हमरस्ता नाकारताना.....

हमरस्ता नाकारताना.....

अनेक दिवसांपासून ज्या पुस्तकाची प्रतीक्षा होती, ते अखेर काल प्रत्यक्ष लेखिकेकडून हातात पडलं. सध्याचं पावसाचं बेभरवशी वातावरण असताना, सरिता ( आवाड)नं घरी येऊन अत्यंत आत्मीयतेनं तिचं आत्मचरित्र ‘हमरस्ता नाकारताना’ मला भेट दिलं. सरिताच्या बाबतीत बोलताना....काही लोकांशी ओळख झाल्यावर मला पहिल्याच भेटीत परकेपणा जाणवला नाही, ना वयाचं अंतर! त्यात मुक्ता मनोहर, गीताली वि.म. आणि आता सरिता आवाड! माझ्यापेक्षा सर्वदृष्टीनं या तिघी मोठ्या असूनही मी त्यांना अगतुगनेच बोलते. त्यांच्याशी ती औपचारिकता कधी पाळावीच वाटली नाही. त्यांचं अंतर्बाह्य पारदर्शी असणं मला जास्त भावलं. 
सरिताशी विचारवेध, मिळून सार्‍याजणी यामुळे अधूनमधून भेट होतच होती. त्यातच तिचं आत्मचरित्राचं लेखन सुरू असल्यानं तिनं काही चाप्टर्स देखील वाचायला पाठवली होती. त्यामुळे या पुस्तकाची निर्मिती होऊन ती पुस्तकरूपात बघण्याची अपार उत्सुकता होती. 
‘हमरस्ता नाकारताना’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलं असून या पुस्तकाचं शीर्षकच सारं काही बोलून जातं आणि त्या शीर्षकाला योग्य न्याय प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी दिला आहे. या पुस्तकाला आत्मचरित्र म्हणावं का असा प्रश्न पडतो, पण तरीही आत्मचरित्रच म्हणावं लागेल. लेखिकेच्या मनोगतात ती हे पुस्तक म्हणजे अनेकांची गोष्ट सांगणारं हे पुस्तक आहे असं म्हणते. ते खरंही आहे. मात्र या सगळ्या गोष्टीतूनच लेखिकेची कहाणी उलगडत जाते! नेहमीच्या आत्मचरित्रासारखा बाज या पुस्तकाचा नाही. अगदी जन्मल्यापासून आजपर्यंतची सलगता या पुस्तकात नाही. आजीपासून आईपर्यंत आणि त्यातच लेखिकेची जडणघडण असा हा प्रवास होत जातो. 
‘हमरस्ता नाकारताना’ हे पुस्तक चळवळींचा वेध घेतं, स्वयंसेवी संस्था आणि त्यातले कार्यकर्ते, संस्थाचालक यांचाही चेहरा दाखवतं. यातले काळेकरडे फटकारे दाखवणारं वास्तव आपल्याला अनुभवायला मिळतं. त्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्याला हे पुस्तक जवळचं वाटेल. जातिव्यवस्थेची खोलवर रुजलेली मुळं, तिच्यातली दाहकता, त्याचे बरेवाईट परिणाम,  त्याचबरोबर या पुस्तकात एका स्त्रीचा प्रवास असला तरी तो त्याच वेळी तीन स्त्रियांचा प्रवास वाचकांना घडतो. लेखिकेची आजी आनंदीबाई, आई सुमती आणि स्वतः लेखिका सरिता या तीन पात्रांभोवतीही तो फिरतो. या तिघी वेगवेगळ्या काळांमधल्या, पण तिघींमधले काही गुण मात्र सारखे! आजीचा कणखरपणा, स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवणं, शिक्षणाचं महत्त्व अशा अनेक गोष्टी सुमतीमध्ये रुजलेल्या जाणवतात. सुमती म्हणजेच प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळे! टॉलस्टॉय एक माणूस, छाया आणि ज्योती, डॉ. अल्बर्ट श्वाईटझर आणि सप्तर्षी आणि अरूंधती अशी त्यांची राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेली पुस्तकं खूपच गाजली. लोकप्रिय झाली. पुष्किन, एमिली ब्राँटे, डोस्टोव्हस्की, निकोलाय गोगोल, एमिल झोला, मोपांसा, बाल्झॅक आणि चेकॉव्ह हे पाश्चिमात्य साहित्यिक आपल्यासमोर आणून उभे केले ते सुमती देवस्थळेनं! त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यांच्या लिखाणातला गोडवा यात वाचक गुंतून पडल्याशिवाय राहत नाहीत. अशा सुमती देवस्थळेंमध्ये आपल्या आईचे बरेच गुण आले. आपली वाचनाची आवड तिनं मुलीमध्येही उतरवली. इतर कुठला खर्च वायफळ समजणार्‍या सुमती देवस्थळे यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आपल्या मुलीला सरिताला पुस्तकं विकत घेताना कधीही अडवलं नाही हे विशेष! आईचे हे आणि यासारखे अनेक गुण नकळत लेखिकेमध्ये उतरले.
खरं तर लेखिकेला हमरस्ता नाकारायचा असं काही प्रवास करताना ठरलं नव्हतं. मात्र या प्रवासात असे काही टप्पे येत गेले की त्या वळणांनी तिला हमरस्त्याचं आकर्षण राहिलंच नाही. तिला ती अनवट वाटच जास्त आवडत गेली. या पुस्तकाची सुरुवातच मुळी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या सुंदर ओळींनी होते. लेखिकेचा प्रवास आपण वाचक म्हणून करताना तिनं खूप अलिप्तपणे आपल्याच आयुष्याकडे फिरून बघितलं आहे असं जाणवतं. संपूर्ण पुस्तकात ती कुठेही ‘स्व’चं समर्थन, आत्मस्तुती, दोषारोप करताना दिसत नाही. तिचे राग, तिचे लोभ, तिचे अपमान, तिच्या इच्छा यावर ती जास्त भाष्य करून वाचकांची सहानुभूतीही मिळवताना ती दिसत नाही. इतक्या तटस्थ नजरेनं स्वतःकडे बघणं तसं सोपं नाही, पण ही स्थितप्रज्ञता तिला गवसली आहे. तसंच हे सगळं विनयानं मांडल्याचा अविर्भावही या लिखाणातून दिसत नाही हे विशेष! तिचं अलिप्तपणे स्वतःला, त्याचबरोबर परिस्थितीला बघणं हाच या आत्मचरित्राचा भरभक्कम पाया मला वाटतो. ‘हमरस्ता नाकारताना’ च्या प्रवासात तिचे राग, लोभ, तिची घुसमट, तिचे अपमान, तिच्यातले न्यूनगंड काळाबरोबर वितळून गेलेले बघायला मिळतात. स्वतःतले अनेक दोषही ती सहजपणे सांगून जाते. तिचं चळवळीकडे ओढलं जाणं, एका दलित तरुणावर केलेलं प्रेम, सहजीवन, त्यातले बरेवाईट अनुभव सगळं काही खूप सहजपणे, प्रामाणिकपणे ती सांगून जाते. यात ती कुठल्याही माणसांवर, परिस्थितीवर कठोर प्रहार करत नाही. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक वळणं ती अत्यंत विश्वासानं वाचकाला दाखवत दाखवत या वाटेची सैर करवून आणते. 
'फिरूनी नवी जन्मेन मी' हे लेखिकेचं मनोगत मला खूपच भावलं. आज ती जे काही आहे, जे काही करतेय त्यावर तिनं भाष्य केलंय. वयाच्या ६४ व्या वर्षी तिच्यातलं तरूण मन, तिच्यातली ऊर्जा, तिच्यातली स्वप्नं टवटवीत आहेत आणि म्हणूनच अजूनही काही चांगलं करू पाहण्याची तळमळ आपल्याला जाणवते. तिच्यातली बंडखोर मुलगी तिला ‘लोग क्या कहेंगे’ला धुडकावणारी वाटते. म्हणूनच तर ती ६० व्या वर्षी आपण कसं प्रेमात पडलो हे बिनधास्तपणे सांगते. अन्यथा, स्त्री असो वा पुरूष लैंगिकतेच्या बाबतीत आपण कसे एकनिष्ठ आहोत हीच प्रतिमा मिरवण्यात धन्यता मानत असताना लेखिका मात्र आपल्या आयुष्यातलं हे नवं वळण वाचकांना दाखवते. प्रतिमेला जपण्याचा भेकडपणा तिच्याबरोबर तिला या वळणावर साथ देणारा आनंदही दाखवत नाही हे विशेष! या टप्प्यावर पुन्हा नव्यानं भेटलेल्या या जोडीत पुढे कदाचित मतभेद होतील, आताही होत असतील तरीही त्यांचं हे प्रामाणिक निर्भिड नातं बघून ‘ वा, क्या बात है’ हीच दाद मन देतं. 
‘हमरस्ता नाकारताना’ हे सरिता आवाड लिखित आत्मचरित्र मनापासून आवडलं. म्हणूनच त्यावर इतकं सविस्तर लिहू शकले. मात्र जाता जाता - यातले नात्यांचे काही संदर्भ टाळले असते तर बरं झालं असं वाचताना वाटत राहतं. कारण या अनावश्यक बाबींचा वाचकाशी कुठलाच संबंध जाणवत नाही आणि तो या बाबींमध्ये समरसही होऊ शकत नाही. काही वेळा वाचताना आपण एखादा दस्तावेज वाचतो आहोत अशीही भावना मनात येते. अर्थात या खूपच किरकोळ बाबी आहेत. आपल्या मनोगतात लेखिकेनं सुनिताबाई देशपांडे यांचं वाक्य उदृत केलं आहे, त्या म्हणाल्या होत्या, 'पुस्तक प्रकाशित झालं की ते नाळ कापलेल्या बाळासारखं होतं. लेखकापासून अलग होतं, वाचकांच्या हातात जातं. वाचकाला त्यात काय आवडेल-नावडेल, काय भावेल, काय नाही यावर लेखकाचं काही नियंत्रण नसतं. ते पुस्तक वाचकाचं होतं.’
शेवटी, सरितानं लिहिलेलं हे पुस्तक खूप वेगळं आहे. वेगळ्या वाटेवरून चालताना येणारे अनुभव आहेत. चौकटीत सुरक्षित जगणार्‍यांना या वाटेवरचं जगणं किती काटेरी असू शकतं याची कल्पना हे पुस्तक वाचून येईल, मात्र त्याचबरोबर त्यातली फुलं, त्यांचा सुखद स्पर्शही किती आनंददायी असू शकतो हे लेखिका वाचकाला सहजपणे सांगून जाते. आपल्या कुटुंबावर, आपल्या माणसांवर, आपल्या आसपासच्या लोकांवर, पुस्तकांवर, प्रेम करणारी ही वाचनवेडी लेखिका आपल्यातलीच असून वेगळी कशी ठरते हे कळण्यासाठी ‘हमरस्ता नाकारताना’ हे पुस्तक जरूर जरूर वाचावं.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.