फिश करी
फिश करी
काल रात्री नेटफ्लिक्सवर सहा महिन्यांपूर्वी (ऑगस्ट २०१७) प्रदर्शित झालेला 'फिश करी' हा बंगाली चित्रपट बघितला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्या आघाड्या प्रतीम गुप्ता यानं सांभाळल्या आहेत. चित्रपटातली दोन गाणी रवींद्रनाथ टागोर आणि अनुपम रॉय यांनी लिहिलेली आहेत. अनुपम रॉय हेच संगीतकार आहेत. यातल्या प्रमुख भूमिकेत ऋत्विक चक्रवर्ती आणि ममता शंकर आहेत. खरं तर हा चित्रपट खूप वेगळा, असाधारण, वेगळं दिग्दर्शन असा काही नाही. तरीही हा चित्रपट भावतो. कुठेही तो कंटाळवाणा होत नाही.
थ्री इडियट्स या चित्रपटात जसं आपल्या मनासारखं करियर करण्यात अडथळे असलेले पालक दाखवले आहेत. किंवा कुठेही बघितलं तर प्रत्येक पालकाला आपल्या मुलानं डॉक्टर इंजिनिअर व्हावं असं वाटतं, तसं त्या मुलानं केलं नाही तर त्यांच्यातला दुरावा कसा वाढतो हे आपणही बघतो. इथेही तेच आहे. वडिलांच्या इच्छेनुसार इंजिनिअर झालेला देव हा नोकरी लागताच त्या दिनक्रमाला कंटाळतो आणि धाडस करून वडिलांसमोर खरं काय ते बोलतो. ही दुराव्याची ठिणगी बापलेकाच्या नात्यात अंतर निर्माण करते. देव पॅरिसला जातो आणि पॅरिसला जाताना त्याची बायको, आई ही सगळी नाती तो मागे सोडतो. पॅरिसमधला तो एक यशस्वी मास्टर शेफ बनतो. पुढे त्याच्या पाककृती जगभरातले लोक/चाहते टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघत असतात. इथेच त्याला एक फ्रेंच मैत्रीण भेटते. ती आणि तो एकत्र राहायला लागतात. एके दिवशी देवला भारतातून त्याची आई हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये असल्याचा फोन येतो आणि १३ वर्षांनी देव भारतात परततो. वडिलांच्या मनातला दुरावा तसूभरही कमी झालेला नसतो. त्याची आई मात्र त्याला बघून खुश होते. तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टर निदान करतात आणि शस्त्रक्रिया झाली तर तिचं आयुष्य वाढेल, मात्र शस्त्रक्रिया किती प्रमाणात यशस्वी होईल हे सांगता येणं कठीण असल्याचंही ते सांगतात. शस्त्रक्रिया न केल्यास तिला होणार्या वेदनांची, तिची स्मृति जाण्याची शक्यता ते बोलून दाखवतात. देवच्या वडिलांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या बायकोला गमवायचं नसतं आणि त्यामुळेच ते शस्त्रक्रियेची जोखीम स्वीकारायला तयार नसतात. देवला काय करावं कळत नाही. यातच त्याची आई देवला म्हणते ‘तू जेव्हा १३-१४ वर्षांचा होतास, तेव्हा माझ्यासाठी एकदा फिश करी केली होतीस. तशीच फिश करी तू बनवून मला खाऊ घाल.
’ फिश करी हा बंगाली लोकांचा पारंपारिक पदार्थ असून त्याला आईच्या हाताची चव असते असं ते मानतात. देवला आता इतक्या वर्षांनंतर ती फिश करी कशी केली होती हे आठवत नसतं. पण आईसाठी तो दहा उचापत्या करून फिश करी बनवतो आणि तिला खाऊ घालतो. ती खाते, मात्र 'तशी चव आलेली नाही' असं देवला सांगते. तशी चव आणण्याचं आव्हान देवही स्वीकारतो आणि मग रोज फिश करी करण्याची धडपड आणि ती खाल्यावर आईची प्रतिक्रिया हा सिलसिला सुरू राहतो. शेवटी आईला फिश करी आवडते का, देवला तीच टेस्ट साधता येते का, देवच्या आईच्या टयूमरची शस्त्रक्रिया होते का या सर्व प्रश्नांची उत्तरं 'फिश करी'चा आस्वाद घेताना मिळतात. या चित्रपटात जेव्हा देवचे वडील शस्त्रक्रिया न करता आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी नेण्याचा निर्णय घेतात तेव्हा देवची बायको देवला सल्ला मागितल्यावर म्हणते, 'नवरा किंवा मुलगा सगळं ठरवताहेत. तिला काय करावं वाटतं हे तिला विचार ना!' देवची अस्वस्थता संपते आणि तो थेट आपल्या आईला ही गोष्ट बोलतो. तिला टयूमरच्या बातमीनं धक्का बसतो, पण ती शस्त्रक्रियेसाठी तयार होते. देव सोडून गेल्यावर देवच्या बायकोनं शिक्षिकेची नोकरी पत्करलेली असते. देव पॅरिसला जाताना तिला दिवस गेलेले असतात. पण ती देवला कल्पना देत नाही. आपला मुलगा आपल्या एकटीचा समजून ती त्याला वाढवत असते. हे सत्य कळल्यावर देव पुन्हा सैरभैर होतो. तिकडे पॅरिसमध्ये देवची चातकासारखी वाट पाहणारी प्रेयसी आणि इकडे देवची बायको आणि सहा-सात वर्षांचा निरागस मुलगा अशा पेचात देव सापडतो.
हा पेच कसा सुटतो? मला या चित्रपटातला वर्तमानाला घेऊन चालणारा दृष्टिकोन खूप आवडला! खूप छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद खूप उल्हसित करून गेला. आई आणि मुलगा यांच्यातलं हळुवार नातं बघणं नितांत सुरेख अनुभव होता. यातला एक पत्रकार तरुण आणि देव राहत असलेल्या हॉटेलमधली शेफची नोकरी करणारी तरुणी याचं देवबरोबरच फुलत जाणारं नातं बघताना आपणही सुखावतो. चांगला चित्रपट असेल तर भाषेचा अडसर येत नाही हे पुन्हा एकदा जाणवलं. 'फिश करी विथ राईस'नं मजा आ गया! तुम्हीही टेस्ट करून बघा!
दीपा देशमुख
४ मार्च २०१८.
Add new comment