ग्रीकपुराण
रोहन प्रकाशनानं काही दिवसांपूर्वी ग्रीकपुराण या सुप्रिया सहस्त्रबुद्धे लिखित पुस्तकाची पोस्ट फेसबुकवर टाकली असताना मी कुतूहल म्हणून ‘या पुस्तकात काय आहे?’ असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर तर त्यांनी मला दिलंच, पण कुरियरनं ग्रीकपुराणाची भेटप्रत अतिशय प्रेमानं पाठवली. त्याबद्दल रोहन प्रकाशनाचे खूप खूप आभार! मी पुस्तकाचं पान उलटवलं आणि प्रदीप चंपानेरकर यांची स्वाक्षरी असलेला माझ्यासाठी लिहिलेला मजकूर वाचून मी खूप वेळ प्रदीप चंपानेरकर यांच्या स्वाक्षरीकडे बघत राहिले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले प्रदीप चंपानेरकर या स्वाक्षरीतून कलाकार असल्याची साक्ष देत होते. अतिशय सुंदर, बोलकी आणि आकर्षित करणारी स्वाक्षरी! काही क्षण ती स्वाक्षरी मनात साठवत मी पुस्तकाची पानं मिटवली आणि मुखपृष्ठाकडे बघत राहिले, तेव्हा नव्याजुन्याचा मिलाफ मला ग्रीकपुराणच्या मुखपृष्ठाकडे बघताना जाणवला. ग्रीकसंस्कृतीचा वेध घेत असतानाच वर्तमानाचं भान ठेवणारं हे मुखपृष्ठ मला भावलं. मग आधाशासारखं पुस्तक वाचायला घेतलं.
आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या पुरातन संस्कृतीबद्दल जाणून घेताना औत्सुक्य वाटतं. अगदी लहानपणापासून कीर्तनं, प्रवचनं, भजनं ऐकून आणि पुस्तकं वाचून भारतीय संस्कृतीबद्दलच्या शेकडो कथा ठाऊक झालेल्या आहेत. मात्र जगातल्या दोन प्राचीन संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीबरोबरच किंवा त्याआधीची संस्कृती म्हणून ग्रीकंसंस्कृतीचा उल्लेख येतो. यातल्या काही निवडक व्यक्तिरेखा अनेक नाटकांमधून आल्यामुळे किंवा साहित्यातही त्या प्रतिमांचा वापर झाल्यामुळे आपल्याला त्यापैकी काही ठाऊक आहेत! ग्रीकपुराणामध्ये लेखिकेनं भारतीय संस्कृती आणि ग्रीकसंस्कृती यांच्यातली अनेक साम्यस्थळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातल्या अनेक देवतांच्या, त्यांच्या वैशिष्ट्यांच्या, त्यांच्या निर्मितीच्या, त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या, त्यांच्या शापाच्या कहाण्या आपल्यासमोर येतात आणि डोळ्यासमोर उभी राहिलेली चित्रं पाहून आपले डोळे विस्फारले जातात. ग्रीकपुराणातली इलियड, ओडिसीसारखी महाकाव्यं आणि शेकडो पुराणकथा वाचकाला वास्तवापासून दूर नेत एका वेगळ्या विश्वाचा प्रवास घडवतात. मात्र या प्रवासात या पुराणकथांमधल्या पात्रांचं सौंदर्य, त्यांचा मनस्वीपणा, त्यांच्यातलं क्रौर्य, त्यांचं कपट आणि मत्सर आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्या खेळांमध्ये तर क्रौर्याची परिसीमा बघायला मिळते. यातून माणसाच्या मनातली दबलेली अघोरी हिंसा समोर येते. समोर घडत असलेल्या मारामारीत, रंक्तबंबाळ परिस्थितीतही प्रेक्षक जेव्हा आसुरी आनंदाने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला 'किल हिम किल हिम' असं म्हणताहेत, आरोळी ठोकताहेत तेव्हा ही माणसंच म्हणायची का असा प्रश्न मनात आल्याविना राहवत नाही. या कथा अनेक गोष्टींची जाणीव करून देतात. एकीकडे मनोरंजन, तर दुसरीकडे कलाकाराच्या सर्जनशीलतेच्या कसोटीचं दर्शन घडवतात.
या कथा एकीकडे भूतकाळाचं दर्शन घडवतात, तर दुसरीकडे आजही लागू पडणार्या मनातल्या कानाकोपर्याचं मनोविश्लेषण करवतात. नार्सिसस कॉम्प्लेक्स, इडिपस कॉम्प्लेक्स ही नावं अमूक एका मनोविकाराला द्यायला फ्रॉईडला का सुचली असावीत? हा नार्सिसस कोण होता? आजही स्वप्रेमात गुंग असलेले अगणित नार्सिसस आपल्याला बघायला मिळतात. इडिपसची कहाणी काय आहे? तसंच मिडासराजाची संपूर्ण गोष्ट काय, मेडुसा ही पूर्वीपासूनच कुरूप, केसांऐवजी साप डोक्यावर रुळत असलेली होती काय? सिसिफसचं प्रचंड आकाराचा पाषाण ढकलत डोंगरमाथ्यापर्यंत नेणं आणि तिथून पुन्हा खाली ढकलून देणं आणि रोज हीच क्रिया पुन्हा पुन्हा करणं यामागची गोष्ट काय? युद्धाच्या, निसर्गाच्या, आनंदाच्या अशा वेगवेगळ्या भावनांच्या प्रकटीकरणाच्या देवता कोणत्या, त्यांची वैशिष्ट्यं काय? हे सगळं ग्रीकपुराणातून अनुभवायला मिळतं. ग्रीक पुराणातून केवळ ग्रीक देवतांच्या कहाण्याच नव्हे तर त्यांची जगभर अजरामर झालेली इलियड आणि ओडिसी यांच्यासारखी महाकाव्यं, ग्रीकांची समृद्ध संस्कृती आणि दृष्टिकोन हे सगळं अनुभवताना वाचक म्हणून, आपल्यातला कलाकार म्हणून, आपल्यातला सुंदरतेचा ध्यास घेतलेला रसिक म्हणून खूप भावतं. विशेष म्हणजे त्यांच्यातलं प्रेम, साहस, कपट, स्वार्थ आणि राजकारण हे सगळं आजही लागू होत असल्याची खात्री आपल्याला पानोपानी पटत राहते.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व असलेल्या ग्रीकपुराणाच्या लेखिका सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांचं हे पुस्तक म्हणजे संशोधनात्मकच रचना आहे. खरं तर वाचताना असं वाटलं की हे पुस्तक आणखी सविस्तर हवं होतं, दोन भागात आलं असतं तरी वाचक म्हणून स्वागतच केलं असतं!
रोहन प्रकाशन प्रकाशित ‘ग्रीकपुराण’ जरूर वाचा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment