फिंद्री

फिंद्री

पहिल्यांदाच ‘फिंद्री’ हा शब्द कानावर पडला आणि पुस्तकाच्या बाजूला असलेल्या टॅगलाईनकडे लक्ष गेलं. ‘मुलीच्या नकुशीपणाची गोष्ट’. (नकुशी हा शब्द ठाऊक होता.) काही निवडक शहरं, काही निवडक घरं, त्यातही काही निवडक पालक यांच्यातून मुलींचं नको असणं आता शिल्लक राहिलेलं नाही, पण आजही भारतात अनेक राज्यांत, अनेक शहरांमध्ये मुलीचा जन्म झाला की कपाळावर आठ्या येतात आणि नुकतंच जग बघू पाहणाऱ्या तिच्या डोळ्यांना आपण पहिली जाणीव ‘तू आम्हाला नको आहेस, तुझं येणं, तुझं असणं आम्हाला आवडलेलं नाही’ याचीच करून देतो. 
‘फिंद्री’ हे सुनीता बोर्डे लिखित मनोविकास प्रकाशनाचं नुकतंच प्रसिद्घ झालेलं पुस्तक. खरं तर मुलीच्या जन्माची परवड सुरू असण्याचा प्रवास रंगवलाय त्यावरची कादंबरी. हिला कादंबरी, पुस्तक असं म्हणण्याऐवजी एक दाहक वास्तव असं संबोधावं लागेल. 

‘फिंद्री’ या कादंबरीत ग्रामीण भागातल्या संगी म्हणजेच संगीता या मुलीची कहाणी सुरू होते... बाप दारुडा, आईला सदोदित मारहाण करणारा असं चित्र बघत आलेली ही मुलगी. आईमुळे या मुलीच्या शिक्षणाचा प्रवास सुरू होतो. जन्मानं एका चांगल्या घरात असलेल्या, जन्मानंच भाषेपासून, प्रेमापासून सगळं काही मिळालेल्या अनेकांना हा प्रवास एखाद्या दु:स्वप्नासारखा वाटेल कदाचित, पण धूसर चेहरा किंवा चेहराच नसलेल्या लाखो मुली असं कष्टप्रद, उपेक्षित जगणं जगताहेत याची जाणीव होताच मनाचा थरकाप उडतो. 

‘फिंद्री’ हे पुस्तक अस्सल ग्रामीण भाषेचं दर्शन घडवणारं आहे. त्यामुळेच संगीची गोष्ट तिच्याच भाषेत वाचकाच्या अंत:करणापर्यंत येऊन भिडते. यात अनेक ठिकाणी लोकगीतं पेरलेली आहेत, शाळेत होणाऱ्या प्रार्थना आहेत. त्या प्रार्थना मनाला चांगलं होईल याचा आशावाद देत राहतात, तर लोकगीतं लोकजीवनाचं वास्तव गाण्यातून अधोरेखित करत राहतात.

नको म्हणू नारी, भरतार मायबाप
उशाचा गं साप, उलटून मारी झाप...
नको म्हणू नारी, भरतार महा भोळा
गारूडी याचं मन, केसानी कापी गळा...
नको म्हणू नारी, भरतार गं आपला
आस्तुरी जल्म देव घालूनी चुकला...

या पुस्तकातली अन्वर हुसेन यांनी रेखाटलेली रेखाचित्रं अतिशय अप्रतिम आहेत. खरं तर अप्रतिम हा शब्द अपुरा आहे. ही सगळी रेखाटनं स्त्रीचं जगणं, तिच्या चिंता, तिची परवड, तिचा न संपणारा काटेरी रस्ता, तिचं केविलवाणं झोपडं, तिथली मूक साक्षीदार असलेली असहाय्य झाडं, तिचा हरवलेला चेहरा सगळं काही समर्थपणे दाखवतात. यातलं  मिणमिणत्या दिव्‍याच्या प्रकाशात अभ्यास करणारी संगी बघून गलबलून येतं. मुखपृष्ठ देखील त्यांचच आहे. 

यात ग्रामीण आयुष्याचं दर्शन घडताना, आठवडी बाजार, केलेली खरेदी, रांधलेले पदार्थ, चुलीत कांदा कसा भाजायचा, कढीपत्ता का टाकायचा अशी वर्णनं खूप सविस्तर आहेत आणि ती वर्णनं वाचताना अनेक गोष्टी नव्‍यानं तर कळतातच, पण त्याचबरोबर ती सगळी दृश्यं समोर येऊन उभी राहतात.

लेखिका लिहिते, ‘कढीपत्ता म्हणजे फकस्त चोखणं आन् फेकणं - आक्शी बाईच्या जगण्यावाणी’ आईचं बोलणं ऐकून संगीला बाई म्हणजे काय पालापाचोळा आहे का काय? असा प्रश्न पडतो. आपली आई दगडी पाट्यावर मसाला वाटते, तेव्‍हा तिच्या लक्षात येतं, आपल्या आईनं तिच्या कितीतरी दु:खांचा जीवनाच्या पाट्यावर हिमतीच्या रुचण्यानं रगडून रगडून लगदा केला होता.

लेखिका डॉ. सुनीता बोर्डे लिहितात, ‘ आता एकाच वेळी आई डोक्यावरच्या चुंबळीवर पिशवीतलं बाजाराचं ओझं, गर्भाशयाच्या पिशवीतलं आठ महिन्यांच्या मांसाच्या गोळ्याचं ओझं, कडेवर चार वर्षांच्या मुलाचं ओझं, मनावर नवऱ्याच्या भीतीचं, माराचं ओझं, काळजावर येऊ घातलेल्या बाळंतपणाच्या काळजीचं, वेदनांचं ओझं, डोळ्यांत मुलं चांगली मोठी होऊन हे दिवस पालटतील या स्वप्नांचं ओझं - अशी कितीतरी ओझी घेऊन घराच्या ओढीनं ती झपाझपा चालत होती.’...एवढं होऊन ज्या नवऱ्यासाठी मटण आणि सामान घेऊन आलेली ‘ती’ स्वयंपाक करते, भुकेल्या मुलांच्या आधी नवऱ्याचं ताट वाढते. तो माणूसपण हरवलेला, दारूमुळे राक्षस झालेला नवरा केवळ लिंबू ताटात वाढलं नाही म्हणून तिला बेदम मारहाण करतो, भरलेलं ताट भिरकावून देतो, तेव्‍हा नरक म्हणजे वेगळा काय असतो ?

आजीच्या तोंडचं, ‘झाडाला म्हणून नही धसकट, अन् माणसाला म्हणू नही कस्पट’ तसंच ‘आयुष्यातही काही निर्णय असे असतात - आपण नुसतेच भीतीनं ते घ्यायचे टाळतो आणि चालढकल करतो. निर्णयाचा पहिला तांब्या अंगावर घ्यायला हिम्मत लागते’, ही आणि अशी अनेक अर्थपूर्ण वाक्य अंतर्मुख करून जातात. खिरणाई, कडकावडकी भांडणं, आपलमती, एधुळलोक, गदळ, पटाडा, परतपाळ, भगुलं, रबाळं, हाडुळं असे अनेक शब्द नव्‍यानं कळतात.

‘फिंद्री’ चा प्रवास अजिबात साधा नाही, मरण आलं तर बरं, आता बस्स असं वाचकाला वाटायला लागतं. नको आता पुढलं वाचायला म्हणून मीही दोन-तीन वेळा हातातलं पुस्तक ठेवून दिलं. पण ही फिंद्री डोळ्यासमोर येत राहिली आणि माझ्याकडे बघत, तिच्या जखमांनी, सुजलेल्या चेहऱ्यानं मला ‘अग, प्रवास थोडाच राहिलाय, ऐक ना माझं’ असं म्हणत राहिली. तिच्या आणि तिच्या आईच्या शरीरावरच्या आणि मनावरच्या असंख्य जखमा भरण्याआधीच पुन्हा ओल्या होत होत्या. संगीसारखी, तिच्या आईसारखी अशा एक दोन नव्‍हे तर कितिक स्त्रिया या जखमा सोबत घेऊन जगताहेत.  कधी संस्कृतीच्या नावाखाली, कधी बाईपणाच्या नावाखाली, तर कधी अज्ञानापोटी, तर कधी गरिबीपोटी....वाट्याला येणारं दु:ख सहन करत जगताहेत. असे विचार मनात येत असताना त्याच वेळी संगीच्या प्रवासातला शिक्षणाचा एक महत्वाचा टप्पा दिसला. मराठवाड्यातल्या वैजापूरजवळच्या लहानशा गावातल्या मुलीचा हा प्रवास औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात येऊन पोहोचला आणि मनाला हायसं वाटलं. 

नकोशी ठरलेल्या एका मुलीने आपल्या कष्टकरी आईची स्वप्नं खरी करण्यासाठी काट्याकुट्यातून प्रवास करत शिक्षण घेतलं.  शिक्षणामुळे तिला सावित्रीबाई फुले,  महात्मा जोतिबा फुले, ताराबाई शिंदे, हेगेल, फुको, मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले. आणि मग वाचक म्हणून मला आता तिचं जगणं सुसह्य होणार याची खात्री पटली.

शेकडो, हजारो नव्‍हे लाखो स्त्रियांना फिंद्रीपण देणाऱ्या व्‍यवस्थेला बदलवण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांचं हिरावून घेतलेलं माणूसपण त्यांना दिलं! बाबासाहेबांचं हे ऋण कसं फेडावं? 
शेवटी, जाता जाता डॉ. सुनिता बोर्डे या लेखिकेनं अतिशय समर्थपणे हा विषय हाताळला आहे. त्यांच्या पुढल्या लिखाणासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. 'नंबरकारी' या अमिता नायडू लिखित पुस्तकाप्रमाणेच ‘फिंद्री’ या पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल मनोविकास प्रकाशनाचे मनापासून आभार. 

आपल्या आसपासचं आपल्याला माहीत नसलेलं वास्तव कळण्यासाठी, आपल्यातच मग्न असलेल्या जगातून बाहेर येण्यासाठी, आपल्यातली संवेदनशीलता सतत जागी ठेवण्यासाठी ‘फिंद्री’सारखी पुस्तकं वाचायलाच हवीत. जरूर वाचा, ‘फिंद्री’.

दीपा देशमुख, पुणे 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.