पुरुष उवाच
'पुरुष उवाच' या दिवाळी अंकाला सुरू होऊन एका तपाचा कालावधी उलटून गेला. भरगच्च पानांनी, विषयांनी, चित्रांनी, कवितांनी, लेखांनी भरलेला हा अंक प्रत्येक वर्षी बघणं यातली मजा काही औरच असते. या अंकाचे सर्वेसर्वा असलेले गीताली आणि मुकुंद दोघंही अनुभव, वय, बुद्धी या सर्व गोष्टींनी माझ्यापेक्षा मोठे असूनही माझे ते सुरुवातीपासूनच खूप चांगले मित्र आहेत.
'पुरुष उवाच' मुळे तरुणाईपासून ते ज्येष्ठ मित्रांपर्यंत सर्वांना लिहितं करण्यासाठीची संधी मिळाली. त्यामुळे कधी अहंकाराचे बुरुज ढासळताना, तर कधी मधुचंद्राच्या रात्रीचा अनुभव, कधी पौगंडावस्थेतले अनुभव, कधी ब्रेकअप के बाद, अशा अनेक प्रकारच्या विषयांवर अनेक पुरूषांशी बोलण्याची संधी मिळाली आणि खूपच धमाल उडाली. शिव्या देण्यातली गंमत, चोरून ब्ल्यू फिल्म बघितल्यानंतरचा अनुभव, प्रेमात पडल्यापासून ते प्रेमभंग झाल्यानंतरची अवस्था अशा विषयांवर गप्पा झाल्यानं ही सगळीच मंडळी माझी आधी होतीच, पण पहिल्यापेक्षाही जरा जास्तच जवळची मित्र बनली. त्यांचे अनुभव 'पुरुष उवाच' च्या दिवाळी अंकात त्या त्या वर्षी प्रसिद्ध होत गेले आणि त्या विषयांमुळे या मित्रमंडळींच्या मनात उमटत असलेले तरंग मीही अनुभवले.
या वर्षी फेसबुकवरचा माझा हुशार मित्र अजिंक्य कुलकर्णी यानं बुद्धयांकावर लेख लिहिला आहे. त्याच्या फेसबुकवरच्या पोस्ट नेहमीच वाचनीय असतात. तर अच्युत गोडबोले आणि प्रदीप चंपानेरकर यांचे ‘आणि मी रडलो’ हे अनुभव डोळ्यात पाणी आणून गेले. हेमंत पाटील हे माझे नवे मित्र! आयआयटीत शिकवणारा एक बुद्धिमान प्रोफेसर, पण कुठेही गर्व नाही. अगदी नीतळ मनाचा हा मित्र गेल्या दहा हजार वर्षांपासूनचा मित्र असावा असा! या मित्राचं पाककलेतलं कौशल्य बघून मी चकितच झाले. विशेष म्हणजे स्वयंपाक करताना रस घेऊन करणं, आनंदानं करणं, सातत्यानं करणं हे सगळं एका पुरुषाच्या बाबतीत घडताना मी पहिल्यांदाच अनुभवत होते. याही मित्राचा लेख यात सामील आहे.
'पुरुष उवाच' मध्ये आनंद करंदीकर, महावीर जोंधळे, सुरेश सावंत, प्रदीप चंपानेरकर अशा अनेक दिग्गजांचेही लेख आहेत आणि ते सगळेच वाचनीय आहेत. 'पुरुष उवाच' चं मुखपृष्ठ हा माझ्यासाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो. याही वेळी मुखपृष्ठातलं नावीन्य राजू देशपांडे यांनी जपलं आहे. त्यातल्या रंगसंगतीमध्ये मी गुंतून गेले.
आज 'पुरुष उवाच' चा अंक हातात आला आणि मी तो फक्त चाळला आहे. वाचून झाला की सविस्तर प्रतिक्रिया देईनच. हा अंक बुकगंगावर ई स्वरुपात देखील उपलब्ध आहे.
तुम्हीही जरुर वाचा ‘पुरुष उवाच’! थँक्यू, गीताली आणि मुकुंद!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment