सिनेमा सिनेमा
या दोन दिवसांत पाच चित्रपट बघितले. त्यातले दोन मराठी होते. पहिला तेजस देओस्कर दिग्दर्शित ‘अजिंक्य’! यात संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शासकीय नोकरीत असलेला आणि बास्केट बॉल या खेळाचा कोच असलेला संदीप कुलकर्णी सतत जिंकत असतो आणि त्यामुळे त्याला हार सहनच होत नसते. अहंकारानं त्याला चांगलाच स्पर्श केलेला असतो. त्याच्या बायकोला द्यायला, किंवा स्वतःकडे बघायलाही त्याला वेळ नसतो. दोघांमध्ये दुरावा वाढलेला असतो. सतत भांडणं होत असतात आणि अशातच त्याची टीम एक मॅच हारते. त्यानं आपल्या बायकोला शब्द दिलेला असतो, ही मॅच मी हारलो तर खेळ सोडून देईन. त्याप्रमाणे तो आपली बदली औरंगाबाद इथं करून घेतो. इथं आल्यावर तो जाणीवपूर्वक बॉस्केट बॉल आपल्या आयुष्यातून काढून टाकायचा प्रयत्न करतो. मात्र त्याला काय साध्य होतं याचा एक सुरेख प्रवास त्याच्याबरोबर आपल्यालाही घडतो. दुसरीकडे त्याची आयटी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं एक एक पायरी वर चढत असलेली बायको तिलाही काय काय उमगतं हेही या प्रवासात कळतं. अंतर्मनात डोकावून बघणं, यशाचा नेमका अर्थ काय याबद्दल हा चित्रपट बोलतो. २०१२ साली प्रदर्शित झालेला ‘अजिंक्य’ हा चित्रपट थोडा संथ असला तरी तो आवडला. संदीप कुलकर्णीचा अभिनय अप्रतिम. कादंबरी ही तरुणी मला नेहमीच आवडते. काही मोजक्या मालिकांमधून तिला बघितलं होतं.
दुसरा मराठी चित्रपट बहुचर्चित आणि खूप कौतुक झालेला माधुरी दिक्षितचं खास आकर्षण असलेला आणि नुकताच म्हणजे २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘बकेट लिस्ट’! तेजस देओस्कर यानंच दिग्दर्शित केलेला! हा चित्रपट मात्र मला आवडला नाही. इंग्लिशविंग्लिश या श्रीदेवीच्या चित्रपटाची आठवण येते. स्टोरी देखील तशाच प्रकारची. थोडा फरक! एक कॉलेजवयीन तरूणी मरते, तिनं आपलं हृदय डोनेट केलेलं असतं. माधुरी दिक्षित या मध्यमवयीन स्त्रीला हे हृदय मिळतं आणि उत्सुकतेपोटी आपला डोनर कोण हे ती शोधून काढते आणि मग त्या तरुणीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्याचं तिला कळतं. त्या तरुणीच्या त्या बकेट लिस्टमधल्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार माधुरी दिक्षित करते. या सगळ्या इच्छा तशा फालतूच असतात. पण यातून संदेश मात्र एकदम भारी देण्याचा प्रयत्न पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी केला आहे. म्हणजे आपलं स्वातंत्र्य, आपली निर्णयक्षमता, आहे तो क्षण आनंदात कसा जगावा वगैरे वगैरे. मात्र हे तत्वज्ञान सांगताना ज्या इच्छांची यादी आहे ती पबमध्ये जाण्याची, एकदा अटक होण्याची, बॉयफ्रेंडला किस करण्याची वगैरे. या सगळ्या इच्छा पूर्ण करत माधुरी दिक्षित आपलं अस्तित्व शोधते. या चित्रपटात सुमित राघवन या अभिनेत्याबरोबर काम करताना माधुरी एकदमच उतारवयाकडे झुकलेली वाटते. अनेक प्रसंगात तिला बघवत नाही. चित्रपटातलं पात्र म्हणून बघण्याऐवजी सतत माधुरी म्हणूनच ती दिसत राहते. वंदना गुप्तेनं बहार आणली आहे. या चित्रपटानं चांगले पैसे कमावले. असो.
तिसरा चित्रपट बघितला तो २०१८ साली प्रदर्शित झालेला आणि नीरज पांडे दिग्दर्शित असलेला अय्यारी! नीरज पांडेचे याआधीचे चित्रपट म्हणजे बेबी, स्पेशल छब्बीस, वेन्सडे! अय्यारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका! सैन्यदलाचं कामकाज, त्यात येणार्या समस्या, जबाबदारी, सरकारचा हस्तक्षेप, राजकारण, कट-कारस्थान, उद्योजकांचं वर्चस्व, अंडरवर्ल्ड। गुरू-शिष्य नातं, वगैरे अनेक गोष्टींचा मालमसाला या चित्रपटात आहे. पाहुणा कलाकार म्हणून यात नासिरूद्दिन शाह आणि विक्रम गोखले भेटतात. मनोरंजन म्हणून हा चित्रपट चांगला आहे. तसंच या चित्रपटानं चांगलच आर्थिक यश मिळवलं आहे. चौथा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेला, अभिनय देवनं दिग्दर्शित केलेला आणि इरफान खानची भूमिका असलेला ‘ब्लॅकमेल’! या चित्रपटावर अनेकांनी लिहिलं आहे. आपल्या बायकोचं दुसर्या कोणाबरोबर तरी संबंध असल्याचं लक्षात येताच तो तिच्या प्रियकराला ब्लॅकमेल करायला लागतो. इरफान खानला पैसे पुरवण्यासाठी प्रियकर आपल्या प्रेयसीकडून म्हणजेच इरफान खानच्या बायकोकडून पैसे उकळायला लागतो....अशी ती मालिका कुठल्या कुठे पोहोचते. फार लॉजिक, तत्व, मूल्य वगैरे गोष्टी मध्ये न आणता हा चित्रपट बघायला हवा. इरफान बाप माणूस आहे. चित्रपटात कोणीही नसलं तरी चालेल, एकटा इरफान खान पुरे होतो..... ‘ब्लॅक कॉमेडी’ ची ट्रिटमेंट दिलेला हा चित्रपट आवडला.
पाचवा चित्रपट पुलकित यानं दिग्दर्शित केलेला ‘मरून’ काल बघितला. मानव कौल आणि सुमित व्यास यांच्या भूमिका! सुमित व्यास मला आवडतोच. मात्र मानव कौल यानंही आपली भूमिका अतिशय समर्थपणे केली आहे. चित्रपटातला बिभत्सपणा मला फारसा आवडला नाही. सतत टॉयलेटचे प्रसंग बघायला त्रासदायक झालं. या चित्रपटात नायकानं आपल्याच बायकोचा संशयावरून, स्वतःमध्ये असलेल्या उणिवांमुळे खून केलेला असतो आणि तो एक सरळसाधा माणूस असल्यानं हा गुन्हा आठवून त्याला मानसिक त्रास होत असतो. आपण केलेला गुन्हा स्वीकारायला त्याचं मन तयार होत नसतं. या त्रासातून त्याच्यावर होणारे मानसिक परिणाम, झोप न येणं, सतत भास होणं, समाजापासून तोडून घेणं, एकाकीपण आणि बरंच काही. हा चित्रपट अनेकांना खूपच आवडला आणि अनेकांना अजिबात आवडला नाही अशी गंमत आहे. चित्रपटातला बिभत्सपणा टाळून हा विषय हाताळला असता, तर कदाचित मला हा चित्रपट आवडला असता. बस्स, आता स्वतःला 'मुन्नाभाई, कामासाठी लगे रहो' म्हणायची वेळ झालीये. मात्र तोपर्यंत सगळ्यांसाठी ‘हॅपी दिवाळी’!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment