SYMPHONY - माझं 'मनोगत'

SYMPHONY - माझं 'मनोगत'

सिंफनी - प्रतीक्षा फक्त 15 दिवसांची.... सिंफनी लिहीत असताना काय काय घडलं? संगीत केवळ आयुष्यात साथसोबतच करत नाही तर आपलं आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करतं हे समजलं. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेतं. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणतं. आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त व्हायला मदत करतं ते संगीतच! संगीतातून वेगवेगळ्या भावनांचा अविष्कार होतो. राग आला तर संगीत ऐकावं, आनंद झाला तर संगीत ऐकावं आणि दुःख झालं तरी संगीताचे स्वर त्या दुःखातून बाहेर काढायला साहाय्यभूत होतात. नैराश्यातून बाहेर काढायलाही संगीतच आपला हात पुढे करतं. संगीत माणसाला जो आनंद देतं तो आनंद कशातूनच मिळू शकत नाही. आत्मिक समाधानाची अनुभूती देतं ते असतं संगीत! सिंफनी लिहिताना १९६०च्या दशकात पहिल्यांदा आफ्रिकन संगीत जगभर नेणारी झेन्जील मीरियम मकेबा मला भेटली! 'ममा आफ्रिका' या नावानं जगभर ओळखली जाणारी ती एक बंडखोर स्त्री असून तिनं समतेसाठी, न्यायासाठी लढा दिला. मीरियम मकेबा हिनं मनाशी प्रामाणिक राहून प्रतिकूल परिस्थितीतही आपण जग हलवू शकतो याचा संदेश मलाच नाही तर समस्त जगाला दिला. तिचं स्त्री म्हणून, गुलाम म्हणून जगणं, तिच्यावरचे अन्याय आणि अत्याचार सगळं वाचल्यावर डोळ्यातून आसवांचा पूर आला. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं त्याच प्रियकरानं नवरा होताच केलेली प्रतारणा आणि छळ, तिला झालेली मारहाण वाचून आता ती काय करू शकेल असा प्रश्‍न मनाला पडला. पण तिनं अन्याय सहन न करता बंडखोरी केली आणि त्या जाचातून आपली सुटका करून घेतली. तिनं केलेला संघर्ष आणि मिळवलेलं स्वातंत्र्य आणि यश बघून ती जगभरातल्या स्त्रियांसाठीच नाही तर कुठल्याही अन्यायपिडित व्यक्तीसाठी प्रेरणा बनू शकते हे समजलं. त्यानंतर धुमाकूळ घालत आला तो ‘हॉलिवूडमध्ये ‘रॉक अँड रोल किंग’ म्हणून ओळखला जाणारा एल्व्हिस प्रीस्ले! एल्व्हिस प्रीस्लेनं अमेरिकेतच नव्हे तर आपली जादू जगभर पसरवली. त्याचं दिसणं, त्याचं वागणं, त्याची हालचाल, त्याचा पेहराव, त्याचं गाणं, त्याचं नाचणं, त्याचा अभिनय सारंच काही देखणं होतं. लाखो लोकांनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकावा असं त्याचं विलक्षण व्यक्तिमत्व होतं. शम्मी कपूर या अभिनेत्याने त्याची नक्कल केली नसती तर तो संपलाच असता . एल्व्हिस प्रीस्लेचा प्रभाव पुढे अनेक दिग्गज संगीतकारांवरही पडला. नंतरच्या काळात आलेल्या बीटल्सचा तर तो आदर्श होता. एल्व्हिस प्रीस्लेप्रमाणेच ‘पॉप संगीताचा बादशहा’ समजला जाणारा मायकेल जॅक्सन आला! त्याच्या अंगातली विजेची चपळाई अचंबित करणारी होती. त्याचं आयुष्य, त्याचा संघर्ष, त्याचं प्रचंड यश आणि त्याच्याबद्दल पसरलेल्या उलटसुलट अफवा हे सगळं थक्क करणारं होतं. एल्व्हिस प्रीस्ले असो वा मायकेल जॅक्सन यांच्या आयुष्याच्या शेवटानं मन खिन्न झालं. 'मी कलाकार आहे, नेता नाही. मला जे बंड करायचंय, जी चळवळ उभी करायचीय, लोकांना जे जागृत करायचंय ते मी माझ्या कलेतूनच करेन.’ असं म्हणणारा आणि २०१६ सालचं साहित्यातलं नोबेल पारितोषिक मिळवणारा बॉब डिलन हाही सिंफनी उलगडताना भेटला. त्याची सामाजिक बांधिलकी जपणारी गाणी ऐकली आणि त्याच्याविषयीचा आदर वाढला. बॉब डिलननं १९६२ ते २०१६ या कालावधीत एकूण ३६ अल्बम केले असून त्यातले १० अल्बम प्लॅटिनम पदाला पोहोचले आहेत. 'बॉब डिलनला चांगलं गाता येत नाही, त्यानं फक्त गाणी लिहावीत' अशी टीका त्याचे समीक्षक करत. मात्र त्यांच्या मताला किंमत न देता बॉब डिलननं जे स्वतःला पटलं तेच आजपर्यंत केलं. पाच दशकांपासून पॉप म्युझिकमध्ये तो गाजतोय. त्याच्या गीतांमध्ये सामाजिक, राजकीय भाष्य आणि जीवनाविषयीचं सखोल चिंतन केलेलं दिसतं. गंमत म्हणजे त्यानं काढलेल्या चित्रांची प्रदर्शनं अनेक ठिकाणी भरली जातात आणि ती चित्रं भरघोस किमतीत विकलीही जातात. त्याची चित्रांवरची चक्क ६ पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत! यानंतर मला भेटले बीटल्स! चार किशोरवयीन पोरं एकत्र येतात काय आणि आपल्या झपाटलेपणातून संपूर्ण जगाला वेड काय लावतात सगळंच अनाकलनीय होतं. १९६० चं दशक तसं मंतरलेलंच होतं. या दशकात एवढे प्रचंड बदल घडत होते, की या दशकाला इतिहासात ‘स्विंगिंग सिक्स्टीज’ म्हणून ओळखलं जाणार होतं. तसंच हे दशक जागतिक इतिहासातल्या चळवळींसाठी एक मैलाचा दगड मानलं जातं. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या पिढीनं पारंपरिक विचार आणि आधुनिक विचार यांच्यातली विसंगती दाखवायला सुरुवात केली आणि जुन्या चौकटी मोडायला तरुणांनी सुरुवात केली. याच काळात पाश्चात्य संगीतात मूलभूत बदल घडले आणि पॉप संस्कृतीकडे संक्रमणाला सुरुवात झाली. (क्रमशः)

दीपा देशमुख

('सिंफनी'च्या मनोगतामधून)

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.