शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!
रिचर्ड फाईनमन या अवली शास्त्रज्ञानं लिहिलेलं आणि माधुरी शानबाग यांनी अनुवादित केलेलं मधुश्री पब्लिकेशनचं ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!’ या पुस्तकाची मी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. नुकतंच हे पुस्तक हातात पडलं. हे पुस्तक लिहिणारा रिचर्ड फाईनमन हा अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ! जन्मानं ज्यू असला तरी मानवता हाच धर्म मानून त्यानं विज्ञानावर आयुष्यभर प्रचंड प्रेम केलं. रिचर्ड फाईनमन हा आपलं अस्थिर आणि वादळी आयुष्य, भरकटलेपण, पारदर्शी स्वभाव, खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, बोलकी चित्रकारिता घेऊन जगासमोर आला. त्याच्यामध्ये एक कुशल संगीतकार, चिकित्सक विद्यार्थी, हाडाचा शिक्षक, हळवा प्रियकर आणि द्रष्टा वैज्ञानिक दडलेला होता. विसाव्या शतकातला ज्या शास्त्रज्ञांना प्रचंड प्रसिद्धीचं वलय लाभलं, त्यातलं पहिलं नाव आईन्स्टाईनचं होतं, तर दुसरं नाव रिचर्ड फाईनमनचं होतं! नॅनो टेक्नालॉजीचं तंत्रज्ञान आज जगभर धुमाकूळ घालतंय, पण या तंत्राची चाहूल त्यानं सर्वप्रथम १९५९ सालीच व्यक्त केली होती. ज्यानं क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स थिअरी आणि भौतिकशास्त्र या विषयात सखोल काम केलं - तो म्हणजेच - रिचर्ड फाईनमन! अणुबॉम्ब चाचणीचा स्फोट गॉगल न लावता उघड्या डोळ्यांनी बघणारा हा धाडसी माणूस होता. विशेष म्हणजे प्रचंड बुद्धिमान असलेल्या या माणसाला आपल्या बुद्धीचा जराही गर्व नव्हता.
रिचर्ड फाईनमननं विज्ञानावर लिखाण केलं, त्यानं काढलेल्या चित्रांचं पुस्तक पुढे त्याची मुलगी मिशेल हिनं त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित केलं. त्याला इतिहासात प्रचंड रस होता. गणित आणि विज्ञान यासारखे कठीण विषय सोपे करून शिकवण्यात त्याचा हातखंडा होता. 'वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवणारं शिक्षण हेच खरं शिक्षण' या म्हणण्यावर ठाम असणार्या, अनेक पदव्या, प्रतिष्ठा आणि मानसन्मान यांना नाकारत भौतिकशास्त्राची कास धरून वाटचाल करणारा हा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा एक रसिला माणूस होता.
रिचर्ड फाईनमनच्या आयुष्यात अनेक संकटं आली, अडथळे आले, पण त्यानं कधीही त्याचा बाऊ केला नाही. प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने बघणारा आणि आपलं आयुष्य समृद्ध करत जगणारा तो माणूस होता. आयुष्याच्या उतरणीच्या काळात त्याच्या पोटात गाठ झाल्याचं निमित्त झालं आणि त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. याही काळात त्यानं आपलं शिकणं आणि शिकवणं मात्र अजिबात बंद केलं नाही. तसंच याच काळात त्यानं ‘शुअरली, यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन’ हे पुस्तक लिहायला घेतलं. हे पुस्तक १९८५ साली प्रसिद्ध झालं. हे पुस्तक लिहिताना एकीकडे फाईनमन हा कॅन्सरच्या वेदना सहन करत होता, तर त्याच वेळी हा मनुष्य आपल्या भूतकाळात डोकावत अत्यंत मिश्कीलपणे पुस्तकात आपल्या आयुष्यातले प्रसंग रंगवत होता.
एकदा फाईनमन प्रिन्स्टनला गेला असताना तिथं चहापानाची औपचारिक मिटिंग आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणेच फाईनमन गबाळ्यासारखा तिथं पोहोचला होता. त्याला अशा औपचारिक कार्यक्रमांमध्ये जायला मुळीच आवडत नसे. तो आपला कसाबसा तिथे पोहोचला होता आणि कुठे बसावं असा विचार करत असतानाच खुद्द डीनची बायको जवळ आली आणि कपात चहा ओतताना म्हणाली, 'तुम्ही चहात लिंबू घ्याल की दूध?' त्यावर फाईनमन म्हणाला ‘‘दोन्ही घाला.’’ त्यावर ती डीनची बायको म्हणाली, 'नक्कीच तुम्ही हे विनोदानं म्हणताय' या तिच्या उद्गारावरूनच त्याच्या या पुस्तकाचं नाव ‘शुअरली, यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन’ पडलं!
त्यानं पुस्तकात चितारलेलं स्त्रियांचं वर्णन न आवडल्यानं त्याच्याविरोधात अनेक निदर्शनं करण्यात आली. या पुस्तकाचं शीर्षक बदलावं असाही प्रकाशकानं फाईनमनजवळ हट्ट धरला. पण फाईनमननं स्पष्ट शब्दात नकार दिला. एवढं सगळं होऊनही हे पुस्तक मात्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्याचा अनेक भाषेत अनुवाद होऊन त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. बेस्ट सेलर म्हणून ते दिमाखात आपला क्रमांक वरच्या यादीत टिकवून राहिलं. सामान्य वाचकांपासून संशोधकांपर्यंत सगळेच फाईनमनचं हे पुस्तक अत्यंत आवडीनं वाचतात.
'शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन’ या पुस्तकात रिचर्ड फाईनमनच्या बालपणापासून ते एमआयटीपर्यंतचा प्रवास चितारला आहे. लहानपणापासून फाईनमनची विज्ञानातली आवड आणि त्यातून घडणारे चित्रविचित्र पराक्रम त्यानं लिहून ठेवले आहेत. लहानपणी संपूर्ण घरभर त्याचे विज्ञानावर चाललेले प्रयोग, त्यातून रेडिओ दुरुस्तीत त्यानं मिळवलेलं प्रावीण्य आणि त्याची मॅड जीनियस म्हणून पसरलेली कीर्ती, आपल्या दूरच्या मावशीच्या रेस्टारंटमध्ये १७-१७ तास काम करत असताना आलेले गंमतीदार अनुभव, प्रिन्स्टनमधल्या काळातला अनुभव, अणुबॉम्ब प्रकल्पाविषयी, आयुष्यातल्या अनेक अनुभवांविषयी हे पुस्तक बोलत राहतं. या पुस्तकात स्वत:विषयीच्या मारलेल्या गप्पा, आपण केलेल्या चुका, आयुष्यात आलेल्या अनेक स्त्रिया, चांगलेवाईट अनुभव, दुखावले गेलेले लोक, गमतीजमती, आयुष्यातल्या रीतीभाती, शिष्टाचार त्यामुळे उडालेली धांदल, संगीतापासून ते चित्रकलेपर्यंतचे आपले छंद, शालेय शिक्षणाची परिस्थिती आणि रूक्ष अभ्यासक्रम, सरकारी यंत्रणेतल्या गमती, असं सगळं सगळं त्यानं लिहून काढलं. या पुस्तकातून रिचर्ड फाईनमनची खिलाडूपणा, संशोधक वृत्ती, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, शिक्षणाविषयी, अध्यापनाविषयी त्याची असलेली मतं, त्याचं साधं असणं आणि त्या साधेपणामागे त्याच्यावर झालेले संस्कार याविषयी अनेक प्रसंग या पुस्तकात येत राहतात आणि आपल्याला संपूर्ण रिचर्ड फाईनमन हा माणूस या पुस्तकातून उलगडत जातो.
रिचर्ड फाईनमनच्या जडणघडणीत त्याच्या पालकांचा विशेषतः त्याचे वडील मेलविल यांचा किती मोलाचा वाटा होता हे अनेक प्रसंगातून दिसून येतं. फाईनमन चालायला बोलायला लागण्याआधीच त्याच्या वडिलांनी त्याला गणिती संकल्पना कळाव्यात, निदान नजरेखालून तरी जाव्यात यासाठी आणलेले रंगीबेरंगी रंगीत तुकडे आणि त्यांच्या करावयाच्या विविध रचना, त्याच्या न कळत्या वयात त्याला आणून दिलेलं एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचं महागडं आणि स्वतःला परवडत नसतानाही आणलेलं पुस्तक, आपल्या मुलाला कळत नसलं तरी त्याला वेगवेगळी म्युझियम्स दाखव अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्याच्या वडिलांनी केल्या. त्याच्यातलं कुतूहल अबाधित राहावं यासाठी ते त्याला अनेक गोष्टी सांगत, याचाच परिणाम म्हणजे फाईनमनही लहानपणापासून गोष्टीवेल्हाळ बनला. एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तिचा गाभा समजून घ्यायला हवा असं फाईनमनचे वडील त्याला सांगत.
या पुस्तकात फाईनमनची लहान बहीण जोआन आणि त्याचे काही प्रसंग आहेत. आपल्या विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये त्यानं तिला आपली आसिस्टंटच बनवून टाकलं होतं. एकदा तिच्या वाढदिवसाला तिला सरप्राईज देण्याच्या दृष्टीनं फाईनमननं तिला घरात खालच्या मजल्यावर उभं केलं आणि वरच्या मजल्यावरून त्यानं तयार केलेल्या रेडिओवरून निवेदकाचा आवाज काढत तिला शुभेच्छा ऐकवल्या. इतकंच नाही तर तोंडानं आवाज काढत संगीतही दिलं. रेडिओवरून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्याचं बघून जोआन खुश होईल असं फाईनमनला वाटलं, पण जोआन त्याचीच बहीण होती. तिला हे सगळे उद्योग रिचर्डचेच आहेत हे केव्हाच लक्षात आलं होतं. ती त्याच्या जवळ येऊन म्हणाली, 'बाकी सगळं ठीक होतं, पण ते तोंडानं वाजवलेलं संगीत मात्र विशेष चांगलं नव्हतं!'
एमआयटीमध्ये असताना वर्गात अनेकदा गमतीदार प्रसंग घडत. पहिल्या सेमिस्टरला असताना फाईनमनचे प्राध्यापक स्ट्रेटन मोठमोठी समीकरणं फळ्यावर लिहीत आणि ती सोडवताना ते कुठे अडले की अस्वस्थ होत आणि स्वतःचाच राग येऊन हातातला खडू पुढे करून म्हणत, 'फाईनमन पुढे ये आणि आता याच्यापुढचं तूच पहा!' मग फाईनमन आत्मविश्वासानं डौलदार चालीनं त्यांच्या हातातला खडू घेऊन चुटकीसरशी ते समीकरण सोडवून दाखवत असे. कमीत कमी वेळात समीकरण कसं सोडवायचं यात त्याचा हात कोणीच धरू शकत नसे.
फाईनमन अतिशय सुंदर शिकवायचा. कांद्याचा पापुद्रा सोलत जावा तसंच आपणही त्या विषयाच्या आत आत जायला हवं असं तो म्हणत असे. कॅल्टेकच्या वास्तव्यातच स्टीफन हॉकिंगनं फाईनमनची आवर्जून भेट घेतली आणि कृष्णविवर (ब्लॅक होल) या विषयावर चर्चा केली. त्या वेळी फाईनमन एखाद्या विषयावर किती खोलवर अभ्यासपूर्ण बोलू शकतो हे स्टीफन हॉकिंगनं अनुभवलं होतं.
जेव्हा नोबेल पारितोषक मिळाल्याची बातमी सांगणारा फोन फाईनमनच्या घरी पहाटे खणाणला तेव्हा तो म्हणाला, 'पाच सहा तास उशिरा फोन केला असता आणि मग सांगितलं असतं तर चाललं नसतं का? उगाचच माझी झोपमोड झाली!' गणवेष किंवा टापटीप सूट घालणं आवडत नसलेल्या फाईनमननं नोबेल पुरस्कार स्वीकारताना मात्र खळखळ न करता सूट घातला. अर्थात गणवेष न घालण्यामागेही फाईनमनच्या मनात काही कारणं होती. लहानपणी त्याच्या वडिलांनी एकदा पोपचा वर्तमानपत्रात आलेला फोटो दाखवला. त्या फोटोत इतर सगळी माणसं त्याच्यापुढे झुकलेली दिसत होती. ते म्हणाले, 'हा पोप आणि इतर सगळी माणसं सारखीच आहेत. त्यांचं खाणं, पिणं, झोपणं, दुःखं ही देखील सारखीच आहेत. पण फरक आहे तो हा की त्या पोपनं एक वेगळा गणवेष चढवला आहे. माणसं गणवेषाला विनाकारण महत्व देतात. त्यापेक्षा त्या माणसाच्या कार्याला महत्व द्यायला हवं.' पुढच्या आयुष्यात वडिलांनी सांगितलेल्या या गोष्टीचा फाईनमनवर खूप परिणाम झाला. कपड्यांवरून माणसाची पारख फाईनमननं कधीही केली नाही.
अखेर १५ फेब्रुवारी १९८८ या दिवशी वयाच्या ६९ व्या वर्षी रिचर्ड फाईनमन हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ हे जग सोडून कायमचा निघून गेला. ४ ऑक्टोबर १९९६ या दिवशी फाईनमनच्या आयुष्यावर ‘इन्फिनिटी’ हा अमेरिकन चित्रपट निघाला. मॅथ्यु ब्रॉडरिक यानं या चित्रपटात फाईनमनची भूमिका केली, या चित्रपटाची पटकथा फाईनमननं लिहिलेल्या ‘शुअरली यू आर ज्योकिंग मि. फाईनमन’ आणि ‘व्हाय डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक’ या पुस्तकांवर बेतली आहे.
मूळ इंग्रजी भाषेत असलेलं रिचर्ड फाईनमननं लिहिलेलं ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन’ हे पुस्तक खूपच ओघवतं आणि वाचनीय आहे. वाचताना वाचक त्यात इतका रंगून जातो की ती भाषा इंग्रजी आहे की आपली मातृभाषा याचंही भान त्याला राहत नाही. ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन’ हे पुस्तक म्हणजे फाईनमनच्या पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अशा ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन’ या पुस्तकाचं मराठीत येणं खूपच आवश्यक होतं आणि ते काम मधुश्री पब्लिकेशननं केलं त्याबद्दल शरद अष्टेकर यांचं मनापासून अभिनंदन. पुस्तकाची निर्मिती, छपाई, बांधणी अतिशय सुरेख झाली आहे. या पुस्तकातले दोष काढायचे झाल्यास वाचताना काही ठिकाणी शुद्धलेखनाचे किरकोळ दोष जाणवतात. हे पुस्तक मराठीतल्या ख्यातनाम लेखिका माधुरी शानबाग यांनी मराठीतून अनुवादित केलं आहे. त्यांच्या ओघवत्या अनुवादामुळे पुस्तक रंजक झालं आहे. तसंच त्यांनी फाईनमनचं चरित्र याआधी लिहिलं होतंच. पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ चैतन्य लिमये या चित्रकारानं चितारलं आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास माणसाला किती समृद्ध करणारा असतो हे सजगपणे बघता यायला हवं असं सांगत याप्रकारचे अनेक संस्कार हे पुस्तक कळत-नकळत वाचकाच्या मनावर रुजवतं. त्यामुळे प्रत्येक पुस्तकप्रेमीनं ‘शुअरली यू आर ज्योकिंग मि. फाईनमन’ हे पुस्तक जरूर वाचायलाच हवं.
दीपा देशमुख
Add new comment