रिटी नावाच्या मुलाची गोष्ट! - मनशक्ती दिवाळी 2018
१९१८ साली अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या मॅनहटन या भागात मेलविल आणि ल्यूसिल यांनी रिचर्ड नावाच्या मुलाला जन्म दिला. रिचर्डला घरातले सगळे रिटी या नावानं हाक मारत. रिटीला जोआन नावाची एक बहीणही होती. रिटी आणि जोआन या दोघांना घेऊन त्यांचे आईवडील अनेक वस्तूसंग्रहालयात जात. तिथले प्राणी, प्राण्यांचे सांगाडे बघून रिटी आणि जोआन आश्चर्यचकित होत आणि मग त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांचे वडील न कंटाळता, न चिडता त्यांना देत असत.
रिटीच्या घरात जरी गरिबी असली तरी घरातलं वातावरण खूप छान आनंदी असायचं. सगळे मिळून कामं करत. त्या कामांचा बाऊ केला जात नसे. रिटीला सायकल घेऊन चक्कर मारणं खूप आवडत असे. तसंच त्या वेळी त्याच्या कल्पनेतल्या पक्ष्यांनी उंचच उंच भरारी घेतलेली असे. अशा वेळी तो स्वतःच्या मनानं अनेक गोष्टी रचत असे आणि घरी परतून येईपर्यंत त्या गोष्टीचा विस्तार करून ती रंगवून सांगत असे.
रिटीच्या वडिलांनी त्याला विज्ञानाची गोडी लावली. रिटीनं आपल्या घरातल्या कपाटात आपलं सगळं साहित्य ठेवलं होतं. तीच त्याची प्रयोगशाळा होती. यात वेगवेगळी रसायनं, भिंगं, फोटोग्राफीची साधनं, तारा आणि बॅटर्या अशा अनेक वस्तू भंगारातून आणलेल्या असत. अशा वस्तू फुकट किंवा अगदी कवडीमोल भावानं विकत मिळत. त्यात कधी जुना रेडिओ उघडून बस, त्या रेडिओच्या आतल्या रचनेचा अभ्यास कर, असे वेळ मिळेल तेव्हा प्रयोग करून बघणं हाही त्याचा आवडता उद्योग झाला होता. संपूर्ण घरात वायरिंग करून कुठल्याही खोलीत रेडिओ ऐकता येईल अशी व्यवस्था त्यानं करून ठेवली होती. जोआन आपल्या भावाची एकमेव हक्काची असिस्टंट असायची. मित्रांना जमवायचं आणि त्यांना विजेचा शॉक कसा बसतो यासाठी अनेक प्रयोग करून दाखवायचे हा तर रिटीचा आवडता खेळ असे.
एकदा रिटीचे आई-वडील बाहेर गेले असताना त्यानं घराचं बाहेरचं दार उघडल्यावर मोठा आवाज होईल असं उपकरण बनवलं. रात्री जेव्हा दोघं घरी परतले, तेव्हा दार उघडताच मोठ्ठा आवाज आला. दोघंही घाबरून ओरडणार, तोच रिटीनं आनंदानं ‘इट वर्क्स, इट वर्क्स’ म्हणत टाळ्या पिटायला सुरुवात केली. चोर आले तर त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी त्यानं बनवलेला तो बर्गलर्स अलार्म होता असं त्यानं आपल्या आई-वडिलांना सांगितलं. ‘करके देखो’ प्रमाणेच ‘करा आणि झालेल्या चुका सुधारत सुधारत पुढे जा’ ही पद्धत तो काम करताना वापरत असे. त्यांच्या घरात रिटी आणि जोआन यांच्या अनेक वस्तू नेहमीच विखुरलेल्या असत. कधी त्याच्या कपाटवजा प्रयोगशाळेतून धूर निघत असल्याचं दृश्य दिसे, तर कधी घरातल्या कपड्यांवर काळे, निळे, हिरवे डाग पडलेले बघायला मिळत. कधी घरभर मुद्दाम केलेला कचरा असे, तर कधी घरभर कुठलीतरी वस्तू जळाल्याचा वास घमघमत असे. रिटीच्या शेजारणी त्याच्या आईला विचारत, की ती इतका गोंधळ आणि पसारा करणार्या मुलांना रागवत का नाही? अशानं ती बिघडतील असंही त्या तिला सांगत. त्या वेळी त्यांची आई ल्यूसिल हसून शांतपणे मुलांना हवं ते करू दिलं पाहिजे असं सांगायची, तेव्हा ल्यूसिलला आपल्या मुलांशी वागताना काहीच कळत नाही असा चेहरा करून शेजारणी निघून जात.
रिटीचे आई-वडील खूप कष्टाळू होते. त्यांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम होतं. कुठलीही गोष्ट सोपी करून सांगणं रिटीच्या वडिलांना जमत असे. आपण समोरच्याला उपदेश करतोय, किंवा ज्ञानाचे मोठमोठे डोस पाजतोय असा अविर्भाव त्यांच्या बोलण्यात अजिबात नसे. एकदा त्यांनी रिटीला सांगितलं,'रिटी बेटा, आपल्या रोजच्या जगण्यातलं ऊर्जेचं खेळणं बघ किती विलक्षण असतं. सूर्यकिरणातून ऊर्जा झाडांमध्ये शिरते. फळाफुलांमध्ये ती साठते आणि आपण खाल्लेल्या अन्नातून ती ऊर्जा आपल्या स्नायुंमध्ये जाते. तीच ऊर्जा आपल्या चालण्याबोलण्यातून वाहत असते. बोटाचे स्नायू वापरून आपण तीच ऊर्जा स्प्रिंगची चावी फिरवून खेळण्यामध्ये भरतो आणि खेळण्यातलं माकड तीच ऊर्जा वापरून टाळ्या पिटत आपल्या समोर येऊन नाचत पुढे जातं.’’ आपल्या वडिलांप्रमाणेच एखादी अवघड गोष्ट सोप्या रीतीनं सांगणं रिटी शिकला. ‘एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तिचा गाभा समजून घ्यायला हवा’ असं रिटीचे वडील त्याला सांगत.
रिटीला घेऊन त्याचे वडील घराजवळ असलेल्या दाट झाडीच्या जंगलात सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जात असत आणि मग ना ना तर्हेची प्रश्न-उत्तरं बापलेकात होत. मध्येच ते एखादा पक्षी रिटीला दाखवून विचारत, ‘रिटी, तो बघ, तो पक्षी आपल्या चोचीनं आपले पंखांना का सारखा टोकतोय?’ मग रिटी जरा वेळ त्या पक्ष्याचं निरीक्षण करून तो पक्षी पंख साफ करायला चोचीचा वापर करत असावा असं उत्तर देत असे. मग तो आपले विस्कटलेले पंखही सरळ करत असावा असंही त्याला वाटे. मग त्याचे वडील विचारत, ‘पण त्या पक्ष्याचे पंख का बरं विस्कटत असतील?’ तो पक्षी उडताना किंवा खाली जमिनीवर उतरताना ते विस्कटत असतील असं रिटीला वाटे आणि तो तसं आपल्या वडिलांना सांगे. मग वडील म्हणत,‘बघ बरं, तो उडून आल्यावर तसं करतो की जमिनीवर चालतानाही तसं करतो?’ रिटीला तो पक्षी उडतानाच नाही तर जमिनीवर असतानाही ती कृती करताना दिसे. मग त्याचे डोळे उत्तर शोधण्यासाठी वडिलांकडे बघत. मग त्याचे वडील सांगत, ‘‘पक्ष्यांच्या अंगावर बारीक किडे असतात आणि ते पंखाच्या मृत कातडीचा भाग खाऊन त्यावर जगतात. त्या किड्यांच्याही अंगातून एकप्रकारचं तेलासारखं द्रव्य बाहेर पडत असतं आणि त्या द्रावावर आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिशय सूक्ष्म किडे जगत असतात. ते सगळंच द्रव्य त्या किड्यांनाही पचत नाही ते नको असलेलं द्रव्य आपल्या शरीराबाहेर टाकतात. मग त्या नको असलेल्या द्रवावरही काही जिवाणू आणि बुरशीसारखे जीव जगतात.’ मग कुठे रिटीला तो पक्षी आपल्या पंखाना चोचीनं का टोकरत असावा याचं उत्तर मिळत असे.
आपल्याबरोबर मित्रासारखंच वागणार्या आपल्या वडिलांवर रिटीचं खूप खूप प्रेम होतं. रिटीच्या मनातल्या का या प्रश्नाला उत्तर देण्यात, त्याच्यातलं कुतूहल जिवंत ठेवण्यात त्याच्या वडिलांनी सतत मदत केली. एकदा रिटीला त्याच्या मित्रानं एका पक्ष्याकडे बोट दाखवून विचारलं, 'तुला हा पक्षी माहीत आहे का? याचं नाव काय सांग?'
रिटीनं नकारार्थी मान हलवली. कारण त्याला तो पक्षी माहीतच नव्हता.
मित्र अभिमानानं म्हणाला, ‘‘या पक्ष्याच नाव ब्राऊन थ्रोटेड थ्रश असं आहे. तुझे वडील तुला काहीच कसं शिकवत नाहीत रे?’’
त्यावर शांतपणे रिटी उत्तरला, ‘‘अरे, माझे वडील मला खूप वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. या पक्ष्याची दहा भाषेतली नावं माहीत असणं म्हणजे ज्ञान नाही. ती तर फक्त माहिती झाली. पण या पक्ष्याचं उडणं कसं आहे, तो कुठे वावरतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्याचा दिनक्रम काय असतो हे सगळं ठाऊक असणं याला ज्ञान म्हणतात समजलं.’’
रिटी शाळेत जायला लागला, तेव्हा त्याला गणित हा विषय सगळ्यात जास्त आवडत असे. त्याची अभ्यासातली हुशारी बघून त्याचे मित्र, शिक्षक, शेजारी, नातेवाईक त्याला ‘मॅड जीनियस’ असं म्हणत. रिटी त्या वेळी फक्त सात-आठ वर्षांचा होता. त्याला जुन्या तुटक्या वस्तू गोळा करण्याचा नाद लहानपणापासूनच लागलेला होता. त्यातूनच रिटी रेडिओ दुरुस्त करायला शिकला होता. आसपासच्या कित्येकांचे रेडिओ तो फुकटात दुरुस्त करून देत असे. खरं तर त्या रेडिओची एखादी तार निसटलेली असे किंवा आतला एखादा पार्ट सरकलेला असे. त्या रेडिओला उकलून बघण्याच्या सवयीमुळे रिटीला तो रेडिओ दुरुस्त करणं मुळीच कठीण जायचं नाही. त्याचं नाव लवकरच सगळीकडे पसरलं होतं.
एकदा काय झालं, रिटीच्या घरातला फोन खणाणला. पलीकडून आवाज आला, ‘रिटी साहेब आहेत का’ रिटी ऐटीत, ‘हो बोलतोय’ असं म्हणाला.
पलीकडची व्यक्ती म्हणाली, ‘अहो रिटीसाहेब, आमच्या हॉटेलमधला रेडिओ बिघडला आहे. तुम्हाला त्यातलं बरंच कळतं असं माझ्या कानावर आलं म्हणून त्रास देतोय, प्लीज, इथे येऊन आमचा रेडिओ बघता का तुम्ही?’’
रिटी महाशय चड्डीच्या खिशात स्क्रू ड्रायव्हर घेउन दिलेल्या पत्यावर पोहोचले. रिटी काही साधा नव्हता, तो चांगलाच खट्याळ होता. त्याला आता रेडिओ दुरुस्तीचं तंत्र चांगलंच अवगत झालं होतं. कधी प्लग सॉकेटमध्ये नीट बसलेला नसे, तर कधी रेडिओतून आवाज येत नसे. मग अशा वेळी तो रेडिओ उघडायचा आणि मग विचार करण्याची अॅक्टिंग करायचा. मोठी माणसं मारतात तशा दोन-चार विचारमग्न पोझमध्ये फेर्या मारायचा. मग काहीतरी कळलंय अशा अविर्भावात लगेच तो रेडिओ दुरूस्त करायला हातात घ्यायचा. हे सगळं ती समोर बसलेली ग्राहक मंडळी बारकाईनं बघत असत. इथेही रिटीनं तेच केलं. रिटीच्या फेर्या, त्याचा अभिनय आणि त्याची दुरुस्ती या सगळ्यांमुळे तिथं जमलेल्या लोकांमध्ये ‘हा मुलगा विचार करून दुरुस्ती करतो बरं’, अशी चर्चा सुरू झाली. अखेर रेडिओचे स्व्रू फिरवून रिटीनं रेडिओचं बटन फिरवलं आणि रेडिओचा आवाज मोठ्यानं सुरू झाला, तेव्हा सगळ्यांनी आनंदानं एकच जल्लोष केला. रिटीचं कौतुक झालं ते वेगळंच.
हा रिटी ऊर्फ रिचर्ड याचं पूर्ण नाव होतं रिचर्ड फाईनमन! रिचर्ड फाईनमन हा एक जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होता, तो गणितज्ञ होता, तो नॅनो टेक्नॉलॉजीचा जनक होता, तो इतिहासात रमणारा होता, तो एक कुशल चित्रकार होता, तो संगीतात रस घेणारा आणि अनेक वाद्यं वाजवणारा होता. रिचर्ड फाईनमन भाषेवर प्रेम करणारा होता. खरं तर रिचर्ड फाईनमन हा जीवनावर प्रेम करणारा माणूस होता. आपलं जगणं आपणच अर्थपूर्ण करू शकतो यावर त्याचा विश्वास होता. मानवता हाच आपला धर्म असं तो म्हणायचा. गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव त्यानं आयुष्यात कधी केला नाही. आपल्या बुद्धीचा त्याला जराही गर्व नव्हता. कितीही संकटं आली तरी आनंदी राहायचा त्याचा स्वभाव होता.
विज्ञानावर प्रेम करणारा जगप्रसिद्ध वैज्ञानिक रिचर्ड फाईनमन याला त्याच्या विज्ञानातल्या कामगिरीबद्दल पुढे नोबेल या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवलं गेलं!
दीपा देशमुख
Add new comment