दशम्या
'परतवारी'नंतर आलेलं सुधीर महाबळ या लेखकाचं दुसरं पुस्तक म्हणजे 'दशम्या'! 'दशम्या' म्हणजे प्रवासाला जाताना घरातल्या स्त्रीनं काळजीनं, मायेनं प्रवासासाठी बरोबर दिलेली शिदोरी. आयुष्याच्या प्रवासात लागणार्या अनेक वाटा....कधी पाऊलवाटा, कधी आडवळणाच्या वाटा, कधी चढउताराच्या वाटा, कधी उन्हाचे चटके देणार्या वाटा, तर कधी हलक्याशा झुळकेनं तनामनाला गारवा देणार्याही वाटा.....अशा वाटांवर अनुभवांची, भेटलेल्या माणसांची, आपण बघितलेल्या स्वप्नांची, आपल्या मूल्यांची, आपल्यावर झालेल्या संस्कारांची सोबत असते. या वाटेवरचे काही अनुभव, काही माणसं कळत-नकळत खूप काही देऊन जातात.
'दशम्या' या पुस्तकात लेखकालाही त्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटली. त्यातली काही त्यानं या पुस्तकात आपल्यासमोर पुन्हा उभी केली आहेत. या प्रत्येकाकडून त्याला काही ना काही भरभरून मिळालं आहे. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कृतज्ञ भाव आहेत. यातल्या १० लेखांमधून १० व्यक्तिचित्रं समोर येतात. त्यांनाच तो त्याच्याबरोबरच्या ‘दशम्या’ असं संबोधतो. त्याच्या प्रवासात या दशम्यांची कायमच सोबत असणार आहे. त्या कधी संपणार नाहीत.
अनेक वर्षांपासून प्रत्येक दिवाळीच्या चार दिवसांपैकी एका दिवशी लेखकाच्या घरी आलेल्या व्यक्ती ज्यात श्री. ना. पेंडसे, सुधीर फडके, मारोती चित्तमपल्ली, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, अच्युत गोडबोले, सखाराम भोईर, प्रभाकर पणशीकर, दशरथ पुजारी, गोपाळ गोडसे, डॉ. रवीन थत्ते आहेत. या सगळ्यांविषयी 'दशम्या' आपल्याशी संवाद साधतात. या सगळ्यांच्या सहवासातले लेखकाचे क्षण त्यानं शब्दबद्ध केलेले आहेत.
'दशम्या' या पुस्तकातला पहिला लेख लेखकाच्या आईविषयी बोलतो. त्याचया आठवणींच्या कोलाजमधून त्याच्या आईचं एक चित्र हळूहळू आकाराला यायला लागतं. आपल्या मुलाच्या जडणघडणीत तिची सोबत, तिचं असणं, तिचं वागणं, तिचा स्वभाव कसकशी भूमिका बजावत राहतो ते वाचक म्हणून आपल्याला उमगत जातं. लेखकाची आई कॅन्सरशी झूंज देत तो १८ वर्षांचा असतानाच गेली. मात्र जाताना, 'कधीही नाऊमेद व्हायचं नाही. तू मोठा आहेस, सगळ्यांना सांभाळ’ असं सांगून गेली. आईचे शब्द त्यानं आजतागायत पाळले. आज तो जो कोणी आहे, त्यामागे त्याच्या आईचं असणं सर्वार्थानं व्यापून टाकणार्या निरभ्र, स्वच्छ आकाशासारखं आहे.
'दशम्या'मधला शेवटचा लेख ‘आता ग्रंथात्मके देवे’ हा व्यक्तीविषयी नसून तो चक्क ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथावर लिहिला आहे. या लेखात आईमुळे त्याला लागलेली वाचनाची आवड तर येतेच, पण त्याचबरोबर ज्ञानेश्वरीनं त्याला भेटलेल्या व्यक्तींसारखीच प्रेरणा दिली, त्याचं जगणं समृद्ध केलं याची जाणीव होते. लेखकानं सजीव-निर्जीव यातलं द्वैत हा लेख घेऊन संपवून टाकलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं त्याच्यासाठी जिवंत असणं आपल्याही पदोपदी लक्षात येतं.
या पुस्तकातली माझ्या दृष्टीनं राहिलेली त्रुटी म्हणजे लेखकानं श्री. ना. पेंडसे पासून सगळ्या व्यक्ती लोकांना ठाऊकच आहेत असं गृहीत धरलंय. अर्थातच या सगळ्या व्यक्ती लौकिकार्थानं खूप मोठ्या आहेत. मात्र लेखाच्या सुरुवातीला किंवा लेख संपल्यावर एका परिच्छेदात त्या त्या व्यक्तीविषयीचा परिचय करून दिला असता, तर नव्यानं वाचणार्यांना ही माणसं जास्त चांगल्या तर्हेनं समजली असती असं वाटतं.
सुधीर महाबळ माझा मित्र! अनेक दिवसांपासून या पुस्तकावर लिहायचं असूनही इतर कामांना प्राधान्य देत राहून जात होतं. आपल्या माणसाला गृहीत धरलं जातं ते असं. अर्थात सुधीरनं कधीही याबद्दलची अपेक्षा, खंत, तक्रार माझ्याजवळ केली नाही. त्याच्या आणि माझ्या प्रत्येक भेटीत मला तो नवा विचार देऊन जातो. माझ्या मनातली अनेक कोडी त्याच्या बोलण्यानं सुटत जातात. माझ्या खाचखळग्यांनी भरलेल्या प्रवासात अचानकपणे मला भेटलेली ही सुधीररूपी 'दशमी'च आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं तुमच्याही प्रवासातल्या 'दशम्या' तुम्हाला नक्कीच आठवतील.
'दशम्या' या पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ मनीषा फडके यांनी केलं असून आतली समर्पक आणि साजेशी मांडणी प्रभाकर भोसले यांची आहे. ज्ञानदा प्रकाशनाने 'दशम्या' प्रकाशित केलं असून पुण्यात बुक गंगा, अक्षरधारा इथे उपलब्ध आहे.
अशा ‘दशम्या’ प्रत्येकाच्या प्रवासात असतील, तर तो प्रवास अर्थपूर्ण, समृद्ध करणाराच असू शकतो. जरूर वाचा 'दशम्या'!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment