शंकर आणि वेदांग!

शंकर आणि वेदांग!

तारीख

पुस्तक वाचून झालं की अनेक जण फोन करतात आणि मनमोकळी आपली प्रतिक्रिया देतात. आपणच लिहिलेलं पुस्तक पुन्हा नव्यानं अर्थ सांगत आपल्यासमोर ते उभं करतात. कधी मुंबईहून, कधी पुण्यातून, कधी परदेशातून तर कधी अगदी सांगली, मीरज जवळच्या एखाद्या खेडेगावातून फोन आलेला असतो. या सगळ्या फोन करणार्‍यांमध्ये मला विशेष वाटतं ते काही लोकांचं! यातले काही शेतकरी, काही पंक्चर काढणारे, तर काही हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारे देखील आहेत. 

परवा तर कोल्हापूरजवळच्या एका गावातून फोन आला. मजूरी करणार्‍या त्या व्यक्तीचं नाव होतं शंकर! त्यानं 'सिंफनी' वाचून फोन केला होता. क्यूआर कोड मात्र त्याला वापरता आले नव्हते कारण त्याच्याकडे स्मार्ट फोन नव्हता/नाही. त्याला आवडलेल्या गोष्टींबद्दल तो भरभरून बोलत होता, तसंच काही खटकलेल्या गोष्टीही तो सांगत होता. मी चकित होऊन ऐकत होते. हा मजूरकाम करणारा माणूस! यानं माझी सगळीच पुस्तकं वाचलेली होती. आणि तो चांगला वाचक असल्यानं इतर लेखकांची पुस्तकं देखील वाचत असणार. मी त्याला तू कुठल्या वाचनालयाचा सदस्य आहेस का असं विचारलं. त्यावर त्यानं मला माझी पुस्तकं माझ्या मालकीहक्काची लागतात. त्यामुळे मी मला हवं ते पुस्तक जमेल त्या वेळी विकत घेतो असं अभिमानानं सांगितलं. माझ्याशी बोलताना त्याला मनातलं सगळंच बोलावंस वाटत असावं. त्यानंतर तो म्हणाला, तुमच्या पुस्तकांच्या किमती कमी असतात, त्यामुळे माझ्यासारखी माणसं पुस्तकं विकत घेऊ शकतात हे खरंय. पण तुमच्या प्रकाशकांना सांगा, पुस्तकांची बांधणी नीट करायला. काही दिवसांत पुस्तकाची पानं निखळायला लागली की जीव खालीवर व्हायला लागतो. त्याचं पुस्तकावरचं प्रेम, पुस्तकांना मुलापेक्षाही जास्त जपण्याची तळमळ मला त्याच्या बोलण्यातून जाणवत होती. त्याला काय म्हणावं तेच मला कळत नव्हतं. सिम्फनी पुस्तक पाश्चात्य संगीतावर असूनही त्याला हाही विषय जाणून घ्यावा वाटला या गोष्टीचं आश्चर्य वाटत राहिलं. त्याचे खूप खूप आभार मानून मी त्याचा पत्ता विचारला. वाटलं, काही चांगली पुस्तकं त्याला आपण पाठवावीत. पण त्यानं नम्र भाषेत नकार दिला. आपण जमेल तशी घेऊन ती नक्कीच वाचू असं आश्वासन मला त्यानं दिलं. 

हे सगळं आजच आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच व्हॉटसअपवर एक मेसेज आला होता, जो मी लगेच बघितलेला नव्हता. एका चौथीतल्या ८-९ वर्षांच्या मुलाचं ते सुवाच्य अक्षरातलं पत्र होतं. त्याचं नाव वेदांग! वेदांगनं माझ्या सुपरहिरो मालिकेतलं डॉ. प्रकाश आमटे यांच्या आयुष्य आणि कार्य यांच्यावरचं पुस्तक वाचलं होतं. सुरुवातीलाच त्यानं लिहिलं होतं, दीपा देशमुख, तुम्ही हे पुस्तक खूप चांगलं लिहिलेलं आहे. पहिलीच ओळ वाचताना माझ्या चेहर्‍यावर हसू उमटलं. त्यानं आमच्या दोघांच्या वयातलं अंतर एका झटक्यात कमी करून टाकलं होतं. त्यानंही त्याला काय आवडलं त्याबद्दल लिहिलं होतं. मी त्याच्या पत्राचं उत्तर दिलं. त्यानंतर मेसेजकर्त्यानं मी वेदांगशी बोलावं असं सुचवलं. कार्यक्रम आणि दोन तीन मिटिंग असल्यानं मी दुसर्‍या दिवशीची सकाळची वेळ सांगितली. 

दुसऱ्या दिवशी वेदांगच्या वडिलांचा फोन आला. वेदांगचे वडील एका लहानशा गावात प्राथमिक शाळेत शिक्षक असून त्यांनी आपल्या मुलाला अजिंक्य कुलकर्णींमुळे वाचनाचं वेड लागल्याचं आवर्जून सांगितलं. मी वेदांगशी बोलायला सुरुवात केली. काय काय वाचलंस विचारलं, त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. पुस्तकं वाचल्यानं काय काय होतं, हे त्याच्या वयानुसार समजेल असं बोलत राहिले. मला उत्तर देताना निरागस आवाजात वेदांग बोलत होता. तो पोहायला शिकत होता, तसंच गायन आणि वादन ही शिकत होता. मी त्याला व्वा म्हणताच, त्यानं मला भूप रागाचे आलाप गावून दाखवले. त्याच्या आवाजातले ते आलाप हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. 

फोन ठेवल्यावर वाटलं, लेखक आणि वाचक यातलं हे नातं किती छान आहे. न पाहिलेल्या व्यक्तीशी देखील एका वेगळ्या प्रकारचं नातं जुळतं. शंकर आणि वेदांग या वेगळ्या वयाच्या, वेगळ्या व्यक्ती! पण तरीही वाचनवेडाचं साम्य दोघांचंही एकसारखं! अजिंक्यसारखे वाचनवेडे स्वतःबरोबरच आपल्या आसपासच्या लहानथोरांनाही या वेडात सामील करून घेतात ही देखील खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.  धन्यवाद अजिंक्य!
शंकर असो की वेदांग, लिहिण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी असे वाचक खूप ऊर्जा देऊन जातात हे मात्र खरं!

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.