नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
आज 'जीनियस'चा तिसरा भाग 'तंत्रज्ञ जीनियस' पूर्ण करत असतानाच डोकं थोडं बधिर झाल्यासारखं वाटायला लागलं. मग सरळ कम्प्युटर बंद केला आणि वाचनाच्या यादीत असलेला रोहन प्रकाशनाचा प्रणव सखदेव लिखित ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हा कथासंग्रह वाचायला घेतला.
या पुस्तकाचं मुखपृष्ठ खूपच बोलकं असून ते चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलं आहे. मुखपृष्ठ म्हणजे त्या पुस्तकाच्या आत काय आहे हे सांगणारी पहिली व्यक्ती असते आणि या पुस्तकाच्या बाबतीत ते काम चोखपणे बजावलं गेलं आहे. अनुभवात मिसळलेल्या कल्पनेला....आणि कल्पनेत घुसलेल्या अनुभवाला....असं म्हणत पुस्तक पुढे सरकतं. यात छत्री, भाजीवाला, टची गोष्ट, अभ्र्यामध्ये दडलेलं फँड्री, ऍबॉर्शन, ग्लोरिया, ऍडॉप्शन आणि नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य अशा आठ कथा आहेत. हे पुस्तक एका दमात वाचून संपवतो असं आव्हान देणारं नाही. ते चवीनंच वाचावं लागतं.
यातली प्रत्येक कथा मेंदूला ताण देते. विचार करायला भाग पाडते. सत्य आणि कल्पना यांच्यातलं अंतर अनेकदा नाहिसं करून आपल्याला एका धूसर भ्रामक जगात नेते. त्या जगात आपण जातो न जातो तोच ती वास्तवाचंही रूप दाखवून तिथून खेचून परत जागेवर आणते. अशा या खेळात वाचक म्हणून स्थिर राहण्याचा खूप आटापिटा करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर ती कथा आपलं बोट सोडते आणि 'आता तुम्ही माझ्या मागे या' असं म्हणत पुढे निघून जाते. एकीकडे माणसाचं संवेदनशील मन, तर त्याच वेळी बदलत चाललेली मूल्यव्यवस्था, नात्यांमधलं वाढत चाललेलं अंतर आणि व्यक्तिकेंद्री बनत चाललेलो आपण, जगण्यातले छोटे छोटे आनंदही या अक्राळविक्राळ वास्तवाने संपवून टाकले आहेत. सगळ्याच भावनांचा, जगण्याचाच गुंता झालाय. मुखवटी संवाद, औपचारिक प्रेम आणि मैत्री, कोणीतरी समजून घेणारं असावं असं वाटत असतानाच कोणीच नाही याची जाणीव करणारं भेसूर सत्य, मग कुठेतरी मुळाशी जाण्याचा आणि शोध घेण्याचा अट्टाहास....यातही हाती काही गवसतं का, तर गवसतं ते रक्तबंबाळलेपण!
प्रणव सखदेव आजच्या तरुण पिढीतला उमदा लेखक! वेगळं काही लिहितो. त्याच त्याच वाटेवरची दृश्यं न दाखवता एक वेगळी वाट तो वाचकाला दाखवत आपल्याबरोबर चालायला लावतो. प्रणव सखदेवचा हा कथासंग्रह जरूर वाचा. तो वाचकाला अंतर्मुख करतोच करतो, पण त्याचबरोबर हे बदलायचं असेल तर कुठलाही उपदेश न करता काय करायला हवंय याचेही अदृश्य धागे तुमच्यासमोर आणतो. टाईमपास म्हणून वाचन करणार्यांनी मात्र या पुस्तकाला हातही लावू नये कारण त्यांचा भ्रमनिरास होईल.
शेवटी, चंद्रमोहन कुलकर्णींचे समर्पक मुखपृष्ठाबद्दल, रोहन प्रकाशनचे प्रदीप आणि रोहन चंपानेरकर यांचे उत्कृष्ट निर्मितीबद्दल आणि प्रणव सखदेव याचे सकस लिखाणाबद्दल खूप आभार आणि शुभेच्छा!
दीपा देशमुख,
रात्री १०.५०.
Add new comment