गुग्लिफाय

गुग्लिफाय

पोरगा काहीतरी हटके लिहितो हे त्याच्या अंतर्नादमधल्या चिंकाराच्या बक्षीसपात्र कथेवरूनच समजलं होतं. जे वास्तव मांडायचं ते सरळसोटपणे नाही तर अ‍ॅब्स्ट्रॅक्टमध्ये फिरवत फिरवत नेत, पण तरीही पुन्हा ते सोपं करून तुमच्या गळी उतरवायचं हे काम काही सोपं नाही आणि ते येरागबाळ्याचंही काम नाही. चैतन्य सरदेशपांडे लिखित गुग्लिफायचा दीर्घांक आज सुदर्शनला बघितला. नावारूनच गूगलची खेचली असणार हे मनात घोळत होतंच.

त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानानं म्हणजेच गूगलनं आपल्या आयुष्यावर केलेलं आक्रमण, खरं तर आक्रमण म्हणण्यापेक्षा आपणच त्याचं स्वागत करत त्याच्या स्वाधीन स्वतःला केलेलं! या तंत्रज्ञानाची म्हणा, की गूगलची सवय इतकी होते की संपूर्ण आयुष्यावरचा आपण ताबा देऊन टाकतो. साधे पत्ते असोत, वा रस्ते शोधताना गूगलचं तंत्रज्ञान कामाला आल्यामुळे कोणाला विचारण्याची गरजच शिल्लक राहिली नाही. मग रस्ता आणि पत्ताच कशाला पाहिजे, तर हळूहळू मला कुठली गाणी आवडतात, कुठलं संगीत आवडतं, कुठली माणसं आवडतात, कुठल्या माणसांबरोबर मी बोलू, नको बोलू इथंपासून सगळ्याच गोष्टींमध्ये त्या गूगलवर आपण अवलंबून राहायला लागतो आणि याचा अतिरेक झाल्यावर काय होतं तेच या दीर्घांकात दाखवलं आहे. मेमरी लॉस पासून अनेक गोष्टी....वास्तवापासून तुटून चालणार नाहीये, पण वास्तवाला तरीही आपण नाकारून आभासी जगात आनंद लुटण्याची धन्यता मानत आहोत असं काहीसं...

पडद्यावरही चैतन्य आणि पूजा ही सर्वार्थाने गुणी आणि देखणी जोडी होती..या व्यसनाच्या विळख्यातून आपला नायक समोरच्या पात्राला म्हणजेच तिला बाहेर काढतो का, त्यांचं नॉर्मल आयुष्य त्यांना जगता येतं का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुग्लिफाय जरूर जरूर बघा. चैतन्यच माकड असो वा गुग्लिफाय नवीन विषय रंगभूमीवर घेऊन येण्याचं धाडस केलं आहे आणि त्याबद्दल त्याचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. तरुणाईला हा विषय नक्कीच आकर्षित करणारा आहे. विचार करायला लावणारा आहे. आज कोणाकडेही गेलो, तरी तिथं प्रौढ गप्पा मारत असतील तर नाईलाजानं बरोबर आलेली तरूणाई आपलं डोकं मोबाईलमध्ये खुपसून बसलेली दिसते. त्या मोबाईलमध्ये मोजता येणार नाहीत इतके अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवलेले सापडतात. एका अवाढव्य अशा जंगलात प्रवेश केल्यानंतर माणूस जसा गांगरून जाईल तसं तंत्रज्ञान न कळणार्‍या माणसाला इथे होईल.

चैतन्यला पूजा हिनं खूपच उत्तम साथ दिली आहे. या पोरीच्या अभिनयात खूप सहजता आहे. चैतन्य आणि पूजा या दोघांनी नाटक कुठेही रेंगाळू दिलं नाही, उलट उत्सुकता कशी ताणेल याची पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रकाशयोजना, नेपथ्य आणि संगीत एकदम बेस्ट! अमर कुलकर्णी या दिग्दर्शकाची आज भेट झाली नाही, पण या नव्या धाडसाबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन! जाता जाता अनाहूत सल्ला, मला नेहमीच वाटतं तेच पुन्हा सांगेन. तंत्रज्ञानच नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा विनाशाकडेच नेणारा असू शकतो. त्यामुळे एकांगी विचारापेक्षा दोन्ही बाजू तितक्याच ताकदीनं दाखवता आल्या असत्या तर.............कदाचित आणखीनच बहार आली असती! तरीही हे माझं वैयक्तिक मत झालं, गुग्लिफाय पुन्हा जरी पाहण्याचा प्रसंग आला, तरी मी जरूर बघेन. तुम्हीही चुकवू नका गुग्लिफाय!

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.