मिरीयम मकेबा - साप्ताहिक सकाळ दिवाळी 2015
ग्रॅमी अॅवार्डनं सन्मानित झालेली दक्षिण आफ्रिकेतली प्रसिद्ध गायिका मिरीयम मकेबा ही ‘ममा आफ्रिका’ या नावानं ओळखली जाते. ती सिव्हिल राईट्स अॅक्टिव्हिस्ट म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहे. १९६०च्या दशकात आफ्रिकन संगीत जगभर पहिल्यांदा कोणी नेलं असेल तर ते मरियम मकेबानं! १९५७ साली रेकॉर्ड झालेलं आणि त्याच साली अमेरिकेत प्रकाशित झालेलं तिचं ‘पाटा, पाटा’ हे गाणं खूपच गाजलं आणि त्यामुळे ती प्रकाशझोतात आली.
मिरीयम मकेबाचं कृष्णवर्णीय असणं, त्यातही पुन्हा तिचं स्त्री असणं आणि त्यातून तिनं आपली एक वेगळी वाट चोखाळणं ही वाटचाल अत्यंत खडतर होती. आफ्रिकेतल्या वसाहतींवर त्या काळी बाहेरून आलेल्या इंग्रज आणि डच यांनी तिथल्या निसर्गसंपत्तीच्या मोहातून ताबा मिळवला. मूळच्या कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांना हुसकावून लावण्यासाठी ते तर्हेतर्हेचे प्रयोग करत. डच आणि ब्रिटिश येण्यापूर्वी आफ्रिकन लोक तिथल्या विशाल मोकळ्या पठारावर धान्य पिकवत. शेतातच राहण्यासाठी ते झोपड्या बांधत. समस्त आफ्रिकन लोकांना काळी माती म्हणजे आपली आईच असल्याची भावना मनात घट्ट रुजलेली होती आणि विशेष म्हणजे आफ्रिकेतल्या या काळ्या सुपीक जमिनीनं तिथल्या लोकांना भरभरून दिलंही होतं. फक्त धान्यच नव्हे तर, हिरे, सोनं आणि कोळसा (काळं सोनं) हेही मुबलक प्रमाणात याच जमिनीनं दिलं. खनिज तेल आणि युरेनियमचे साठे हेही प्रचंड प्रमाणात इथेच होते.
गोर्या लोकांनी इथल्या कृष्णवर्णीयांचं जगणं प्राण्यांपेक्षाही वाईट बनवलं. ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांनी गोर्यांची गुलामगिरी आणि अत्याचार सहन केले. गोर्यांनी सगळी सुखं उपभोगायची आणि कृष्णवर्णीयांना गरिबीत खितपत ठेवायचं हा जणू काही अलिखित नियमच बनला. लाखो कृष्णवर्णीयांना या बाहेरून आलेल्या उपर्यांनी आपल्या सुखसोयींसाठी गुलाम केलं. त्यांच्याकडून अतोनात कष्ट करून घेण्यात आले. तिथलेच रहिवासी असूनही कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क नव्हता. त्यांच्यात एकी होऊ नये यासाठी त्यांनी आपापसांतल्या जातीजमातींबरेाबर संबंध ठेवणं हाही गुन्हा समजला जात असे. कृष्णवर्णीयांना मद्यपानाचाही हक्क नव्हता. त्यांच्यांजवळ दारू सापडली तर त्यांची थेट तुरुंगात रवानगी होत असे. दारू पिण्यासाठी गोर्यांसारखी सुसंस्कृत लोक असावी लागतात असं गोर्यांचं मत होतं. कधी काळी पक्ष्यासारखं मुक्त आणि स्वच्छंद जीवन जगणारे कृष्णवर्णीय आता गोर्यांचे बंदिवान म्हणून जगत होते.
अशा दुसह्य वातावरणात मिरीयम मकेबाचा जन्म ४ मार्च १९३२ या दिवशी झाला. मिरीयमचे वडील कासवेल मकेबा आणि आई ख्रिस्तिना यांचं आयुष्य इतर कृष्णवर्णीयांप्रमाणेच अतिशय खडतर असं होतं. जन्मल्यावर मिरीयम इतकी नाजूक होती की श्वास घ्यायचा झाला तरी तिची दमछाक होत असे. पण मिरीयमच्या आजीच्या देखभालीमुळे तिचा जीव वाचला.
मिरीयमची आई ख्रिस्तिना मक्याचं पीठ आणि माल्ट यांच्यापासून उम्क्वोम्बी नावाची बिअर गुपचूप बनवून शेजारीपाजारी विकण्याचं काम करत असे. त्या मिळणार्या पैशांतून कुटुंबाचं पोट कसंबसं भरावं लागे. मरियम अवघी १८ दिवसांची असताना पोलिसांना ख्रिस्तिनाच्या कामाचा सुगावा लागला आणि त्यांनी धाड टाकताच घरात उम्क्वोम्बी मिळाली. पोलिसांनी ख्रिस्तिनाला आणि तिच्याबरोबर असलेल्या चिमुकल्या मिरीयमला पकडून तुरुंगात टाकलं. केवळ मक्याच्या पिठाची थोडीशी दारू गाळल्यानं तिला आपल्या आईबरोबर तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगातल्या शिक्षेचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यावर कासवेलनं ख्रिस्तिना आणि मिरीयम यांना बरोबर घेऊन मल्स्प्रुट या उत्तरेकडे असलेल्या शहरात शेल ऑईल कंपनीत पहारेकरी म्हणून काम करायला सुरुवात केली. तुटपुंज्या मिळकतीमुळे आपल्या इतर मुलांना त्यानं प्रिटोरियाला स्वतःच्या आईकडेच ठेवलं. ख्रिस्तिनाही संसाराचा गाडा ओढण्यासाठी दुसर्यांकडे स्वयंपाकाचं काम करायला लागली. ख्रिस्तिना आणि कासवेल कामावर जाताना मिरीयमला झोपडीत एकटं ठेवून जात. पण मिरीयम एकटीच न कुरकुरता खेळत असे. त्याच वेळी आणखी एक वाईट घटना घडली. कासवेलला कावीळ झाल्याचं निमित्त झालं आणि वयाच्या सहाव्या वर्षीच मिरीयमच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र नाहिसं झालं.
ख्रिस्तिना परत प्रिटोरिया इथे राहायला लागली. तिथून ती रोज जोहान्सबर्गला कामासाठी जात असे. मिरीयम आपल्या आजीजवळ असे. मिरीयमला नाचायला खूप आवडायचं. मुलींमध्ये खेळण्यापेक्षा तिला मुलांमध्ये खेळायलाच जास्त आवडायचं. त्या काळी गोर्यांकडून कृष्णवर्णीयांना जन्माचा दाखला मिळत असे. त्या दाखल्याची पुढे पदोपदी आवश्यकता पडे. त्याला पास म्हणत. पास असणं म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा असे. पास असल्याशिवाय एका भागातून दुसर्या भागात जाताही येत नसे. रात्रीच्या वेळी कुठल्याही वेळी दारावर जोरजोरात धडका बसत. दार उघडलं तर खाकी गणवेषातले पोलीस पास मागत. आपली दहशत टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमीच अशा प्रकारे त्रास द्यायला येत.
कचर्यापासून विटा तयार करण्याचं काम मरियमची आजी आणि मिरीयमची इतर भावंडं करत. मिरीयम रोज भल्या पहाटे पाच वाजताच उठून कामाला लागायची. सकाळच्या वेळी अंगण झाडून ती डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवर पाणी भरायला जाई. चार गॅलनचा डबा भरून डोक्यावर घेऊन ती आजीबरोबर लुटूलुटू पावलांनी घराच्या दिशेनं चालू लागे. मिरीयमला अशा चार-पाच खेपा करून पाणी आणावं लागत असे. कारण आणलेलं पाणी स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी वापरावं लागे. त्या काळी सर्वच कृष्णवर्णीय मुलांना अशा प्रकारची कष्टाची कामं करावीच लागत. आजूबाजूला सफरचंद, जर्दाळू, प्लम आणि पीचेससारखी अनेक फळं पिकत असली, तरी मिरीयम आणि कुटुंबाच्या गरिबीमुळे ती त्यांच्या वाट्याला येतच नसत. रोज मक्याच्या पिठाची लापशी किंवा मक्याची भाकरी असंच जेवण असायचं. कधीतरी आठवड्यातून एकदा भात मिळायचा आणि कधी अन्नधान्य नसलं तर मात्र सगळेच उपाशी राहत.
मिरीयमचं कुटुंबच नव्हे तर इतरही कृष्णवर्णीय आदिवासींमध्ये स्वतःच्या पद्धती आणि ख्रिश्चन धर्मातल्या पद्धती यांची सरमिसळ झाली होती. मिरीयमला चर्चमध्ये जायला आवडत असे. रविवारी भजनं आणि इतर गाणी आफ्रिकन आणि इंग्रजी भाषेत गायला तिला खूप आवडायचं. तिथे शाळेतून येताना काही भटके लोक फूटबॉल खेळताना दिसत. त्यांना बापेडी असं म्हटलं जात असे. ते ढोलकी वाजवत आणि नाचतही. बापेडी लोकांना संगीत खूपच आवडायचं. खरं तर त्या भटक्या/बापेडी लोकांचं जगणं मिरीयमसारख्या मंडळींपेक्षा आणखीनच दयनीय आणि बत्तर होतं. पण तरीही ते नाचताना, गाताना आनंदी दिसायचे. त्याच क्षणी मिरीयमला संगीतामधली जादू कळली. एखाद्या त्राण नसलेल्या माणसामध्ये अफाट ऊर्जा भरण्याचं काम संगीत करू शकतं हे मिरीयमच्या लक्षात आलं. त्या क्षणापासून मिरीयमच्या अंगात संगीतानं आपली जागा व्यापून टाकली. तिचं शरीर संगीताचा आवाज ऐकला की थरारून जायचं. संगीताचा ताल कानावर पडला, की असेल त्या जागी मिरीयमची पावलं तो ठेका पकडत.
मिरीयमचा आवाज ऐकून मोलेके नावाच्या शिक्षकांनी तिला त्यांच्या गानसमुहात घेतलं. मग इतर शाळांमधून ती गाण्याच्या स्पर्धेसाठीही जात असे. ती बहुतांशी गाणी आदिवासी भाषेतली असत आणि त्यांना संगीतही आफ्रिकी संगीतकारांनीच दिलेलं असे. बहुतेक गाणी गोर्यांच्या विरोधातली असायची. पण गोर्यांना ती भाषा कळत नसल्यानं बरंच असायचं. त्या काळी कृष्णवर्णीय मुलं शाळेत जाताहेत हे देखील इतरांना आवडायचं नाही. आपल्याच मातीत आपण फक्त गुलाम म्हणून जगलं पाहिजे हेच गोरी मंडळी त्यांच्यावर बिंबवत होती. कृष्णवर्णीयांची मुलं शाळेत गेली, तरी त्यांना इंग्लंडचा इतिहास शिकवला जात असे. त्यांची स्वतःची संस्कृती, इतिहास आणि कृष्णवर्णीयांमधली थोर मंडळी यांच्याविषयी एक अक्षरही त्यात नसे.
एवढंच काय, पण त्या वेळी कृष्णवर्णीयांकडे रेडिओ असणं हा देखील गुन्हा मानला जात असे. बाहेरच्या देशातले लोक काय करताहेत हे समजलं तर ही मंडळी आपल्याविरुद्ध बंड करतील अशी भीती गोर्यांना वाटत असे. गोरे लोक कृष्णवर्णीयांमध्ये भांडणं लावून देत आणि ती लागल्यावर तिकडे ढुंकूनही लक्ष देत नसत. त्या मारामारीत कोणी मरण पावला तर ‘बरं झालं एक काळा कमी झाला’ अशीच त्यांची भावना असे. याउलट गोर्यांच्या वस्तीत एखादा पक्षी जरी जखमी झाला तरी एखाद्या कृष्णवर्णीयाला त्याचा दोष नसतानाही तुरुंगाची हवा खावी लागे. आजूबाजूचं असं सगळं वातावरण बघून मिरीयमला खूप अस्वस्थपणा येत असे. तिचं रक्त उसळून येत असे.
दर रविवारी मिरीयम आणि तिचे मित्र-मैत्रिणी एकत्र जमत आणि अमेरिकन कृष्णवर्णीयांच्या जॅझ संगीताच्या इला फिट्झगेराल्ड आणि बिली हॉलिडे यांच्या रेकॉर्ड्स ऐकत बसत. मिरीयम वयात आल्यानं आसपासची तरुण मुलं देखील तिच्याभोवती पिंगा घालायला लागली. पण मिरीयमला मात्र जेम्स कुबे ऊर्फ गुली नावाचा तरूण आवडला. दिसायला गोरा आणि देखणा असलेल्या कृष्णवर्णीय गुलीला देखील मिरीयम आवडायला लागली होती.
१९४७ सालं उजाडलं आणि त्याच दिवसांत मिरीयमची शाळा संपली. गोर्यांकडे काम करताना तिला गोर्या पुरुषांशी, स्त्रियांशी आणि त्यांच्या लहान लहान मुलांशीही ‘जी मालक, जी मालकीणबाई आणि जी छोटे मालक’ असं किती आदबीनं बोललं पाहिजे याची सवय करावी लागली. प्रिटोरियाजवळच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या वेवली या छोट्या गावात मिरीयमला नोकरी मिळाली. तिथल्या एका कुटुंबाची मुलं सांभाळणं, त्यांचे कपडे धुणं आणि त्यांच्या घराची साफसफाई करणं अशी अनेक कामं मिरीयम करत असताना तिची मालकीण मात्र महिना उलटल्यावरही पगाराचे पैसे देण्याचं नावच काढेना. वाट पाहून जेव्हा मिरीयमनं पैशांची आठवण केली, तेव्हा मालकिणीनं तिच्यावर चोरीचा आळ आणून पोलिसांना बोलावलं. पण ऐन वेळी मिरीयमची दया आल्यानं मालकानं तिला पोलिसांपासून वाचवलं. ते काम सुटल्यावर दुसर्या ठिकाणीही मिरीयमला यापेक्षाही वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं.
याच दरम्यान गुलीबरोबरच्या वाढत्या भेटींमुळे सतरा वर्षाच्या मिरीयमला दिवस गेले आणि गुलीनं आपण बाप बनणार ही बातमी कळताच तिच्या आजीकडे येऊन तिला लग्नाची मागणी घातली आणि लगेचच त्यांचं लग्न एका चर्चमध्ये झालं. काहीच महिन्यांनी मिरीयमनं अतिशय सुंदर बोंगी नावाच्या एका गोर्या मुलीला जन्म दिला.
मिरीयमचा संसार सुरू झाला. पहाटे चार वाजता उठून घरातली सगळी कामं करणं, लहानशा बोंगीची देखभाल करणं, आजारी सासर्याची शुश्रुषा करणं अशी अनेक कामं मिरीयम करत असे. गुलीच्या बहिणींच्या मदतीनं मिरीयम दारूही गाळत असे. एवढी कामं केल्यानंतरही मिरीयमची सासू तिला वाट्टेल तसं टाकून बोले. एवढंच काय पण तिला खर्चायला काहीच पैसे देत नसे. मिरीयमवर झालेल्या संस्कारामुळे ती सासूला उलटून बोलत नसे. मिरीयमची मिझ्पा नावाची बहीण तिला अधूनमधून येऊन भेटत असे. मिझ्पाला गुली आवडत असे. त्यामुळे ती आपल्या बहिणीला थोडं संयमानं घेण्याचा सल्ला देत असे.
नवरा झाल्यामुळे गुलीत मालकीहक्क आणि संशयीपणा बळावायला लागला. आपल्या मित्रांशी मोकळेपणानं मिरीयमनं मारलेल्या गप्पा देखील त्याला खटकायला लागल्या. एकीकडे सासूचा छळ तर चालू होताच. गुलीची पोलीस खात्यातली नोकरी आणि बाहेर अनेक मुलींबरोबरची लफडी यामुळे तो जास्तच उद्धट होत चालला होता. त्यातच गुलीचे आपल्याच बहिणीबरोबर मिझ्पाबरोबर शारीरिक संबंध आहेत हे कळताच मिरीयमच्या पायाखालची जमीनच सरकली. मिरीयमला आपले बाहेरख्यालीपणाचे प्रताप कळले आहेत हे लक्षात येताच अपराधी वाटण्याऐवजी गुलीनं मिरीयमला लाथाबुक्वयानं तुडवायला सुरुवात केली. गुली मिरीयमला मारत असताना गुलीच्या घरातले सगळेच तमाशा पाहत होते. पण एकानंही मध्ये पडून त्याला रोखलं नाही. त्याच्या हाणामारीत लहानशी बोंगीही जखमी झाली. बोंगीच्या नाकातोंडातून रक्त वाहायला लागलं. मिरीयमनं तिला छातीशी धरलं आणि ‘आता हा छळवाद बस्स झाला’ असं म्हणत गुलीच्या घरातून तशा काळोखातून बाहेर धाव घेतली.
प्रिटोरियाला आपली आजी आणि आई यांच्याकडे परतलेल्या मिरीयमनं पुन्हा गायचं ठरवलं. गावात हौशी कलाकारांचा क्युबन ब्रदर्स नावाचा एक बँड तालमी करायचा. क्युबन बदर्सबरोबर ‘कम ऑन माय हाऊस, आय गिव्ह यू कँडी’ अशा गाण्यासह अमेरिकन गाणी, आदिवासी भागातली लोकगीतं मरियमनं गायली. मिरीयम ही क्युबन बदर्समधली एकमेव स्त्री गायिका होती आणि तिच्या गाण्याच्या बदल्यात ते तिला मानधनही देत नसत. गाण्याच्या बदल्यात तिला मिळे ती फक्त समाजाकडून अवहेलना आणि कुचेष्टा. कारण त्या काळात चांगल्या घरातल्या स्त्रीनं असं जाहीर स्टेजवर गाणं आणि नाचणं हे खूप वाईट समजलं जात असे. ‘मिरीयम मकेबा ही वाईट चालीची आहे, तिनं नवर्याला सोडलं कारण तिला असं गात फिरायचं होतं आणि आताही आपल्या मुलीला नीट वाढवायचं, सांभाळायचं सोडून सरळ आपल्या आईच्या जिवावर ती गात फिरते’ असं तिच्याबद्दल काहीकाही बोललं जाई. पण मिरीयमची आई मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.
एके दिवशी कार्यक्रम संपल्यावर मॅनहटन ब्रदर्स या द. आफ्रिकेतल्या प्रसिद्ध बँडचा संचालक नाथन माधने यानं मॅनहटन ब्रदर्समध्ये मिरीयमनं गावं असा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. त्या काळी मॅनहटनचे कार्यक्रम रेडिओवर होत असत. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्सही प्रचंड लोकप्रिय होत्या. देशभर ठिकठिकाणी त्यांचे लोकाग्रहास्तव अनेक कार्यक्रम आयोजित केले जात. अशा बँडची संचालक असलेली व्यक्ती आपल्याशी बोलतेय यावर मिरीयम मकेबाचा विश्वासच बसेना. मिरीयम त्या देखण्या आणि धिप्पाड गायकाकडे टकाटका बघत राहिली. आपण स्वप्नात तर नाहीत ना? असंच तिला वाटलं. अखेर मिरीयमनं त्याला होकार दिला. नाथन माधनेच्या घरी मग गाण्याच्या तालमी सुरू झाल्या. ती सगळी मंडळी तिच्यापेक्षा १०-१० वर्षांनी मोठी होती. पण तरीही ते तिला प्रत्येक गोष्ट शिकवताना खूप प्रेमानं वागत. मॅनहटन बदर्सचे कार्यक्रम कृष्णवर्णीयांच्या वस्तीत होत. रात्री आठ ते मध्यरात्रीच्या १२ वाजेपर्यंत ही मंडळी गात. १२ नंतर लोक खुर्च्या बाजूला सारत आणि नृत्यासाठी जागा रिकामी करून पहाटे ५ पर्यंत नृत्य करत. मॅनहटन बदर्सचा संगीतवृंद त्यांना मनमुराद साथ देत असे. मिरीयम मात्र बोंगीच्या ओढीनं बारा वाजताच घराकडे पळ काढे. बोंगीला तिनं प्रिटोरियाला तिच्या आईकडेच ठेवलं होतं.
१९५३ साली मिरीयमनं मोफोलो या ठिकाणी एक घर भाड्यानं घेतलं. तिथे बोंगीसह मिरीयमची आई आणि मिरीयम राहायला लागल्या. त्यानंतर गालोटोन कंपनीनं मिरीयम मकेबाच्या गाण्याची रेकॉर्ड काढली. त्या रेकॉर्डमध्ये मिरीयमनं जगाच्या पाठीवर आपल्या प्रेयसीला शोधत आर्तपणे गाणार्या प्रियकराच्या भावना विरहगीतातून व्यक्त केल्या. तिचं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ते रेडिओवर सतत वाजलं गेलं आणि थेट सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचलं. मग मिरीयमनं आता इंग्रजी गाणी गावीत असाही प्रस्ताव तिला कंपनीकडून आला. आपल्या गाण्यांमुळे वर्णद्वेष नष्ट होणार असेल, तर काय हरकत आहे या भावनेतून तिनं तोही प्रस्ताव स्वीकारला. आता तिच्या गाण्यांमुळे लोक तिला ओळखायला लागले आणि कार्यक्रम संपला की तिच्याभोवती गराडा घालून तिची स्वाक्षरी मागायला लागले.
अजूनही मिरीयमचं कृष्णवर्णीय असणं एखाद्या शापाप्रमाणेच तिचा पिच्छा पुरवत होतं. गाण्याच्या निमित्तानं तिला ठिकठिकाणी कार्यक्रमांना जावं लागे. रस्त्यात गोरे पोलीस तिला अडवत आणि त्रास देत. कित्येकदा शनिवारी आणि रविवारी कार्यक्रम असला की ते शुक्रवारी काहीतरी कारण काढून तिला तुरुंगात टाकत. त्यामुळे कार्यक्रमाला ती जाऊ शकत नसे आणि झालेलं नुकसानही सहन करावं लागे, ते वेगळंच!
साधं माणूस म्हणूनही आपल्याला जगता येऊ नये याचं मिरीयमला खूप दुःख होई. जनावरापेक्षाही वाईट वागणूक देणार्या गोर्यांबद्दल तिच्या मनात चीड निर्माण होई. सगळ्याच दिशांना अंधारानं वेढलेलं असायचं. एके दिवशी मॅनहटन ब्रदर्सच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आफ्रिकन नॅशनल कॉग्रेसची (एएनसी) काही माणसं एकत्र जमून आपला असंतोष व्यक्त करत होती. काही कृष्णवर्णीय वकील आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन अहिंसेवर विश्वास असणार्या ‘एएनसी’ची स्थापन केली होती. मॅनहटन ब्रदर्सचा कार्यक्रम संपल्यावर एएनसीच्या नेत्यांची आणि सगळ्यांची ओळख करून देण्यात आली. मिरीयमला तर राजकारणातली काहीही माहिती नव्हती. तिनं दबकत दबकत त्यांच्यातल्या दयाळू दिसणार्या तरुण नेत्याबरोबर शेकहँड केला. त्यानं मिरीयमला तिचं गाणं आपल्याला खूप आवडल्याचं सांगून आपलं नाव नेल्सन मंडेला असल्याचं सांगितलं. ते सगळे स्वातंत्र्याचा करार तयार करण्यासाठी जमले होते. द. आफ्रिकेत राहणारे गोरे आणि काळे दोघांचीही ती भूमी असल्याची त्यांची भूमिका असणार होती. मिरीयमला हे सगळं अद्भभुत वाटत होतं. गोर्यांना कळलं तर ते या सगळ्यांनाच गोळ्या घालून ठार मारतील अशी भीतीही तिला वाटत होती.
एकीकडे दहशत तर दुसरीकडे मॅनहटन ब्रदर्सची कीर्ती आता देशविदेशांत जाऊन पोहोचली होती. नाथनेनं स्वाझिलँड, लेसोथो, पोर्तुगीजांची वसाहत असलेलं ठिकाण आणि लोरेन्को मार्क अशा अनेक ठिकाणचा दौरा आखला. या प्रवासात कधी व्हिक्टोरियाच्या धबधब्याखाली निसर्गाच्या दर्शनानं मिरीयम स्तिमित होऊन गेली. निसर्गाच्या विराट अस्तित्वापुढे आपण किती नगण्य आहोत याची जाणीवही तिला झाली. कधी निबिड घनदाट जंगलात रानटी प्राण्यांच्या दर्शनानं ती घाबरली तर कधी सुखावली. त्या प्रवासात तिला काही ठिकाणी दहा फूट उंचीची कोकाकोलाची जाहिरात करणारी स्वतःचीच छबीही दिसली. एकूणच मिरीयमचं नाव आता सर्वत्र पसरलं होतं.
एके दिवशी दक्षिण आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या जीवनावर आधारित ‘कम बॅक आफ्रिका’ (आफ्रिकन नॅशन काँगेसचं हे राष्ट्रगीत होतं) या नावाचा सिनेमा काढण्यासाठी अमेरिकेतला लियोनेल रोगोसिन नावाच्या निर्मात्यानं मिरीयमची भेट घेऊन तिनं या सिनेमातली गाणी गावीत असा प्रस्ताव ठेवला. या सिनेमात आफ्रिकेतल्या एका खेडेगावात राहणारा एक माणूस जोहान्सबर्गमधल्या सोन्याच्या खाणीत काम करायला जातो. तिथे तो गोर्या लोकांना बॉस म्हणायला विसरतो आणि त्याचा तो अक्षम्य गुन्हा मानून त्याला कामावरून काढलं जातं. त्यानंतर मात्र त्याला कुठल्याच कामावर राहू दिलं जात नाही. यामुळे संतापलेला तो मनुष्य सगळे नितीनियम झुगारून मनाला येईल तसं वागायला लागतो. या सिनेमात कृष्णवर्णीयांसाठी असलेल्या एका क्लबमध्ये कृष्णवर्णीयांना बेकायदेशीर दारूही मिळत असते. अशा क्लबमध्ये मिरीयमला ‘मिरीयम मकिबा’ म्हणूनच गाणं गायचं असतं. तिथे आलेले पत्रकार तिला ओळखतात आणि तिनं आणखी एक गाणं गावं असा आग्रह धरतात. एवढीच त्या सिनेमात मिरीयम मकेबाची भूमिका होती. मिरीयम या सिनेमातून गायली तर ती जगभरातल्या लोकांपर्यंत पोहेाचू शकणार होती. रोगोसिनच्या आग्रहाच्या प्रस्तावाला मिरीयमनं होकार दिला.
थोड्याच दिवसांत रोगोसिनचा ‘कम बॅक आफ्रिका’ पूर्ण होऊन व्हेनिसच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील होणार असल्यामुळे मिरीयमनं तिथे आलं पाहिजे असं रोगोसिननं तिला कळवलं. हा सिनेमा वादगस्त असल्यानं मिरीयमचं द. आफ्रिकेबाहेर जाणं गुप्त ठेवलं गेलं. जाण्यापूर्वी आफ्रिकन कवी गिप्सन केन्टे यानं खास मिरीयमसाठी लिहिलेल्या गाण्याचं रेकॉडिर्ंगही तिनं पूर्ण केलं. ते गाणं गाताना मात्र मिरीयमला खूप दाटून आलं. कारण त्या गाण्यात ती तरुणी आपल्या आई-वडिलांचा निरोप घेत असते, त्याच वेळी तिच्या बाळापासूनही तिला दूर व्हावं लागणार असतं. ती दूर जात असली, तरी तिचं मन मात्र त्यांच्यात अडकलेलं असतं. त्याच वेळी मिरीयमनं स्थानिक झुलू भाषेतही एक गाणं गाऊन रेकॉर्ड केलं. त्या गाण्यात देशबांधवांना उद्देशून ती आता गोर्यांच्या देशात जातेय आणि तरीही तिला त्या तिच्या लोकांची सोबत हवीये, तेव्हा त्यांनी तिला सतत मार्ग दाखवला पाहिजे असं ती म्हणत असते. आपल्या स्वकीयांच्या भेटीची ओढही ती त्या गाण्यातून व्यक्त करते. व्हेनिसला जाताना तिलाही तिच्या आईला आणि बोंगीला एकटं ठेवून जावं लागणार होतंच.
मिरीयमनं विमान प्रवासाचा आनंद पुरेपूर लुटला. विमानाच्या खिडकीतून कापसासारखे दिसणारे ते पांढरेशुभ्र ढग, नदीकाठची दिसणारी ती ठिपक्यांसारखी गावं, जमिनीचे हिरव्या छटेतले ते विविध रंगातले चौकोनी तुकडे असं तिला स्तिमित करणारं नयनरम्य दृश्य दिसत होतं. एखाद्या परीकथेप्रमाणे सगळंच अदभुत असं तिला वाटत होतं. विमानात इंधन भरण्यासाठी मध्ये काही काळ विमान नायजेरियात उतरलं. तेव्हा तिथे एक कृष्णवर्णीय माणूस विमानाला काही सूचना करत होता. कृष्णवर्णीय माणूस असा अधिकारी थाटात बघण्याची सवय नसलेल्या मिरीयमला पहिल्यांदा द. आफ्रिकेबाहेर एक वेगळं जग आहे याची जाणीव झाली आणि तिथे आपल्यासारख्या कृष्णवर्णीय माणसांना माणूस म्हणून जगताही येतं हेही कळलं.
व्हेनिसच्या वास्तव्यात तिथल्या अनेक दिग्गज नटनट्यांना सोडून मिरीयमची छबी आपापल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी फोटोग्राफर धावाधाव करताना पाहून मिरीयम अचंबित झाली. मिरीयमच्या मागे सगळे लागल्याचं पाहून अनेक नटनट्या तिच्याकडे असूयेनं पाहत. ज्या रात्री ‘कम बॅक आफ्रिका’ दाखवणार होते, त्या दिवशी मिरीयम, रोगोसिन आणि त्याची बायको जेव्हा हॉटेलपासून थिएटरपर्यंत निघाले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी करून लोक उभे असलेले मिरीयमला दिसले. ते सगळे ‘आफ्रिका आफ्रिका’ असं ओरडत होते. ‘मिरीयम आता आंतरराष्ट्रीय कीर्तीची कलावंत आहे’ असं रोगोसिननं तिला हळूच सांगितलं, तेव्हा मिरीयमला खूप लाजल्यासारखं झालं. एकूणच इतकं कौतुकभरलं मोकळं वातावरण अनुभवयाची तिची ही पहिलीच वेळ होती.
यानंतरच्या काळात मिरीयमची हॅरी बेलाफोन्टे नावाच्या एका प्रसिद्ध गायकाशी भेट झाली आणि तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. त्याची गाणी क्युबन बदर्सच्या पहिल्या कार्यक्रमापासून मिरीयमनं ऐकली आणि गायली होती. इतकंच काय, पण त्याचा ‘कारमेन जोन्स’ नावाचा सिनेमाही तिनं बघितला होता. त्याची सगळी गाजलेली गाणी मिरीयमनं आदिवासी भाषेत भाषांतरित करून गायल्याचं कळताच हॅरी बेलाफोन्टेला तिचं खूप कौतुक वाटतं. त्याचं आदबशीर वागणं आणि नम्रपणे बोलणं यानं मिरीयम चकित झाली. खरं तर एका सिनेमातल्या छोट्याशा भूमिकेनं मिरीयमची जादू जगभर पसरली होती आणि आता तर ती बेलाफोन्टेबरोबर पुढच्या अनेक कार्यक्रमासाठी ती वचनबद्द झाली होती. लवकरच अमेरिकेत जाण्याची संधी तिला त्याच्यामुळे मिळाली.
त्यानंतर हॅरी बेलाफोन्टेनं आयोजित केलेला अमेरिकन दूरदर्शनवरून प्रक्षेपित होणारा मिरीयमचा कार्यक्रम एकाच वेळी अमेरिकेतले सहा कोटी लोक बघितला. हॅरी बेलाफोन्टेमुळे तिची भेट अनेक दिग्गज कलाकारांबरोबरही झाली. मिरीयम मकेबाच्या गाण्याचे चाहते असलेल्या अनेक कलावंतांनी तिला भेटून आपलं प्रेम व्यक्त केलं. मग त्यांच्यासाठी तिनं युद्धात हरलेल्या एका सैनिकाचं करूण गीत गायलं. त्या वेळी ‘कम बॅक आफ्रिका’मधलं बॅक ऑफ द मून (चंद्राच्या पलीकडे), कदाकगोददाने (खोसा भाषेतलं नववधूचं नवस्वप्नं रंगवलेलं गीत), सात सुखद वर्षं, नोमवा नावाचं आदिवासी भाषेतलं प्रेमगीत अशी अनेक गाणी मिरीयमनं गायली, तेव्हा न्यूयार्कमधल्या त्या वेळच्या प्रसिद्ध गायक-गायिकांनी तिच्याभोवती गराडाच घातला.
अमेरिकेच्या वास्तव्यात न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वर्तमानपत्रात मिरीयम मकेबावर कौतुकभरल्या शब्दांचा अक्षरशः वर्षाव झाला. मिरीयम मकेबाची जादू सर्वत्र इतकी पसरली की मरियम मकेबाची हेअरस्टाईल किंवा पेहराव याची तिथल्या स्त्रिया नक्कल करायला लागल्या. तिच्या केस राखण्याच्या पद्धतीला त्यांनी ‘आफ्रो’ असं खास नामकरणही केलं. एकदा हॉलिवूडमधली अतिशय प्रसिद्ध असलेली आणि मिरीयमला आवडत असलेली एलिझाबेथ टेलर ही नटी मिरीयमचं गाणं ऐकायला आली आणि एवढंच नाही, तर तिनं आपल्याबरोबर मिरीयमनं जेवावं असं खास आमंत्रणही दिलं. मिरीयमला ते सगळे दिवस स्वप्नासारखेच वाटले.
त्यानंतर अमेरिकेमधल्या दक्षिण भागातल्या अॅटलांटा या भागात मिरीयमचे दौरे चालू असताना तिचं गाणं मार्टिन ल्यूथर किंगच्या एका कार्यक्रमानिमित्त ठेवलं. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झटणार्या मार्टिन ल्यूथर किंग यांचं भाषण हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकतात हेही तिनं ऐकलं होतं. अशा कार्यक्रमात गायला मिळणं हा तिला बहुमानच वाटत होता. इतकंच नाही तर गाणं संपल्यावर प्रत्यक्ष मार्टिन ल्यूथर किंग यानं तिच्याजवळ येऊन तिला अभिवादन करत तिचं गाणं आवडल्याचं सांगितलं, तेव्हा मिरीयमच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
अॅटलांटाच्या त्या वास्तव्यात एकदा हॉटेलमधल्या जेवणाच्या ठिकाणी जात असताना तिथल्या मॅनेजरनं मिरीयमला अडवलं आणि कृष्णवर्णीय असल्याचं कारण सांगून ती आत जाऊ शकत नाही असं सांगितलं. इथेही आपल्या देशाप्रमाणेच वातावरण असल्याचं मिरीयमच्या लक्षात आलं. ती माघारी वळणार, तोच बेलाफोन्टेनं मात्र त्याच क्षणी वर्तमानपत्रातल्या आणि दूरदर्शनच्या झाडून सगळ्या बातमीदारांना बोलावून घेतलं आणि ‘वर्णभेद पाळणार्या एका देशातून आलेल्या मिस मकेबा या आपल्या पाहुणीला इथेही तीच वागणूक मिळत असेल तर आपण काय म्हणायचं?’ असा प्रश्न विचारला. आता मात्र मॅनेजरची चांगलीच तंतरली आणि त्यानं सगळ्यांनाच आत जाण्याची परवानगी दिली. अमेरिकेत अमेरिकन लोक कृष्णवर्णीयांना वेगळी वागणूक अनेक ठिकाणी देत असले तरी त्यांच्या घटनेत मात्र वर्णभेद एका वंशेभेदविरोधी प्रचंड लढ्यानंतर नाकारलेला होता आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र वर्णभेदाला घटनेनंच मान्यता दिली होती.
जिथे कुठे मिरीयमचे कार्यक्रम आयोजित केले जात, तिथे तिथे हॅरी बेलाफोन्टे आधी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाविषयी सांगत असे. पण त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतल्या परिस्थितीविषयी देखील सांगितलं जाई. मिरीयम मकेबाला तर तिच्या आपल्या स्वतःच्या देशात यायला परवानगी नव्हतीच. या कार्यक्रमांच्या निमित्तानं मिरीयम मकेबा बेलाफोन्टेकडून कितीतरी गोष्टी शिकली. आपल्याला मदत करणार्याविषयी कृतज्ञता बाळगणं, स्वतःबद्दल अभिमान बाळगणं, रंगमंचाची कदर करणं, प्रेक्षकांचं त्रण मानणं, रंगमंचावर काय कपडे असावेत, कसं वावरावं आणि शिस्त कशी पाळावी यासारख्या अनेक गोष्टी तिनं आपल्या अंगी बाणवल्या.
थोडी स्थिरता लाभल्यावर मिरीयमनं १९६२ साली अमेरिकेत एक घर विकत घेतलं. एके दिवशी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिरीयमला निमंत्रित केलं. केनेडींना इतके दिवस तिनं टीव्हीवर बघितलेलं होतं. मिरीयमची प्रकृती बरी नसतानाही तिनं तिथे जाऊन केनेडीच्या सन्मानार्थ दोन गाणी गायली. केनेडींनी तिला आपल्या वाढदिवसानिमित्तानं एका आफ्रिकन गायिकेनं इतकं सुरेख गाणं गायलं याचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
त्यानंतर संयुक्त संघाच्या वर्णभेद परिषदेत सामील झालेल्या मिरीयम मकेबानं दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्या तुरुंगातल्या खितपत पडलेल्या हजारो कृष्णवर्णीय स्त्री-पुरूषांना आणि मुलांना त्या यातनामय जगण्यातून मुक्त करावं अशी विनंती केली. तिचं ओघवतं आणि मनाचा तळ ढवळून काढणारं वर्क्तृत्व ऐकून आणि शोषितांच्या बाजूनं उभं राहायचं तिचा पक्का निर्धार पाहून परिषदेसाठी जमलेले इतर देशांचे प्रतिनिधीही तिच्यापुढे नतमस्तक झाले. आता सर्वसामान्य लोकांमध्ये मिरीयम मकेबाची ओळख केवळ आफ्रिकन गायिका नाही, तर दडपशाहीनं भरडून निघालेल्या हजारो/लाखो लोकांची प्रतिनिधी म्हणून झाली. याच काळात नेल्सन मंडेला यांना जन्मठेप सुनावल्याच्या बातमीनं मिरीयमचं मन खूपच हेलावून गेलं.
दरम्यान कार्यक्रम झाल्यानंतर आजकाल आपण लवकर थकतो असं मिरीयमला जाणवलं. एकदा तर कार्यक्रमाच्या ठिकाणीच ती चक्कर येऊन कोसळली. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यावर तिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचं निदान केलं. डॉक्टरांकडून मिरीयम तडक बेलाफोन्टेकडे पोहोचली. रडतच तिनं त्याला आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. बेलाफोन्टेसाठी देखील ती एक धक्कादायक बातमी होती. मिरीयमला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा आपल्यानंतर आपल्या मुलीचं कसं होणार या विचारानं तिला रडू कोसळलं. पण बेलाफोन्टेनं तिला ‘आपण बोंगीला नीट सांभाळू तू काळजी करू नकोस’ असंही आश्वासन दिलं. मरणाच्या एका बातमीनं मिरीयमचं सगळं जगच उलटंपालटं झाल्याची जाणीव तिला झाली. तिच्यातला आशावाद, आत्मविश्वास आणि हिम्मत सगळं पत्याच्या डावासारखं कोसळून पडायला लागलं. मिरीयमचं ऑपेरशन करून गर्भाशय काढून टाकलं गेलं. आता खरं तर तिची भीती जायला हवी होती. पण तरीही मिरीयमच्या मनातली अस्वस्थता जाता जात नव्हती.
हॉस्पिटलच्या खोलीतला टीव्ही लावल्यावर तिला बेलाफोन्टे लोकशाहीच्या हक्कासाठी आणि अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांना न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढणार असल्याची बातमी दिसली. बेलाफोन्टेनं तिला हॉस्पिटलमध्ये तार पाठवून ‘तू शरीरानं जरी आमच्यात नसलीस तरी मनानं आमच्याबरेाबरच आहेस’ असं कळवलेलं होतं. या सगळ्या घडामोडींनी मिरीयमचं उन्मळून पडलेलं मन सावरलं. त्यातलं मार्टिन ल्यूथर किंगचं ‘आय हॅव अ ड्रीम’ हे भाषण तिला जादू करणारं वाटलं. तो त्याच्या स्वप्नाविषयी लोकांशी बोलतो. जगभरातल्या वेगवेगळ्या रंगाची, वंशाची मुलं एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र गुण्यागोविंदानं आणि सुखासमाधानानं, शांततेनं राहत असल्याचं ते स्वप्न असतं. त्याचं स्वप्न ऐकत असतानाच मिरीयमला तिचं स्वप्नं आठवलं. तिलाही आपल्या दक्षिण आफ्रिकेतल्या बांधवांना स्वतंत्र झालेलं बघायचं होतं. दक्षिण आफ्रिकेतली काळी आणि गोरी सगळी मुलं एकमेकांच्या हातात हात घालून फिरतानाचं दृश्य किती सुखद होतं आणि ते दृश्य पाहण्यासाठी तिनं जगायला हवं होतं. हे स्वप्न मिरीयमला जगण्याची नवी उभारी देणारं ठरलं हे मात्र खरं. याच दरम्यान तिला अध्यक्ष केनेडी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची बातमी कळाल्यामुळे तिला आपलं आयुष्य काही क्षण थांबल्याची जाणीव झाली.
मिरीयम मकेबाचं नाव आता देशोदेशी पोहोचलं होतं. १९५६ मध्ये तिनं स्वतः लिहिलेलं ‘पाटा पाटा’ हे उडत्या चालीचं गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. झुलू अणि खोसा भाषेत पाटा म्हणजे स्पर्श करणं असा अर्थ होतो. त्या गाण्यावर अनेक जण नृत्यही बसवत. सर्वाधिक विकल्या जाणार्या पहिल्या पाच रेकॉर्डृसमध्ये या गाण्याचा क्रमांक होता. डिस्कोमध्येही अनेक जण ‘पाटा पाटा’ नृत्य करत. यात स्त्री पुरुषांनी दूर उभं राहूनच नृत्य करायचं आणि शेवटी जवळ येऊन एकमेकांना स्पर्श करायचा असा गमतीदार प्रकार होता. हे गाणं अनेक भाषांमध्ये झालं.
मिरीयम मकेबाचे दौरे चालू असतानाच आखाती युद्ध भडकलेलं होतं. कलेमध्येही राजकारण शिरू पाहत होतं. एकदा तर ती गात असलेलं एक गाणं ज्यूच्या बाजूनं भावना व्यक्त करणारं असून तिनं ते गाऊ नये असा दबाव आणला गेला. या एका प्रसंगामुळे तिच्यात आणि बेलाफोन्टेमध्ये केवळ नीट संवाद न झाल्यानं गैरसमज निर्माण झाले आणि ज्या हॅरी बेलाफोन्टेनं मिरीयम मकेबाचं करियर घडवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले, तो तिच्यापासून क्षणात दूर गेला. या घटनेनं मकेबालाही आत्यंतिक दुःख झालं.
त्यानंतरच्या ताणतणावाच्या काळात मकेबा गिनी देशात पोहोचली. गिनी हा देश १९६० मध्ये स्वतंत्र झाला. गिनीच्या ग्रामीण भागात खूपच गरिबी असून देश मात्र निसर्गसौंदर्यानं बहरलेला आहे. गिनी या देशात संगीत महोत्सव होणार होता. गिनीमध्ये दर दोन वर्षांनी संगीत महोत्सव साजरा होत असे. १९५८ पासून देखणे आणि हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले अध्यक्ष सेको तुरे हे गिनी इथे सत्तेवर होते. सर्व देशातल्या राष्ट्रीय चळवळींना ते मदत करत. ग्रामीण भागातल्या प्रवासात अध्यक्ष तुरे तिची ओळख आपली दक्षिण आफ्रिकेची बहीण अशी करून देत. तिथेच तिनं कायमचं राहावं असंही तुरेंनी सांगितलं.
याच दरम्यान मिरीयमची भेट तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणाशी कारमायकेल स्टॉक्ली या अमेरिकन तरुणाशी झाली. अमेरिकेतला लोकशाही हक्काच्या लढ्यात सतत भाग घेणारा जहाल म्हणून गोर्या अमेरिकन लोकांना त्याची दहशत वाटत असे. मिरीयम आणि स्टॉक्ली एकमेकांच्या कार्यक्रमांना आवर्जून जात आणि भेटत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या संबंधाबद्दल चर्चा व्हायला लागल्या. अखेर एके दिवशी हो नाही करत दोघांनीही लग्न केलं.
मिरीयमचा हा निर्णय मात्र तिला पुढच्या आयुष्यात चांगलाच महाग पडला. स्टॉक्लीसारख्या जहाल कार्यकर्त्याशी लग्न केल्यामुळे एफबीआयचे हेर तिच्यावर पाळत ठेवायला लागले. तसंच मिरीयमच्या कार्यक्रमांतून मिळालेला पैसा स्टॉक्लीसारख्या जहाल कार्यकर्त्यांच्या कामासाठी वापरला जातो की काय या भीतीनं सर्वसामान्य लोकांनी भीतीपोटी तिच्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं. परिणामी तिचे सगळे कार्यक्रम धडाधड रद्द व्हायला लागले आणि विरोधाभास म्हणजे मिरीयमच्या आग्रहामुळे स्टॉक्लीचं राहणीमान बदलल्यानं त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना तो बदललाय आणि भांडवलशाहीच्या बाजूनं झालाय असं वाटायला लागलं.
आता अमेरिकेत आपलं काही राहिलं नाही या भावनेनं अमेरिका सोडायला विचार मिरीयमच्या मनात वारंवार येत असतानाच गिनीचे अध्यक्ष तुरे आणि इतर अनेक देशांनी मिरीयमला आपल्याकडे येऊन कायमचं राहावं असं आग्रहाचं निमंत्रण दिलं. ती गिनीला पुन्हा एकदा पोहोचली. पण परिस्थितीत फारसा बदल झालाच नाही. स्टॉक्ली हा मिरीयमचा नवरा आहे असं कळताच गिनीमधले सरकारी अधिकारी तिच्यावर नजर ठेवायला लागले. गिनीत असताना एकदा क्युबाला गेल्यावर मिरीयमनं फिडेल कॅस्ट्रोचीही भेट घेतली. त्याच्या भाषणानं ती खूपच प्रभावित झाली. ‘आम्हाला खेडोपाडी शाळा आणि वीज पोहोचवायची आहे. सगळा रस्ता झगमगवून टाकणार्या नियॉन दिव्यांच्या जाहिरातींपेक्षा आम्हाला याच गोष्टी आवश्यक वाटतात. म्हणून आमच्या दृष्टीनं बसेसचं महत्त्व जास्त आहे. लाखो मोटारी असण्यापेक्षा लाखो बसेस नक्कीच चांगल्या.’ असं तो म्हणत होता. क्युबामधल्या सुधारणाही तिनं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्या.
त्यानंतर जवळपास सात वर्षाच्या कालावधीनंतर मिरीयम पुन्हा अमेरिकेत १९७५ साली एका कार्यक्रमासाठी परतली. गंमत म्हणजे एक गायिका म्हणून नाही, तर गिनीचे अध्यक्ष तुरे यांनी तिला गिनी देशाची प्रतिनिधी म्हणून संयुक्त संघामध्ये पाठवलेलं होतं. तिथे गिनी सरकारच्या वतीनं आफ्रिका खंडातल्या कृष्णवर्णीयांचे प्रश्न, तिथल्या राष्ट्रीय चळवळींचं यश अशा गोष्टी मरियमनं मांडल्या. वर्णभेदावर चढ्या आवाजात बोलताना महाशक्तींनी मदत करून स्वतंत्रपणे या देशांना वाढू द्यावं अशी आशा तिनं व्यक्त केली.
या दरम्यान स्टॉक्ली आपल्याला फसवतोय हे लक्षात आल्यावर तिनं त्याच्यापासूनही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि गिनीला परतल्यावर तिथे तिनं एक जागा भाड्यानं घेऊन एक डिस्को क्लब सुरू केला. तिथे पश्चिमी, आफ्रिकन आणि क्युबन संगीताच्या रेकार्ड्स आणि अनेक प्रकारचं संगीत वाजवलं जाई. मिरीयमच्या या क्लबची प्रसिद्धी संपूर्ण आफ्रिकेत सर्वदूर पसरली. गिनीला आलेले पर्यटक मिरीयमच्या क्लबला आवर्जून भेट देत. काहीच दिवसांत मिरीयमच्या डिस्को क्लबची प्रसिद्धी बघून क्लबच्या जागेच्या मालकानं तिला अव्वाच्या सव्वा भाडं मागायला सुरू केल्यावर तिनं शांतपणे क्लब बंद करायचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान गिनीचे दिलदार अध्यक्ष तुरे मलेरियानं आजारी पडले. त्यांना उपचारासाठी अमेरिकेतही हलवलं पण त्यांचा मृत्यू झाल्याची बातमीच गिनीच्या लोकांपर्यंत येऊन धडकली. मिरीयमसाठी हा खूप मोठा आघात होता.
तुरेंच्या मृत्यू नंतर गिनीमध्ये सगळीकडे धुमाकूळ माजला. या सगळ्या धुमश्चक्रीत मिरीयम पुन्हा न्यूयॉर्कला पोहोचली. तिथे पोहोचताच तिची लाडकी मुलगी बोंगी हिचं दुःखद निधन झाल्यानं मिरीयमला खूप एकटं वाटायला लागलं. खरं तर तोपर्यंत मिरीयम मकेबा ही केवळ बोंगीची आई नव्हती, तर ती द. आफ्रिकेची ‘ममा आफ्रिका’ झाली होती. ती दक्षिण आफ्रिकेतली एक गायिका तर होतीच, पण वर्णभेदाला आव्हान देण्यासाठी आयुष्यभर ठाम उभी राहिलेली वादळी व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती. बेलाफोन्टे या तिच्या गुरूनं तिला सुरेल आवाजाची ‘आफ्रिकन नाईंटेगल’ म्हटलं. तिची गाणी केवळ लोकांचं मनोरंजन करणारी नव्हती, तर त्या गाण्यांमधून चारशे वर्षांपासून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या तिच्या देशबांधवांचं दुःख आणि अन्याय यांचा करूण स्वर उमटत असे. जोहान्सबर्गमधल्या टाऊनशिप झोपड्यांपासून ते न्यूयॉर्कच्या वर्णद्वेषी घेट्टोमध्ये राहणार्या कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांच्या अत्याचाराचे पडसाद तिच्या गाण्यामधून उमटले. ती स्वतः वर्णद्वेषाच्या दाहक अनुभवातून पोळली गेली होतीच, पण अनेक अत्याचारांच्या घटनांची ती साक्षीदारही होती.
९ नोव्हेंबर २००८ या दिवशी आजारी असतानाही ती कार्यक्रम सादर करत असताना तिचं प्रसिद्ध असलेलं ‘पाटा पाटा’ हे गातानाच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, पण ते तिला वाचवू शकले नाहीत. तिच्या मृत्यूनंतर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक कार्यक्रम झाले. तिच्या आयुष्यावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारी ‘ममा आफ्रिका’ ही डॉक्युमेंट्री फिल्मही प्रदर्शित झाली. तिच्या सन्मानार्थ ४ मार्च २०१३ या दिवशी गुगलनं डुडल होमपेजवर तिला सन्मानित करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मिरीयम मकेबा ही आयुष्यभर न डगमगता वर्णद्वेष हा माणुसकीला लागलेला कलंक असल्यानं त्याच्या विरोधात बंड करत आवाज उठवत राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक आफ्रिकी देशांमध्ये ती स्वातंत्र्याला मानवंदना देत गात राहिली. मकेबाचं गाणं ऐकण्यासाठी लोकांची अलोट गर्दी लोटत असे. तिचा आवाज माणसाला मान उंच करून जगण्याचं बळ देणारा होता. तिचा स्वाभिमान जागृत ठेवून जगण्याचा संदेश तिच्या गाण्यांतून दूरदूरपर्यंत पोहोचला. मिरीयम मकेबाच्या आयुष्यातला सगळा संघर्ष, तिच्या वेदना, तिच्या यातना यांना साहण्याची अफाट ताकद संगीतानं दिली हे मात्र खरं!
Add new comment