भंगार
'भंगार' पुस्तक कालपासून वाचायला घेतलं आणि आज संपलं. कितीतरी वेळापासून मनाला बधिरपणा आलाय. मन सुन्न झालंय. लहानपणी गोष्टीतून स्वर्ग कसा असतो आणि नरक कसा असतो हे ऐकलं होतं आणि वाचलं होतं. आज मात्र नरक कसा असतो आणि तो इथंच, आपल्या आसपास असतो हे लक्षात येऊन मनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या आहेत. खरं तर उकिरडा ठाऊक होता, त्यावरचा कचरा वेचणारी मुलं-मुली, स्त्रिया बघितल्या नव्हत्या अशातलाही भाग नाही. पण त्यांच्या रोजच्या जगण्याविषयीचा विचार मनात कधी या तर्हेनं आला नव्हता. 'भंगार' या पुस्तकातून मी गोसावी समाजाचं जगणं अनुभवून आले. नरकापेक्षाही विदारक असं आयुष्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. पण असं जगणं आज लाखो लोक जगताहेत. त्यांचा प्रतिनिधी अशोक जाधव याच्या प्रवासाची ही गोष्ट! रोज उकिरडा पिंजून त्यातून भंगार गोळा करायचं, अंगात घाण, काचा टोचवून जखमी करून घ्यायचं, त्याच उकिरड्यात मिळालेल्या भाज्यांची साल, फळांची साल, बुरशी आलेल्या भाकरीचा तुकडा अशा सगळ्या गोष्टी पोटात उसळलेला भुकेचा डोंब विझवण्यासाठी वापरणं......
एका प्रसंगात भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन एक कुत्रा पळतोय आणि त्याला दगडं मारत तो तुकडा आपल्याला कसा मिळेल याचा प्रयत्न हा नायक करतोय हे चित्र मनाला खूप यातना देतं. या पुस्तकातून गोसावी समाजातली जातपंचायत, अज्ञान, रुढी-परंपरा, अंधश्रद्धा सगळं काही ओघानं येत जातं. स्त्रियांची अवस्था तर अत्यंत दयनीय आणि वाईट. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून हा मुलगा शाळेची स्वप्नं बघतो आणि सगळीकडून वाट्याला आलेली उपेक्षा सहन करत पुढे जातो आणि आज इचलकरंजी इथल्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो याची ही गोष्ट! खरं तर हे वाचताना ही साहित्यकृती चांगली आहे असं म्हणायलाही मन धजावत नाही.
वाहरू सोनावणे या आदिवासी कार्यकर्त्यांनं त्याच्या जगण्यावरची एक कविता ऐकवली होती, त्या कवितेत आदिवासींच्या दुःखावर ‘वा, क्या बात है’ ची दाद कशी मिळते हे त्यानं सांगितलं होतं. हे सगळं खूप असह्य आहे. एखाद्याच्या दुःखावर हे शब्द ओठातून बाहेर पडणं म्हणजे विकृती आहे. एक माणूस म्हणून, संघर्ष करत विवेकाची कास धरून चालणारे 'भंगार'चे लेखक अशोक जाधव यांना सलाम. या पुस्तकाचं, या दाहक अनुभवांचं मूल्यमापन कोणीही करू शकणार नाही. मनोविकास प्रकाशनाचे या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल खूप खूप आभार! असं जगणं, अशी माणसं आणि आजही समाजात असलेल्या या अनिष्ट गोष्टी यावर बोलणार्या, लिहिणार्या, प्रसिद्ध करणार्या आणि या प्रश्नांवर काम करणार्या माणसांची गरज आहे. आपण ते काम करता आहात याचा खरोखरंच अभिमान वाटतो.
डॉ. सुनिलकुमार लवटे यांची समर्पक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रत्येकानं वाचलंच पाहिजे आणि आपल्यातल्या संवेदनशीलतेला, आपल्यातल्या माणुसपणाला थोडं हलवलं पाहिजे यासाठी हे पुस्तक जरूर जरूर आणि जरूर वाचा.
दीपा देशमुख.
७ फेब्रुवारी २०१८.
Add new comment