अतुल पेठेंची शब्दांची रोजनिशी

अतुल पेठेंची शब्दांची रोजनिशी

दिग्दर्शक अतुल पेठे या नाट्यकर्मीच्या प्रेमाखातर आज ठरवून रामू रामनाथन लिखित आणि अमर देगावकर अनुवादित 'शब्दांची रोजनिशी' हे नाटक बघण्यासाठी प्रयोगस्थळी पोहोचले. काहीच वेळात हॉलमध्ये प्रवेश केला आणि समोर असलेल्या पडद्यावर ज्याला आपण प्रगती म्हणतो त्याची प्रतीकं दिसायला लागली. उंचच उंच इमारती, उड्डाणपूल, त्यावरून धावणार्‍या गाड्यांची संख्या असं बरंच काही.....ही भित्तीचित्र जयंत भीमसेन जोशी यांनी काढलेली आहेत. नाटकाविषयी बोलण्याआधी थोडं इतर, पण महत्त्वाचं. आपल्याकडे इंग्रजाचं राज्य आलं, अनेक बदल घडले. त्यांनी इंग्रजीची रुजवणूक काही प्रमाणात केली. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपण इंग्रजांनी जी वाट दाखवली त्याच वाटेवरून चालत राहिलो.

पुढे १९८०च्या जागतिकीकरणानंतर आपल्या आयुष्यात अनेक आमूलाग्र बदल झाले आणि संस्कृती आणि भाषा यांचं सपाटीकरण सुरू झालं. सगळीच शहरं अमेरिकन शहरांसारखी दिसायला लागली. सगळीकडे टोलेजंग इमारती, मॉल्स, तशाच जाहिराती, तशीच जीवनशैली, तशीच वागण्याची पद्धती, तशीच ऑफिसेस, तशाच कामाच्या पद्धती या जगभर पसरल्या आणि याचबरोबर इंग्लडच्या पाठोपाठ अमेरिकेची भाषासुद्धा इंग्रजी असल्यामुळे जगामध्ये इंग्रजीचं महत्व खूप वाढलं. भारतात तर खूपच़ अगदी खेड्यापाड्यातली साधी माणसं सुद्धा स्वतःला इंग्रजी भाषेचा गंध नसताना मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकायला लागली. त्याचबरोबर भारतातले राज्यकर्ते मात्र हिंदी भाषिक असल्यामुळे इंग्रजी खालोखाल भारतामध्ये हिंदीचाही प्रभाव वाढला आणि सरकारी कार्यालयात इंग्रजी किंवा हिंदी पाट्या दिसायला लागल्या. याच्याविरूद्ध बंड म्हणून अनेक स्थानिक भाषाप्रेमींनी बंड पुकारलं. सगळ्या दुकानांच्या पाट्या आणि सरकारी पत्रकं ही त्या त्या स्थानिक भाषांमध्येही असली पाहिजेत अशा तर्‍हेच्या मागण्या सुरू झाल्या. पण एवढं असूनही त्या स्थानिक भाषांपेक्षा इंग्रजी आणि हिंदी या भाषांचा प्रभाव इतका मोठा होता की या स्थानिक भाषांसाठी भांडणारे लोक स्वतः मात्र स्वतःच्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण देणं पसंत करायला लागले. आणि हे झालं मराठी सारख्याच त्या त्या तत्सम भाषांचं. पण त्या खाली अनेक शेकडो, हजारो भाषा लोक बोलत होते. त्यांच्या संस्कृतीची आणि त्यांच्या जीवनाची ती ओळख होती.

मराठीनं जेमतेम तग धरलेला असला तरी शेकडो/हजारो इतर स्थानिक लोकभाषा लोप पावल्या. एकीकडे विविधतेचं कौतुक आपल्याला होतं, पण ती विविधता - प्रत्येक बाबतीतली असेल - कामाची, हस्तकौशल्याची, उत्पादनाची, भाषेची, संस्कृतीची विविधता - या सपाटीकरणामुळ हळूहळू ती नष्ट होत गेली. शेकडो भाषा नष्ट झाल्या, भाषाच नव्हे तर त्या भाषांमध्ये लिहिणारे साहित्यिक - त्यांचं लिखाण- त्यांचं त्या भाषेतलं योगदान सगळं काही नष्ट झालं. आज भाषांचं आणि संस्कृती यांच संवर्धन व्हावं, तिचं जतन व्हावं यासाठी डॉ. गणेश देवी, पी. साईनाथ यांच्यासारखी माणसं खूप गांभीर्यानं विचार करताहेत आणि त्यानुसार कृतीदेखील करताहेत.

'शब्दांची रोजनिशी' या नाटकात भाषेचा होणार्‍या र्‍हास हाच विषय अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीनं हाताळला आहे. यातली प्रकाशयोजना, आवश्यक तितकंच नेटकं नेपथ्य आणि सुयोग्य असं संगीत होतं. यात भाषांकडे केलेलं दुर्लक्ष, त्यांचा होणारा र्‍हास आणि त्यामुळे त्या भाषेतले साहित्यिक यांचं साहित्यही काळाबरोबर नष्ट झालं, शब्दांचे बदललेले अर्थ (अनर्थ) याचे काही उल्लेख ठळकपणे 'शब्दांची रोजनिशी'मध्ये येतात. अतुल पेठे आणि केतकी थत्ते यांचा अभिनय खूपच अप्रतिम! विशेषतः या वेळी अतुल पेठेच्या अभिनयात खूप वेगळेपण जाणवलं. तसंच केतकी थत्ते हिचा आवाज आणि शब्दफेक, आवाजातला चढाव-उतार म्हणजे 'वा, क्या बात है'. तिला फक्त ऐकत राहावं असं वाटत होतं. विशेषतः यातला लोकगीतांचा (वेगवेगळ्या भाषांचा) केलेला वापर ! भाषेंचा होणारा र्‍हास हा विषय खूप महत्त्वाचा असून तो टीव्ही, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामध्ये गुंग झालेल्या लोकांना जागं करण्यासाठी सातत्यानं मांडला गेला पाहिजे.

मात्र जाता जाता हे मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं, दिग्दर्शकानं विषयाची मांडणी करताना त्यातली दुर्बोधता थोडी कमी केली तर त्या विषयाचं महत्व प्रेक्षकांना नीट समजू शकेल आणि हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. सध्या पुण्यातला या नाटकाच्या सर्व प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. एक वेगळा प्रयोग . जरूर पहा.

दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.