थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!!
मिणमिणता दिवा.....कधी विझेल तो त्याचा नेम नाही........दहा बाय दहाची खोली आणि त्या खोलीत एका कोपर्यात बसलेला साध्याशा कपड्यातला तरूण....बहुतेक हा गावाकडला असावा....पुढे कधीतरी शहरात जाऊन स्थिरावला असावा असा अंदाज मी मनाशी बांधत होते........तो संवाद साधायला लागला आणि कळलं की तो एका चिमुकल्या गावातलाच मुलगा....तो आणि त्याचा भाऊ ....त्यांच्या कितीतरी आठवणी.....भाऊ काही शिकला नाही, रानात बकर्यांना चरायला नेत राहिला...मोठा झाल्यावर शेती करत राहिला.....आणि हा माझ्यासमोर बसलेला तरूण मात्र मोठ्या भावाच्या प्रोत्साहनानं शिकला.......भावानं त्याच्या शिक्षणात कुठलीच अडचण येऊ दिली नाही.........शिकून सवरून शहरात अर्थशास्त्राचा प्राध्यापक झाला.........घरादाराची काळजी वाहू लागला...... शेतीत पीक यावं म्हणून मोठ्या भावालाआर्थिक मदतही करू लागला..........एके दिवशी अचानक त्याला भाऊ गेल्याची बातमी कळली...... भावानं विष पिऊन आत्महत्या केली.....हा सैरभैर झालाय..........आठवणींचा गुंता झालाय...........मनावरचं ओझं हलकं होत नाहीये............त्याच्या संवादानं मलाही सुन्न व्हायला झालं..... तासभर तो बोलत होता, गहिरवल्या आवाजात बरंच काही सांगत होता.........वेळ कसा गेला कळलंच नाही पण त्याची व्यथा मात्र मनाला बराच वेळ कुरतडत राहिली. आजची शेतकर्याची स्थिती, या स्थितीला जबाबदार असणारे वेगवेगळे घटक, गाव आणि शहर यातलं वाढणारं अंतर....... तसंच माणसामाणसामधलंही वाढत चाललेलं अंतर........समाज बोथट बनण्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित करून तो तरुण गप्प झाला. मिणमिणता दिवा बंद झाला.........क्षणात लख्ख उजेड पडला मी आणि माझ्याबरोबर जमलेले उपस्थित सगळेच एका बधिरावस्थेत होतो.
पाचएक मिनिटांनी सगळे भानावर आलो. समोर घडलेला संवाद होता तो आसाराम लोमटे यांच्या ‘ओझं’ या कथेवर आधारित! ओझंचा एकपात्री प्रयोग सुरज कोकरे या तरुणानं आमच्यासमोर सादर केला होता. उत्तम सादरीकरण, उत्तम पाठांतर, अभिनयाची चांगली जाण, ........आजची सायंकाळ खूप काही देऊन गेली. विनायक कोळवणकर आणि सुमेध म्हात्रे यांनी दिग्दर्शन केलं असून प्रयोग व्यवस्थापन अक्षयकुमार मांडे यानं केलं आहे. तरुण मुलांना अशा प्रश्नांना भिडताना पाहून खूप बरं वाटतं. आपल्या आसपास खूप काही आशादायक, चांगलं घडतंय हे बघून मनाला उभारी येते. थिएटर फ्लेमिंगो सतत नवनवीन प्रयोग करताहेत. त्यांच्या या वैविध्यपूर्ण प्रयोगांना तुम्हीही प्रतिसाद देऊ शकता.
खरं तर दहा-बारा दिवसांपूर्वी थिएटर फ्लेमिंगोच्या अक्षयचा फोन आला, 'दीपा मॅडम तुमच्या घरी आपण नाटकाचा एक वेगळा प्रयोग करूयात का?’ मी ‘हो’ सांगितलं आणि शनिवार ठरला. मात्र तीन महिन्यांपासून रेंगाळत असलेल्या एका कामामुळे काल माझा ताण खूप वाढला आणि अचानक बीपी एकदम 'हाय' झालं. डॉक्टरांना शरण जावं लागलं. त्यामुळे आजचा प्रयोग कसा होणार याची मला काळजी होती. पण माझ्या प्रकृतीनेही साथ दिली आणि उपस्थितांनीही माझ्या हाकेला प्रतिसाद दिला.
आजचा प्रयोग खूप छान झाला. शहराशहरांमध्ये फ्लेमिंगो ग्रुपचे अनेक प्रयोग झाले पाहिजेत. आपल्या बोथट संवेदनाना जाग आली पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाची जाणीव होऊन हा प्रश्न माझाच आहे हे कळलं पाहिजे. फ्लेमिंगो ग्रुपच्या निमित्ताने काही चांगलं करू पाहणारे, धडपडे तरूण मला भेटले आणि आपलेसे झाले. फ्लेमिंगो ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. आज आलेल्या सर्वांचे मनापासून आभार. 'अपूर्व मेघदूत' या नाटकाच्या निर्मात्या रश्मी पांढरे, नाटकातली प्रमुख अभिनेत्री रुपाली, शीतल, निखील, मीनाक्षी, राहुल, आसावरी, देवेंद्र, अपूर्व, अक्षय, विनायक, सी. ए. असलेला बीडचा तरुण आणि त्याचा मित्र सर्वांचे आभार! कारण तुमच्यामुळेच हा प्रयोग रंगला.
दीपा देशमुख.
( प्रयोग संपल्यावर काही मंडळी लवकर गेल्यामुळे ग्रुप फोटोमध्ये येऊ शकली नाहीत.)
Add new comment