दो बिघा जमीन 

दो बिघा जमीन 

सातत्यानं अनेक वर्षं गावात दुष्काळ पडल्यामुळे त्या गावातल्या शेतकर्‍यांची स्थिती अतिशय हलाखीची झालेली असते. त्या गावातला शंभू नावाचा अतिशय गरीब शेतकरी असतो. त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी केवळ दोन बिघा जमीन (जमीनीचा आकार मापन करण्याचं एक परिमाण, जसं एक गुंठा जमीन म्हणतो तसंच) आणि त्या जमिनीवर त्याचं छोटंसं खोपटंवजा घर असतं. त्याचे वृद्ध वडील, बायको - पारो आणि ८-९ वर्षांचा मुलगा - कन्हैया राहत असतात. पारोला दिवस गेलेले असतात. लग्नाला १० वर्षं उलटली असली तरी त्यांच्या नात्यातलं ताजेपण तसंच टिकून असतं. पाऊस पडला की सगळं सुरळीत होईल या आशेवर शंभूसहित सगळेच शेतकरी आतुरतेनं पावसाची वाट बघत असतात. त्याच गावातला जमीनदार शहरातल्या काही लोकांबरोबर आपल्या जमिनीवर एक कारखाना उभारण्याचं ठरवतो. मात्र त्या जमिनीच्या मध्येच शंभूची दोन बिघा जमीन अडथळ्यासारखी आलेली असते.

शंभूची परिस्थिती आणि कर्जबाजारीपण पाहून शंभू आपल्याला सहजपणे ती जमीन विकेल असं जमीनदाराला वाटतं. पण आपल्या आईसमान असणारी जमीन विकायला शंभू नकार देतो. जमीनदार वैतागतो आणि आपलं साचलेलं कर्ज ताबडतोब चुकव असा दम त्याला देतो. घरातली भांडीकुंडी आणि बायकोचे कानातले विकून शंभू काही रक्कम उभी करतो आणि जमीनदाराला नेऊन देतो. पण जमीनदाराची व्याजाची गणितं खूप वेगळी असतात. खोटी कागदपत्रं तयार करून ६५ रुपयाचं कर्ज २३५ रुपये दाखवलेलं असतं आणि त्यावर अशिक्षित असलेल्या शंभूचा अंगठाही असतो. चिडलेला जमीनदार कोर्टात जातो आणि पुरावे सगळे त्याच्याच बाजूनं असल्यामुळे कोर्ट कर्ज फेडण्यासाठी शंभूला तीन महिन्यांची सवलत देतं. त्या तीन महिन्यात शंभू ती रक्कम चुकती करू शकला नाही तर ती जमीन लिलाव करून विकून रक्कम वसूल केली जाणार असते. शंभूवर संकटाचा पहाडच कोसळलेला असतो. मिळेल तिथून पैसे उभे करण्यासाठी तो वणवण फिरत राहतो. पण त्याच्यासाठी ती रक्कम प्रचंड मोठी असते.

अशा वेळी त्याला गावातला एक जण कलकत्याला जाण्याचा सल्ला देतो. पैसे मिळवण्यासाठी पारोचा निरोप घेऊन शंभू कलकत्त्याला जायला निघतो, तेव्हा त्याचा निरागस मुलगा- कन्हैयाही कलकत्ता शहर बघण्याच्या हेतूनं त्याच्याही आधी स्टेशनवर पोहोचून रेल्वेत येऊन बसतो. शहरात आल्यावर शहरातलं ते घाईगडबडीचं चेहरा नसलेलं वातावरण बघून शंभू भांबावतो. त्याला काम तर कोणी देतच नाही, पण जवळ असलेलं सामानही चोरीला जातं. रस्त्यावर थकून झोपलेल्या शंभू आणि कन्हैया यांना पोलीस हुसकावून लावतो. अशा वेळी एका अतिशय गलिच्छ अशा बकाल वस्तीत कशीबशी जाता शंभूला मिळते. मात्र या दगदगीत कन्हैया आजारी पडतो.

तापानं फणफणलेल्या कन्हैयाला खोलीत ठेवून शंभू रिक्षा चालवायला लागतो. बैलगाडीला जसे बैल बांधलेले असतात, त्याप्रमाणे रिक्षाला बैलाऐवजी माणूस ओढत राहतो. अनवाणी पायानं शंभू जिवाच्या वर बेतेल इतकं काम करत राहतो. या सगळ्या परिस्थितीत बापाची अवस्था कन्हैयाला सहन होत नाही. त्याचं बालपण व्रूर परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यानं आणि तिथंच संपतं. अकाली प्रौढ झालेला कन्हैया शंभूला मदत करावी म्हणून बूटपॉलिश शिकून घेतो आणि पैसे मिळवायला लागतो. या सगळ्या परिस्थितीत रस्त्यावरची अनाथ असलेली टपोरी मुलं त्याला भेटतात. त्यांच्यातलं कोवळं संवेदनशील मन नष्ट होऊन ती पक्की बनेल आणि व्यवहारी झालेली असतात. ती त्याला चोरीमारीच्या मार्गावर नेण्याचाही प्रयत्न करतात. पण कन्हैयाला ते जमत नाही. एकीकडे संस्कार आणि एकीकडे गरिबी यात शंभूबरोबर कन्हैयाही भरडला जातो.

रोज पोटाला मारून डब्यात एक एक पैसा जमा करणारा शंभू आणि कन्हैया यांची ती धडपड पाहून आपल्यालाही आशा वाटायला लागते, की यांची जमीन जाणार नाही, काहीतरी चमत्कार होईल आणि शेवट तरी सुखाचा होईल. पण वास्तव कल्पनेपेक्षा भयंकर असतं. चित्रपटाच्या शेवटी शंभू पूर्ण पैसे जमा करूच शकत नाही. त्याची जमीन जाते. तिथे मिल उभी राहते. पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन आणि डोळ्यादेखत गेलेलं घर पाहून शंभूचा बाप वेडा होतो. अखेरच्या क्षणी तारेच्या कुंपणाआडून शंभू, पारो आणि कन्हैया आगतिकपणे इथंच आपलं घर अिाण जमीन कशी होती हे बघायला येतात. त्या जमिनीवरची माती उचलण्याचा शंभू प्रयत्न करतो, पण तिथला रखवालदार त्याला चोर समजून हुसकावून लावतो.

१९५३ साली बिमल रॉय या ख्यातनाम दिग्दर्शकानं ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट काढला. बिमल रॉय यांचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणूनही याकडे बघता येईल. आता पाकिस्तानात असलेल्या ढाका या शहरात १२ जुलै १९०९ या दिवशी त्यांचा जन्म झाला. फोटोग्राफीचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. बंगाली सिने-उद्योग डबघाईला आल्यानं ते मुंबईत आले आणि बिमल रॉय प्रोडक्शन ही फिल्म कंपनी सुरू करून त्यांनी या बॅनरखाली लो बजेटमध्ये दो बिघा जमीन ही पहिलीच फिल्म प्रदर्शित केली. हा चित्रपट खरं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या दुई बिघा जोमी या कवितेवर आधारलेला आहे. सलील चौधरी यांनी त्यावरचं कथानक लिहिलं आणि हृषिकेष मुखर्जी यांनी पटकथा लिहिली. यात शंभूची भूमिका अर्थातच बापमाणूस बलराज साहनीनं केली.

लंडनहून आलेला हा तरूण एका गावातल्या शेतकर्‍याची भूमिका नीट करू शकेल की नाही याबद्दल बिमल रॉय यांना मनात सुरुवातीला साशंकता होती. पण खरोखरंच भूमिका जगणं म्हणजे काय हे शंभूची भूमिका पाहून आपल्या लक्षात येतं. बलराज साहनीच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम चित्रपट आहे. बलराज साहनीनं या चित्रपटासाठी इतके परिश्रम घेतले होते, की त्या गरीब शेतकर्‍याची अवस्था अनुभवण्यासाठी दिवस दिवस तो उपाशी राहत असे आणि भूक काय असते याचा अनुभव घेत असे. आपण खरेखुरे रिक्षावाले वाटलो पाहिजेत यासाठी बलराज साहनी रिक्षावाल्याचा पेहराव करून कलकत्त्यामध्ये इकडेतिकडे रस्त्यावरून चक्क फिरत असे. एकदा एका पानवाल्याच्या ठेल्यावर जाऊन त्यानं गावच्या भाषेत एक सिगारेटचं पाकीट मागितलं, तेव्हा त्या पानवाल्यानं त्याला ‘चल जा इथून, मोठा आला सिगारेटचं पाकिट मागणारा’ म्हणून हुसकावून लावलं. पानवाल्याच्या या ओरडण्यानं बलराज साहनीला खूपच आनंद झाला. बलराज साहनी या माणसाला खरंच काय म्हणावं? प्रत्येक वेळी त्याच्यातल्या अस्सल माणूसपणाचा, त्याच्यातल्या गुणांचा एक नवाच पैलू बघायला मिळतो.

या चित्रपटात काम करताना हा मनुष्य कलकत्त्याच्या रस्त्यावर जाऊन त्या प्रकारची रिक्षा चालवायला शिकला. बलराज साहनी रिक्षा चालवण्याचा सराव करण्यासाठी त्या रिक्षात आपली बायको आणि बहीण यांना बसवत असे आणि अनवाणी पायांनी ती रिक्षा ओढत असे. आपलं पात्र खरंखुरं वाटण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते तो माणूस सहजपणे करत असे. एवढंच काय, पण त्या काळात त्यानं अनेक रिक्षाचालकांबरोबर दोस्तीही केली. या चित्रपटात पारोच्या भूमिकेत निरुपा रॉय, शंभूच्या वृद्ध वडिलांच्या भूमिकेत नाना पळशीकर आहेत. एका छोट्या भूमिकेत मीनाकुमारीही दिसते. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हा चित्रपट पाहत नसून सगळं काही समोर घडतंय असंच वाटत राहतं. दिग्दर्शकाचे प्रचंड परिश्रम या चित्रपटात दिसतात. किती किती बारीकसारीक गोष्टींचा केलेला अभ्यास आपल्याला बघायला मिळतो. सुरुवातीचं शंभूचं कुटुंब, नंतर होणारी फरफट आणि त्याबरोबरच त्यांच्या फाटत गेलेल्या कपड्यांपासून ते चेहर्‍यापर्यंतचे बदल इतके बारकाईनं टिपले आहेत की ते बदल खरेखुरे वाटत राहतात. अशा वेळी तुलना करू नये पण संजय लीला भन्साळीचे अवास्तव झगझगीतपणा दाखवून निर्माण केलेले चमको चित्रपट आठवतात.

'दो बिघा जमीन’ या चित्रपटातली सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेली ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’, ‘आजा री आज निंदिया तू आ’, ‘अजब तोरी दुनिया हो मेरे राजा’ ही गाणी अवीट असली तरी मला भावलेलं गाणं म्हणजे शैलेंद्रनं लिहिलेलं ‘धरती कहे पुकार के’ हे मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं! धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के मौसम बिता जाये, मौसम बिता जाये अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा कौन कहे इस और तू फिर आये ना आये मौसम बिता जाये, मौसम बिता जाये १९५४ साली फिल्म फेअर पुरस्कार सुरू झाले आणि या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ पुरस्कार आणि दिग्दर्शनाचा बिमल रॉय यांना पुरस्कार मिळाला. तसंच राष्ट्रीय फिल्म पुरस्कारही या चित्रपटानं मिळवला. या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेषतः चीन, इंग्लंड, रशिया, व्हेनिस, आस्ट्रेलिया आणि कान्स फिल्म महोत्सवात वाहवा मिळवली.

‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट खरोखरच हिन्दी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. भारतातल्या १० उत्कृष्ट चित्रपटात ‘दो बिघा जमीन’ ची गणना होते. पण हा चित्रपट गल्ला भरू नसल्यानं त्या वेळी फारसा चालला नाही. या चित्रपटानं भारतीय सिनेमात नवयर्थाथवादाची सुरुवात केली. खरं तर हा चित्रपट म्हणूच नये. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी - कशा अवस्थेत आजही जगतोय याचं डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं वास्तव आज ६० वर्षांनतर तसंच बघायला मिळतं आहे. एकीकडे या चित्रपटातून परस्परातलं प्रेम, माणुसकी, परिश्रम, आशावाद, मूल्यांवरची अढळ श्रद्धा हे सगळं दिसत असतानाच आजही गरीब, दलित वर्गाची दयनीय अवस्थाही बघायला मिळते. भारतीय शेतकर्‍याच्या भीषण अवस्थेचं चित्रण या चित्रपटात आहे. यात रोजच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण झाल्यानं गावाकडून शहराकडे धावणार्‍या मनुष्याचं जगणं बघायला मिळतं. पण त्याचबरोबर शहरात जाऊनही त्याच्या हाती काहीच लागत नाही. मिळतं ते फक्त बकाल जीवन! त्याचं सुख संपल्यातच जमा होतं. सुखाची स्वप्नंही तो बघू शकत नाही कारण ती स्वप्नं बघायलाही त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, इतका तो त्या घाण्याच्या बैलासारखा कामाला जुंपला जातो. त्या वेळी बिमल रॉयनं या चित्रपटाच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्‍न आजही ६० वर्षानंतर उत्तराच्या शोधात तसेच उभे आहेत हेच खरं! 

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.