सिंफनी
कॅनव्हासनंतरचं मी आणि अच्युत गोडबोले आम्ही मिळून लिहिलेलं ५५० पानी मोठं पुस्तक म्हणजे सिंफनी! हे पुस्तक पाश्चिमात्य संगीतकार आणि संगीत यावर भाष्य करणारं आहे. कॅनव्हासप्रमाणेच या पुस्तकात पाश्चिमात्य संगीताचा अभिजात काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा इतिहास उलगडला आहे. अनेक सांगितिक संज्ञांचे अर्थ दिले आहेत. सुरुवातीला चर्चसाठी लिहिलेलं संगीत कसं बदलत गेलं. त्यानंतर ते राजेरजवड्यांपर्यंत जाऊन पोहोचलं. त्यानंतर सर्वसामान्यमाणसं या संगीताचा भाग बनली. त्यानंतर उपेक्षितांचं जगणं, त्यांचा प्रवास उलगणारं बंडखोर संगीत तयार झालं. या संगीताचा प्रवास खूपच अनोखा आहे. या प्रवासातच योहान सेबेस्टियन बाखपासून मोत्झार्ट, बीथोवन, हँडेल, हेडन विवाल्डी, सारखे अनेक संगीतकार भेटले. आधुनिक काळातले एल्व्हिस प्रिस्ले, बॉब डिलन, मायकेल जॅक्सन, बीटल्स, मरियम मकेबा भेटले. या सगळ्यांचा संगीतमय प्रवास आणि त्यांच्या संगीतातल्या रचना यांनी मन वेडावून गेलं. त्यांच्या आयुष्यातली यशाची कमान, अपयशानं झालेली फरपट सगळं काही वाचता आलं. अभ्यासता आलं.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पाश्चात्य संगीतकारांचा भारतीय संगीतकारांवरही प्रभाव पडला आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमध्ये तो प्रभाव डोकावलेला बघायला मिळाला. अशा काही निवडक १५० गाण्यांची यादी सिंफनी या पुस्तकाच्या शेवटी दिली आहे. तसंच महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात पानोपानी क्युआरकोड दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचता वाचता श्रवणीय देखील वाटणारं आहे. जे वाचलं ते अनुभवण्यासाठी क्युआरकोडवर मोबाईलनं स्कॅन केलं की त्या त्या संगीतकाराचं संगीत ऐकायला आणि बघायला मिळणार आहे.
एकूणच पुस्तकांबरोबर चालणारा प्रवास खूपच समृद्ध करणारा असतो हे मात्र खरं
Add new comment