिशातून/पर्समधून पैसे देऊन पुढे सरकतो. ही भीती, ही तुच्छता ज्या हिजड्यांच्या वाट्याला येते त्या हिजड्याचं आयुष्य कसं असतं, हिजडा होणं किंवा असणं म्हणजे काय, सर्वसामान्य स्त्री-पुरुषांपेक्षा हिजड्यातले शारीरिक आणि मानसिक बदल काय असतात, समाजातल्या बहिष्कृत होण्याच्या प्रक्रियेत ते कसे तोंड देतात, हिजड्यांची एक कम्यूनिटी असते, तिच्यात काही खास विधीही असतात ते कोणते अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं लक्ष्मीने आपल्या या आत्मकथनातून दिली आहेत. 
स्त्री आणि पुरुष या दोहोंपेक्षा निसर्गतः तिसरं रुपही असू शकतं आणि समाज म्हणून आपण ते स्वीकारायची मानसिकता तयार करणं हे पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला जाणवतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आत्मकथन तर आहेच पण त्याचबरोबर हिजड्यांचा इतिहास, त्याविषयीच्या दंतकथा, आख्यायिकाही आपल्याला पुस्तक वाचताना उलगडत जातात. 
लक्ष्मीचं पुरुष म्हणून जन्माला येणं, लहानपणापासूनच स्वतःमधलं वेगळेपण जाणवायला लागल्यानंतरचे मनात पडलेले असंख्य प्रश्‍नं...ज्या समाजात लैंगिकतेविषयी खुलेपणानं बोलणं अजून होत नाही तिथं लहानग्या लक्ष्मीनारायणच्या मनातल उठणारं काहूर आणि इतर तरुण मुलांकडून झालेले लैंगिक अत्याचार आणि त्यामुळे झालेली घुसमट...या आत्मकथनात वाचायला मिळते. परिस्थिती माणसाला घडवते. इथेही अबोल, लाजर्‍या आणि शांत असलेल्या लक्ष्मीनारायणला परिस्थितीनं कसं घडवलं आणि प्रयत्नपूर्वक तिनं स्वतःला कसं बदलवलं हे वाचताना अचंबित व्हायला होतं. सुरुवातीचा बुजरेपणा, भीडस्तपणा आणि त्यानंतर समाजाशी घेतलेली टक्कर आणि स्वतःला ओळखून त्या दिशेनं टाकलेली पावलं एका व्यक्तीला कुठे नेऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मी! उत्तर प्रदेशातल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या आणि ठाण्यात वास्तव्य करणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लक्ष्मीपासून देश-विदेशात ख्याती मिळवणार्‍या, सामाजिक कार्य करणार्‍या लक्ष्मीला जाणून घ्यायचं असेल, तसंच हा प्रवास अत्यंत खडतर होता पण तो कसा साध्य केला हेही समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. 
या नेमकेपणानं मांडलेल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ गिरीश सहाबुद्धे यांचं आहे. आतला मजकूर काय आहे यापेक्षा प्रथम वाचकाला खेचून घेणारं हे मुखपृष्ठच असतं. लक्ष्मीचं हे आत्मकथन वाचकाला खेचून घेतं. या मुखपृष्ठाचा लाल रंग अंगावर न येता वाचकाशी काही बोलू पाहतो. आपली व्यथा आपली कथा सांगू पाहतो. गिरीश सहाबुद्धे यांचं अभिनंदन. तसंच वैशाली रोडे यांनी अतिशय सुरेख भाषेत ‘मी हिजडा...’चं शब्दांकन केलं आहे. वैशाली रोडे आणि लक्ष्मी आणि तिचं कुटुंब यांच्यातला वृद्धिंगत होत जाणारा स्नेह, लक्ष्मीला वैशालीविषयीची खात्री झाल्यावर तिचं वैशाली जवळचं खुलणं, वैशालीचा निश्‍चय आणि या लिखाणासाठीचा रोज सकाळचे दोन तास स्वतंत्रपणे काढून ठाण्याला जाणं हे सारं वैशाली रोडे यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला खूप मोकळेपणे वाचकांशी संवाद करत सांगितलं आहे. खरंतर ‘लक्ष्मी आकाराला येताना...’ हे वैशाली रोडेचं मनोगत वाचतानाच वाचकाचं लक्ष्मीशी नातं जोडलं जातं आणि तो या वाचनाच्या प्रक्रियेत गुंतल्या जातो. हे पुस्तक वाचताना काही प्रश्‍नं मनात निर्माणही होतात. हिजडा ते सामान्य स्त्री-पुरुष यांच्यातली भींत पार करायला ते अडथळाही आणतात पण तरीही अनेक प्रश्‍नांची उकलही हे पुस्तक करतं. पुस्तकाच्या सुरुवातीला असलेली काव्यात्मक रचना लक्ष्मीची संवेदनशीलता, तिच्यातला हळुवारपणा व्यक्त करते. मनोविकासचे अरविंद आणि आशिश पाटकर हे चळवळींशी नातं ठेवून असलेले, वेगळ्या प्रकारच्या पुस्तकांना त्यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन असतं. त्यामुळे हे पुस्तक वेगळेपणाचा ठसा उमटवून जातं. तसंच हिजड्यांविषयी असणारे सर्वसामान्य वाचकांचे अनेक गैरसमज या आत्मकथनामुळे दूर होण्यास मदत होईल यात शंकाच नाही!

दीपा देशमुख 

लेखक - लक्ष्मीनारायण त्रिपाठी
शब्दांकन- वैशाली रोडे
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
मुखपृष्ठ - गिरीश सहाबुद्धे
पृष्ठसंख्या - १८५, मूल्य - २०० रुपये

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.