चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...
चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...
21 सप्टेंबर 2024, सकाळी सकाळी धनूचा (धनंजय सरदेशपांडे) फोन आला, ‘दीपा तू येणार आहेस ना आजच्या कार्यक्रमाला?’ मी ‘हो’ म्हटलं.
‘दीपा पुस्तकाचं नाव काय आहे? हेच आहे ना, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...?’
‘छे रे, असं कुठे पुस्तकाचं नाव असतं का? चंदू नाटकवाला माणूस आहे ना, म्हणून त्याने आपल्याला निमंत्रण पाठवण्यासाठी त्या शैलीमध्ये पत्रिकेत सुरुवात केली असणार’, मी अकलेचे तारे तोडले.
‘काsssssय?’
‘म्हणजे त्याने जरा हटके निमंत्रण करावं म्हणून सुरुवातीला लिहिलंय, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’
‘मग त्याच्या पुस्तकाचं नाव काय आहे?’
‘थांब हं बघते.....’ मी जरा काळजीपूर्वक निमंत्रण पत्रिका बघितली म्हणजे वाचली आणि माझे सगळे तारे जमिनीवर आले, मी खजिल होत धनूला म्हटलं, ‘पुस्तकाचं नाव ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ असंच आहे’.
ठरवल्यानुसार यमाजी, अंजली (मालकर), डावकिनाचा रिच्या आणि मी ‘द बॉक्स स्टुडिओ’च्या आवारात पोहोचलो. खरं तर बऱ्यापैकी लवकर पोहोचलो असलो, तरी तिथे अनेकांची लगबग सुरू झालेली होती. सुधीर मोघे, सपत्नीक संभा (संजय भास्कर जोशी), खुद्द प्रदीप वैद्य, संजय (गंगाखेडकर), धनू (धनंजय सरदेशपांडे)....अनेकजण भेटले. तेवढ्यात छानशा सुटाबुटात अभय (जोशी) हसतच स्वागत करत समोर आला. मग प्रशांत (दळवी) खूप आत्मीयतेने भेटला. त्याच्याशी बोलत असतानाच चंदूची (उत्सवमूर्ती चंद्रकांत कुलकर्णी) बहीण संगीता आली, चंदूही भेटला. सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण होतं. बघता बघता पुण्यातलीच नव्हे, तर औरंगाबादची अनेक मंडळी दिसायला लागली. औरंगाबाद आणि पुणे एक झाल्याचा भास होत होता.
सुरुवातीलाच बाहेर असलेल्या टेबलवर विक्रीसाठी ठेवलेलं चंदूचं पुस्तक ताब्यात घेऊन टाकलं (कारण कार्यक्रम संपताच तिथे एकच झुंबड उडते हा नेहमीचा अनुभव). नाटकाची पहिली घंटा वाजताच आम्ही सगळ्यांनी आतमध्ये प्रवेश केला. काहीच मिनिटांत रसिक प्रेक्षकांनी स्टुडिओचं ‘खोकं’ पूर्णपणे खचाखच भरून गेलं. सकाळीच धनू आणि माझी, द बॉक्समध्ये गर्दी कशी सामावेल याबद्दलची चिंता करून झाली होती. असो. पण लोक भिंतीशी उभे होते. तरूणाई इतरांना आपली जागा देत होती. काहीजण समोर मांडी घालून बसले. बघता बघता पथनाट्याचा जसा माहोल असतो, सर्व बाजूंनी प्रेक्षक आणि मध्ये नाटक...तसा माहोल तयार झाला.
तिसरी घंटा वाजली आणि राजहंस प्रकाशन निर्मित ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुरू झाला.
प्रकाशनाचं वैशिष्ट्य म्हणजे अतुल पेठे, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, श्याम मनोहर, गिरीश जोशी, प्रदीप वैद्य, प्रशांत दळवी आणि अजित दळवी, असे दिग्गज नाटककार रंगमचावर आले होते. राजहंसचे दिलीप माजगांवकर आणि संपादक करुणा गोखले हे दोघंही उपस्थित होते.
गौरी देशपांडे हिने निवेदकाची भूमिका चोख बजावली. करूणा गोखले यांनी या पुस्तकाच्या संपादक म्हणून घडलेल्या गमतीजमती आणि या पुस्तकाचं काम करताना आपलीही प्रगल्भता कशी वाढली याबद्दलचे अनुभव अत्यंत खुसखुशीत शैलीत सांगितले. अचूकतेचा आग्रह, काटेकोरपणा आणि झपाटलेपणा या चंदूच्या गुणांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. विषयाचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी हे राजहंसचं ब्रिदवाक्य त्यांनी उदृत केलं आणि चंद्रकांत कुलकर्णींना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर या पुस्तकातल्या दोन लेखांचं अभिवाचन अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वतंत्रपणे केलं. मुक्ता बर्वे ज्या पद्घतीने वाचत होती, तेव्हा तिचे शब्द शब्द राहिले नव्हते तर तिने त्यातून साक्षात भक्ती बर्वे समोर उभी केली होती. त्या वेळी वातावरण भारावून टाकणारं झालं होतं. त्यानंतर चंदूने जेव्हा वाचनातून संवाद सुरू केला, तेव्हा माहीत नसलेला चंदू समोर आला. त्याच्या जडणघडणीचा काळ समोर उभा राहत असतानाच, त्याचं एक वाक्य पक्कं लक्षात राहिलं, तो म्हणाला, ‘सगळं बालपण आठ बाय दहाच्या छोट्या घरात गेल्यामुळे आज रंमंचावरच्या छोट्या लाकडी लेव्हल्सवरच्या हालचाली कम्पोज करताना मला अजिबात त्रास होत नाही आणि किशोरवयात पाहिलेल्या स्वप्नातल्या भव्यतेमुळे वाडा आणि हॅम्लेट सारखी नाटकं दिग्दर्शित करताना कसलीही अडचण येत नाही.’ तसंच ‘गरिबीमुळे प्रतिकूल परिस्थितीत ठाम उभं राहण्याची शक्ती मिळाली आणि प्रसंगानुरूप कुठेही सामावून जाण्याची लवचिकता प्राप्त झाली.’
त्यानंतर श्याम मनोहर यांनी पंधरा वाक्यच बोलेन असं म्हटलं आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांनी जे व्यक्त केलं ते अफाट ताकदीचं आहे हे जाणवलं. ते म्हणाले, चंदूकडे भरपूर ऊर्जा आहे, शिस्त आहे, सर्जनशीलता आहे, त्याचं डोकं पिसाळलेलं नाही’. मराठी नाटकाची रूढी, प्रतिभावंत आणि मग काय करायचं? अशा तीन मुद्द्यांवर ते अतिशय तिरकसपणे बोलले. रुढीला आकार आणि तर्कशास्त्र नसतं असं सांगत त्यांनी रुढी आणि परंपरा यातल्या भेदाकडे लक्ष वेधलं. कर्तृत्ववान असणं आणि प्रतिभावंत असणं यातला फरक सांगितला, तसंच सखोल चिंतन करून त्यातून जे निर्माण होतं त्याबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या अणि हे सगळं काहीच मोजक्या शब्दांमध्ये.
त्यानंतर पुण्याचं भूषण असलेले दिग्दर्शक, अभिनेते, लेखक अतुल पेठे यांनी आपल्या समकालीन मित्राचं म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी याचं या पुस्तकाबद्दल अभिनंदन केलं. आपलं 40 वर्षांपासून असलेलं मैत्र, जिगीषा या नाट्यंसस्थेने केलेली क्रांती, 1990 नंतरची परिस्थिती, जागतिकीकरणाच्या उदयाचा काळ, विस्कळीत झालेला प्रेक्षकवर्ग, आणि अशा वेळी नाट्यकर्मी म्हणून ते सगळे करत असलेलं काम याबद्दल संवाद साधला. मराठी रंगभूमीचा प्रेक्षक टिकवण्याचं आव्हान पेलताना बदलत्या परिस्थितीला सामोरं जात निर्माण झालेले प्रश्न आपापल्या पातळीवर कसे सोडवायचे ही आव्हानं सांगितली. त्याच वेळी चंदूने केलेल्या व्यावसायिक नाटकांचा उल्लेख केला. त्याच्या 82 नाटकांपैकी यळकोट, गांधी विरूद्ध गांधी, चाहूल, वाडा चिरेबंदी ही त्रिनाट्यधारा या आवडत्या नाटकांचा आवर्जून उल्लेख केला. सलग 9 तासाचं नाटक रंगभूमीवर होऊ शकतं हा विक्रम चंदूने केला याबद्दल त्याची प्रशंसा केली. तसंच आपल्याकडे समीक्षक नाहीत, मूल्यमापन नाही, राज्यकर्त्यांना कदर नाही, नाटक नीट बघायची पद्धत समाजाला ठाऊक नाही. त्याचप्रमाणे चंद्रकांत कुलकर्णी असो वा आम्ही दिग्दर्शक, आमचा सर्जनशीलतेपेक्षा मॅनेजमेंटमध्येच वेळ अधिक जातो. नवीन रंगभाषा शोधण्यासाठी आम्हाला अवसर मिळत नाही. समीक्षण होत नसल्याने आपण केलेलं काम रंगभूमीच्या कुठल्या टप्प्यात आहे, ते रंगभूमीच्या कुठल्या परिपेक्ष्यात आहे हे आम्हाला कळतच नाही. वर्तमानपत्रातली जागा इतकी आक्रसली आहेत, की नाटकांची परीक्षणंही येत नाहीत. नाटकाचं मूल्यमापन, विच्छेदन आणि परिशीलन होत नाही. चंद्रकांत कुलकर्णी, विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्या दिग्दर्शनाच्या पद्धती काय आहेत किंवा होत्या, त्यांच्या दिग्दर्शनातली ताकदीची स्थळं काय होती असं समीक्षकांना लिहावं वाटत नाही याची खंत अतुल पेठेने कळकळीने व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत कुलकर्णीचं हे पुस्तक खूप महत्वाचा दस्तावेज असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच तो खऱ्या अर्थाने मास्तर आहे हे सांगताना त्यांनी त्याच्या नाटकाच्या अफाट रेंजबद्दल, दिग्दर्शनाबद्दल आणि अभिनय कौशल्याबद्दल प्रशंसा केली. नाटक करताना रंगभूमीवर तो नाट्यमय क्षण ज्या पद्धतीने करतो, त्याची पात्रांची निवड सुयोग्य असते आणि लेखकाचा आशय तो प्रेक्षकांपर्यंत अचूकपणे पोहोचवतो इतकंच नाही तर त्याच्यावर कोणीतरी पीएचडी करायला पाहिजे असंही अतुलने म्हटलं. नाट्यसंवाद वाढला पाहिजे असं म्हणत चंदू आणि प्रशांत हे शंकर-जयकिशन जोडीसारखे आहेत असंही सांगितलं. राजहंसबद्दल बोलताना डॉ. लागूंचं पुस्तक जसं काढलं, तसंच चंद्रकांत कुलकर्णीचं हे पुस्तक अप्रतिम असल्याचं त्याने सांगितलं.
अतुल पेठेच्या तडाखेबाज संवादानंतर विजय केंकरे यांनी चंदूबद्दल पाच मिनिटांत बोलणं कठीण असल्याचं म्हटलं. भांडणाने सुरुवात झालेली चंदूबरोबरची पहिली भेट सांगितली. चंदूने आपला एक मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला असं सांगितलं. नाटक करताना मी नेहमीच सावध असायचो, पण चंदूने कधीच सावध राहून नाटक केलं नाही, तर त्याने चारचौघी सारखी नाटकं करून जोखीम घेतली. चंदूला नाटकाचा टेन्शन पॉइंट जसा उत्तम कळतो, तसाच त्याला रिलॅक्स करण्याचे पॉइंट्स सुद्धा कळतात म्ळणून तो मोठा दिग्दर्शक आहे हे विजय केंकरे यांनी नमूद केलं. चंदूच्या नाटकातले काही रिलॅक्स करण्याचे व्हिज्युअल्स कोणते आणि त्याची पात्रं कशी जमिनीवर बसतात, बोलतात याबद्दल सांगितलं. चंद्रकांतसारख्या माणसांनी म्हणजेच करणाऱ्या माणसांनी स्वत: लिहिलं पाहिजे, म्हणजे ते वाचकांपर्यंत थेट पोहोचतं हा महत्वाचा मुद्दा विजय केंकरेंनी मांडला.
त्यानंतर दत्ता बाळसराफ यांनी चंदू या नावाबरोबरच प्रशांत, प्रतीक्षा, प्रतिमा सगळी जिगीषाच कशी येते असं सांगत असताना राजहंसने केलेल्या दर्जेदार पुस्तकनिर्मितीचीही प्रशंसा केली. चंदूदादाची नाटकं भविष्याचा वेध घेणारी असून चारचौघी नाटक त्या वेळी बघून मी शॉक झालो होतो. तो आमच्यासाठी फ्युचर शॉक होता असं म्हटलं, मात्र आज तेच नाटक आज इतक्या वर्षांनी बघताना तो आजचा प्रश्न झाल्याचं दिसतंय असं सांगितलं. दत्ता बाळसराफ यांनी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ या चित्रपटाबद्दल बोलताना त्याने तुकारामाला संतपणातून बाहेर काढलं असं म्हणत कौतुक केलं. जिगीषा, त्यांचं 40 वर्षांपासूनचं मैत्र, सहकारी म्हणून सातत्याने चालणारं काम हे आजच्या घडीला एक अप्राप्य गोष्ट असल्याचं म्हटलं.
खरं तर हा कार्यक्रम एक ते सव्वा तासात न संपता, जवळजवळ दोन तास चालला. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटी वेळेचं भान ठेवून स्वत: जास्त काही न बोलता अगदी कमी शब्दांत चंदूने समारोप केला. पुस्तकप्रकाशनासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांची व्यक्तीश: नावं घेऊन ते आज कार्यक्रमासाठी येणं, आपल्याला का महत्वाचं होतं ते सांगितलं. तो पुढे म्हणाला, ‘80-90 च्या काळातले आम्ही समविचारी मित्र रोज भेटत नव्हतो, पण आमच्या नाटकाचा कंटेट, त्याची पद्धत ही प्रोग्रेसिव्ह, आणि आधुनिक संवेदनेची होती’. त्याने विंदांच्या नवता आणि परंपरा या लेखातील एका वाक्याने आपल्या बोलण्याचा शेवट केला, ‘ परंपरा घडत असताना जिचा प्रत्यय येतो ती असते नवता आणि एकदा नवता आत्मसात झाल्यावर जी मागे उरते ती असते परंपरा.
प्रकाशन समारंभात प्रतिमा कुलकर्णी, भाग्यश्री जाधव, श्रीपाद पद्माकर, रोहिणी हट्टंगडी, मंगला गोडबोले, भारत सासणे, खासदार सुप्रिया सुळे, अजित दळवी, अनुया दळवी, श्रीपाद ब्रह्मे, सुशील सुर्वे, जयश्री खारकर, संदीप खरे, चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई आणि ज्ञानेश झोटिंगसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ या पुस्तकाबद्दल बोलायचं झाल्यास राजहंसने अतिशय देखणी निर्मिती केली आहे. बघताक्षणी कुठलाही विचार न करता पुस्तक विकत घेतलंच पाहिजे ही भावना मनात निर्माण होते. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतली रचना करणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबद्दल काय बोलावं? सिर्फ नामही काफी है इतकं वाक्य त्यांच्यासाठी पुरेसं आहे. मुखपृष्ठावरचा काळसर पार्श्वभूमीसमोरचा चंदूचा बसलेल्या पोझमधला फोटो... चंद्रकांत कुलकर्णीचं व्यक्तिमत्व आणि त्याचं कर्तृत्व दाखवणारा आहे... अप्रतिम!
‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ या पुस्तकाचं पान उलटलं, की नाटकाचा पडदा दिसायला लागतो आणि तो कधीही वर जाईल आणि एका प्रवासाची सुरुवात होईल असं वाटायला लागतं. त्यानंतरची अर्पण पत्रिकाही तशीच साजेशी... अपेक्षित होती तशीच....चंदूची आई आणि प्रशांत यांना हे पुस्तक त्याने अर्पण केलंय. त्या दोघांचे तितकेच बोलके फोटो त्या पानावर आहेत. या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातले सगळेच फोटो खूपच मस्त आहेत आणि ते योग्य जागी आहेत. हे पुस्तक म्हटलं तर कॉफी टेबल बुक सारखं वाटतं आणि म्हटलं तर त्यातला संपूर्ण मजकूर बघून ते नेहमीच्या पुस्तकांसारखंही वाटतं. या पुस्तकात रंगीत फोटोही आहेत. जे त्या त्या प्रवासाचे साक्षीदार म्हणून समोर येतात. त्यामुळे हे पुस्तक देखील ब्लॅक अँड व्हाईट काळापासून इस्टमनकलर काळापर्यंतचा प्रवास घडवणारं झालं आहे.
चंदूचं मनोगत वाचकाशी गप्पा मारल्यासारखं, अनौपचारिक असं आहे. ते अत्यंत प्रांजळ झालं आहे. तिथूनच वाचक पुढचं वाचण्यासाठी उद्युक्त होतो, त्याचं लेखकाशी नातं जोडलं जातं. या पुस्तकात एकूण 34 लेख असून 36 वर्षांच्या कालावधीतल्या नाट्यप्रवासाचा आढावा यात घेण्यात आला आहे. ही 36 वर्षं औरंगाबादहून मुंबईत स्थलांतर केल्यानंतरची आहेत. असं असलं तरीही औरंगाबादमधली जडणघडण, जिगिषाची निर्मिती आणि उभारणी, त्यावेळी केलेली सभासद योजना, औरंगाबादच्या सभूमधल्या सभागृहात झालेल्या एकांकिका आणि नाटकं हे सगळंही त्यात आलंच आहे. वसंत कुंभोजकरसर, सूर्यकांत सराफ सर, आलोक चौधरी यांच्यापासून औरंगाबादच्या अनेक रथी-महारथींविषयीची कृतज्ञता आणि स्नेह चंदूने व्यक्त केलाय.
‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ या पुस्तकातून चंदूचा दिग्दर्शक होण्याचा क्षण, प्रशांतचं त्याच्या आयुष्यात असलेलं स्थान, नाटकच नव्हे तर कलाप्रकाराकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन विकसित होण्याची प्रक्रिया, प्रेक्षकांचीही बौद्धिक घुसळण होण्यास भाग पाडणारी त्याची नाटकं, या प्रक्रियेत नाटक हाच ध्यास होणं आणि नाटकच श्वास होणं हे सगळं वाचता वाचता उलगडत जातं.
चंदू स्वत:मधल्या दिग्दर्शकाचं घडणं सांगत असताना तो टीमवर्कचं महत्व आणि आवश्यकताही सांगतो. त्याच्या एकूणच लिखाणात ‘मी’ खूप कमी वेळा आलाय. ‘आम्ही’ हाच शब्दप्रयोग वारंवार आलाय. तो एका ठिकाणी म्हणतो, ‘नाटकातल्या पात्रांच्या तोंडच्या संवादांनी माझा भावनांक समृद्ध केलाय. तसंच एका ठिकाणी नाटक ही फक्त आवड, छंद किंवा जुनून नसून ज्ञान आणि आकलन वाढणारी गोष्ट आहे हेही तो सांगतो.
चंदूने याच पुस्तकाद्वारे औरंगाबादचं दर्शनही घडवलंय. औरंगाबादमधले ते ते भाग, चित्रपटगृह, त्यात लागलेले सिनेमे, ही आवड समृद्ध होत असताना सुरुवातीला अमिताभ बच्चन आवडणं आणि मोहन टॉकीजमध्ये बघितलेला मुकद्दर का सिकंदर..हे सगळं वाचताना जणूकाही हे सगळं आपणच लिहिलंय असं वाटायला लागलं. चित्रपटांनीच हळूहळू कोणते चित्रपट बघायचे, कोणते कलाकार किती उंचीचे आहेत हे शिकवलं हेही त्याच्या लेखांमधून कळत राहतं.
‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ हे पुस्तक का वाचावं? कोणी वाचावं? याबद्दल बोलताना मला सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे कार्यकर्ते खूप तळमळीने काम करतात, पण ते आपल्या कामासंबंधी, त्यांच्या निरीक्षणासंबंधी काहीही लिहून ठेवत नाहीत. बहुतेकांना ती सवयच नसते. या पुस्तकात चंदूने जिगीषाची शिस्त याबद्दल लिहिताना त्यांनी सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टींचं दस्तावेजीकरण कसं करून ठेवलंय याबद्दल सांगितलंय. मला ही गोष्ट अत्यंत महत्वाची वाटली. तर, सांगायचं हेच की एका दिग्दर्शकाचा प्रवास वाचताना लेखकालाच नव्हे तर इतरांनाही या वाटेवरून प्रवास करताना हे दस्तावेजीकरण किती उपयोगी पडेल याचा विचार मनात आला. त्या त्या वेळेसचे फोटो, त्या एकांकिका, त्या त्या वेळेस घडलेले प्रसंग यामुळे जणूकाही तोच काळ फिरून उभा राहिल्यासारखं वाटलं.
तसंच शाळेत टेबलावर आपलं पहिलं भाषण करण्यासाठी उभा असलेला चिमुकला चंदू ते आज या इथपर्यंतच्या प्रवासाने दिलेला आत्मविश्वास घेऊन उभा असलेला चंद्रकांत कुलकर्णी हा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून बघणं, अनुभवणं खूप आनंददायी गोष्ट आहे. हे पुस्तक यासाठी देखील वाचावं, की आपण सगळेच...प्रवासाचा एक एक टप्पा ओलांडत असताना आपल्यासमोरही कितीतरी आव्हानं समोर येतात, कडवट अनुभव येतात, कधी यश तर कधी अपयशाशी सामना करावा लागतो. कधी अपमान पचवावे लागतात, तर कधी आनंदाने चिंब भिंजून जावं असेही काही क्षण येतात. अशा वेळी इथे लेखकाने कुठेही कटू गोष्टींना महत्व देत त्यांचा बाऊ केलेला नाही. अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सगळं लिहिलंय. त्याची भाषेवरची पकड चांगली आहे. एका दिग्दर्शकाची निरीक्षणदृष्टी कशी असावी हे तो लिहीत गेलेल्या अनेक प्रसंगातून वाचकाला कळतं, या प्रत्येक गोष्टी कळाव्यात यासाठी देखील हे पुस्तक वाचावं.
कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, कलेच्या प्रांतात शिरू पाहणाऱ्या, शिरलेल्या सर्वांनीच हे पुस्तक वाचावं, पण कलाच नव्हे, तर कुठलंही काम करताना त्यात झोकून दिलं तर तर ते काम परिसस्पर्श झाल्यागत कसं चमकतं, कसं झळकतं हे अनुभवण्यासाठी देखील हे देखणं आणि दर्जेदार पुस्तक वाचावं!
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Add new comment