हॅलो, हॅलो.......
हॅलो.....
हॅलो कोण, कोण हवंय तुम्हाला?
खरं सांगू का, राँग नम्बर लागलाय हे माहीत आहे मला...
पण बोलू का पाच मिनिटं...
थांबा, थांबा, ठेवू नका...
अहो, मी कोणी लुच्चा, लफंगा, रोडरोमियो मुळीच नाही...
हवं तर नाव, गावं काहीही सांगू नका...
बस पाच मिनिट बोलूया...
ठीक आहे, काय फरक पडतोय बोलल्यानं, बोलूया....
हॅलो, हं बोला, मी ऐकते...
-------
हॅलो, काय करताय,
काय करणार? तीच नेहमीची कामं...
रांधा, वाढा, उष्टी काढा....
म्हणजे? मी नाही समजलो
समजायचं काय त्यात, बाई शिकली, सवरली, खांद्याला खांदा
देऊन उभी राहिली तरी हे थोडीच सुटतंय...
काय, रांधा, वाढा, उष्टी काढा?
चेष्टा करताय का?
नाही हो, चेष्टा नाही करत,
पण वैतागताय कशाला, काय करताय सांगा बरं?
तोच विचार करतेय, इथे सतरा जणांचे सतरा नखरे...
मी काही सुचवू?
हो सुचवा ना...
मसाला आहे तयार? रेडिमेड? कोल्हापुरी चिकन मसाला, मटन मसाला काहीही चालेल...
हो आहे, पण बटाटा, वांगी कंटाळा आलाय ...
अहो, ऐका तर खरं...सोया आहे...
आहे ना...
मग काय, मसाल्याची ग्रेव्ही करा आणि गरम पाण्यातून सोया काढून टाका ग्रेव्हीत
छान प्रोटिनयुक्त स्पाईसी भाजी तयार...
चला, तुम्ही लागा कामाला....बाय
बाय....
-------
हॅलो,
हॅलो कोण?
अरेच्च्या, आवाज ओळखला नाहीत माझा?
अहो, काल बोललो नाहीत का आपण?
काल? कशाबद्दल?
अहो, कमालच आहे तुमची, अहो, मी तुम्हाला भाजी करायला सांगितली नव्हती का...
अच्छा, तुम्ही होय....
मी डिस्टर्ब तर नाही ना केलं...
छे, मी दोरीवरून कपडे काढून आता घड्या करायला घेतल्या होत्या...
अरे व्वा,
अरे व्वा, काय? ढीग पडलाय कपड्यांच्या आणि म्हणे अरे व्वा!
रागवू नका हो, तुम्हाला सांगू का, कपडे वाळत घालणं हीच मुळी कला आहे.
हो माहीत आहे मला...
माहीत आहे ना, तसंच घड्या करणं ही देखील कला आहे...
हो तेही माहीत आहे मला, पण सगळ्यांच्या कलाकलानं घेताना जीव जातो म्हटलं...
तुम्हाला एक आईडिया सांगू का...
सांगा...
तुम्ही किती वाजता कपड्यांच्या घड्या घालता?
संध्याकाळी, साडेसहा, सात वाजता...
हो ओहो हो, किती छान
तुम्हाला वेड लागलंय का...छान काय त्यात...
अहो, तुम्ही कपड्यांच्या घड्या घालता ती वेळ,
सायंकाळची,
तुम्ही ते कपडे बाजूला ठेवा आधी उठा पटकन
आणि मी काय सांगतो ते ऐका...
अहो, उठा काय, कपडे कोण तुम्ही येऊन घड्या घालणार की काय
ऐका हो, उठा आणि तुमचा आयपॉड किंवा मोबाईलमध्ये गाणी असल्यास
हेडफोन लावून ऐका...आणि ऐकता ऐकता ऐकता घड्या करा कपड्यांच्या....
शोधावा लागेल हो, ....
ठीक आहे, उद्यापासून ...पण अजून एक ऐका..
काय ते?
संध्याकाळची वेळ यमनची, यमन ऐका...
खूप मस्त मूड होईल तुमचा...
बरं चलू, बाय ह..
बाय
--------
हॅलो,.....
हॅलो, अरे होतात कुठे दोन दिवस?
का हो?
मी किती वाट बघितली...
माझी, का बरं?
अहो, तुम्हीच सांगितलं होतं ना, यमन ऐकत कपड्यांच्या घड्या घालायला
तुमची आठवण आली, पण दोन दिवस इतके मजेत गेले,
त्या यमनच्या नादात पुढची सगळी कामं पण एका
धुंद मूडमध्ये गेली,
थँक्स हं....
त्यात काय आभार मानायचे,
पण तुम्ही कुठे होतात दोन दिवस?
असंच...म्हटलं कशाला रोज रोज डिस्टर्ब करायचं?
छे हो, मला मुळीच डिस्टर्ब होत नाही, उलट बरं वाटतं
खरंच
हो खरंच
ठेवू?
का हो, घाई आहे का आज? आज काही आयडिया नाही देणार?
आज तुम्ही बोला, मी ऐकतो.
मी? मी काय बोलू?
काहीही बोला,
तुम्हाला गाणं आवडतं?
हो खूप....
मलाही....दोन दिवस गाण्यातच होते मी...
हो, सूर तुम्हाला वेड लावतात, वेडं करतात...
तुम्हाला एक यमनची चीज ऐकवू?
काय सांगताय? तुम्ही गाता?
छे हो, मी कसली गाते...पण गुणगुणते...जे आवडेल ते...
गा ना...मी ऐकतो...
ए री आली पिया बिन, सखी कल ना परत मोहे घडी पल छिन बिन...
ए री आली पिया बिन...
अं पुढे काय...आठवतच नाही हो...
मी सांगू...
काय...
जबसे पिया परदेस गवन किनो, रतिया कटत मोहे तारे गिन गिन...
एरी आली पियाबिन...
तुम्हाला गाणं येतं?
थोडं थोडं...
बापरे, मी काहीतरीच गायले,....तुम्हाला हसायला आलं असेल ना...
नाही हो, किती मनापासून गात होतात....आवडलं मला...
म्हणून तर इतक्या दिवसांनी मला त्या चीजेचा अंतरा पटकन आठवला....
चला भेटूया पुन्हा...
हो, पण असं दोन दोन दिवस गायब व्हायचं नाही हं...
नाही होणार...बोअर करणार भरपूर....
बाय
बाय
------
हॅलो,
हॅलो
कशा आहात?
मस्त
आज काही कामं नाहीत?
करून टाकली पटकन...एक सुचवू?
सांगा ना....
आपण चांगले मित्र होऊयात का?
ते तर झालोतच की...
तसं नाही हो, म्हणजे मैत्रीत हे अहोजाहो नको...खूप परकं वाटतं....
ओके बॉस....तुम्ही करा सुरुवात एकेरी हाक मारायला...
खरंतर मला संकोच वाटतो हो, पण आय विल ट्राय...
तुमचं, सॉरी तुझं नाव काय?
नाव कशाला हवं, ए म्हटलं तरी चालेल...
आपण ना एक काम करु, आपली मैत्री अशीच
छान, नीतळ राहो, आपण एकमेकांचं नाव, गाव, वय
काहीही विचारायचं नाही...
आणि?
आणि काय, छान बोलत राहायचं, ते सगळं विचारल्याविना
आपलं काही अडलंय का?
हो चालेल
ठीक, डन मग.
हो डन
ठेवू ?
हो चालेल.
-----
हॅलो,
हॅलो,
ए, तुला मी आज छान राग ऐकवणार आहे.
कोणता ग?
तू ओळखायचास.
बापरे, परीक्षा घेतेस की काय माझी?
तसं समज, घाबरू नकोस रे....
बरं, ऐकव
ऐक हं....
सावरियाँ, घर नाही आये...रतियॉ बिताई
तडपत सारी, उनबिन रोवत, रोवत
सावरियाँ घर नाही आवे...
व्वा, सुंदर.....काय सुंदर स्वर आहेत ग...
हा राग ना, बैरागी भैरव....
कुठून शिकून आलीस?
बाबाने शिकवला...
बाबा कोण?
आहे माझा बाबा, त्याने ऐकवला...
मग वाटलं, तुला ऐकवावा...म्हणून मग शिकावा लागला...
अरे बापरे, माझ्यासाठी मोठी शिक्षाच झाली तुला...
नाही रे...खूप छान वाटलं..शिकताना....
एक सांगू,
काय?
जेव्हा कधी आपलं बोलणं होईल तेव्हा
हीच चीज ऐकवायचीस..ऐकवशील प्लीज...
अरे प्लीज कशाला, मला आवडेल खूप...
नाहीतरी तू माझा एकुलता एक हक्काचा श्रोता आहेस..
त्याला गमावून कसं चालेल?
काहीतरी बोलू नकोस हं, छान आवाज आहे तुझा..
चल, उगीच हरभर्याच्या झाडावर चढवू नकोस...
ए,
ए, काय ? ए तू आहेस.
मग तू कोण आहेस?
मी? मी ....मी....मी ‘क’
म्हणजे तू ‘ए’ आणि मी ‘क’ म्हणजे एक...कसं?
नको गं, तू ‘क’ होऊ नकोस,
मग काय होऊ?
तू..... बैरागी भैरव....
तू भैरवी...
भैरवी काय रे....
हो, भैरवीच आहेस...किती आर्त गातेस.....भिडतं मनाला...
शेवटाची सोबत...छान, ठरलं आता...
आणि तू बैरागी....हा हा हा...
ए, मारीन हं तुला, बैरागी काय? मी फक्त ए बरा नाही का..
नाही, मला भैरवी म्हणतोय काय मग तू बैरागीच...
चल बाई, ठेवतो आता........बाय
बाय
-----
हॅलो,
सावरियॉ घर नाही आये....रतिया बिताई तडपत सारी
उन बिन रोवत रोवत ......
उनी सोम डारी थी मोरी आन
मंदिरवा मे बैठ घर जात...गुणीजन
कछु नही आवत...सावरियाँ....
अरे व्वा...आज अंतरा पण?
हो बाबाने आज अंतराही शिकवला....
बाबा म्हणतो, मनाला वाटतं ना, मनमोकळेपणे गायचं...छान जमतं...
खरंय....
बैरागी,
काय?
तू पण म्हण ना ही चीज
मी? छे ग बाई, तुझ्याइतकी चांगली मला नाही येणार....
असं रे काय करतोय, म्हण ना....
बरं ऐक हं....
सावरियॉ घर नाही आये.....
ए, किती छान म्हणतोस....थांब रेकॉर्ड करते...
ए, नको ग, पुन्हा केव्हा तरी...
बरं बाबा,
चल ठेवू का ग...
नको?
नको? का ग?
बैरागी, तू खूप चांगला आहेस...
हा कसला विनोद?
विनोद नाही खरंच सांगतेय मी....
अगं काहीतरीच काय...
काहीतरीच नाही, होच....
बरं बाई होच...मी चांगला..छान, उत्तमराव एकदम...
ए, उत्तमराव नाही, बैरागीराव....
येस बॉस, बाय आता?
हो बाय....
----
हॅलो,
सावरियॉ, घर नाही आये.....
बैरागी,
काय गं,
आज मी एक कविता केलीय.
काय सांगतेस?
ऐकवू तुला?
म्हणजे काय, नेकी और पूछ पूछ?
ऐकव पटकन.....
नको, तू हसशील, उद्या ऐकवेन....
नाही हसणार, पण ठीक आहे, तुझी मानसिक तयारी झाल्यावर ऐकव...
बैरागी, आज खूप कामं आहेत, ठेवू का?
नको म्हणणार होतो, पण ठेव...कर तुझी कामं....
सॉरी...
अरे, हे काय सॉरी, थँक यू ?
आमच्या समाजात हे चालत नाही हां सांगून ठेवतो...
तू ना बोलण्यात मला गुंगवू नकोस, बैरागी बाय
बाय
----
ट्रींग ट्रींग.....
ट्रींग ट्रींग...........
----
ट्रींग ट्रींग............
----
हॅलो,
हॅलो कोण हवंय?
नाव माहीत नाही हो, प्लीज फोन ठेवू नका...
नाव माहीत नाही मला, पण हा फोन ज्यांचा आहे ते हवे आहेत...
फोन ज्यांचा आहे ते?
ते नाही भेटू शकणार आता...
का?
का? गेले ते तीन दिवसांपूर्वी....
कुठे गेले?
कॅन्सर होता त्याला....शेवटच्या स्टेजमधला...
ठेवतो....
Add new comment