द इंडियन्स

द इंडियन्स

द इंडियन्स
काल दिवसभर पडत राहणारा पाऊस, मात्र त्याला न जुमानता भांडारकर इन्स्टिटयूटच्या सभागृहात जमलेले पुणेकर - औचित्य होतं मनोविकास प्रकाशित ‘द इंडियन्स’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचं. 
या ग्रंथाच्या निर्मितीमागची कथा - झालं असं की भारत सरकारने भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांच्या सर्वंकष अभ्यासासाठी 16 तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमली. याची घोषणा प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने 14 सप्टेंबर 2020 या दिवशी प्रसिद्ध केली. यात 12 हजार वर्षांचा भारतीय संस्कृतीचा विकास कसा झाला याबद्दलचा अभ्यास असणार होता. याआधीही म्हणजे 2017 मध्ये 14 लोकांची समिती गठित करण्यात आली होती. 14 असोत वा 16 तज्ज्ञ, मात्र यांच्यामध्ये एकही स्त्री अभ्यासक नाही, उत्तर, पूर्व किंवा दक्षिणेकडच्या राज्यातला एकही प्रतिनिधी नाही, तसंच अनुसूचित जाती आणि जमाती मधला एकही अभ्यासक नाही. समितीतले सर्वच्या सर्व सदस्य हिंदू आहेत. हजारो वर्षांपासून इथे हिंदूच कसे आहेत, तसंच हिंदू पुराणग्रंथ हे काल्पनिक नसून वास्तव सांगणारे आहेत, अशा प्रकारचा इतिहास तयार करून तो भावी काळात/पिढीत रुजवण्याचा या समितीने हेतू यातून दिसून येतो.
या सर्व गोष्टी कळताच गणेश देवी अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने जगभरातल्या अनेक अभ्यासक मंडळींशी संपर्क/संवाद साधला आणि 12 हजार वर्षांत काय काय घडलं, मग ते मनुष्याच्या उत्क्रांत होण्याबाबत असेल, त्याच्या जडणघडणीबद्दल असेल, त्याच्या सांस्कृतिक विकासाबद्दल असेल, या प्रक्रियेतल्या वेगवेगळ्या धर्मांबद्दल असेल, विविध भाषेबद्दल असेल, या सगळ्यांबद्दलची मांडणी करायची असं ठरवलं. 100 पेक्षा अधिक अभ्यासकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण या प्रकल्पात सामील होत असल्याची खात्री गणेश देवींना दिली. यात पुण्यातले अनेक लेखकही आहेत. ‘द इंडियन्स’ हा ग्रंथ मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये इंग्रजीतून प्रसिद्ध झाला आणि बरोबर वर्षभरानंतर मनोविकासतर्फे मराठीतून प्रसिद्ध होतो आहे. या पुस्तकाचं संपादन गणेश देवी, टोनी जोसेफ आणि रवी कोरीसेट्टर यांनी केलंय, तर अनुवाद शेखर साठे, प्रमोद मुजूमदार, नीतिन जरंडीकर आणि ज्ञानदा आसोलकर यांनी केलाय. हा ग्रंथ मराठीतूनच नव्‍हे, तर हिंदी, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित होण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू आहे.
‘द इंडियन्स’ या ग्रंथाचा ब्लर्ब : मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, अन्नसंकलन आणि पशुपालन करणारा भटका समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम यात दडला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासून भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपलं घर बनवण्यास प्राधान्य दिलेलं आहे. परिणामी युगानयुगे बहुसांस्कृतिकता हा इथला स्थायिभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडल्या काही विषर्यांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचं दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचं दिसून येत आहे. फेक नरेटिव्‍हज् रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या साहाय्याने भारताच्या तब्बल 12000 वर्षांच्या गतकाळाचं अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा हा ‘द इंडियन्स’  ग्रंथ आहे. यामध्ये जगभरातल्या 100 अभ्यासकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. इतिहास, तत्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण आणि राजकारण  या प्रती सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे.
अशा सगळ्या गोष्टींमुळे प्रकाशन समारंभाला उपस्थित राहणं आवश्यकच आहे असं वाटलं. कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. मनोविकासतर्फे आशीश पाटकर याने मनोविकासच्या 40 वर्षांच्या प्रवासाबद्दल, प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल आणि द इंडियन्सच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल वाचकांशी संवाद साधला. तसं पाहता अतिशय गंभीर विषय असूनही ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विचारवंत कुमार केतकर, भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांच्या उपहासात्मक शैलीतल्या संवादाने श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जितकं हास्य फुललं, तितकेच ते गंभीरही झाले. वाचन चळवळीचे कार्यकर्ते शेखर साठे यांनी सर्व अनुवादकांचा प्रतिनिधी म्हणून तसंच अनुवाद करतानाचा स्वत:चा अनुभव याबद्दल आपलं मत मांडलं. प्राच्यविद्या संशोधक आणि अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांनी वेद, विशेषत: ऋग्वेदाविषयी केलेलं विवेचन ज्ञानात भर टाकणारं होतं. इतिहासाच्या अभ्यासक आणि लेखक श्रद्धा कुंभोजकर यांनी या ग्रंथातल्या त्यांच्या योगदानाविषयी अत्यंत नम्रभावाने सांगत, सध्या विद्वानांना, त्यांच्या अभ्यासाला मान्यता नसल्याची खंत व्‍यक्‍त केली. सुप्रिया गोडबोले-चित्राव या मैत्रिणीने अतिशय उत्तम सूत्रधाराची भूमिका पार पडली. इतक्या अभ्यासपूर्ण कार्यक्रमावर आणि त्यात सामील झालेल्या दिग्गजांबद्दल बोलणं कठीण असताना तिने आपली जबाबदारी अतिशय कुशलतेने निभावली. गणेश देवी यांनी अशा विषयावर पुस्तक काढण्याचं जे साहस मनोविकास प्रकाशनाने दाखवलं त्याचं कौतुक केलं.
पावणेदोन तास चाललेला कार्यक्रम कसा संपला हे कळलंच नाही. कार्यक्रमाला या ग्रंथाचे अनेक अनुवादक, पुण्यातले मान्यवर लेखक, वाचक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ‘द इंडियन्स’ खरेदी करण्यासाठी वाचकांनी गर्दी केली.
‘द इंडियन्स’ हा ग्रंथ मी आजपासून वाचायला सुरुवात केली आहे, वाचल्यानंतर सविस्तर लिहीनच. या ग्रंथाची निर्मिती अतिशय देखणी झाली आहे, चंद्रमोहनचं अप्रतिम असं मुखपृष्ठ आहे. मानवाचा सर्वार्थाने खरा इतिहास कळण्यासाठी, आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, सजग पद्घतीने विचार करण्यासाठी जरूर वाचा ‘द इंडियन्स’.
दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.