वुल्फगँग अमॅडेअस मोत्झार्ट- ग्राहकहित दिवाळी 2015
ट्विंकल टि्ंवकल लिट्ल स्टार,
हाऊ आय वंडर व्हॉट यू आर
अप अबव्ह द वर्ल्ड सो हाय
लाईक ए डायमंड इन द स्काय
जॉन टेलर या इंग्रजी कवीनं १८०६ साली लिहिलेली ही कविता आजही जगभरातल्या आबालवृद्धांच्या ओठांवर रेंगाळते. पण हिचा खरा रचेता संगीतकार कोणालाच ठाऊक नाही. खरं तर ही मूळ रचना फ्रेंच संगीतातली असून १७६१ साली ती मुलांसाठी म्हणून प्रसिद्ध झाली. या कवितेला संगीतबद्ध करण्याचा मोह त्या वेळच्या भल्याभल्या संगीतकारांनाही आवरला गेला नाही. त्यातलाच एक होता संगीताची अलौकिक देणगी असलेला प्रतिभावान संगीतकार वुल्फगँग अमॅडेअस मोत्झार्ट! त्यानं ‘ट्विंकल ट्विंकल’ ही धुन १२ प्रकारे वाजवली! मोत्झार्ट हा क्लासिकल पिरियडमधला (अभिजात काळातला) अतिशय महान असा संगीतकार मानला जातो. त्याला अवघं ३५ वर्षांचं आयुष्य मिळालं, पण त्यातली वयाच्या नवव्या वर्षांपासूनची २४ वर्षं त्यानं आपल्या अद्भभुत जादुई संगीतानं पाश्चिमात्य अभिजात संगीतात धूम मचवली! जगप्रसिद्ध शााज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हा मोत्झार्टच्या संगीताचा निस्सिम चाहता होता.
सिंफनी (वाद्यवृंदांची संगीतरचना), कोरस (समूह), सोनाटा (पियानोसाठीची वाद्यरचना), मार्चेस (लष्करी कवायतीसाठीचं संगीत), ऑपेराज (संगीत नाटक), कॉन्चर्टोज (वाद्यसंगीताची मैफील), या सगळ्या प्रकारांमध्ये मोत्झार्टनं सुमारे ६०० संगीतरचना केल्या. त्यातल्या अनेक रचना आजपयर्ंतच्या पाश्चिमात्त्य क्लासिकल म्युझिकमधल्या सर्वोत्तम रचना मानल्या जातात. त्याच्या प्रत्येक कामात एक वेगळा मूड आणि वेगळी शैली असायची. स्वतः मोत्झार्टला भावनांनी ओथंबलेलं संगीत जास्त मोहून टाकत असे. त्याच्या संगीतात भावना आणि आवाजातलं सौंदर्य याचा उत्कृष्ट मिलाफ असे. मोत्झार्टनं आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत ४१ (नव्या संशोधनानुसार ६४) सिंफनीज् रचल्या. गंमत आणि आश्चर्य म्हणजे यातल्या १३ रचना त्यानं वयाच्या ९ ते १४ या कालावधीत लिहून ठेवल्या होत्या! मात्र त्याच्या अनुयायांनी त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अर्धवट राहिलेल्या रचना नंतर पूर्ण करून त्याला एकप्रकारे श्रद्धाजंलीच वाहिली!
वयाच्या तिसर्या वर्षापासून मोत्झार्टला संगीताची गोडी लागली! इवलासा मोत्झार्ट पियानो घेऊन वाजवत असे, त्या वेळी घरातले सगळे जण थक्क होऊन ऐकत असत. त्याच्या सर्वोत्तम अशा अजरामर रचनांची निर्मिती व्हिएन्नामध्येच झाली. संगीतकार म्हणून जरी त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली तरी त्याची आर्थिक परिस्थिती मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत हलाखीचीच राहिली. मोत्झार्टचं आयुष्य आणि संगीत या दोन्हीही गोष्टी खर्या अर्थानं विस्मयकारक होत्या. त्याच्या संगीताला ही विस्मयकारकता त्याच्या अलौकिक प्रतिभेच्या सर्शामुळे लाभली होती. एवढ्या उच्चकोटीची प्रतिभा असलेला हा माणूस कायमच सळसळत्या उत्साहानं वावरत असायचा. एखाद्या खोडकर मुलाला शोभेल असंच त्याचं वागणं होतं. त्यामुळे चेहरा उगाचच लटकावून गंभीरपणे फिरणार्या आणि स्वतःला तज्ज्ञ समजणार्या संगीतकारांना, आस्वादकांना आणि मोत्झार्टच्या प्रतिसर्ध्यांना त्याचं हे वागणं खूपच खटकायचं. संगीतरचनेत डुंबलेला मोत्झार्ट तासन्तास केवळ संगीताच्याच धुंदीत असे. लहान वयातच त्याची ओळख जोहान ख्रिश्चन बाख या त्या वेळच्या थोर संगीतकाराशी झाली आणि त्यामुळेच मोत्झार्टच्या सुरुवातीच्या अनेक रचनांवर बाखच्या संगीताचा प्रभाव होता.
विचित्र पण विलक्षण असा मोत्झार्ट हा होता तरी कोण? कुठून आला? आणि त्याच्यात असं काय होतं की त्यानं तीन शतकांपूर्वी केलेल्या संगीतरचनांनी आजही लाखो, करोडो लोकांच्या मनावर गारुड टाकावं?
वोल्फगँग अॅमेडेअस मोत्झार्टचा जन्म २७ जानेवारी १७५६ मध्ये रोमन साम्राज्यातल्या साल्जबर्ग इथे झाला. साल्जबर्ग हे ऑस्ट्रियातलं चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर असून हे शहर ऑस्ट्रियाच्या पश्चिम भागात जर्मनीच्या सीमेवर वसलेलं आहे. मोत्झार्टचं पूर्ण नाव जोहॅन्स ख्रिसोस्टोमस वुल्फगँग थिओफिल्स अमॅडेअस गॉटलिएब सिगीसमन्डूस मोत्झार्ट असं लंबचौडं होतं. आता एवढ्या मोठ्या नावानं हाका कशा मारणार? त्यामुळे घरातले मात्र त्याला ‘वुफी’ या नावानंच हाक मारत.
मोत्झार्टचे वडील लिओपोल्ड स्वतः एक संगीतकार होते. आईचं नाव अन्ना मारिया असं होतं. या दाम्पत्याला एकूण ७ मुलं झाली. पण त्यापैकी वुफी आणि नॅनल ही मुलगी अशी दोनच मुलं जगली. नॅनल हिलाही संगीताची देणगीच असावी इतकं ती सुरेल गायची. मोत्झार्ट तीन वर्षांचा असताना नॅनल ही सात वर्षांची होती. एके दिवशी लिओपोल्डचा वाढदिवस असल्यानं अन्ना मारिया ही तयारी करण्यात गुंतली होती. घरातल्या सगळ्यांनी लिओपोल्डला शुभेच्छा दिल्या. गंमत म्हणजे छोट्याशा मोत्झार्टनंही एका स्टूलवर उभं राहून आपल्या वडिलांसाठी एक कविता गाऊन दाखवली. कविता संपल्यावर एक क्षण तो थांबला आणि उडी मारून आपल्या वडिलांच्या कडेवर चढून बसला. वडिलांच्या गळ्यात आपल्या इवल्याशा हातानं मिठी मारत तो म्हणाला, ‘‘पपा, मला तुम्ही खूप खूप आवडता. देवानंतर दुसरं कोणी असेल तर माझ्यासाठी तुम्हीच आहात.’’ त्याचं ते गंभीर आवाजातलं मोठ्या माणसासारखं बोलणं ऐकून लिओपोल्ड आणि घरात जमलेले सगळे चकितच झाले!
लिओपोल्ड आणि अन्ना मारिया यांनी आपली मुलगी नॅनल हिची संगीतातली गोडी पाहून तिला संगीत शिकवायचं ठरवलं. त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असलेला मोत्झार्ट लगेचंच ‘मला पण शिकायचं, मला पण शिकायचं’ असं तुणतुणं गात बसला. लिओपोल्डनं त्याला ‘अजून थोडा मोठा हो, म्हणजे पियानोवरच्या कीजपर्यंत तरी तुझा हात पोहोचेल. मग मी तुलाही शिकवेन’ असं हसत हसत गंमतीनं म्हटलं. नॅनल पियानो वाजवत असताना छोटा मोत्झार्ट दाराआड ऐकत उभा राही.
नॅनलचा पियानोवरचा सराव झाला की ती उठून खेळण्यासाठी घराबाहेर पळत असे. ती गेली रे गेली की तिच्यावर लक्ष ठेवून असलेला मोत्झार्ट मग पियानोचा ताबा घेई. नॅनलचं वाजवणं ऐकून वयाच्या तिसर्या वर्षी मोत्झार्ट पियानो वाजवायला शिकला. एके दिवशी नॅनल खेळायला बाहेर गेली आणि मोत्झार्टनं पियानोचा ताबा घेतला. तीन वर्षाच्या मोत्झार्टचे हात जेमतेम पियानोपर्यंत पोहोचत होते. नेमकं त्याच वेळी लिओपोल्ड आणि अन्ना मारिया यांनी मोत्झार्ट वाजवत असलेली एक धुन ऐकली आणि ते चकितच झाले. त्यांनी केवळ नॅनललाच शिकवलं होतं. केवळ तिचं ऐकून ऐकून शिकणार्या आणि वाजवताना तल्लीन झालेल्या आपल्या इवल्याशा मुलाला पाहून दोघंही भारावले आणि त्या दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले.
त्यानंतर मात्र लिओपोल्डनं मोत्झार्टला नॅनलबरोबरच अतिशय सूक्ष्म आणि छोटे छोटे संगीताचे काही तुकडे शिकवायला सुरुवात केली आणि लिओपोल्डला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढासा लहान पोरगा, पण तो संगीताचे तुकडे बिनचूक आणि तेही ठरलेल्या वेळेत पूर्ण करत असे. त्याहून आश्चर्याची गोष्ट अशी की वयाच्या चवथ्या-पाचव्या वर्षी मोत्झार्टनं चक्क छोट्या छोट्या संगीतरचनाही बांधायला सुरुवात केली! मोत्झार्ट त्या रचना वडिलांना ऐकवी आणि त्याचे वडील मग त्यांचे स्वर लिहून ठेवत. आपल्या दोन्ही मुलांची संगीतातली प्रगती पाहून लिओपोल्डला खूपच धन्यता वाटे.
मोत्झार्ट पियानोवर सराव तर करत होताच, पण त्याचबरोबर त्यानं आता लिओपोल्डकडे व्हायोलिन शिकायचाही हट्ट धरला. मोत्झार्टचे पहिले गुरू त्याचे वडीलच होते. मोत्झार्टचं एकलव्याच्या एकाग्रतेनं शिकणं पाहून लिओपोल्डनं त्याच्यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावावं लागलं तरी चालेल असं ठरवलं. मोत्झार्टला लिओपोल्ड व्हायोलिनचे प्राथमिक धडे द्यायला लागला. मोत्झार्टचं वय इतकं लहान असतानाही वयाच्या मानानं संगीताच्या विश्वात आपण ‘भूतो न भविष्याति’ असं काम करत असल्याचं त्याला स्वतःलाही ठाऊक नव्हतं. मोत्झार्टला आधी संगीतरचना सुचायची आणि मग शब्द. मोत्झार्टचा गणित हा विषय चांगला होता. जमिनीवर, टेबलक्लॉथवर, जिथे मोकळी जागा दिसेल, तिथे तो गणितं आणि त्यातल्या आकृत्या काढत बसायचा. मोत्झार्टला कुठलीही भाषा खूप कमी काळात आत्मसात करता येत असे. त्यातही इटालियन भाषेवर त्याचं उत्तम प्रभुत्व होतं.
१७६२ मध्ये मोत्झार्ट चक्क फक्त सहा वर्षांचा असताना लिओपोल्डनं आपल्या मुलांना घेऊन जाहीर असा संगीताचा पहिला यशस्वी कार्यक्रम सादर केला! तो ऐकून सगळे अवाक्च झाले! तिथपासून मात्र मुलांचा खरा संगीतमय प्रवास सुरू झाला. मुलांसाठी हा प्रवास म्हणजे देखील एकप्रकारची सैर आणि मजाच होती. ते दिवसभर प्रवास करत आणि रात्री कुठल्यातरी गावात मुक्काम करत. कार्यक्रमासाठी व्हिएन्ना, प्राग, म्युनिक, पॅरिस, लंडन, झ्यूरिक आणि रोम या सगळ्या ठिकाणी नॅनल आणि मोत्झार्टला घेऊन लिओपोल्ड फिरला. ज्या ठिकाणी मोत्झार्ट आणि नॅनल यांचा जाहीर कार्यक्रम होत असे, त्या ठिकाणी इतकी लहान वयाची मुलं असं काही संगीतातला जादुई चमत्कार सादर करू शकतात यावर श्रोत्यांचा विश्वासच बसत नसे. त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असे. लोक मग ज्याला त्याला मोत्झार्ट आणि नॅनल यांच्याबद्दल भरभरून सांगत आणि ही बातमी कर्णोपकर्णी करत दुसर्या गावात लिओपोल्ड आपल्या मुलांना घेऊन जाण्यापूर्वीच पोहोचलेली असे.
व्हिएन्नाच्या वास्तव्यात एकदा शूबर्न इथे मोत्झार्ट आणि नॅनल यांच्यासाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. तिथला सम्राट फ्रँझ जोसेफ यानं मोत्झार्टला ‘बालजादूगार’ ही पदवी दिली. मोत्झार्टच्या संगीतप्रतिभेची परीक्षा पाहण्यासाठी सम्राटानं त्याला अत्यंत कठीण अशा संगीतरचना वाजवायला सांगितल्या आणि त्याही त्यानं एका बोटानं वाजवाव्यात अशी अट घातली. तसंच पियानोचा कीबोर्डही मुद्दामच मोत्झार्टला कीज दिसूच नयेत म्हणून कपड्यानं आच्छादून टाकला गेला. पण मोत्झार्टची तयारी एवढी जबरदस्त होती आणि त्याचा कीबोर्डवर हात इतका चांगला बसला होता, की मोत्झार्टसाठी ही काही परीक्षा नव्हतीच. त्यानं अत्यंत कठीण असे तुकडे काही क्षणात वाजवायला सुरुवात केली आणि राजाराणीसहित उपस्थितांनी आश्चयानं तोंडात बोटंच घातली!
मोत्झार्ट आणि नॅनल या दोघा भावंडातली अद्भुत जादुई कला पाहून दरबारातले सगळेच जण त्यांच्यावर प्रचंडच खुश होते. अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्तींनी दोघा भावंडांवर भेटवस्तूंचा माराच केला. राजाला तर मोत्झार्ट आणि नॅनल इतके आवडले, की त्यानं मोत्झार्टला निळसर जांभळ्या रंगाचा सुंदर सूट शिवून भेट दिला. नॅनलसाठीही रेशमी पांढराशुभ्र फ्रॉक देण्यात आला. दोघांही भावंडांना हिर्याच्या अंगठ्या देण्यात आल्या. जांभळ्या सूटमधल्या मोत्झार्टचं चित्रही त्या वेळी काढण्यात आलं आणि आजही ते जतन करून ठेवण्यात आलं आहे. मोत्झार्टनं त्या वेळी पियानोबरोबर व्हायोलिन, हॉस्पिकॉर्ड आणि इतर वाद्यांच्या स्वतंत्र रचना लिहिल्यामुळे त्याची कीर्ती इतकी पसरली की लोक त्याला ‘बाल प्रतिभावंत’ म्हणजेच ‘चाइल्ड प्रॉडिजी’ म्हणून ओळखायला लागले.
जर्मनीतल्या फ्रँकफर्टला दोघा भावंडाचा कार्यक्रम बघून तिथल्या लोकांना मोत्झार्टनं वेडच लावलं. जाईल तिथे लोक मोत्झार्ट आणि नॅनल यांचं मनापासून कौतुक करत. १७६४ साली मोत्झार्ट आणि नॅनल यांना लिओपोल्ड पॅरिसहून लंडनला घेऊन गेला. त्या वेळी किंग जॉर्ज-तिसरा हा राजा इंग्लंडमध्ये राज्य करत होता. राजा आणि राणी या दोघांनाही संगीताची प्रचंड आवड होती. राजानं मोत्झार्टला बाख आणि हँडेल या संगीतकारांच्या अतिशय अवघड रचना वाजवायला सांगितल्या. मोत्झार्टनं त्या रचना तर एका झटक्यात वाजवल्याच पण त्यात भर टाकून स्वतःची सर्जनशीलताही दाखवली. मोत्झार्टनं सादर केलेल्या संगीतरचनांनी सगळा हॉल त्याच्यावर कौतुकभरल्या शब्दांचा वर्षाव करत राहिला. त्या वेळी मोत्झार्ट अवघा ८ वर्षांचा होता! त्यानंतर १७६५ च्या जुलै महिन्यात मोत्झार्टला घेऊन लिओपोल्ड लंडनहून हॉलंडला गेला. तिथे अनेक लहानमोठ्या गावांमध्ये कार्यक्रम करून ते सगळे साल्जबर्गला १७६६ च्या नोव्हेंबर महिन्यात परतले.
त्या काळात संगीतक्षेत्रात इटलीला खूपच महत्त्व होतं. इटलीत आपलं संगीतातलं कौशल्य सिद्ध केल्यावरच त्या व्यक्तीला एक चांगला संगीतकार म्हणून मान्यता मिळत असे. त्याशिवाय त्याचं कौशल्य कुणी स्वीकारत नसे. यामुळे लिओपोल्डला आता मोत्झार्टनं इटलीत रीतसर ती मान्यता मिळवली पाहिजे असं वाटायला लागलं. त्यामुळे त्यानं इटलीच्या प्रवासाची तयारी सुरू केली.
१७६९ च्या डिसेंबरच्या महिन्यात लिओपोल्ड आणि मोत्झार्ट पुन्हा प्रवासाला निघाले. सततच्या प्रवासाला मोत्झार्ट कधीही कंटाळला नाही. रस्त्यात त्याच्याविरुद्ध दिशेनं लगबगीनं पळणारी हिरवी झाडी, मधूनच साद घालणारा पक्ष्यांचा आवाज आणि घाटावरून दिसणार्या निळ्याशार दर्या, पाण्यानं तुडुंब भरलेली नितळ तळी आणि त्यात उमललेली रंगीबेरंगी असंख्य फुलं, डोलणारी हिरवीकच्च शेतं आणि या सगळ्यांमधून ओसंडून वाहत असलेलं संगीत मोत्झार्ट अनुभवत होता. मध्येच एखादं गाव लागे, तेव्हा त्या गावातले अरूंद रस्ते, आजूबाजूनं दाटीवाटीनं उभ्या असलेल्या वास्तू आणि त्यातूनच मधूनच दृष्टीस पडणारं छोटंसं चर्च आणि चर्चच्या दिशेनं जाणारा फादर यांच्या चित्रांतही मोत्झार्टला संगीत भरलेलं दिसे.
इटलीला पोहोचल्यावर तेरा वर्ष वय असलेल्या मोत्झार्टला खूपच परिश्रम करावे लागले. प्रत्येक कॉन्चर्टोमध्ये आपलं कसब दाखवताना संगीतातले दिग्गज मोत्झार्टची सत्वपरीक्षा घेण्याचीच वाट बघत. ते त्याला अत्यंत कठीण अशा संगीतरचना करायला सांगत. पण मोत्झार्ट कोणासमोरही हार पत्करणार्यातला नव्हताच. प्रत्येक परीक्षा त्याला एक प्रकारचं आव्हानच वाटे. त्याच्या बुद्धीला ती मेजवानीच वाटे. त्याच्या या गुणांमुळे आणि संगीतातल्या कौशल्यामुळे तो कुठे जाण्यापूर्वीच त्याच्याविषयी अनेक दंतकथा त्या ठिकाणी पोहोचलेल्या असत. त्या त्या ठिकाणचे लोक मग मोत्झार्टला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.
रोममध्येही जिथे मोत्झार्ट जाईल तिथे त्याच्या मागे यश धावत येतच होतं. तिथल्या सेंट पीटर्सच्या भव्य वास्तूला लिओपोल्ड आणि मोत्झार्ट यांनी भेट दिली. तिथलं कॅथीड्रल बघताना त्यांना त्या वास्तूची भव्यता लक्षात आली आणि त्यांचं लक्ष मायकेलअँजेलोनं केलेल्या अद्वितीय चित्रकारितेतल्या कौशल्यपूर्ण अशा तिथल्या सिस्टाईन चॅपेलनं वेधलं. मायकेलअँजेलो या जगप्रसिद्ध कलाकारानं केलेलं ‘लास्ट जजमेंट’ हे चित्र पाहून तर मोत्झार्टच्या अंगावर रोमांचच उठले! तिथलं ‘मिजरेरी’ हे करूणेनं भरलेलं संगीत त्यांनी ऐकलं. ‘मिजरेरी’ या संगीतरचनेचं एक वैशिष्ट्य होतं. ही रचना लिहिलेले कागद चर्चच्या बाहेर नेण्यास चर्चचा मज्जाव असे. ही रचना चर्चबाहेर कुणीही वाजवू नये यासाठी चर्चनं घेतलेली ती सावधगिरी असे. कॅथीड्रलमधून परतताना लिओपोल्ड आणि मोत्झार्ट ‘मिजरेरी’च्या ऐकलेल्या त्या संगीतानं इतके स्तिमित झाले होते, की बराच वेळ ते एकमेकांशी एक शब्दही बोलू शकले नाहीत. त्या रात्री मोत्झार्टला झोपच लागेना. त्यानं मग उठून कागद आणि पेन घेऊन कॅथीड्रलमध्ये ऐकलेली आणि मेंदूत साठवलेली ती संगीतरचना जशीच्या तशी कागदावर उतरवायला सुरुवात केली. जेव्हा त्याचं समाधान झालं, तेव्हा पहाट झाली होती आणि १४ वर्षांचा मोत्झार्ट टेबलावर डोक ठेवून शांतपणे झोपला होता. मिजरेरीमधली ९ आवाजातली ही संगीतरचना केवळ एकदाच ऐकून लक्षात ठेवणं हा एक चमत्कारच होता! गंमत म्हणजे या रचनेतले हे ९ आवाज एकाच वेळी एकाच स्वरात गात नव्हते. त्यामध्ये एकापेक्षा जास्त मेलडीज एकाच वेळी सुरू होत्या. (मेलडी म्हणजे एकामागून एक येणार्या स्वरांची कानाला मधुर वाटणारी स्वररचना. मेलडीमध्ये एका वेळी एकच स्वर वाजवायचा असतो.)
मोत्झार्टच्या या कामगिरीची वार्ताही क्षणात संपूर्ण रोममध्ये पसरली. मग रोममधल्या मोठमोठ्या नामांकित लोकांकडून मोत्झार्टला आमंत्रणं यायला लागली. रोममध्ये मोत्झार्ट जाईल तिथे लोक त्याच्यावर आपल्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजवायला लागली.
लिओपोल्ड आणि मोत्झार्ट यांचा पुढचा मुक्काम नेपल्स इथे होता. नेपल्समध्येही बड्या बड्या लोकांपुढे अतिशय सुंदर अशा संगीतरचना मोत्झार्टनं सादर केल्या. पण एवढा लहान मुलगा इतकं सफाईदारपणे आणि अप्रतिम संगीत कसं काय सादर करू शकतो यावर ऐकणार्यांचाही विश्वास बसेना. मग एकच अफवा क्षणात सगळीकडे पसरली. मोत्झार्टनं हाताच्या बोटात घातलेल्या जादुई अंगठीमुळेच त्याला हे शक्य होतं असं लोक जोरजोरात बोलायला लागले. मोत्झार्टच्या कानावर जेव्हा त्यांचं बोलणं पडलं, तेव्हा त्यानं एक मंद स्मित केलं आणि आपल्या बोटातली अंगठी क्षणार्धात काढून ठेवली आणि पहिल्यापेक्षाही कठीण आणि चमत्कार वाटावा अशी संगीतरचना सादर केली!
मोत्झार्टची इटली भेट अविस्मरणीय अशीच झाली. रोममधल्या पोपनं तर मोत्झार्टला ‘गोल्डन स्पर’ असा मानाचा किताब बहाल केला. त्यानंतर लिओपोल्ड आणि मोत्झार्ट मिलानला पोहोचले. मिलानला आल्यावर १७७० साली वयाच्या १४ व्या वर्षी मोत्झार्टनं आपला ‘मेट्रिडेट’ नावाचा पहिला ऑपेरा लिहिला. ऑपेरा म्हणजे आपल्याकडल्या संगीतनाटकांसारखाच एक प्रकार म्हणता येईल. त्यानं लिहिलेला हा ऑपेरा खूपच लोकप्रिय झाला. त्याचाच एक भाग म्हणून त्यानं सातवी सिंफनी (वाद्यवृंदांची संगीतरचना) लिहिली.
वयाच्या १७ व्या वर्षांपर्यत मोत्झार्टनं २४ सिंफनीज लिहिल्या होत्या. त्यानं लिहिलेली २९ क्रमांकाची सिंफनी ही अफलातून आहे. त्याचं संगीतातलं आपलं सगळं कौशल्यच या सिंफनीत एकवटल्याचा भास ही सिंफनी ऐकताना होतो. आक्टोबर, १७७३ मध्ये रचलेल्या २५ क्रमांकाची सिंफनी ही सुंदरच होती. जी-मायनर (मायनर स्केल म्हणजे एका विशिष्ट पट्टीत वापरून केलेल्या रचनांमध्ये बर्याच वेळा दुःखी भाव व्यक्त केलेले असतात.) या विशिष्ट पट्टीचा वापर करून मोत्झार्ट दुःख आणि शोकांतिका खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करत असे. टायटन घड्याळाच्या कुठल्याही जाहिरातीत मोत्झार्टची २५ क्रमांकाची धुन वापरली आहे आणि अनेक वर्षांपासून जाहिरातीचं स्वरूप जरी बदललं तरी धुन मात्र तीच आहे. मोत्झार्टच्याच रचनेवर ए. आर. रेहमान यानं अतिशय कल्पकतेनं पियानो, पं. रवीशंकरांची सतार, अल्लारख्खा आणि झाकीर हुसेन यांचा तबला आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी आपल्याला ऐकायला मिळते.
सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि तेजस्वी यश मोत्झार्टकडे भरभरून येत असतानाच ढगाळलेलं सावटही त्याच्या आयुष्यावर पडणार होतं. मोत्झार्टची बुद्धी, त्याचं संगीतातलं अद्वितीय कौशल्य, त्याचं निर्व्याज वागणं, त्याची प्रसिद्धी, त्याला मिळणारे सन्मान हे सगळं मात्र काही जणांना सहन होइनासं झालं हेातं. जेव्हा लिओपोल्ड आणि मोत्झार्ट साल्जबर्गला परतले तेव्हा त्यांच्यावर मेहेरनजर असणार्या आर्चबिशपचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या जागेवर स्थानापन्न झालेल्याला मोत्झार्ट नकोच होता. त्यामुळे मोत्झार्टला काम कसं मिळणार नाही याची त्यानं जाणीवपूर्वक काळजी घेतली. मोत्झार्टचं वय या वेळी अवघं २१ वर्षाचं होतं. कुठलंही काम नसल्यानं तो घरातच बसून होता. पण आपली कला त्याला गप्प बसू देत नव्हती. मोत्झार्ट साल्जबर्गच्या बाहेर पडला, तरच त्याच्या कामाला न्याय मिळेल असं वाटल्यानं लिओपोल्डनं त्याच्याबरोबर बाहेर पडायचं ठरवलं. पण लिओपोल्डच्या जाण्यावर नव्या आर्चबिशपनं हरकत घेतली. शेवटी २३ सप्टेंबर १७७७ या दिवशी फक्त मोत्झार्ट आणि त्याची आई या दोघांनीच लिओपोल्डशिवायच प्रवासाला सुरुवात केली.
मायलेकांनी पहिला मुक्काम म्युनिकमध्ये केला. पण इथे आल्यावर मोत्झार्टनं मॅनहाईमला जाऊन नाव कमवावं आणि मग त्याला नोकरी मिळेल असा सल्ला तिथे त्याला दिला गेल्यानं, म्युनिकला रामराम करत त्यानं मग मॅनहाईमचा रस्ता पकडला. मॅनहाईम इथे मोत्झार्टला खूपच मोकळं आणि खेळीमेळीचं वातावरण मिळालं, पण त्याला अजून आर्थिक स्थैर्य लाभलं नव्हतंच.
त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही मोत्झार्टच्या वाळवंटी आयुष्यात थंडगार झुळुक यावी तशी त्याची ओळख वेबर या कुटुंबाशी झाली. १५ वर्षांची आलोविशा आणि १४ वर्षांची कॉन्स्टन्झा या वेबर कुटुंबातल्या दोन मुलींशी मोत्झार्टची ओळख झाली. आलोविशाचा आवाज खूपच गोड होता. मोत्झार्ट आता आलोविशासाठी गाण्यांची रचना लिहायला लागला. इतकंच नाही तर तो तिच्याकडून ती गाणी गाऊनही घ्यायला लागला. मोत्झार्ट आणि आलोविशा काहीच दिवसांत एकमेकांच्या प्रेमात पडले. मोत्झार्टनं लिओपोल्डलाही पत्रानं आपल्या प्रेमाबद्दल सुतोवाच केलं. पण लिओपोल्डला मोत्झार्टचं हे प्रेमप्रकरण पसंत पडलं नाही. त्यानं मोत्झार्टला पॅरिसला यायला सांगितलं. वडिलांची नाराजी नको म्हणून आज्ञाधारकपणे मोत्झार्टनं मॅनहाईम सोडायचा निर्णय घेतला. खरं तर त्याचं सर्वस्व असणारी आलोविशा मॅनहाईममध्ये होती. पण वडील का प्रेयसी असा पर्याय समोर असल्यानं त्यानं वडील हाच पर्याय अखेर निवडला.
पॅरिसच्या वास्तव्यात मोत्झार्टचे तीन महिने अत्यंत हलाखीत गेले. काम तर मिळत नव्हतंच. पण नवख्या ठिकाणी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी रोज वेगवेगळे छोटेमोठे देणेकरी घरासमोर येऊन तगादा लावत होते. मोत्झार्टच्या आईनं तिच्याजवळ असलेलं नसलेलं विकून कसंतरी घर चालवायचा प्रयत्न केला. पण अखेर तीही थकली आणि आजारी पडली. तिच्या आजारपणात तिच्यावर उपचार करायलाही मोत्झार्ट जवळ पैसे नव्हते. ३ जुलै १७७८ या दिवशी मोत्झार्टची आई त्याला सोडून कायमची निघून गेली.
आता पॅरिसमध्ये राहण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. पॅरिसमध्ये येताना मोत्झार्टनं त्याची आलोविशासारखी प्रेमळ आणि देखणी प्रेयसी गमावली होती आणि तिथे आल्यावर आपली प्रत्यक्ष जन्मदात्री आई! दुःखद प्रसंगांची गाठोडी बरोबर घेऊन मोत्झार्ट साल्जबर्गला परतला.
लिओपोल्डनं मोत्झार्टसाठी साल्जबर्गमध्ये काम मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर साल्जबर्गच्या आर्चबिशपनं दरबारात कोर्ट ऑर्गनिस्ट हे पद मोत्झार्टला देऊन दर महा ५०० फ्लोरिन्स एवढ्या पगारावर त्याची नियुक्ती करायचं ठरवलं. लिओपोल्डची मिळणारी मिळकत आणि मोत्झार्टचा पगार यावर त्याचं कुटुंब जेमतेम उदरनिर्वाह करू शकणार होतं. त्यातच लिओपोल्डनं आर्चबिशपकडून मोत्झार्टसाठी तो जेव्हा ऑपेरा करेल तेव्हा तो कामावर उपस्थित राहू शकणार नाही अशी परवानगीही मिळवली होती. खरं तर आता मोत्झार्टला साल्जबर्गला येण्याची इच्छाच राहिली नव्हती.
१७८० मधल्या नोव्हेंबर महिन्यात म्युनिकला वार्षिक उत्सव होणार असल्यानं मोत्झार्टवर त्यात ऑपेरा लिहिण्याचं काम सोपवण्यात आलं. मोत्झार्टनं ऑपेरा लिहिण्यासाठी खूपच उत्साहानं मग तयारी सुरू केली. तो म्युनिकला गेला आणि त्याचा ’आयडोमेनिया’ हा गंभीर स्वरुपाचा ऑपेरा २९ जानेवारी १७८१ या दिवशी इटालियन भाषेमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला. या ऑपेराला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९३०-३१ मध्ये युरोपमध्ये मोठमोठ्या ऑपेराहाऊसेसमध्ये हा ऑपेरा सादर केला गेला होता.
मोत्झार्टचं टोकाचं यश पाहून साल्जबर्गच्या दरबारातल्या संगीतप्रमुखाला मोत्झार्टचा इतका मत्सर वाटायला लागला की त्यानं मोत्झार्टचा सन्मान करण्याऐवजी त्याला नोकरीवरून चक्क काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. आपल्यापेक्षाही मोत्झार्टची होणारी वाहवा, प्रशंसा आणि लोकांच्या मनातलं प्रेम तो सहनच करू शकला नाही. मोत्झार्टनं आपण आता दुसर्याची चाकरी करणार नाही असं लिओपोल्डला स्पष्ट शब्दात सांगून टाकलं आणि आपण आता साल्जबर्गला काहीही झालं तरी येणार नाही, असं लिओपोल्डला कळवलं.
आता मोत्झार्टनं आयुष्यात स्थिर व्हायचं ठरवलं. आलोविशाची लहान बहीण कॉन्स्टन्झा हिच्याशी लग्न करायचा प्रस्ताव त्यानं तिच्यासमोर ठेवला. कॉन्स्टन्झाला मोत्झार्ट आणि आलोविशा यांच्या प्रेमाविषयी कल्पना असूनही तिनं मोत्झार्टला होकार दिला आणि दोघांनी घरच्यांच्या संमतीनं १६ ऑगस्ट १७८२ या दिवशी लग्न केलं.
कॉन्स्टन्झाचं मोत्झार्टवर खूप प्रेम होतं. पण तिला घरकामाचा आणि संसार चालण्याचा अनुभव नसल्यानं मोत्झार्टच्या तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत घर कसं चालवायचं हेच कळायचं नाही. लग्नानंतर मोत्झार्टला आर्थिक परिस्थितीशी पुन्हा झगडावं लागलं. याचं कारण पियानोवादक आणि संगीतकार म्हणून जरी मोत्झार्टचा व्हिएन्नामध्ये नावलौकिक असला, तरी त्याच्या आर्थिक उत्पन्नात फारसा बदल झाला नव्हता. त्यातून मोत्झार्ट आणि कॉन्स्टन्झा ही दोघंही खर्चीक असल्यानं येणारा पैसा कमीच पडत असे.
त्यानंतर १७८४ साली मोत्झार्टनं लिहिलेल्या ‘दी मॅरेज ऑफ फिगारो’ या ऑपेरालाही प्रचंड यश मिळालं. मोत्झार्टच्या आधीच्या काळातल्या ऑपेराजमधली पात्रं ही अतिमानवी (सुपरनॅचरल, सुपरह्यूमन) अशी असायची. वास्तव जगातली माणसं, त्यांची व्यक्तिमत्त्वं, त्यांच्या भावभावना हे सगळं गुंफून ऑपेरामध्ये सादर करणारा मोत्झार्ट हा पहिलाच संगीतकार होता. मोत्झार्टनं जवळजवळ २२ ऑपेराजसाठी संगीत दिलं. त्यापैकी अर्धे ऑपेराज जगातल्या मोठ्या ऑपेरा हाऊसमध्ये आजही सव्वादोनशे वर्षांनंतरही सातत्यानं प्रदर्शित होतात!
या ऑपेराचं सुरुवातीचं संगीत मोत्झार्टच्या सर्वोत्तम संगीतापैकी एक आहे. नंतरच्या रोमँटिक काळातला सुप्रसिद्ध जर्मन संगीतकार जोहान्स ब्रॅहम्स म्हणतो,‘‘माझ्या मते फिगारोमधली प्रत्येक रचना म्हणजे एक चमत्कारच आहे. एखादा संगीतकार इतकं परिपूर्ण संगीत कसं रचू शकतो हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. मोत्झार्टच्या या संगीताइतकं संगीत दुसरं कोणीही देऊ शकलं नाही. अगदी बीथोवनसुद्धा नाही.’’
ऑपेरामधल्या यशानंतरही मोत्झार्टच्या आर्थिक परिस्थितीत मात्र काहीच फरक पडला नाही. घर चालवण्यासाठी त्याला संगीताच्या शिकवण्या घ्याव्या लागत. त्यातच त्याचा स्वभावही उदार असल्यानं त्याच्याकडे मदत मागायला आलेल्या गरजूंना तो सढळ हातानं मदत करत असे. अनेकदा प्रकृतीनं तोळामोसा असलेल्या कॉन्स्टन्झाच्या आजारपणाचा खर्चही मोत्झार्ट करू शकत नसे. कित्येकदा तर त्यांना उपाशीपोटी झोपावं लागे. मोत्झार्टचे मित्र मात्र त्याची कदर करणारे होते. तो अडचणीत आहे कळताच ते धावत येत आणि त्यांची गरज भागवत.
९ मार्च १७८५ या दिवशी मोत्झार्टनं २१ क्रमांकाची सिंफनी पूर्ण केली. अत्यंत धीम्या लयीत असलेल्या या रचनेतली सौंदर्यस्थळं आणि सूक्ष्म बारकावे आपण जितक्या वेळी ही रचना ऐकू तितक्या वेळा आपल्याला कळत जातात. ही रचना मुख्यतः पियानोवर वाजवलेली असून इतर वाद्यांचीही यात खूपच अनोखी साथ आहे. पियानोबरोबरच बासरी, ओबो, बसून, हॉर्न, व्हायोलिन आणि चेलो या वाद्यांचा वापर यात सुरेख पद्धतीनं केलेला लक्षात येतो. रात्रीच्या शांत वेळी मनातल्या आनंदलहरींना जागवत, डोळे मिटून पडलेल्या अवस्थेत २१ क्रमांकाची ही संगीतरचना ऐकली तर त्याचा एक अद्भभुत असा अनुभव ऐकणार्याला येतो.
ऑपेरा आणि सिंफनी यासारख्या प्रकारांसाठी मोत्झार्ट दीर्घ संगीतरचना लिहायचा. तसंच काही प्रकारांतल्या कार्यक्रमांसाठी विशिष्ट प्रकारचं लघुसंगीतही तो तयार करत असे. यालाच ‘सेरेनेड’ असं म्हटलं जात असे. मोत्झार्टनं रचलेलं सेरेनेड हे संगीत रात्रीचं छोटेखानी संगीत म्हणून ओळखलं जातं. सेरेनेडचे कार्यक्रम मोकळ्या जागेत होत असत. विशेष करून संध्याकाळच्या मनोरंजनाच्या हेतूनं हे संगीत लिहिलं जायचं. एकीकडे हे संगीत चालू आहे आणि एकीकडे लोक एकमेकांशी गप्पा मारताहेत आणि मेजवानीचा आस्वाद घेताहेत असं दृश्य असायचं. असं असलं तरी मोत्झार्टनं सेरेनेड या प्रकारचं संगीत लिहितानाही त्यात कधी तडजोड केली नाही. ते तितकंच उत्कृष्ट झालं पाहिजे यावर त्याचा भर असे. मोत्झार्टनं रचलेली सेरेनेड नं. १३ ही पाश्चिमात्य अभिजात संगीतातली सर्वोत्तम रचनांपैकी एक समजली जाते.
१७८७ च्या सप्टेंबर महिन्यात प्रागमध्ये मोत्झार्ट त्याचा पुढे सगळ्यात गाजलेला ‘डॉन जिओव्हानी’ नावाचा ऑपेरा लिहीत होता. पण तो लिहिण्यासाठी त्याच्याकडे वेळ खूपच कमी होता. त्याला हा ऑपेरा २९ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचा होता. पण त्याच्या फक्त एक दिवस अगोदर म्हणजे २८ ऑक्टोबरला मोत्झार्टला एक गोष्ट लक्षात आली. ती ही की या ऑपेराच्या सुरुवातीला वाजणारी वाद्यसंगीताची धुन (ज्याला ओव्हर्चर असं म्हणतात) आपण तयारच केली नाहीये! पण मोत्झार्टच्या डोक्यात मात्र ती धुन तयारच होती. ती फक्त कागदावर उतरवणंच बाकी होतं. दुसर्या दिवशी ऑपेरा सादर होणार होता. मोत्झार्टला रात्रभर जागून ती धुन लिहून काढणं भाग होतं. खरं तर मोत्झार्टला प्रचंड थकवा आला होता. पण सगळे विचार, सगळा थकवा झटकून मोत्झार्ट कागद पुढ्यात घेऊन धुन लिहीत बसला. कॉन्स्टन्झाही मोत्झार्टनं जागं राहावं यासाठी ना ना प्रकारे प्रयत्न करत होती. मोत्झार्ट पेंगुळलेला दिसताच ती त्याला मोठमोठ्या आवाजात परिकथा सांगायची. तेवढ्यानंही भागलं नाही, तर मग डुलकी घेऊ पाहणार्या मोत्झार्टला ती गुद्दे घालून जागं करायची. असं करत करत सकाळचे सात वाजले आणि मोत्झार्टची संगीतरचना लिहून तयार झाली! त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ऑपेरा सादर करण्यात आला, तेव्हा कुठल्याही सरावाशिवाय ही धुन अचूकपणे वाजवली गेली आणि ऐकणार्यांचे कान प्रचंड तृप्त झाले. हे फक्त आणि फक्त मोत्झार्टच करू शकत होता!
‘डॉन जिओव्हानी’ला प्रचंडच यश मिळालं, पण मोत्झार्टची आर्थिक स्थिती मात्र जास्तच ढासळत चालली होती. २५ जुलै १७८८ या दिवशी ४० नम्बरची सिंफनी मोत्झार्टनं लिहून पूर्ण केली. असंही म्हटलं जातं की त्यानं ही सिंफनी सादर करण्याच्या उद्देशानं मुळीच लिहिली नव्हती. ही सिंफनी त्यानं येणार्या भावी पिढ्यांसाठी लिहिली होती. ‘ही सिंफनी म्हणजे अनंत काळाला आवाहन देण्यासाठी लिहिली गेली‘ असं अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणायचा.
पाश्चिमात्य संगीतातला बादशहा बिथोवन आणि भारतीय संगीतविश्वातले थोर संगीतकार सलील चौधरी आणि शंकर-जयकिशन यांच्यावर मोत्झार्टंचा प्रचंड प्रभाव होता. ‘छाया’ या हिन्दी चित्रपटातलं सलील चौधरींचं तलत महेमूद आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ हे गाणं मोत्झार्ट च्या ४० नम्बरच्या सिंफनीमधल्या पहिल्या मूव्हमेंटमधल्या (भागातल्या) मुख्य थीमवरून बेतलेलं आहे. ही सिंफनी काही वेळेला ‘जी-मायनर’ मधली ग्रेट सिंफनी म्हणूनही ओळखली जाते. (मायनर स्केल वापरून केलेल्या रचनांमध्ये बर्याच वेळा दुःखी भाव व्यक्त केलेले असतात.) ही सिंफनी कितीही वेळा ऐकली तरी ती पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते आणि तरीही मनाचं समाधान होतंच नाही!
१७९१ च्या जुलै महिन्यात व्हिएन्नामध्ये एके दिवशी एक गूढ व्यक्तिमत्त्व असलेली उंचीपुरी अनोळखी व्यक्ती मोत्झार्टसमोर येऊन उभी राहिली आणि तिनं मोत्झार्टला ‘रेक्वियम’ (एखाद्याच्या मृत्यूनंतर मृतात्म्याला शांती लाभावी म्हणून गायची प्रार्थना) लिहून देण्याची विनंती केली. त्यासाठी आगाऊ रक्कमही त्या व्यक्तीनं मोत्झार्टच्या हातात ठेवली आणि रेक्वियम पूर्ण झाल्यावर आणखी प्रचंड रक्कम देणार असल्याचं सांगितलं. त्या व्यक्तीला ती प्रार्थना कोणासाठी करून हवी होती, कोणी त्याला मोत्झार्टकडे पाठवलं होतं हे मात्र गुलदस्त्यातच होतं. त्यानं बाकी काही सांगायला नकार दिला.
मोत्झार्टनं या कामासाठी होकार तर दिला आणि कामही सुरू केलं. पण हे सगळंच त्याला चमत्कारिक वाटत होतं. याचं कारण त्या वेळी एकाच वेळी परिकथेचा ऑपेरा आणि त्याच वेळी रेक्वियमचं लिखाण असं दोन्हीही काम मोत्झार्ट करत होता. नेमकं त्याच वेळी प्रागमधला राजा लिओपोल्ड दुसरा याच्या राज्याभिषेकानिमित्त ‘ला क्लेमेन्झा दी टिटो’ हा ऑपेरा मोत्झार्टनं लिहावा असा प्रस्ताव त्याच्याकडे आला. हा सोहळा ६ सप्टेंबरला संपन्न होणार होता. मोत्झार्टनं लिहिलेला हा नवा ऑपेरा ठरलेल्या वेळात पूर्ण झाला. मोत्झार्टनं या ऑपेराचं संगीत खूपच कमी वेळात रचलं. आता परिकथा आणि रेक्वियम या दोनच गोष्टी रचायच्या शिल्लक राहिल्या होत्या.
परिकथेवर काम करत असलेला ‘मॅजिक फ्ल्यूट’ हा ऑपेराही मोत्झार्टनं ३० सप्टेंबर १७९१ मध्ये पूर्ण केला. जगामध्ये सगळ्यात जास्त सादर केल्या जाणार्या ऑपेराजमध्ये या ऑपेराचा तिसरा क्रमांक लागतो. मोत्झार्टनं ‘मॅजिक फ्ल्यूट’चं काम हातावेगळं केल्यामुळे ‘रेक्वियम’च्या कामावर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं. पण अनेक दिवसांपासून अंगात असलेल्या थकव्यानं त्याला न जुमानता त्याच्यावर अतिक्रमण केलं. एकदा तर हताश होऊन, ‘मला वाटतंय मी माझ्यासाठीच रेक्वियम लिहितो आहे की काय’ असं मोत्झार्ट कॉन्स्टन्झाला म्हणाला. त्याचे हे उदगार ऐकून कॉन्स्टन्झा धास्तावलीच.
१७९१ साली मोत्झार्ट खूप आजारी पडला. शेवटी ५ डिसेंबर १७९१ या दिवशी वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अत्यंत गूढपणे मोत्झार्टचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल उलटसुलट बोललं गेलं आणि आजही बोललं जातं. असं म्हणतात, साल्जबर्गच्या दरबारातला दरबारी संगीतकार आणि संगीतशिक्षक अँटानिओ सॅलिअरी हा मोत्झार्टचं यश पाहून त्याच्यावर प्रचंड जळत असे आणि अखेरीस त्यानंच मोत्झार्टवर विषप्रयोग करून त्याला ठार मारलं.
‘द मॅजिक फ्ल्यूट’ चा १०० वा प्रयोग १७९२ च्या नोव्हेंबर महिन्यात झाला खरा, पण या प्रयोगाच्या वेळी तो बघायला मात्र मोत्झार्ट जिवंत नव्हता. व्हिएन्नाच्या मास ग्रेव्हमध्ये कुठल्याही शाही इतमामाशिवाय अगदी साधेपणानं त्याला दफन करण्यात आलं. कॉन्स्टन्झानं त्याला शेवटपर्यंतची साथ दिली. त्याच्या अंत्यविधीच्या वेळीही फारशी माणसं उपस्थित नव्हती. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या मोत्झार्टच्या मृत्यूनंतरही त्याचं रीतसर दफन करण्यासाठी कॉन्स्टन्झाकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या स्थळाची निश्चित नोंद आज सापडत नाही. ज्यानं जगाला आपल्या संगीतानं रिझवलं,
झुलवलं आणि गेल्या अडीचशे वर्षांहून जास्त काळ आनंद दिला, त्याचा मृत्यू इतका अनाकलीय पद्धतीनं व्हावा ही गोष्ट खूपच धक्कादायक होती.
१९८४ साली मोत्झार्टच्या आयुष्यावर ‘अमॅडेअस’ नावाचा चित्रपट निघाला. उत्कृष्ट संगीतानं बहरलेला आणि एकजात सगळ्या समीक्षकांनी प्रशंसलेला या चित्रपटाचं ५३ पुरस्कारांसाठी नामांकन झालं आणि त्याला ४० पुरस्कार मिळाले. या चित्रपटात अॅन्टानिओ सॅलिअरी या त्याचा द्वेष करणार्या संगीतकाराचे मोत्झार्ट बरोबर असलेले संबंध, मोत्झार्टच्या वाट्याला आलेलं अपूर्व यश, सततच्या चढउताराचं आयुष्य, त्या काळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आणि मोत्झार्टचा अत्यंत दुःखद आणि गूढ अंत हे सगळं अतिशय उत्कृष्टरीत्या मांडलं आहे. या चित्रपटातलं मोत्झार्टचं संगीत ऐकणं हा नितांत सुंदर अनुभव आहे.
मोत्झार्टच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोनॅको सरकारनं १९८७ साली टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. यात मोत्झार्टच्या छबीबरोबरच डॉन जिओव्हनीमधला प्रसंगही चित्रित केला आहे. केवळ मोनॅकोचं सरकारचं नाही, तर जगभरातल्या अनेक देशांनी त्याच्यावरचं प्रेम टपाल तिकीट काढून दर्शवलं.
आर्थर श्नाबल या ऑस्ट्रियन बुद्धिवंत संगीतकारानं म्हटलं, ‘‘मोत्झार्टचे सोनाटाज (पियानोसाठीची वाद्यरचना) अतिशय युनिक असून ते मुलांसाठी जितके सोपे आहेत तितकेच ते एखाद्या कलाकारासाठी वाजवायला अतिशय अवघड आहेत’’ अन्टॉनिन डव्होराक या प्रसिद्ध संगीतकारानं तर ‘मोत्झार्ट म्हणजे सूर्यप्रकाश’ या शब्दात त्याला गौरवलं.
मोत्झार्टनं संगीताच्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. अखेरच्या दिवसांत त्याची परिस्थिती पाहून एका प्रकाशक त्याला म्हणाला, ‘‘तू सध्याच्या ट्रेंडप्रमाणे थोडी तडजोड करून संगीतरचना कर आणि मग बघ, तुझ्याकडे कसा पैशाचा ओघ वाहतो ते.’’ पण मोत्झार्ट त्याला म्हणाला, ‘मी उपाशीपोटी मरण पत्करेन, पण संगीताच्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही.’’
संगीत हेच जीवन मानणार्या मोत्झार्टची कुठलीही सिंफनी ऐकताना मनाच्या गाभार्यात शांतता नांदायला लागते. सगळे ताण-तणाव, अडचणी, संकटं आणि इच्छा-अपेक्षांचं ओझं सगळं सगळं नाहिसं होतं आणि उरतं ते केवळ मोत्झार्टचं संगीत आणि आपल्या आत आत भिनत गेलेली अतीव सुख देणारी शांतता! कुठलेही शाब्दिक उपदेश न करता अंतर्मुख होणं म्हणजे काय असतं ते मोत्झार्ट त्याच्या सिंफनीमधूनच दाखवतो. चंचल असणारं मन एका जागी क्षणभरही स्थिर राहत नाही. ‘अचपळ मन माझे....’ प्रमाणे असणार्या या मनाला मुकाट एका जागी खिळवून टाकण्याचं काम मात्र मोत्झार्टची सिंफनीच करू जाणे! अभ्यास करताना असो, लिखाण करताना असो किंवा घरकाम करताना असो, मोत्झार्टची सिंफनी कधीही आपल्या कामात अडथळा आणत नाही, तर तिचे सूर आपल्या कामाला बळ देतात, ऊर्जा देतात आणि ते त्या कामाला पुढे नेणारे साथीदार बनतात!
ग्राहक हित 2015
Add new comment