राजकारणातल्या स्त्रियांची मानसिकता

राजकारणातल्या स्त्रियांची मानसिकता

मागच्या वर्षी बारामतीला सुप्रिया सुळेंनी एक युवती मेळावा आयोजित केलेला होता. त्या मेळाव्यात सरपंच झालेल्या आणि राजकारणात नुकत्याच प्रवेश केलेल्या युवतींसोबत गप्पांचा कार्यक्रम होता. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्या तरूण सरपंच बोलत होत्या. पण अजून तितकासा सराव नसल्यामुळे थोड्या कॉन्शस होत्याच. कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी कशी पेलता याचं उत्तर देताना बहुतांशी तरुणींनी घरून आपल्याला खूपच सपोर्ट असल्यामुळे आपण हे काम करू शकतो असं सांगितलं. विशेषतः आपल्या सासूच्या सपोर्टविषयी (सासू म्हणजे आईच वगैरे..) त्या तरुणी भरभरून बोलल्या. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी बोलताना सांगितलं की इथे आलेल्या या राजकारणात प्रवेश केलेल्या तरुणींचं कौतुक आहेच पण त्यांना इतका छान सपोर्ट घरातूनच मिळतोय हे पाहून मला आश्‍चर्य वाटतंय. त्या पुढे असंही म्हणाल्या की ’माझ्या मुलांना जेव्हा कमी मार्कस पडतात तेव्हा घरातले आणि इतर नातेवाईक लगेचच म्हणतात, बघा बघा, आईचं लक्ष आहे का? आई कधी घरी असते का? मुलांना कमी मार्क मिळणारच. आणि जर मुलांना जास्त मार्क्स मिळाले तर मात्र लगेचच प्रतिक्रिया उमटते, मुलं अगदी वडलांवर गेलीत हो! त्या म्हणाल्या, आज स्त्रीला आपलं करियर करण्यासाठी घराबाहेर पडलं तरी तिच्या घराच्या आणि मुलांच्या जबाबदार्‍या कमी होत नाहीत आणि काही उणंदुणं घडलं तर त्याचं खापरही तिच्यावरच फुटतं. माझ्या घरी तरी हीच परिस्थिती आहे. तुम्ही सुदैवी आहात.
 उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली पण या एका प्रसंगाने माझ्या मनात विचार सुरू झाला तो असा, आज छोट्याशा गावातून राजकारणात येऊ पाहणारी स्त्री - तिला असं उत्तर का द्यावं लागलं?  तिच्यापुढे राजकारणात येण्याचं स्वप्न सुरूवातीपासून होतं का नवर्‍याच्या महत्त्वाकांक्षेमुळे तिला पुढे केलं गेलं? आणि मग या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं की पुढचीही उत्तरं आपसूकच मिळायला लागतात.
 स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांची एक कविता आहे,
 डोळं तुमचं डोळं
तुमच्या डोळ्याची मला भीती
खाली पाहून चालू किती..............
 पुरुषप्रधान मानसिकतेत गुरफटलेल्या स्त्रीला आजही या कवितेतल्या ओळींप्रमाणे घरातून बाहेर पाऊल टाकतानाही ही भीती सोबत करते. सुरुवातीला राजकारण म्हणजे आपलं हे क्षेत्र नाहीच या ठाम मतावर स्त्री होती. राजकारण हा पुरुषांचाच कामाचा एरिया, तिथे आपलं काय काम असाही तिचा आणि इतरांचा अविर्भाव होता. त्यामुळे घाबरतच राजकीय जीवनात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रीचा प्रवेश झाला. त्यामुळे आत्मविश्‍वासाचा अभाव स्वाभाविकपणे होताच. राजकीय क्षेत्रात पण हळूहळू राखीव जागांमुळे कधी युक्तीने तर कधी नाइलाजाने त्या त्या ठिकाणी स्त्रीला राजकारणात येण्याची संधी मिळू लागली. प्रथम ती भांबावली याचं कारण सार्वजनिक कामातला तिचा वावर फारसा नव्हता. कुटुंब आणि नातेवाईक आणि स्नेही यांच्याभोवतीच फिरणारं तिचं विश्‍व होतं. तिच्या वतीने मग तिचा नवराच काम बघू लागला, ती नाममात्र त्या पदावर असे. पण हळूहळू हे चित्र बदललं. समर्थ रामदासांनी म्हटलंय, केल्याने देशाटन मनुजा, चातुर्य येतसे फार...घरातून बाहेर पडलेल्या स्त्रीला सार्वजनिक आयुष्यात अनेक प्रकारची माणसं, काम दिसू लागलं. ती चुकू लागली पण शिकूही लागली. बाहेरच्या जगानं तिला आत्मविश्‍वास दिला. काय बोलावं आणि काय बोलू नये पासून ती कामाबाबतचं ज्ञान मिळवू लागली. इतर अनेकांशी संबंध येतो तेव्हा तिच्या घरापासून ते आसपासच्या विश्‍वात ते तितकं मान्य होत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग, कार्यकर्ते आणि इतरांशी बोलताना त्याविषयीही कधी कधी मानसिक कुचंबणा होते. वेळेच्या आणि कामाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत तिची अनेकदा तारांबळ उडते.
 हे चित्र होतं, लहान गावातल्या एका गृहिणीचं मात्र शहरी भागात स्त्री शिकली तरी तिचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा सकारात्मक नव्हता. करियर म्हणून राजकारणाकडे बघावं असं असणार्‍यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही नाही/नव्हती. ज्यांच्या घरातच राजकारणाचं वारं वाहात आहे अशा घरातल्या स्त्रीयांना मात्र याचे अनेक लाभ मिळाले. उदाहरणच घ्यायचं झाल्यास सुप्रिया सुळेंचं घेता येईल. राजकारणाचा वारसा घरातूनच मिळालेला. शिक्षण आणि राजकारणाचे बाळकडू यांची शिदोरी सोबत घेऊन सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा आत्मविश्‍वास सोबत होताच. घरातून पाठिंबा आणि पाठबळ तेही होतंच. आर्थिक स्थिती उत्तम! त्यामुळे सुरुवातीला येणार्‍या अडचणी त्यांना आल्या नसाव्यात. मात्र राजकारण असो वा चित्रपटसृष्टी किंवा उद्योगजगत - या क्षेत्रात तुम्ही कोणाचं तरी बोट पकडून येऊ शकता पण प्रवेश केल्यावर स्वप्रयत्नांनीच तुमचं अस्तित्व टिकवू शकता, घडवू शकता. तुमचं कामच तुमची ओळख करून देतं.
 बर्‍याच स्त्रीयांना पुरुषांच्या कृपेनं हे पद मिळालंय या कृतज्ञतेच्या भावनेनं उपकृततेची भावना तयार होते. या मानसिकतेमुळे राजकारणातलं कौशल्य आणि क्षमता कमावण्यात खूप अडचणी येतात. ज्या स्त्रीया असं कौशल्य कमावून पुढे येतात त्यांना पुरुषी म्हणून संबोधलं जातं. मग स्त्रीनं कसं बोललं पाहिजे वगैरेही सांगितलं जातं.
 इंदिरा गांधी पार्लमेंटमध्ये असताना त्यांचा कणखरपणा आणि खंबीरपणा पाहून त्यांना एकमेव पुरुष म्हटलं गेलं. कारण हे गुण पुरुषांचेच असं मानलं जात. कोमलपणा, नाजूकपणा हेच गुण स्त्रीयांचे म्हणून अधोरेखित होतात. पण आता हे गुण विकसित होताना त्यांना सामाजिक एक्स्पोजर मिळतं आहे. घरापासून ते पक्षापर्यंत अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे एक खूप चांगला बदल आपल्याला दिसतो आहे. आज राजकीय क्षेत्रात आलेल्या स्त्रीया माणसं जोडताहेत, संघटन करताहेत त्याचरोबर अनेक प्रश्‍नांना भिडताहेत ज्या स्त्रीया राजकीय क्षेत्रात आलेल्या आहेत आणि मोठ्या झालेल्या आहेत त्यात उदाहरणादाखल इंदिरा गांधी ते सोनिया गांधी आहेत. जयललिता ते मायावती, ममता बॅनर्जी आहेत. स्वातंत्र्य आणि मोकळीक यांचा त्यांना राजकीय जीवनात निश्‍चितच फायदा होत असतो. मुक्तपणे वागण्याच्या वातावरणामुळे त्याचं कर्तृत्व फुलतं त्या स्वकर्तृत्वावर शिकत मोठ्या झालेल्या स्त्रीया म्हणता येतील.
 स्वतःच्या स्त्रीपणातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत. स्त्रियांमध्ये असलेली संचित ऊर्जा तिला जर योग्य वातावरण, योग्य दिशा मिळाली आणि योग्य प्रशिक्षण मिळालं तर ती फुलून येऊ शकते. त्यासाठी घरातून आणि समाजातून तो पाठिंबा आणि संधी तिला मिळायला हवी. मात्र आता प्रश्‍न आहे ती पुरुषांचीच मानसिकता बदलली पाहिजे. आता यावर विचार झाला पाहिजे की पुरुषांचीच याबाबतीत स्त्रीकडे बघण्याची मानसिकता काय आहे?

दीपा देशमुख
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.