युद्धखोर अमेरिका
अमेरिका म्हटलं की तिथली समृद्धी, तिथली प्रगती, तिथलं आधुनिक राहणीमान, तिथल्या टोलेजंग इमारती, असं काय काय डोळ्यासमोर येतं. भारतातली शेकडो, हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येनं तरुणाई उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत जाण्यासाठी धडपडताना दिसते आणि शिक्षण झाल्यानंतर तिकडेच नोकरी करून स्थायिक होतानाही दिसते. या तरुणाईचे पालकही अभिमानानं आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपली मान ताठ करत आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अमेरिकेत कशी लठ्ठ पगारावर नोकरी करतेय असं सांगताना दिसतात. या पालकांच्या अधूनमधून अमेरिकावार्याही होतात. परत आल्यावर तिथून आणलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि तिथल्या नियमांचं, स्वच्छतेचं वारेमाप कौतुकही करून होतं.
वरवर पाहता अमेरिकेविषयीचं हे सगळं कौतुक सुखावणार असतं आणि आहे. मात्र याच अमेरिकेचा दुसराही एक चेहरा आहे. त्या चेहर्यामागे अमेरिकेतली प्रचंड विषमता, दारिद्र्य, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी लपलेली आहे. तसच याच अमेरिकेचा चेहरा प्रगतिशील, समानतावादी नसून साम्राज्यवादी, युद्धखोर आणि लाखो करोडो लोकांना देशोधडीला लावणारा असा क्रूर आहे. अमेरिकेचं खरं स्वरूप कळण्यासाठी जागतिक पटावरचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यास करून अतुल कहाते या प्रसिद्ध लेखकानं नुकतंच अमेरिकेच्या या काळ्या चेहर्याची ओळख या पुस्तकातून वाचकांना करून दिली आहे.
या पुस्तकात इराण, इराक, चिली, व्हिएटनाम, अफगणिस्तान, लीबिया, व्हेनेझुएला, पनामा, पुर्टो रिको, हवाई, क्युबा, हाँडुरस, फिलिपाइन्स, निगराग्वा आणि ग्वाटेमाला अशा १६ देशांच्या सुखी, स्थिर जीवनात अमेरिकेनं आपल्या वर्चस्वाची भूक भागवण्यासाठी कसा हैदोस घातला त्याची गोष्ट अतुल कहाते यांनी सांगितली आहे. कधी तेलासाठी, तर कधी आपलं स्थान बळकट करण्यासाठी, कधी लबाडीनं तर कधी दुहेरी मुखवटा लावून अमेरिकेनं अनेक डावपेच खेळत या १६ देशांची धुळधाण उडवली. अतुल कहातेंनी या पुस्तकात या सोळा देशातली भीषण परिस्थिती, तिथला विध्वंस आणि तिथल्या नेत्यांनी आणि जनतेनं निकरानं दिलेली झुंज याविषयीचं वास्तव अतिशय समर्पक शब्दांत मांडलं आहे.
यातल्या प्रत्येक देशातल्या विध्वसांचं चित्र हे पुस्तक वाचताना समोर उभं राहतं आणि मन अमेरिकेचा आर्थिक महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटीचा हा काळाकुट्ट चेहरा पाहून अक्षरशः सुन्न होतं. 'युद्धखोर अमेरिका' या पुस्तकाची सरळ सोपी ओघवती भाषा आणि त्या त्या देशातली अमेरिकेच्या घुसखोरीमुळे झालेली भीषण परिस्थिती वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो. मात्र या १६ देशांविषयीचं सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक चित्र देखील वाचकांसमोर थोडक्यात उभं केलं असतं, तर आणखी बहार आली असती असं वाटतं. 'युद्धखोर अमेरिका' या पुस्तकाचा प्रत्येक चाप्टर त्या देशाचा नकाशा घेऊन उभा राहतो. या पुस्तकाचं मुखपृष्ठ राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनी अतिशय बोलकं असं केलं आहे. जगाच्या नकाशावर असलेले हे १६ देश आपल्याला दिसतात आणि या देशांमध्ये धुमाकूळ घालणारं अमेरिकन लष्करही आपल्याला बघायला मिळतं.
३५० पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकाची किंमत ३४० रुपये असून निर्मिती रोहन प्रकाशनाची Rohan Prakashanआहे. रोहन प्रकाशनानं Rohan Champanerkar हा अतिशय महत्वाचा विषय हाती घेऊन त्याची दर्जेदार निर्मिती करत या पुस्तकाला योग्य न्याय मिळवून दिला आहे. प्रत्येक सुजाण, सजग आणि सतर्क नागरिकानं हे पुस्तक जरूर जरूर वाचायलाच हवं!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment