तारुण्याचे दिवस !!!

तारुण्याचे दिवस !!!

किती सुंदर असतं हे कॉलेजमधलं जग! मला तर कल्पनाच नव्हती. इतके दिवस वेड्यासारखं किती स्वतःला दुषणं द्यायची, कमी लेखायची. पण या जगानं मला माझ्यातलं सौंदर्य दाखवलं. एवढी मोठी कॉलेजची इमारत बघून सुरुवातीला मला एकदम बावचळायलाच झालं. किती सुंदर मुली आणि रुबाबदार मुलं.......मी त्यांच्याकडे पाहत एकाच जागी खिळून राहिल्यासारखी उभी असतानाच कोणाचातरी मला धक्का लागला आणि माझ्या हातातली डायरी खाली पडली. मी ओशाळले आणि 'सॉरी' म्हणावं का आधी डायरी उचलावी हेच मला कळेना. मग आधी सॉरीच म्हणूया अस वाटलं आणि मी वर मान केली, तर इतका छान तरुण.....अगदी सनीसारखाच! माझ्याकडे हसत बघत उभा! मी त्याला सॉरी म्हणायचंच विसरून गेले. वेड्यासारखी बघतच राहिले. एकटक! जेव्हा त्यानं माझ्या डोळ्यासमोरून वर खाली हात फिरवला तेव्हा कुठे भानावर आले. त्याने खाली वाकून डायरी माझ्या हातात ठेवली आणि मला म्हणाला, 'मी समीर! हवा का झोका......तू?'

'मी... मी मीरा' 'छान! छान दिसतेस.' असं म्हणून तो निघून गेला कॉलेजचा पहिलाच दिवस, पण मला हवेत घेऊन गेला. इंट्रोडक्शन, कँम्पसची आणि सिलॅबसची माहिती असा सगळा दिवस गेला. घरी आल्याबरोबर तोंडावर पाणी मारलं आणि आरशासमोर उभी राहिले. लक्षात आलं, आपण काही इतक्या वाईट दिसत नाहीतच मुळी! रंग गोरा नसला तर काय झालं? किती चमकदार त्वचा आहे आपली! टपोरे डोळे! काय काय बोलू पाहतायेत....आपण इतक्या छान दिसतो हे आरशानं का सांगू नये याआधी आपल्याला? एवढ्यात आई ओरडली, 'पंख फुटले काय पहिल्याच दिवशी? काय चालवलय इतका वेळ? कामापासून सुटका नाही हं.' खरं तर मला पंखच फुटले होते की! आणि आज घडलेलं मला सगळं आईला सांगायचं होतं, पण ते ऐकून तिने शिवाय उपदेशाचे डोस काहीही केलं नसतं. तिने माझी मैत्रीण व्हायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न करून बघायचे का? मी स्वयंपाकघरात आईला मदत करत करत म्हटलं, 'आज कॉलेजमध्ये काय काय झालं सांगू?' आणि मी तिच्या संमतीची वाट न पाहता समीरबद्दल, आणि एकूणच उडालेल्या तारांबळीबद्दल सगळं काही सांगितलं. मला तर तिचा हात दोन्ही हातात धरून गोल गिरक्याही घ्याव्याशा वाटल्या. पण फुग्याला टाचणी लागावी तशी ती थंडगार आवाजात बोलली, 'मीरा, तुला कॉलेजमध्ये शिकायला पाठवतोय आम्ही. आमच्या नावाला काळं फासू नकोस. तुझं कॉलेजमधलं जाणं बंद करून टाकीन हे थेर केले तर............!' मी चकित झाले. का माझ्यातलं सगळं हिला वाईटच दिसतं? का सनीचं सगळं चांगलं असतं? का तर तो मुलगा आहे आणि या घराला पुढे चालवणारा कर्ता पुरूष? पण मी पण होईन की कर्ती स्त्री! माझं डोकं शिणून गेलं. पण एवढं मात्र मनानं नक्कीच ठरवलं की यापुढे तिला आपल्या गुजगोष्टी सांगायच्या नाहीत.

कॉलेजमध्ये हळूहळू मैत्रिणी मिळाल्या. मला त्यांच्यासारखं थोडंस आधुनिक राहावं वाटायचं. पण आईला आणि बाबांना तसे कपडे घालणं म्हणजे थिल्लरपणा वाटायचा. त्यातच सनीलाही आपल्या बहिणीनं काय घालावं आणि काय नाही याबद्दलची मतं होती. तोही बिनदिक्कतपणे ती लादायचा आणि आता घरात तीन विरूद्ध एक असं वातावरण कायमस्वरूपी असल्यामुळे मी विरोध करणं, मतं मांडणं सोडूनच दिलं होतं. माझं कॉलेजविश्व तर छान होतं ना! कॉलेजमधल्या प्राध्यापिका.........त्याही अगदी आमच्यातल्याच एक वाटत आणि किती गोड बोलत. अधूनमधून कॉलेजमध्ये होणारे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम....ती व्याख्यानं, त्या चर्चा....खूप काही करायची ऊर्जा या वातावरणातून मिळते आहे असं वाटायचं. कॉलेजचं गॅदरिंग जवळ येत होतं. नोटीसबोर्डवर नोटीस लागली होती. मैत्रिणींनी आपण नाटकात भाग घेऊया असं सुचवलं. कधीच अभिनय केला नसताना असा कसा भाग घ्यायचा, पण त्यांच्याबरोबर उत्सुकतेनं कल्चरल डिपार्टेंमेटला गेले आणि तिथे समीरला बघून चाटच पडले. मला बघताच, समीर देखील - हाय ब्युटी क्वीन, कम'.........म्हणून टाळ्या वाजवून चक्क स्वागत केलं. मी हसले. त्याने मला नाटकात भाग घ्यायचा का विचारलं, मी घाबरून ‘नाही नाही’ म्हटलं. मी फक्त बघायला उत्सुकतेपोटी आलेय असं सांगितलं. तेव्हा त्याने आणि माझ्या मैत्रिणींनी फोर्सने मला स्क्रिप्ट नमुन्यादाखल वाचायला लावली. माझ्या तोंडून तर शब्दच फुटेना. मी अडखळत काय वाचत होते तेच कळेना. अंगाला दरदरून घाम फुटला. तोंडाला कोरड पडली. नंतर शब्दच घशातून निघेनात. मी मान वर केली, तेव्हा समीर कौतुकानं पाहत होता. हे काय, मला तर तो ओरडेल असं वाटलं होतं. पण त्याऐवजी तो म्हणाला, 'खूप बोलका आवाज आहे तुझा. करशील तू. मस्त जमेल. ये उद्या.’’  माझ्या संमतीची वाटही न बघता त्याने निकाल देऊनच टाकला.

मी घरी घाबरतच नाटकाबद्दल सांगितलं. वेळेत घरी येणं आणि आगाऊ उद्योग न करणं या अटींवर मला काम करायला परवानगी देण्यात आली. अर्थात तालमीं कॉलेज झाल्यावर होत आणि मग रोजच उशीर होत असे. अनेकदा समीर त्याच्या बाईकवरून घराच्या कोपर्‍यापर्यंत सोडत असे. एके दिवशी सनीनं त्याला मला एकत्र पाहिलं. तेव्हा तो काही बोलला नाही. पण घरी गेल्यावर तीन विरूद्ध एक जुंपली. मी काय गुन्हा केला होता? मी राजरोसपणे एका मुलासोबत रंग उधळत फिरतेय असं काय काय मला  ऐकवण्यात आलं. हे खरंय की समीर मला आवडायला लागला होता. पण आवडणं हा काय गुन्हा ठरतो?

दुसर्‍या दिवशी मी कॉलेजला गेलेच नाही. तिसर्‍या दिवशी मैत्रिणी बोलवायला आल्या, तेव्हा मी नकार दिला तेव्हा आई जवळ येऊन बारीक आवाजात डाफरत म्हणाली, 'शिक्षण पूर्ण करा आधीच रूप असं, त्यात लग्नाच्या बाजारात शिक्षणही नाही म्हटल्यावर जन्मभर पोसावं लागेल आम्हालाच!'  मी डोळ्यातलं पाणी आवरत उठले आणि तयार झाले. पिरीयड्स झाल्यावर समीर वाटच पाहत होता. माझा पडलेला चेहरा पाहून त्याने काहीही न विचारता जवळ हातात हात घेऊन बसून राहिला. मला मात्र त्याच्या हाताच्या आश्वासक स्पर्शानं रडूच फुटलं. समीर आणि मी आणखीनच जवळ येत गेलो. आमचं नाटक खूपच छान झालं. त्यात माझं काम! प्राचार्यांपासून सगळ्यांनी माझं खूपच कौतुक केलं. अगदी पुरूषोत्तम करंडक आता आपल्याकडेच येऊ शकतो असं सांगत मला शाबासकी दिली. माझं दिसणं इथे आड येत नव्हतं, तर या जगात माझ्या गुणांची कदर होत होती. त्या वर्षी आम्ही ठिकठिकाणी एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षिसंही मिळवली.

आता सगळीजणं समीर आणि मला चिडवायला लागली होती. समीर कधीच त्या चिडवण्याला विरोध करत नसे. पण त्याच्या मनात काय होतं, काय माहीत! एके दिवशी समीरच्या मित्रानं मला येऊन सांगितलं, की समीर कँटिनमध्ये बेशुद्ध होऊन कोसळलाय. मी हातातली बँग टाकून तशीच कँटिनच्या दिशेनं धावत सुटले. मी ‘समीर, समीर’ अशा हाका मारायला सुरूवात केली. माझ्या हाकांनी हास्याचा कल्लोळ ऐकायला आला. माझ्यासमोर सगळीजणं उभी होती. त्यात मधोमध समीर आणि सगळीजणं माझ्याकडे बघून हसत होती. तो व्यवस्थित आहे हे पाहून मी हसतही होते आणि एकीकडे गालावरून पाणीही ओघळत होतं. माझा हा अवतार पाहून मात्र सगळे ‘‘समीर समीर’’ करून मला चिडवायला लागले. त्याच वेळी एकजण जोरात ओरडला, 'मीरा क्या समीर से प्यार करती हो...........' मी काहीही न सुचून गप्प बसले. तेवढ्यात एक मैत्रीण जोरात ओरडली, 'समीर, क्या मीरासे प्यार करते हो...' आणि समीर जोरात म्हणाला..........'येस, मै मीरासे प्यार करता हूँ' सगळ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. आमच्या प्रेमाला कॉलेजमधल्या सगळ्यांकडूनच मान्यता होती. त्यांना ते गृहीतच असावं.

बघता बघता सेंकड इयर संपलं आणि सुट्टया संपून कॉलेज सुरू झालं. आईचं माझ्यासाठी वरसंशोधन सुरू झालं असल्याची कुणकुण मला लागली. लग्नाच्या बातमीनं मला आम्ही शहाण्णव कुळी मराठा आहोत आणि त्याबाबतचे नियम कळत गेले. मी समीर जवळ लग्नाविषयी चिंता व्यक्त करताच तो म्हणाला, 'चल, आज आपण आमच्या घरी जाऊया.' आम्ही त्याच्या बाईकवरून त्याच्या घरी गेलो. कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्ती सुरू झाली होती. एका दुमजली चाळवजा इमारतीसमोर बाईक थांबवत समीर खाली उतरला. सगळेजण आम्हा दोघांकडे एकटक बघू लागले. मी समीर मागोमाग नजरा चुकवत त्याच्या पाठोपाठ जिना चढू लागले. घर उघडंच होतं. दोन खोल्याचं इवलंस घर. समीरने आत जाताच लोखडी कॉटकडे कटाक्ष टाकत मला बसायला सांगितलं. त्याने त्याच्या आईला हाक मारली. त्याची आई बाहेर आली. कष्टाचे पडसाद तिच्या शरीरावर उमटलेले दिसत होते. समीरने ओळख करून देण्याची आवश्यकता तिला नसावी. तिने मला जवळ घेतलं. माझ्या गालावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. मला समीरच्या आईची माया जाणवली. 

समीर मला म्हणाला, 'मीरा, तुझ्या साधेपणानंच मला पहिल्याच भेटीत आवडलीस. मी जात, धर्म काहीच मानत नाही. माझ्यासाठी आणि आईसाठी मानवता हा एकच धर्म आहे. रुढार्थानं मी बौद्ध आहे. तुमच्या समाजात आम्ही म्हणजे अगदीच खालच्या जातीतले! आपल्या प्रेमाविषयी तुझ्या घरात कुणकुण जरी लागली, तरी ते तुझं लग्न जबरदस्तीनं लावून टाकतील. माझे बाबा कामगार चळवळीतले कार्यकर्ते! बाबांच्या मृत्यूनंतर आईनं लोकांच्या घरी कामं करून मला शिकवलं. मला समजायला लागल्यापासून मीही वर्तमानपत्रं विक, शिकवण्या घे, लोकांच्या गाड्या धुवून दे असं करत चार पैसे मिळवून आईला हातभार लावू लागलो. शिक्षण पूर्ण होताच, मी पत्रकार म्हणून करियर करणार आहे. मला पैसे किती मिळतील माहीत नाही, पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागतील एवढं नक्कीच मी कमावेन. तुझी साथ असेल तर त्यात थोडी जास्त भर पडेल. आहे का तयारी?' माझे डोळे भरून आले. गालावरून ओघळणारे माझे अश्रू माझा होकार बोलून गेले.

बातमी घरी पोचली होती. नेहमीप्रमाणचे बाँम्बस्फोट आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत गेले. समीरच्या जातीचा उद्धार झाला. मी तर लहानपणापासूनच वळण नसलेली, वाया गेलेली असं काय काय बोलून झालं. गंमत म्हणजे दुसर्‍या दिवशीपासून माझं कॉलेज बदं करण्यात आलं. आईच्या नात्यातून एक स्थळ आलं. माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा, भरपूर शेती, शिकलेला......आई-बाबांना लग्न जमवायची घाई लागलेली होतीच. शेवटी आईनं भावनिक ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. एके दिवशी तिनं बाथरूमचं दार लावून घेतलं आणि कीटकनाशक औषधाची बाटली पिण्याची धमकी मला दिली. माझ्याकडून होकार येत नाही हे कळताच आईनं बाटली तोंडाला लावली. सनी आणि बाबांनी बाथरूमचं दार तोडून तिला बाहेर काढलं. डॉक्टरांनी तिला वाचवलं. माझा लग्नासाठी होकार मिळवण्यात सगळे यशस्वी झाले. मी मात्र त्या दिवसापासून पार दगडासारखी झाले!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.