डॉ. प्रकाश बाबा आमटे

डॉ. प्रकाश बाबा आमटे

काल दुपारी अखेर डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट बघितला. चित्रपट मराठी असूनही हाऊसफुल्ल होता. नाना पाटेकर भूमिका अगदी जगलाय. त्याची नेहमीची फटकेबाज संवाद शैली इथे चुकुनही दिसली नाही. सोनालीचा अभिनय देखील तितकाच ताकदीचा वाटला. चित्रपट अनेक अंगांनी बोलतो.
चित्रपट बघताना डॉ. प्रकाश आमटे आणि हेमलकसा समोर उभं होतं, मनात त्याच वेळी बॅकग्राउंडला अनेक गोष्टींची चित्रमालिका सुरू होतीच. प्रकाश आमटे यांचं साधेपण...गांधीजींनी जसं एका पंचावर आयुष्य काढलं. त्या दिसण्याचा, त्या राहणीमानाचा परिणाम त्यांनी आपल्या दैनंदिन जगण्यात महत्वाचा मानला नाही. एकदा घेतलेलं व्रत मग ते अगदी साध्याशा गोष्टीचं का होईना पाळणं ही गोष्ट त्यांनी आयुष्यभर अंगीकारली. तीच अतिशय कठीण गोष्ट डॉ. प्रकाश आमटे यांच्या त्या एका साध्याशा निर्णयात दिसते. ज्या वेळी थंडीत कुडकुडत असलेले आदिवासी प्रकाशला दिसले, त्या वेळी त्यांनी आपणही मोजक्या कपड्यात राहायचा निर्णय घेतला. रोजचं जगणं अर्धी पांढरी चड्डी आणि सुती बनियन! अगदी मॅगेसेसे पुरस्कार घेतानाही हा माणूस आपला पायजमा आणि खादीचा कुर्ता या पेहरावानंच जातो. गांधीजीनंतर या पद्धतीनं जगणारा हा एक आगळा माणूस - तुमच्याआमच्यातला वाटणारा एक पण तरीही असामान्य नायक! 
मलाच फार कळतं हा आव कुठेही त्यांच्या वागण्यात कणभरही दिसत नाही. ना प्रसिद्धीचा सोस, ना भौतिक गोष्टींची लालसा...मला हे जमलं मी केलं हे अगदी साधेपणानं सांगणार. फारसा बोलका स्वभाव नाही, नेमकं बोलणार. त्या बोलण्यात कुठे कोणाची कुचेष्टा नाही, की अहंभाव नाही. 
एक एक पाण्याचा थेंब मिळून सागर बनतो, तशी हेमलकशात जागा साफ करण्यापासूनचा जो प्रवास आहे तो आज झगमगता आणि जगाच्या नकाशावर दिसू लागलाय. पण त्या खडतर प्रवासाची वाट पार करत जाणारे प्रकाश आणि मंदासारखे कितिक आहेत? माझ्या जवळचा एक तरूण मुलगा मला म्हणाला, असे लोक पाहून आम्हाला आमच्या नात्यातल्या जबाबदार्‍यांचं भान येतं आणि अजून वेळ गेली नाही हे कळतं.’ किती खरं आहे. प्रकाश आणि मंदा यांच्या सहजीवनात ध्येय इतकं मोठं आणि व्यापक होतं की बारीकसारीक गोष्टींना त्यांच्या आयुष्यात जागाच उरली नाही. प्रत्येकाला हा चित्रपट वेगळंच काही देऊन जातोय. सामाजिक कार्याबरोबर वैयक्तिक आयुष्यातली माणसामाणसातली नाती जपणं हेही त्यातून नकळत या तरूणापर्यंत पोहोचलंच की!
आज मॉलमध्ये सामान आणायला गेल्यावर आवश्यकबरोबर अनेक अनावश्यक वस्तूंना घेऊन आपण घरी घेऊन  येतो. मॅचिंग चपला लागतात, मॅचिंग लिपस्टिक आणि इतर मेकअपचं सामान, ब्युर्टीपार्लर, गरज नसतानाही वस्तू घेऊन संग्रह करण्याचा सोस आणि अशा अनेक अनावश्यक गोष्टींची तर गरजच झालीये. हे सगळं चांगल की वाईट हा भाग वेगळा. पण या सगळ्या जगण्यात आभासी जगात एकमेकांवर प्रेम आपण करत आहोत, इतरांविषयी सहानुभूती पण दाखवतोय, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र तनमन आणि धन यांच्यासह आपण कितीसे पुढे होतो? १५०० रु. महिना कमवणारा आज एक डॉक्टर तरीही समाधानी आयुष्य जगतो आहे आणि आम्ही कोटी कोटी रूपये मिळवूनही आमची हाव संपतच नाही. एकमेकांविषयीचा मत्सर, द्वेष, स्पर्धा कमी होत नाही.
डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट बघताना चित्रपट आणि प्रत्यक्षातले डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे हे वेगळे शिल्लक राहतच नाही. चित्रपट बघून प्रत्येक जण नक्कीच अंतर्मूख होतोच होतो हे मी काल चित्रपट सुटल्यावर त्या गर्दीत अनुभवलं. 
आपापल्या मनाला प्रश्‍न विचारता आला तरी ही सुरुवातही काही कमी नाही!
डॉ. अरूण गद्रे यांच्या ‘कैफियत’ पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभासाठी डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे आले होते. त्या वेळी त्यांनी श्रोत्यांशी केलेला संवादही मला आपल्याबरोबर शेअर करायचा आहे. तुर्तास त्या वेळी त्यांचा घेतलेला एक फोटो बस इतकंच!
चित्रपट जरूर पहा.
दीपा

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.