अग्निपंखांनी भरारी घेणारा मुलगा (15 ऑक्टोबर 1931-27 जुलै 2015)

अग्निपंखांनी भरारी घेणारा मुलगा (15 ऑक्टोबर 1931-27 जुलै 2015)

रामेश्वरमसारख्या धार्मिक स्थळी जन्मलेला एक मुलगा, 
मंदिर आणि मशिद यांना एकाच नजरेतून बघणारा, 
कष्टाची किंमत लहानपणीच समजलेला, 
दिनमणीसारखं वर्तमानपत्रं घराघरात टाकणारा
विनम्र, विनयशील, जिज्ञासा आणि कुतूहल असलेला
आकाशात पक्ष्यासारखं उडायची स्वप्नं बघणारा
आई, वडील, शिक्षक, परिस्थिती, 
अनुकूल-प्रतिकूल
सार्‍यांनाच गुरू मानणारा
सकारात्मक विचारांची ऊर्जा घेऊन चालणारा
अपमानातून घडणारा, शिकणारा
पुस्तकांच्या ओढीनं धाव घेणारा
खलिल जिब्रान, टॉलस्टॉय, एलियट यांच्या विचारांवर प्रेम करणारा
रामानुजन, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, 
असे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त करणारा
अग्निपंखांनी भरारी घेत, मर्यादांच्या सीमा ओलांडून जाणारा
भारताचा सुपुत्र एपीजे अब्दुल कलाम!

अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी चेन्नईजवळच्या रामेश्वरम या धार्मिक तीर्थस्थळी एका तमीळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील यात्रेकरूंना होडीतून ने-आण करण्याचं काम करत. आई आशियम्मा ही एक आदर्श गृहिणी होती. संपूर्ण परिसरात ते एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जात असे. आशियम्माने आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार दिले. साधी राहणी अिाण उच्च विचार यावर जैनुलबदीन यांचा विश्वास होता. महागड्या आणि चैनीच्या वस्तूंचं आकर्षण घरात कोणालाही नव्हतं. अब्दुल कलाम यांना प्रचंड आत्मविश्वासाची देणगी मिळाली असेल तर ती आपल्या आईकडूनच. चांगुलपणावर विश्वास ठेवण्याची ताकदही आईनंच त्यांना दिली, तर अब्दुल कलाम यांना त्यांच्या वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त यांचे धडे मिळाले. 

लहान असताना अब्दुल कलाम आपल्या वडिलांबरोबर नमाज पढायला मशिदीत जात. त्यांना त्या वेळी अरबी भाषेतली ती प्रार्थना काही केल्या कळत नसे. पण ही प्रार्थना मनाला शांतता देते एवढं त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. त्यांचे वडील जैनुलबदीन आणि रामेश्वरमच्या शिवमंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री दोघंही जिवलग मित्र होते. वडिलांचा पारंपरिक मुसलमानाचा पोशाख आणि लक्ष्मणशास्त्रींचा हिंदू पोशाख असे दोन्ही अब्दुल कलाम यांच्या स्मृतिपटलावर त्यांच्या अतुट मैत्रीबरोबरच कायमचा कोरला गेला.
 
धर्म, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवर अब्दुल कलाम यांचे वडील आणि त्यांचे मित्र लक्ष्मणशास्त्री चर्चा करत. एकदा अब्दुल कलाम यांनी आपल्या वडिलांना एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकत्र येऊन प्रार्थना करण्यामागचा अर्थ वडिलांनी अब्दुल कलाम यांना सांगितला. एकत्र आल्यानं माणसामाणसामधला भेद नाहिसा होतो. तसंच वय, संपत्ती, जात, धर्म, वंश आणि शरीर सारं काही विसरून विश्वशक्तीशी आपण एकरूप होतो. तमीळ भाषेत अतिशय सोप्या पद्धतीनं ते आपल्या मुलाला अनेक गोष्टी समजवून सांगत. संकटं आली, दुःखं आली तरी माणसानं धीर सोडू नये तर त्यांना न घाबरता सामोरं जावं आणि संकटं माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात, असं ते म्हणत. आपल्या वडिलांप्रमाणेच बहिणीचा नवरा महंमद जलालुद्दिन हाही अब्दुल कलाम यांचा जिवलग मित्र बनला. जलालुद्दिन त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी वयानं मोठा होता. त्याच्याकडून अनेक ज्ञानदायी गोष्टी अब्दुल कलाम यांना ऐकायला मिळत. तसंच एस. टी. आर. माणिकम नावाचे एक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त त्या गावात राहायचे. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. पुस्तकं वाचण्यासाठी अब्दुल कलाम त्यांच्या घरी धाव घेत असत. 

अब्दुल कलाम पाचवीत शिकत असताना एके दिवशी त्यांच्या वर्गावर नवीन शिक्षक शिकवायला आले. अब्दुल कलाम आणि त्यांचा मित्र रामनाथ शास्त्री एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत. अब्दुल कलाम यांच्या डोक्यावरची मुसलमान धर्माची टोपी अिाण रामनाथच्या गळ्यात रुळत असलेलं जानवं असायचं. हे दृश्य पाहून ते शिक्षक अस्वस्थ व्हायचे. अखेर त्यांनी त्या वेळच्या सामाजिक पातळीनुसार अब्दुल कलाम यांना उठवून शेवटच्या बाकावर बसायला भाग पाडलं आणि रामनाथला पहिल्या बाकावर! अब्दुल कलाम यांना खूप वाईट आणि अपमानास्पद वाटलं. मात्र त्याच वेळी रामनाथच्या चेहर्‍यावर उमटलेलं दुःख आणि त्याच्या डोळ्यातले अश्रूही अब्दुल कलाम यांनी बघितले. शाळा सुटल्यावर रामनाथ आणि कलाम यांनी आपापल्या घरी शाळेत घडलेली घटना सांगितली. लक्ष्मणशास्त्री आणि जैनुलबदीन यांनी त्या शिक्षकाला बोलावून निरागस, निष्पाप मुलांमध्ये विषमतेचं विष पेरू नकोस; तसंच भिन्न धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करू नकोस असं सांगितलं. त्या शिक्षकाला ही गोष्ट मान्य नसेल तर त्यानं शाळा आणि गाव सोडून जावं असं त्यांनी स्पष्टपणे ऐकवलं. मात्र त्या दोघांचं बोलणं त्या शिक्षकावर परिणाम करून गेलं. त्यानं पश्चाताप होऊन माफी मागितलीच, पण पुन्हा कधीही अशी आगळिक त्याच्या हातून घडली नाही हे विशेष!

अब्दुल कलाम आणखी एका प्रसंगाची आठवण सांगायचे. शिवसुब्रमणिया अय्यर नावाचे एक शिक्षक कलाम यांना विज्ञान शिकवायचे. ते अतिशय पुरोगामी विचाराचे असले तरी त्यांची पत्नी कट्टर सनातनी आणि धार्मिक विचारांची होती. कलाम त्या शिक्षकाचे लाडके विद्यार्थी असल्यानं त्यांनी एकदा कलाम यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं. आपल्या घरात एक मुसलमान मुलगा जेवणार या विचारानं त्यांच्या पत्नीचं धाबं दणाणलं. तिनं कलाम यांना आपल्या स्वयंपाकघरात जेवू घालायला स्पष्ट नकार दिला. अशा वेळी ते शिक्षक अजिबात गडबडले नाहीत. ते आपल्या पत्नीवरही रागावले नाहीत. त्यांनी कलाम यांना बाहेरच्या खोलीत बसवलं आणि तिथे त्यांनी स्वतःच्या हातानं कलामांना वाढलं आणि स्वतःही त्याच्या शेजारी बसून ते जेवले. इतकंच नाही, तर पुढल्या रविवारी देखील आपल्या घरी जेवायला येण्याचं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी कलाम यांना दिलं. कलाम यांची अवस्था द्विधा झाली. त्यांनी शिक्षकाच्या पत्नीचा नकार पचवला होता. त्या वेळी कलामांना ते शिक्षक म्हणाले, ‘आपल्याला जेव्हा बदल घडवायचा असतो, तेव्हा वाटेतले छोटेमोठे अडथळे दुर्लक्षित करायचे असतात. तू ये.’ कलाम पुढल्या रविवारी त्या शिक्षकांकडे जेवायला गेले. या वेळी मात्र त्यांच्या पत्नीनं त्यांना स्वयंपाकघरात जेवायला बसवून स्वतः प्रेमानं वाढलं होतं. 

अशा वातावरणात कलाम वाढत होते. प्राथमिक शिक्षण संपल्यावर त्यांना पुढल्या शिक्षणासाठी रामनाथपुरमला जायचं होतं. मात्र आपल्या कुटुंबातून त्यांचा पाय निघत नव्हता. अशा वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, ‘सीगल पक्षी घरटं सोडून दूरवर एकटे उडत जातात आणि नवा प्रदेश शोधतात. तुलाही हे सगळे मोह सोडून जायला हवं. आमच्या गरजा तुझा रस्ता कधीही अडवणार नाहीत.’ 

आपलं कुटुंब, मित्रं, शाळा, शिक्षक आणि महंमद जलालुद्दिनसारखा मेव्हणा-मित्र या सगळ्यांना सोडून कलाम रामनाथपुरमला जाण्यासाठी सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. निघताना मात्र जलालुद्दिनचे शब्द त्यांच्या मनावर घोळत राहिले. ‘आशावादी विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते’ हे शब्द घेऊन आपण आपल्या वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची या निर्धाराने कलामांनी रामेश्वरम सोडलं. रामनाथपुरम इथे माध्यमिक शिक्षण घेतानाही कलाम यांना खूप चांगले गुरु भेटले. श्री. इयादुराई सालोमन यांनी, ‘आपली कृती हीच आपल्या आय्ाुष्यात घडणार्‍या घटनांवर नियंत्रण ठेवू शकते’ तसंच ‘आय्ाुष्यात यशस्वी होण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा, ध्यास आणि दृढविश्वास या गोष्टीं असायला हव्यात’ असं त्यांनी कलामांना सांगितलं. सीगल पक्ष्यासारखं आपणही आकाशात झेपावतोय अशी कलामांची इच्छा मग आणखीनच जागृत व्हायची. 

1950 साली कलाम यांनी त्रिचनापल्ली (तिरुचिरापल्ली) इथल्या जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान शिकवणारे खूप चांगले शिक्षक मिळाले. याच काळात कलामांना गणित तर खूप आवडत होतंच, पण इंग्रजी साहित्याचीही गोडी लागली. टॉलस्टॉय, हार्डी आणि स्कॉट हे लेखक त्यांचे आवडते बनले. इंटरनंतर कलाम इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेऊ शकले असते. पण त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे बीएस्सी पूर्ण केल्यावर त्यांनी चेन्नईच्या मद्रास इन्स्टिटय्ाूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या प्रसिद्ध अशा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाचा अर्ज भरला. कलामांची निवड झाली, पण त्या वेळची हजार रुपयेेेे फी भरणं त्यांना शक्यच नव्हतं. अशा वेळी त्यांची बहीण जोहरा हिने आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. बहिणीचं आपल्यावरचं प्रेम पाहून कलाम हेलावून गेले. 

कलामांचं शिक्षण सुरू झालं. एमआयटीच्या परिसरात विद्यार्थ्यांना अभ्यासता येण्यासाठी अनेक विमानं ठेवली होती. कॉलेज संपल्यावरही कलाम एखाद्या लोहचुंबकासारखे त्या विमानांकडे खेचले जात आणि तासन्तास विमानाच्या भागांचं निरीक्षण करण्यात घालवत. पहिल्या वर्षांनंतर विशेष शाखा निवडताना त्यांनी क्षणाचाही विचार न करता एअरोडायनॅमिक्स ही विमान बांधणीशी संबंधित शाखा निवडली. कलामांना विमानबांधणीमागचं तंत्रज्ञान आणि त्यातलं विज्ञान शिकताना खूप आनंद मिळत गेला. विमानाच्या प्रत्येक भागाचं महत्त्व त्यांना समजायला लागलं. एरोनॉटिक अभियांत्रिकी हा विषय कळत, रुजत चालला होता. आता प्रत्यक्ष प्रोजेक्ट वर्क त्यांना करायचं होतं. त्यांना चार विद्यार्थ्यांसोबत एका विमानाचं डिझाईन बनवायचं होतं. प्रोजेक्टला वेळ लागत होता. मार्गात अनंत अडचणी उभ्या होत्या. संस्थेचे डायरेक्टर श्रीनिवासन यांनी कलाम यांच्याजवळ चौकशी करताच कलाम यांनी अडथळ्यांची यादी समोर केली. त्या वेळी त्यांना एक महिना वेळ मिळावा अशी विनंतीही त्यांनी केली. श्रीनिवासन यांनी तीन दिवसांची मुदत देऊन हा प्रोजेक्ट पूर्ण केला नाही तर तुझी शिष्यवृत्ती रद्द होईल असं गंभीर चेहर्‍यानी सांगून ते निघून गेले. कलाम यांना काय करावं तेच कळेनासं झालं. समोर अंधार दिसत होता. अशा वेळी त्यांनी त्या रात्री न जेवता आराखडा बनवायला घेतला. रात्रंदिवस काम करून रविवारी सकाळी त्यांना कुणाचीतरी चाहूल लागली. कलामांचं काम कुठवर आलंय हे बघण्यासाठी श्रीनिवासन आले होते. त्यांनी कलामांनी केलेलं काम बघितलं आणि त्यांनी समाधानानं कलामांची पाठ थोपटली. कलामांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं! 

एमआयटीमधून बाहेर पडल्यावर बंगलोरमधल्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून कलाम रुजू झाले. इथेही विमानाच्या संदर्भात खूप शिकायला मिळालं. हवा, हवेचा दाब, इंजिन, त्याची झीज, अशा अनेक गोष्टी ते तपासून अभ्यास करू लागले. तिथलं प्रशिक्षण संपवून एरोनॉटिकल अभियंता म्हणून कलाम बाहेर पडले आता त्यांच्यासमोर हवाई दलात वैमानिक म्हणून जायचं का संरक्षण खात्यात टेक्निकल विभागात काम करायचं याचा निर्णय घ्यायचा होता. हवाई दलात कलामांची निवड झाली नाही, मात्र संरक्षण खात्यात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांच्या हाती नेमणूकपत्र पडलं. 

सुरुवातीच्या काळात कलामांना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागला. कामाच्या ठिकाणी अनेकदा सहकार्य तर सोडाच पण त्यांच्या खेडवळपणाची चेष्टा होत असे. या सगळ्यांत कलाम न डगमगता स्थिर उभे होते आणि प्रयत्न करत होते. त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि वरिष्ठांची वाहवा मिळवली. टीआयएफआर संस्थेतर्फे त्यांना रॉकेट इंजिनियरच्या जागेच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं. ही मुलाखत प्रोफेसर एम.जी.के. मेनन, विक्रम साराभाई आणि अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनचे साहाय्यक सचिव सराफ यांनी घेतली. या वेळी विक्रम साराभाईंच्या व्यक्तिमत्वाचा कलामांवर प्रचंड प्रभाव पडला. त्यांची टीआयएफआरमध्ये रॉकेट इंजिनियर म्हणून निवड झाली. काहीच काळात केरळमधल्या थुंबा इथे अवकाशतळ उभारण्याच्या कामी ते लागले. त्यानंतर सहाच महिन्यात कलाम अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नासा संस्थेत गेले. नासाचं प्रशिक्षण पूर्ण करून कलाम 21 नोव्हेंबर 1963 या दिवशी भारतात परतले. आल्यावर भारताचं पहिलं अंतराळयान ‘नाइके-अपाची’ अवकाशात सोडण्यात आलं. या यानाचं उड्डाण यशस्वी झालं. 

यानंतर कलाम यांच्या कामाला वेग येत गेला. विक्रम साराभाईंनी आपल्या देशातल्या अवकाश संशोधनातल्या पुढल्या दिशा काय असतील याबद्दल कलाम आणि त्यांच्याबरोबर इतर संशोधकांची मतं जाणून घेतली. विक्रम साराभाईंनी या काळात अवकाश संशोधनाच्या विकासाचं स्वप्नं या सार्‍यांना दाखवलं. विक्रम साराभाई समोरच्या व्यक्तीमधल्या क्षमता ओळखून त्याला कामाला लावण्यात कुशल होते. ते एक द्रष्टे संशोधक होते. त्यांच्या कल्पनेची झेप कलामांना चकित करून सोडायची. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरुणाईला उद्युक्त करण्यावर विक्रम साराभाईंचा भर असायचा. या काळात थुंबा इथल्या अवकाशतळाचा विकास होत गेला. अवकाश संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख विक्रम साराभाई होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतानं क्षेपणाा विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला आणि कलामांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिरा गांधींच्या खंबीर नेतृत्वाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे साराभाईंचं नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे कलाम प्रमुख झाले. त्यांच्या अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं. पोखरण इथे त्यांनी दोन यशस्वी अणुचाचण्याही केल्या. 

पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही कलामांची निय्ाुक्ती झाली आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रभावी धोरणं त्यांनी आखली. संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार म्हणूनही कलाम यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या निभावली. डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एमबीटी रणगाडा आणि लाईट काँबट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत मोलाची भूमिका पार पाडली. 2001 साली कलाम आपल्या सरकारी सेवेतून निवृत्त झाले. मात्र विज्ञानाची कास धरून चालणार्‍या कलामांवर भारत सरकारने 2002 साली अकराव्या राष्ट्रपतीपदाची धुरा सोपवली. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपती पदावर एक खडतर आय्ाुष्य जगलेले, परिश्रमाच्या जोरावर वाट तुडवीत चाललेले ए.पी.जे. कलाम जाऊन पोहोचले, तरी त्यांचं संवेदनशील असणं आणि त्यांच्यातलं साधेपण तसंच अबाधित राहिलं. य्ाुवकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्थान राहिले. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जायला लागला. 40 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं. कलामांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं. 

शिलाँंग इथे आयआयएमच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असतानाच कलाम यांना हृदयविकाराचा झटका आला अिाण त्यांना तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. 27 जुलै 2015 या दिवशी एपीजे अब्दुल कलाम यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्य्ाूनंतर त्यांच्या संपत्तीची मोजणी केली तेव्हा त्यांचे चार-पाच पोशाख, बूट आणि त्यांचे पुरस्कार याशिवाय काहीही त्यांच्या नावे नव्हतं. इतका साधा राष्ट्रपती जगाने पहिल्यांदाच पाहिला असावा. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचा टीव्ही, एसी, कार यापैकी काहीही नव्हतं. त्यांनी त्यांची शेवटची आठ वर्षांची स्वतःची पेन्शनदेखील आपल्या गावाच्या विकासासाठी देऊन टाकली होती.  सीएनएन आयबीएनच्या वतीनं ग्रेटेस्ट इंडियनचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. या सर्व्हेक्षणात पहिल्या दहाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसर्‍या क्रमांकावर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव झळकलं. 26 मे या दिवशी कलाम स्विर्त्झलँडच्या दौर्‍यावर गेल्याची आठवण म्हणून आजही तिथे विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या विकासाचं स्वप्न बघणार्‍या कलाम यांना भारताच्या तरुणाईनं ‘मिसाईल मॅन’चा किताब देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं! 

‘जागेपणी स्वप्नं पहा, म्हणजे ती खरी करता येतात’ असं म्हणणार्‍या अब्दुल कलामांना लाख वेळा सलाम!

दीपा देशमुख 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.