नाट्य-त्रिधारा - वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत!!!
नाट्य-त्रिधारा - वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत!!!
'युगांत' बघायचं राहिलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही नाटकं बघायची ठरवलं. काल बालगंधर्व नाट्यगृह बाल्कनीसह गर्दीनं खचाखच भरलं होतं. पुण्यातले चोखंदळ रसिक चांगल्या कार्यक्रमांना कसा भरभरून प्रतिसाद देतात याचं ते उदाहरण होतं. नऊ तास विनातक्रार बसायचं होतं. सर्व वयोगटातली ही मंडळी होती. कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक) यानं रसिकांच्या अलोट प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
'वाडा चिरेंबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' या त्रिधारेच्या निर्मितीचं ‘दायाद’ नावाचं एक पुस्तक याप्रसंगी प्रकाशित झालं. अतिशय देखण्या रुपातलं हे रंगीत पुस्तक असून 'दायाद' म्हणजे वारसा! हे पुस्तक वाचकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होतं. तिथे मला अभय भेटला. अभय जोशी, सारस्वत बँकेचा बडा अधिकारी! कायम हसतमुख आणि बडबड्या! हा माणूस निग्रहपूर्वक नाटकापासून कसा दूर राहू शकतो याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. कारण तो जिगीषाचा एक भाग आहे तरी आपलं क्षेत्र वेगळं निवडून दुरून तटस्थपणे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे बघणं किती कठीण आहे याची मला कल्पनाच करवत नाही! अभय भेटताच त्या भेटीचा आनंद आम्हा दोघांच्याही चेहर्यावर उमटला. श्रीपादची (पद्माकर - या त्रिधारेचा निर्माता) भेट झाली. मी माझी थोडक्यात प्रतिक्रिया त्याच्याजवळ व्यक्त केली. खरं तर 'युगांत' सोडून मी मागच्या वेळी म्हणजे २३ एप्रिल २०१७ या दिवशी याबद्दल लिहिलं होतंच. आज एकत्रित हा अनुभव घेणं माझ्यासाठी वेगळा अनुभव होता.
'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' संपलं आणि मला जाणवलं ते असं.....जेव्हा एखादा आवडलेला चित्रपट, आवडलेलं पुस्तक आपण पुन्हा बघतो, वाचतो तेव्हा पहिल्यांदा आलेलं भारावलेपण दुसर्यांदा अनुभवताना कमी झालेलं असतं. पण इथे 'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' दोन्हीही नाटकं बघताना पुन्हा एकदा पहिल्यांदाच ते बघतोय इतका बुडून गेल्याचा आनंद मिळाला. मध्यंतराच्या काळात 'दायाद' हे पुस्तक देव या रसिक प्रेक्षकाला निवेदिता सराफ यांच्याकडून भेट मिळालं. देव ही धुळ्याहून पुन्हा एकदा या त्रिधारेचा अनुभव घेण्यासाठी आलेली प्रेक्षक होती. तिनेही हा आनंद आपल्याला पुन्हा तसाच आणि तितकाच उत्कटपणे मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' या दोन्ही नाटकामध्ये दहा वर्षांचा काळ आहे. विदर्भातल्या धरणगाव नावाच्या एका खेड्यातल्या देशपांडे नावाच्या वाडा संस्कृती जपणार्या कुटुंबाची ही गोष्ट! खोट्या प्रतिष्ठेला जपताना होणारी दमछाक, शहरी जीवन आणि गावातलं जगणं यातली तफावत आणि आकर्षण, शहर आणि गाव दोन्हीकडे शिरलेलं बकालीकरण आणि लोकांची यंत्रवत झालेली मनं....आर्थिक विवंचना, पौगंडावस्थेतले प्रश्न आणि ते समजून न घेतले गेल्यामुळे भरकटलेलं आयुष्य, व्यसनाधीनता, मूल्यांशी चाललेला झगडा, प्रत्येक पिढीगणिक स्त्रियांचा होणारा प्रवास, फरफट आणि तिच्याकडे बघण्याची पुरुषी मानसिकता, तिला मिळालेलं दुय्यमत्व, नात्यातलं दुभंगलेपण आणि अपेक्षांचं ओझं, संकटकाळी सगळं काही विसरून माणसातलं माणूसपणाचं दर्शन होणं, काही वेळा सहवासानं दूर होणारं तुटलेपण अशा अनेक गोष्टींना ही दोन्ही नाटकं स्पर्श करतात. कधी हसवतात, तर कधी अस्वस्थ करून सोडतात.
'युगांत' सुरू झालं आणि पहिल्या दोन नाटकांनी दिलेला हळुवार शिडकावा या नाटकानं पार उदध्वस्त करून टाकला. आठ वर्षांनतरचा काळ.....वाड्याची झालेली दयनीय अवस्था, दुष्काळ, मृत्यूचं थैमान, माणसांमध्ये शिरलेलं जनावर, प्रेतवत जगणारी माणसं... सगळं काही खूप बेचैन करणारं होतं. तरीही त्याही अवस्थेत जगणारे पराग, नंदिनी आणि त्याचा पाच-सहा वर्षांचा मुलगा त्यांच्याकडे पाहून हे कसं काय घडू शकतं असा प्रश्न मनाला पडतो. ज्वालामुखींचे उद्रेक सातत्यानं होणारे प्रदेश याविषयी डिस्कव्हरी वगेरे चॅनलवर लहानपणी बघितलं की वाटायचं इतकी अशाश्वत परिस्थिती असताना हे लोक इथं राहतात कशाला? का निघून जात नाहीत दुसर्या एखाद्या प्रदेशात? त्या प्रश्नाचं उत्तर 'युगांत'नं दिलं. पराग आणि नंदिनीचा नात्यातला घट्टपणा, जगण्याविषयीचा चिवट आशावाद, मानवतावाद या गोष्टी प्रत्येक संकटाशी सामना द्यायला कसं बळ देतात हे बघायला मिळालं. दोनच पर्याय पळून जाणं किंवा सामना करणं! एकूणच या त्रिधारेनं खूप अस्वस्थ करून सोडलं.
मी लिखाणाविषयी खूप तत्पर असते. लगेच लिहून मोकळी होते. पण 'युगांत'ने मला तसं करू दिलं नाही. अभय (सिद्धार्थ चांदेकर)चं वैफल्य माझ्याही मनात शिरलं. या त्रिधारेतल्या सगळ्या पात्रांचा अभिनय उत्कृष्ट! प्रसाद ओक, निवेदिता जोशी, प्रतिमा जोशी, वैभव मांगलेसह सगळेच कलाकार तर ग्रेटच, पण त्यांच्याबरोबर काम करणारे नेहा, पूर्वा, सिद्धार्थ, चिन्मय ही तरुण मंडळीही ठसा उमटवणारी होती. कालच्या प्रयोगात तर चिन्मय मांडलेकरचा पराग अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेला. दिग्दर्शन उत्तम - चंदूच्या दिग्दर्शनाविषयीचा प्रेक्षकांनी दाखवलेला विश्वास प्रत्ययाला येत होता. आणि महेश एलकुंचवार यांच्याबद्दल काय बोलावं? प्रशांत (दळवी) म्हणतो त्याप्रमाणे त्यांच्या नाटकातल्या संदिग्धतेचं आकर्षण वाटावं असा ताकदीचा नाटककार! मानवी नातेसंबंधातला गहिरेपणा इतक्या तरलपणा व्यक्त करणारा दुसरा नाटककार नाही.
चंद्रकांत कुलकर्णी उर्फ चंदू यानं ही त्रिधारा सादर करून नाट्यक्षेत्रात एक इतिहास निर्माण केला आहे. सलग नऊ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. तसंच सलग नऊ तास एखाद्या नाटकासाठी आपले मोबाईल बंद ठेवणं ही देखील सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं प्रेक्षकांनी आनंदानं केलं होतं. यानंतर एका प्रयोगानंतर ही त्रिधारा पुन्हा होणार नाही याचं अतीव दुःख मनात आहे, पण हे प्रयोग करताना त्यामागचे परिश्रम, आर्थिक गणितं या सगळ्यांची जाणीवही मनात आहे. त्यामुळे या त्रिधारेचा नितांत सुंदर अनुभव दिल्याबद्दल लेखक, दिग्दर्शक, अभिनयकर्ते, तंत्रज्ञ, निर्माते सगळ्यांचे खूप खूप आभार आणि पुढल्या नवनिर्मितीसाठी खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख,
२० नोव्हेंबर २०१७.
Add new comment