कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। - एक तरोताजा अनुभव!

कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। - एक तरोताजा अनुभव!

कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। - एक तरोताजा अनुभव!

मी होकार दिला होता, एक नवा अनुभव घेण्यासाठी! त्याप्रमाणे मला सकाळी सकाळी एक फोन आला. मला सायंकाळी साडेसात वाजता सनसिटीतल्या 'गार्डन इन' हॉटेलला पोहोचायचं होतं. तिथे मला एकजण भेटणार होता आणि पुढे घेऊन जाणार होता. एकूणच सगळं प्रकरण थ्रिलिंग होतं.

आता तुम्हाला हे थ्रिलिंग प्रकरण सांगते. पत्ते सापडण्याच्या बाबतीत माझ्या मेंदूचं नेहमीच असहकार धोरण असल्यामुळे मी अपूर्वच्या मागे लागले आणि त्याला माझ्याबरोबर येण्यासाठी तैय्यार केलं. अक्षय नावाच्या तरुणाला मी कन्फर्म येत असून माझ्या सोबत अपूर्व असल्याचंही सांगितलं. त्यानंही ग्रीन सिग्नल दिला. मी आणि अपूर्व सात वीसलाच सनसिटीमधल्या 'गार्डन इन' हॉटेलजवळ पोहोचलो. तिथे लगेचच अक्षय मांडे नावाचा गोड तरुण आला. अपूर्व आणि माझं स्वागत करत त्यानं आणखी दोघेजण येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही नियोजित स्थळी पोहोचणार होतो. काहीच वेळात आणखी एक तरुण आला. अरेच्च्या, हा तर 'मंत्र' चित्रपटातला सनी! मला याचं काम भारीच आवडलं होतं. एकदम नॅचरल. जसा काही अमित नागरेच माझ्यासमोर उभा होता. सनी म्हणजेच शुभंकर एकबोटे. त्यानंतर जरा खात्यापित्या घरचा एक तरुण दाखल झाला. तब्येतीनं ऐसपैस असल्यानं त्याच्या चेहर्‍यावरही आनंदी भाव होते. हा म.टा. चा स्वप्नील जोगी. पहिल्याच भेटीत आवडला. मग अक्षय आम्हाला त्याच्या मोटारगाडीतून एका बंगल्यात घेऊन गेला. तिथे आणखी ओगले नावाचे एक गृहस्थ आम्हाला जॉईन झाले.

आम्हाला त्या बंगल्यात नेण्यासाठी अक्षय बंगल्याची बेल वाजवत होता. आतून कोणाचा प्रतिसाद येत नव्हता. मात्र अक्षय बेल वाजवतच होता. तर मंडळी, इथे आम्ही म्हणजे मी, अपूर्व, स्वप्नील, शुभंकर आणि मि. ओगले अक्षयबरोबर एका अनोख्या नाटकाला अनुभवण्यासाठी त्या बंगल्याच्या बाहेर दार उघडण्याची प्रतीक्षा करत उभे होतो. अक्षयनं आम्हाला काही सूचना केल्या होत्या. आम्ही बंगल्यात दाखल झाल्यावर आत वावर करू शकतो, पण आत घडणार्‍या प्रसंगामध्ये आणि पात्रांमध्ये अडथळे आणणार नव्हतो. आम्ही आपसांत बोलणारही नव्हतो. त्या किरकोळ दोन-तीन अटी आम्ही लगेचच मान्य केल्या. काही वेळात दार उघडलं गेलं. आतमध्ये अंधार होता. अक्षयनं आम्हाला 'वेलकम' म्हणत आत बोलावलं. आम्ही आत गेलो. आत सोफ्यावर बसलो. समोरच्या भागातही अंधार होता. काही वेळात आतून वॉशरूममधून एक तरुणी बाहेर आली आणि तिनं हॉलमधला लाईट लावला...............तिथल्या एका भिंतीवर माझा लाडका जॉन लेनन होता. मग काय, माझ्यातला रंगा एकदम खुश झाला .....एकूणच तिथे बरंच काय काय घडत चाललं होतं....मी सगळी स्टोरी सांगत बसेन. कारण मला खूपच मोह होतोय. पण हा मोह आवरता घेते. कारण काहीच दिवसांत तुम्ही हा अनुभव प्रत्यक्ष घ्यावा असं मला वाटतंय.

तर या बंगल्यात एकाच वेळी चार वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी पात्रं आणि वेगवेगळे प्रसंग घडले आणि त्या चारी गोष्टींचे साक्षीदार आम्ही होतो. आम्ही त्यांना कुठलाही त्रास न दिल्यानं आम्ही त्यांच्यासाठी जणू काही अदृश्यच होतो. थोडक्यात आम्ही 'मि. इंडिया' यानेके अनिल कपूर झालो होतो. या बंगल्यातला हॉल, स्वयंपाकघर, आतून वर चढत जाणारा जिना आणि त्यातली एक कम्प्युटर रूम, तिथे असलेली एक आई आणि तिची मुलगी.....त्यांच्यातल्या संवादाचेही आम्ही मि. इंडिया साक्षीदार होतोच.....मग परत एकदा जिना उतरून खाली आलो....एका वेगळ्याच दृश्याचे साक्षीदार झालो....मग पुन्हा जिना चढून गेल्यावर एक रंगीबेरंगी रूम....तिथे धुरात गुंगलेली तरुणाई....मला देखील त्या धुराला आपलंसं करावं वाटू लागलं....लई भारी वातावरण होतं राव! मग तिथून थेट गच्ची! चंद्राचा मादक प्रकाश आणि दोन तरुण तिथे मद्य पिताहेत...त्यांच्यातले संवाद आणि ती कविता .....मला तर त्यांच्यात जाऊन 'मलाही द्या ना थोडी, मीही चिअर्स करते' असं म्हणावं वाटत होतं, पण मनाला आवरलं. दीड तास कसा संपला कळलंच नाही. जेव्हा अक्षयनं ‘संपलं’ म्हटलं तेव्हा आम्ही सगळे भानावर आलो. सगळे दिवे लागले. घरातली चारही वेगवेगळ्या घटनांमधली पात्रं हॉलमध्ये एकत्र आली.

आम्ही पाहुणे - या अनुभवाबद्दल भरभरून बोललो. यात अभिनय करणारी तरुणाई होती, प्रमिती नरके, रसिका वाखारकर, सचिन जोशी, अनामिका डांगरे, कपिल रेडेकर, त्रषिकेश प्रधान, चिन्मय पटवर्धन, नाथ पुरंदरे, अक्षय मांडे, शर्वरी लहाडे आणि रमा नाडगौडा. रमा, तू तर कुठल्याही वयोगटात सहज सामावून जातेस !!!! यातला निवेदक अक्षय हा मला 'थोडासा रुमानी हो जाये' मधल्या नाना पाटेकर सारखा भासला....... या नाटकाचा लेखक आहे, अक्षय संत हा तरूण! किती मच्युअर्ड लिखाण आहे त्याचं. खरं तर लिहिलंय असं वाटतच नाही. तो एक ताजा जिवंत अनुभव वाटतो. मनाच्या तळाशी असलेलं सगळं वर आल्यासारखं वाटलं. तसाच या नाटकाचा आर्ट डिरेक्टर अभिनव काफरे हा तरूण! त्याला कुठेच कृत्रिमपणा नको होता. मग घरातच घडलेलं हे नाटक अगदी घरासारखंच होतं. कुठेही सेट लावलाय असं न वाटणारं....एकदम सहज, स्वाभाविक! नाटकाचा दिग्दर्शक विनायक कोळवणकर यानं एक हटके अनुभव आम्हाला दिला.

इमर्सिव्ह थिएटर या संकल्पनेत जिथे नाटक घडतं, त्या नाटकात प्रेक्षकही सामील होतात आणि ते त्या पात्रांशी रिऍक्टही करू शकतात. इथे मात्र थोडा बदल होता. आम्ही केवळ साक्षीदार होतो. नाटक संपल्यावर आम्ही प्रत्येकाने आपापली मतं मांडली. मि. ओगलेंसाठी या बंगल्यात घडणार्‍या अनेक घटना धक्कादायक होत्या, तर पत्रकारिता करणार्‍या स्वप्नीलने नैतिक अनैतिकतेच्या पायर्‍या किती धूसर असतात हे सांगितलं. स्पर्शातून होणारा संवाद आणि नातं हेही त्यानं खूप चांगल्या तर्‍हेनं उलगडून दाखवलं. आयटी क्षेत्रातल्या अपूर्वला हा अनुभव निःशब्द करून गेला. चित्रपट आणि प्रेक्षक यात बॅरियर असतो, तसंच नेहमीच्या नाटकातही स्टेज आणि समोर बसलेले प्रेक्षक यातही बॅरिअर असतोच, पण इथे सगळे बॅरिअर्स हटवले गेले होते. शुभंकरलाही हा अनुभव खूप छान वाटला, मात्र तो थोडा लांबट वाटला. मला हे सगळं जवळंच वाटलं. कारण आजच्या तरुणाईचे अनुभव मी जवळून बघितले आहेत. त्यांच्याशी माझं संवादाचं नातं आहेच. आजची तरुणाई प्रश्‍नांना कशी हाताळतेय, कशाकशाचा स्वीकार सहजपणे करतेय, नात्यांमधलं वयामधलं अंतर कमी करू बघतेय, तिची आव्हानं ती पेलण्याचा प्रयत्न करतेय.

आजची तरुणाई समोर आलेले प्रश्‍न...त्यांचा फारसा बाऊ न करता ती सोडवता कशी येतील याचा विचार करतेय आणि कृतीच्या दिशेनं पाऊल टाकतेय....मला हे सगळं लईच आवडलं. ही पोरं पुरुषोत्तम करंडक वगैरे मिळवून बसलेली....अभिनयात बाप असलेली होती.....पण त्यांच्यातला साधेपणा, सहजपणा आणि खूप काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न बघून मन कौतुकानं भरून आलं. फ्लेमिंगो टीम खूप खूप शुभेच्छा! मित्रहो, तुम्हाला हा तरोताजा अनुभव घ्यायचाय? सांगा मला. आपण त्यांना विनंती करू आणि लवकरच तुमच्यासाठी एक खास शो ठेवायला लावू. दीपा देशमुख, पुणे. या नाटकात, साहिल आणि सागर यांच्या संवादातून बाहेर पडलेलं ‘गोपालदास ‘नीरज’ चं हे काव्य! खूपच सही!

स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से,
लूट गये सिंगार सभी बाग़ के बबूल से,
और हम खड़े-खड़े बहार देखते रहे
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे!
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गई,
पाँव जब तलक उठे कि ज़िन्दगी फिसल गई,
पात-पात झर गये कि शाख़-शाख़ जल गई,
चाह तो निकल सकी न, पर उमर निकल गई,
गीत अश्क़ बन गए, छंद हो दफ़न गए,
साथ के सभी दिऐ धुआँ-धुआँ पहन गये,
और हम झुके-झुके, मोड़ पर रुके-रुके
उम्र के चढ़ाव का उतार देखते रहे
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे।
क्या शबाब था कि फूल-फूल प्यार कर उठा,
क्या सुरूप था कि देख आइना मचल उठा
इस तरफ जमीन और आसमां उधर उठा,
थाम कर जिगर उठा कि जो मिला नज़र उठा,
एक दिन मगर यहाँ, ऐसी कुछ हवा चली,
लुट गयी कली-कली कि घुट गयी गली-गली,
और हम लुटे-लुटे, वक्त से पिटे-पिटे,
साँस की शराब का खुमार देखते रहे
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे।
हाथ थे मिले कि जुल्फ चाँद की सँवार दूँ,
होंठ थे खुले कि हर बहार को पुकार दूँ,
दर्द था दिया गया कि हर दुखी को प्यार दूँ,
और साँस यूँ कि स्वर्ग भूमी पर उतार दूँ,
हो सका न कुछ मगर, शाम बन गई सहर,
वह उठी लहर कि दह गये किले बिखर-बिखर,
और हम डरे-डरे, नीर नयन में भरे,
ओढ़कर कफ़न, पड़े मज़ार देखते रहे
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे!
माँग भर चली कि एक, जब नई-नई किरन,
ढोलकें धुमुक उठीं, ठुमक उठे चरण-चरण,
शोर मच गया कि लो चली दुल्हन, चली दुल्हन,
गाँव सब उमड़ पड़ा, बहक उठे नयन-नयन,
पर तभी ज़हर भरी, ग़ाज एक वह गिरी,
पुंछ गया सिंदूर तार-तार हुई चूनरी,
और हम अजान से, दूर के मकान से,
पालकी लिये हुए कहार देखते रहे।
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे।

- गोपालदास 'नीरज'

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.