सिंफनी मनोगत
संगीत कुठे नाही
संगीत निसर्गात, संगीत वातावरणात,
संगीत पक्ष्यांच्या आवाजात,
संगीत नदीच्या खळखळाटात,
संगीत पावसाच्या बरसण्यात,
संगीत प्रेमात, संगीत मैत्रीत,
संगीत भक्तीत, संगीत सेवेत आणि
संगीत बाळाच्या निर्व्याज हसण्यातही
संगीत मानवतेच्या वाटेत,
संगीत उधळून देणार्या निरपेक्ष लाटेत
संगीत झंकारून उठलेल्या मनात,
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांमध्ये संगीत
श्वासाच्या प्रत्येक लयीत संगीत
संगीत हाच श्वास, संगीत हाच ध्यास
शाळेत जायला लागल्यावर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी सकाळी प्रभातफेरी व्हायची आणि त्या वेळी शाळेचा परिसर देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेलेला असे. ती गाणी ऐकताना आपल्याही अंगात वीरश्री संचारल्याचा भास होऊन त्या तालावर जोषात पावलं पडत असत. शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन विश्वात प्रवेश करताना रोमँटिक गाण्यांनी आयुष्यातल्या हळुवारपणाला साथ दिली. सगळं जग या गाण्यांनी सुंदर केलं होतं. सकाळी कॉलेजला जाताना बसस्टॉपमागच्या ‘ए-वन’ या चहाच्या रेस्टारंटमधून ‘बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है’ असे मं. रफीच्या आवाजातले स्वर कानावर पडले की त्या गाण्यातला महेबूब आपणच आहोत असं वाटून गालावर गुलाब उमलायचे. लहानपणीच आईने जबरदस्तीने गाणं शिकायला पाठवल्यामुळे शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवले जात होते. त्यातून भक्तिरस, वीररस, प्रेमरस याबरोबरच इतरही रसांमधलं संगीत मनाला मोहवत होतं.
आनंद असो, वा दुःख प्रत्येक वेळी संगीत त्या त्या भावनेला बरोबर घेऊन चालताना बरोबर होतंच. खरंच, माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संगीत आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर साथ देतं. संगीत आत्मशोधाचा एक मार्ग आहे. मैत्रीचा हात पुढे केला की ते आपलाच एक हिस्सा बनतं. म्हणूनच वयाच्या ५२ वर्षी टागोर आपल्या हातात कुंचला धरू शकतात, तर एखादी व्यक्ती निवृत्त झाल्यावर संस्कृत शिकू शकते.
असं असलं तरी हे सगळं भारतीय संगीत ऐकण्यापुरतंच माझं ज्ञान सीमित होतं. ११ वर्षांपूर्वी अच्युत गोडबोले आणि माझी ओळख झाली आणि माझं संगीतामधलं ज्ञान किती तोकडं आहे याची जाणीव मला झाली. त्यांच्यामुळे केवळ भारतीयच नाही तर पाश्चात्य संगीत म्हणजे काय, त्यातले प्रकार कोणते, ते कसं ऐकायचं हे मला कळायला लागलं. त्यांच्याबरोबर काम करताना, त्यांच्याशी बोलताना पाश्चात्य संगीतातलं व्यापकपण बघून मी थक्क झाले. जगभरातलं ऐकलेलं संगीत या विषयावर ते माझ्याशी भरभरून बोलत आणि एवढ्यावरच थांबत नसत, तर थांब तुला बीथोवन ऐकवतो किंवा तुला विवाल्डीचं 'फोर सिझन्स' ऐकवतो असं म्हणून लगेचच ते संगीत लावत असत. सुरुवातीला मला त्यातलं काहीच कळत नसे. सगळं संगीत एकसारखंच वाटे. पण हळूहळू त्यातला सौम्यपणा, हळुवारपणा तर कधी रांगडेपणा, त्यातला जोष आणि त्यातला जल्लोष हे सगळं कळत गेलं. मोत्झार्टपासून ते बेला बार्टोकपर्यंतच्या संगीतातलं वेगळेपण कळायला लागलं. अच्युत गोडबोलेंनी त्यांच्या पाश्चात्य संगीताचा खजिनाही माझ्या कम्प्युटरमध्ये भरून टाकला.
गेली दोन-अडीच वर्षं केलेला 'सिंफनी'चा हा प्रवास खूपच सुरेल झाला. आता प्रतीक्षा आहे तुमच्या माझ्या भेटीची - अर्थातच 'सिंफनी'सह!
दीपा देशमुख
Add new comment