संवाद
सध्या ऑस्कर नामांकन झालेले चित्रपट रोज एक याप्रमाणे बघते आहे. त्यातला ‘अरायव्हल’ बघताना संवादाचं महत्त्व, त्यात येणारे अडथळे, संवादाचे अर्थ लावणारे जगभरातले तज्ज्ञ असं सगळं बघून मनात ना ना प्रकारचे विचार आले. 'प्रथम' या संस्थेत काम करत असताना मी संवादावर एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार केलं होतं. तरुणांबरोबर हे ट्रेनिंग घेताना खूप धमाल येत असे.
आज हे सगळं मनात येण्याचं आणखी एक कारण म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून ओळख नसलेले कितीतरी लोक केवळ पोस्ट्स वाचून संवाद साधते झाले आणि खूप जवळचे मित्र-मैत्रिणी बनले. आज तर ३५ वर्षांनी डॉ. जावेद अन्सारी यांनी मला शोधून काढलं. हा संवाद आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे लक्षात येतं. शब्दांतून, स्पर्शातून, नजरेतून, हालचालींतून किती किती प्रकारे तो आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो.
काल अशीच एक गंमत झाली. मोबाईल वाजला आणि मी उचलताच तिकडून आवाज आला, ‘दीपा मॅडम बोलताहेत ना, चेअरमन साहेबांना आपल्याशी बोलायचंय’ मी ठीक आहे द्या असं म्हटलं. पण फोन जोडून देईपर्यंत त्या रिसेप्शनिस्टनं आपल्या गोड आवाजात माझ्याशी संवाद सुरू केला. ती म्हणाली, ‘दीपा मॅडम, तुम्हाला फोन लावला आणि कानावर तुमची इतकी सुरेख हॅलो ट्यून पडली की तुम्ही लवकर फोन उचलूच नये असं वाटलं. मी हे गाणं कधीच ऐकलेलं नाहीये.....’ मीही मग तिला उत्साहानं त्या गाण्याचे शब्द ‘दिल का दिया जला के गया, ये कौन मेरी तनहाईये मे’ सांगितले. लताचा इतका हळुवार आवाज कुठल्याच गाण्यात ऐकायला मिळणार नाही सांगितलं. हे गाणं यू ट्यूबवर ऐक असंही सांगितलं. तीही खूप आनंदित झाली आणि त्यानंतर तिनं मला तिच्या चेअरमनसाहेबांबरोबर फोन जोडून दिला.
आपला आवडीचा पदार्थ, विचार, चित्रपट, साहित्य, संगीत किती किती गोष्टीमुळे माणसं जवळ येतात आणि अनोळखी असतानाही संवाद साधतात. मैत्रीचा हात पुढे करतात. तिच्याशी बोलून मला खूपच छान वाटलं. खरं तर वर्षानुवर्षं माझ्या मोबाईलवर गुरू या चित्रपटातलं ‘एै हैरते आशिकी....’ हे गाणं होतं. मात्र अचानक एके दिवशी बाबाला (अनिल अवचट) काय झालं कोणास ठाऊक. खरं तर तो कधीच उपदेश, सल्ले किंवा आदेश देत नाही. पण त्या दिवशी त्याच्यातला लहान मुलगा जागा झाला आणि मला म्हणाला, 'किती दिवस ही तुझीहॅलो ट्यून मी ऐकायची, बदलून टाक.' मी 'बरं' म्हटलं. पण पुढचा त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, 'अजून बदलली नाहीस?' शेवटी आमच्यात एक तारीख ठरली. पण तरीही माझ्याकडून ती हॅलो ट्यून बदलणं झालं नाही. मग बाबा म्हणाला, 'ठीक आहे बाई, नको बदलवूस.' त्याचं ते फुरंगटून बसणं बघून मला खूप हसायला आलं. मग मी गंभीरपणे म्हणाले, 'आज काहीही झालं तरी बदलून टाकते.' ती हॅलो ट्यून बदलल्यानं माझं काहीही बिघडणार नव्हतंच. उलट बाबामधल्या जाग्या झालेल्या हट्टी मुलाचा हट्ट पुरवला जाणार होता. मी संध्याकाळीच ती हॅलो ट्यून बदलवून टाकली. ज्यांना वर्षानुवर्षं माझ्या पहिल्या ट्यूनची सवय झाली होती त्यांना आश्चर्य वाटलं. पण बाबा मात्र खुश झाला!
'दिल का दिया जला के गया....’ हे १९६५ साली प्रदर्शित झालेल्या आकाशदीप या चित्रपटातलं चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं मीही पहिल्यांदा ऐकलं ते माझे हरहुन्नरी, गुणी मित्र संजीव कोल्हटकर यांच्यामुळे! मजरूह सुलतानपुरी यांनी ते काव्यबद्ध केलं. खरं तर अनेक दिवसांपासून आमचं 'सिंफनी' या पुस्तकाचं लिखाण सुरू असून संजीव कोल्हटकर मला वेस्टर्न म्युझिकवर आधारलेली अनेक हिंदी चित्रपटातली गाणीही पाठवतात. असंच एकदा त्यांनी हे गाणं पाठवलं आणि ते किती सुंदर आहे सांगितलं. लताचं हे गाणं ऐकल्यावर मी अक्षरशः वेडीच झाले. जवळपास मी शंभर वेळा हे गाणं ऐकलं असेन. इतकंच नाही तर स्वतःही गात राहिले. माझ्याच आवाजात मग रेकॉर्ड करून मित्र-मैत्रिणींना ऐकायला पाठवलं. त्यांच्याकडून स्वतःचं कौतुकही करून घेतलं. थँक्स संजीव!
दिल का दिया, जला के गया, ये कौन मेरी तनहाई में
सोये नग्में जाग उठे, होंठों की शहनाई में
प्यार अरमानों का दर खटकाए
ख्वाब जागी आँखों से मिलने को आये
कितने साये डोल पड़े, सूनी सी अंगनाई में
एक ही नजर में निखर गई मैं तो
आईना जो देखा संवर गई मैं तो
तन पे उजाला फ़ैल गया पहली ही अंगडाई में
काँपते लबों को मैं खोल रही हूँ
बोल वही जैसे के बोल रही हूँ
बोल जो डूबे से हैं कहीं इस दिल की गहराई में
आपल्या सगळ्यांमधला हा संवाद असाच वाढत राहो, मैत्र दृढ होवो या सदिच्छेसह!
-दीपा देशमुख
२८ फेब्रुवारी २०१७.
Add new comment