खिलते है गुल यहॉं....
किशोरकुमार हिन्दी चित्रपटसृष्टीतला एक यशस्वी पार्श्वगायक, कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक अशा सगळ्याच क्षेत्रात त्यानं ठसा उमटवणारी मुशाफिरी केली. हिन्दीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमधून किशोर गायला. किशोरकुमारचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ साली मध्यप्रदेशमधल्या खांडवा या ठिकाणी एका बंगाली कुटुंबात झाला. त्याचं खरं नाव आभासकुमार गांगुली! फिल्म अभिनेता अशोककुमार, सतीदेवी, अनुपकुमार ही किशोरकुमारची भावंडं होती. अशोककुमारमुळेच किशोरकुमारला चित्रपटसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं. पण तो त्यात करियर करण्याबाबत तितकासा गंभीरही नव्हता. पुढे किशोरनं आपल्या कारकिर्दीत ८ वेळा फिल्मफेअर ऍवार्ड मिळवून एक विक्रमच केला होता! कुंदनलाल सहगल यांचा किशोरकुमार जबरदस्त चाहता होता. तसंच आल्फ्रेड हिचकॉकचे चित्रपट बघायला किशोरकुमारला प्रचंड आवडायचं.
किशोरकुमारला लहानपणी आपण ख्रिश्चन धर्मोपदेशक असल्याची स्वप्न पडत. त्या धर्मोपदेशकाच्या वेषात आपण प्रवचनं देतोय असंही तो स्वप्नात बघे. एकदा त्यानंच सांगितलेली आठवण अशी, की तो एकदा फिरत असताना त्याला ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी दिसली. तिथे त्याला एक दुर्लक्षित समाधी दिसली. त्यानं त्यावरची धूळ आणि कचरा बाजूला केला, तेव्हा ती एका ख्रिश्चन धर्मोपदेशकाची असल्याचं तिथं लिहिलं होतं. मग उत्सुकतेपोटी किशोरकुमारनं ती सगळीच अक्षरं वाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या धर्मोपदेशकाच्या मृत्यूची तारीख आणि किशोरच्या जन्माची तारीख एकच असल्याचं लक्षात आलं. या योगायोगाचं किशोरकुमारला खूपच आश्चर्य वाटलं आणि मग आपण खरंच मागच्या जन्मातला ख्रिश्चन धर्मातला धर्मोपदेशक असल्याचा थाटात तो काही दिवस वावरत राहिला.
किशोरकुमारनं चार लग्न केली. त्याचं पहिलं लग्न बंगाली अभिनेत्री आणि गायिका रुमा गुहा/घोष हिच्याबरोबर १९५० साली झालं. रूमा ही प्रसिद्ध निर्देशक सत्यजित रे यांची भाची! किशोर आणि रुमा यांना अमितकुमार नावाचा मुलगा झाला आणि १९५८ साली ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर किशोरकुमारचं दुसरं लग्न मधुबाला या अभिनेत्रीबरोबर झालं. मधुबालाशी लग्न करताना तिच्या आग्रहामुळे किशोरकुमारनं इस्लाम धर्माचा स्वीकार करून करीम अब्दुल हे नाव धारण केलं! किशोरकुमार हिन्दू आणि मधुबाला ही मुस्लीम कुटुंबातली असल्यामुळे अर्थातच त्यांच्या लग्नाला विरोध होताच. तिच्या हृदयाला एक छिद्र पडलं होतं आणि त्या उपचारासाठी तिला लंडनला जावं लागणार होतं. हे सगळं माहीत असतानाही किशोरनं आणि मधुबालानं लग्न केलं. या लग्नाला किशोरच्या घरातलं कोणीही उपस्थित राहिलं नाही. खरं तर किशोरनं त्यांचं मन राखण्यासाठी किशोरनं हिंदूपद्धतीनं देखील लग्नाचे विधी केले. पण त्यांनी मधुबालाला आपली सून म्हणून कधीच स्वीकारलं नाही. त्यांच्या नजरेतली उपेक्षा आणि तिरस्कार झेलत मधुबाला त्यांच्याबरोबर राहू शकली नाही आणि लग्नानंतर एकाच महिन्यात ती बांद्रा इथल्या आपल्या स्वतःच्या बंगल्यात परतली. मधुबालाचा मृत्यू होईपर्यंतचे दिवस एका विचित्र तणावाखालचेच होते.
त्यानंतर किशोरकुमारचा योगिताबाली या अभिनेत्रीबरोबर १९७६ ते १९७८ या दोन वर्षात लग्न आणि घटस्फोट झाला. योगिता बाली ही अभिनेत्री गीता बालीची पुतणी! किशोरकुमारशी लग्न झाल्यानंतर योगिता बाली मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडली आणि तिनं किशोरकुमारबरोबर घटस्फोट घेऊन मिथुनशी लग्न केलं. अभिनेत्री लीना चंदावरकर हिच्याबरोबर किशोरनं १९८० साली लग्न केलं ते मात्र त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १३ ऑक्टोबर १९८७ पर्यंत अबाधित राहिलं. किशोरकुमारचा मुलगा अमितकुमार याच्यापेक्षाही लीना दोन वर्षांनी लहान होती. किशोरकुमार आणि लीना यांना सुमीत नावाचा मुलगा झाला. किशोरकुमारनं लीनाला हसणं शिकवलं, पुन्हा नव्यानं जगणं शिकवलं आणि दुःख कसं झेलायचं हेही शिकवलं!
किशोरकुमार स्वभावानं खूप विचित्र होता. लोकांनी त्याला विचित्र, वेडा असं म्हटलेलं त्याला आवडायचं. जोपर्यंत त्याचा सेक्रेटरी निर्मात्यानं पैसे दिल्याचं कन्फर्म करत नसे, तोपर्यंत तो ते गाणं गात नसे. एकदा तर एका निर्मात्यानं किशोरचे ठरलेले पूर्ण पैसे दिले नव्हते. अर्धी रक्कमच त्याच्या हातावर टिकवली होती. किशोरनं काय करावं? तो सेटवर तर पोहोचला, पण त्यानं आपल्या एका बाजूचाच चेहरा मेकअपनं रंगवला. जेव्हा निर्मात्यानं रागानं, हा काय चावटपणा आहे?’ असा प्रश्न किशोरला केला, तेव्हा शांतपणे किशोरनं, अर्धे पैसे, अर्धा मेकअप’ असं ठणकावून उत्तर सगळ्यांसमोर दिलं. तो कधी काय करेल आणि कधी काय बोलेल याचा तर नेमच नसायचा.
‘भाई भाई’ या चित्रपटाचा दिग्दर्शक एम व्ही रामन यानं किशोरच्या हातात फक्त ५००० रुपये टिकवले होते. किशोरकुमारनं आपण काम करणार नाही असं सांगितल्यावर अशोककुमारनं त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि तू नीट शूटिंग पार पाड, नीट काम कर असं सांगितलं. पण किशोरनं काय करावं, तर शूटिंग चालू झालं. कॅमेरे सज्ज झाले आणि या पठठ्यानं जिन्याच्या वरच्या पायरीवरून दोन उड्या मारून उभा राहून पाच हज्जार रूपये असं जोरात ओरडायला सुरुवात केली. असं करत करत दोन दोन दोन पायर्या नाचत गात पाच हजारांचा उच्चार करत खालपर्यंत पोहोचला आणि शेवटी स्टुडिओतून चक्क पळून गेला.
आर. सी. तलवार नावाच्या निर्मात्यानं तर अनेक वेळा आठवण देऊनही किशोरचे पैसे दिले नव्हते. मग किशोरकुमारमधला खोडकर मुलगा जागा झाला आणि त्यानं रोज तलवारच्या घरी जायला सुरुवात केली. रोज सकाळी किशोर तलवारच्या घरासमोर उभं राहून ‘ए तलवार, दे माझे आठ हजार’ असं सुरात ओरडत असे. जोपर्यंत तलवारनं त्याचे पैसे दिले नाहीत तोपर्यंत किशोरनं हा कार्यक्रम न कंटाळता चालू ठेवला.
१९७१ साली तयार झालेला गाजलेला चित्रपट आनंद - या चित्रपटासाठी सर्वप्रथम हृषिकेश मुखर्जी यांनी महेमूद आणि किशोरकुमार यांना घेऊन तो चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी ते जेव्हा किशोरकुमारला भेटायला त्याच्या घरी गेले, तेव्हा दारातूनच वॉचमननं गैरसमजानं त्यांना हुसकावून लावलं. शेवटी महेमूद आणि किशोरकुमार आपल्याला आनंदमध्ये दिसण्याऐवजी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ताब्यात आनंदच्या भूमिका गेल्या.
किशोरकुमारचं एकीकडे ‘पैसे नाही, तर काम नाही’ हे तत्त्व होतं, तर दुसरीकडे तो अनेकांसाठी एक पै न घेता गाणी गायचा, काम करायचा. एवढंच काय, पण काही निर्मात्यांना तो चित्रपटासाठी कमी पडले, तर पैसेही द्यायचा. खरं तर त्या वेळी ते निर्माते त्याला पैसे देण्यासाठी इच्छुक असायचे. पण याच्या मनात काय असायचं ते त्यालाच ठाऊक! अरूणकुमार मुखर्जी या बंगाली अभिनेत्याचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा त्याच्या भागलपूरला राहत असलेल्या कुटुंबीयांना नियमितपणे पैसे पाठवत राहिला. जणुकाही ते कुटुंब म्हणजे त्याचीच जबाबदारी होती!
किशोरकुमारच्या मध्यप्रदेशातल्या खंडव्याच्या घरावरही नावचा बोर्ड लावण्याऐवजी कित्येक दिवस त्यानं ‘मेंटल हॉस्पिटल’ असा बोर्ड लावला होता. तसंच किशोरकुमार मुंबईतल्या ज्या वार्डन रोडवर राहायचा, तिथे त्याच्या फ्लॅटच्या दारावर ‘किशोरपासून सावध’ अशा नावाचा बोर्ड त्यानं लटकावला होता. एक दिवस एक निर्माता ज्याला किशोरनं काही पैसे दिले होते, ते परत करण्यासाठी किशोरच्या फ्लॅटवर पोहोचला. त्यानं दार ठोठावलं आणि किशोरनं दार उघडलं. त्या निर्मात्याला आत ये असंही न म्हणता किशोर त्याच्याकडे बघत राहिला. मग त्या निर्मात्यानं काही न सुचून खिशातून पैसे काढून किशोरच्या हातात ठेवले. किशोरनं ते एका झडपेत ताब्यात घेतले. मग त्या निर्मात्यानं थॅक्स म्हणत किशोरकडे शेकहँडसाठी हात पुढे केला. आता मात्र किशोरनं चक्क त्या निर्मात्याचा हात पकडून त्याचा चावा घेतला आणि त्याला म्हटलं, तू दारावरचा बोर्ड नीट वाचला नव्हतास का? निर्मात्याला इतकं हसू फुटलं की तो जोरजोरात हसतच तिथून बाहेर पडला.
शूटिंगच्या वेळी तो खूपच धमाल करत असे. वेगवेगळे ज्योक्स सांगून सगळ्यांना हसवत असे. कित्येकदा तर तो एखाद्या लहान मुलाशी बोलावं तसं स्वतःशीच बोलत बसे. थोडक्यात, गाणं रेकॉर्ड करत असताना ते गाणं जर किशोरला आवडलं नाही तर तोच लहान मुलाचा आवाज काढून स्वतःच ‘बाबा हे गाणं चांगल नाहीये’ असं म्हणत असे. आणि मग स्वतःच नॉर्मल आवाजात ‘बाळा, असं नाही बोलायचं. घरी गेल्यावर बोल हं.’’
प्रसिद्ध निर्माते/दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांना किशोरकडून एक गाणं गाऊन घ्यायचं होतं, त्यामुळे किशोरला गाठण्यासाठी ते त्याच्या घराजवळ पोहोचले. किशोर कारमधून बाहेर निघाला होता. आपल्याला बघून तो त्याची गाडी थांबवेल असं सिप्पींना वाटलं. पण किशोरनं सरळ दुर्लक्ष करून कार रस्त्यावर काढली. सिप्पीनं ओरडून किशोरला गाडी थांबवायला सांगितलं, पण किशोरनं उलट वेग वाढवला. शेवटी सिप्पीनी किशोरच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. मढआयलँडजवळच्या फोर्टजवळ अखेर किशोरनं गाडी थांबवली. सिप्पी चांगलेच वैतागले होते. त्यांनी गाडीतून उतरून किशोरला त्याच्या अशा वागण्याबद्दलचा जाब विचारला. आता किशोरनं काय करावं? त्यानं चक्क सिप्पीना ओळखण्यास नकार दिला आणि काही बोलण्यास देखील! इतकंच नाही, तर सिप्पींनी जास्त गडबड केली, तर मी पोलिसांना बोलावेन असा किशोरनं दमही भरला. बिच्चारे सिप्पी निमूटपणे माघारी फिरले. दुसर्या दिवशी सकाळी रेकॉर्डिंगच्या वेळी अगदी वेळेवर किशोरकुमार स्टुडिओत हजर होता. त्याला पाहताच सिप्पींना आदल्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्याला ‘काल तू असा का वागलास?’ असा प्रश्न केला. त्यावर किशोरनं ‘आपण काल मुंबईत नव्हतोच, आपण खांडव्यात होतो’ असं शांतपणे उत्तर दिलं. एकदा तर किशोरचा गाडी चालवण्याचा शॉट होता. किशोरकुमार गाडी चालवत होता, पण दिग्दर्शक ‘कट’ म्हणायचं विसरला म्हणून किशोर गाडी चालवत चक्क खंडाळ्यापर्यंत पोहोचला!
हाफ तिकिट’ या गाजलेल्या चित्रपटाच्या वेळी या चित्रपटाचा फायनान्सर किशोरच्या अशा वागण्यानं त्रस्त झाला होता. किशोरला धडा शिकवण्याच्या दृष्टीनं त्यानं इन्कमटॅक्सच्या अधिकार्यांकडे बोलून इन्कमटॅक्सची रेड किशोरच्या घरावर टाकण्यात पुढाकार घेतला. या रेडनं किशोरची बदनामी होईल आणि तो जरा ताळ्यावर येऊन नीट को-ऑपरेट करेल असं त्या फायनान्सरला वाटलं. त्यानंतर मध्ये अनेक दिवस गेले. एके दिवशी किशोरनं त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. किशोर आता ताळ्यावर आलाय आणि माणसांत आल्यासारखं वागतोय असं समजून तो फायनान्सर किशोरकडे आनंदात गेला. किशोरनं त्याला आपलं घर दाखवत आत नेलं. घरातलं कपाट उघडून ते किती मोठं आहे हे सांगत असताना आपण त्या कपाटात जाऊन उभा राहिला आणि त्या फायनान्सरलाही ते बघायला आत बोलावलं. फायनान्सर त्या कपाटात जाताच किशोरनं कपाटाच्या बाहेर चपळाईनं येऊन कपाटाला चक्क लॉक केलं आणि तब्बल दोन तास त्या फायनान्सरला आत कोंडून ठेवलं. दोन तासांनी कपाटाचं लॉक उघडून त्याला किशोरनं ‘यापुढे माझ्या घरात पाऊल टाकू नकोस’ असं शांतपणे सांगितलं.
१९७५ ते १९७७ या दोन वर्षांत इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली, त्याआधी त्यांनी त्यांच्या वीस कलमी कार्यक्रमात किशोरनं सहभाग घ्यावा असा आदेश काढला. वीस कलमी कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करण्यासाठी किशोरकुमारच्या आवाजात काही फिलर्स गाऊन घ्यायचे होते. पण किशोरकुमारनं सरळ नकार दिला आणि इतकंच नाही, तर सरकार जे करतंय ते योग्य नाही असंही ठणकावून सांगितलं. परिणामी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला यांनी किशोरकुमारवर नाराज होऊन त्याची कुठलीच गाणी आकाशवाणी आणि विविध भारती यावरून प्रसारित होऊ नयेत याचे आदेश काढले. पण किशोरकुमारनं या गोष्टींची पर्वा केली नाही आणि कोणाचं लांगूलचालनही केलं नाही.
प्रितिश नंदी यानं किशोरची एक मुलाखत घेतली त्यानं त्यात ‘आपल्याला कोणी मित्र नसून आपण खूप एकटे आहोत’ असं सांगितलं. आपण फक्त झाडांशीच गप्पा मारतो असंही तो म्हणाला. एकदा एका पत्रकाराला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि ती किशोरला भेटायला त्याची वेळ घेऊन त्याच्या घरी पोहोचली. किशोर तिला घेऊन आपल्या बागेत गेला आणि त्यानं काही झाडांची नावं घेत त्या त्या झाडांजवळ तिला नेलं. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्या प्रत्येक झाडाजवळ जाऊन तिची त्यानं त्या झाडांबरोबर हे माझे सगळ्यात जिवलग मित्र आहेत अशी ओळखही करून दिली!
किशोरकुमारकडे जुन्या चित्रपटांचं खूप चांगलं कलेक्शन होतं. लहानशा सुमीतला आणि अमितला घेऊन किशोरकुमार अनेक वेळा रात्री ब्लँकेट अंगावर घेऊन हिचकॉकच्या फिल्म बघत बसे. सुमीत घाबरेल असं लीनानं म्हटल्यावरही तो ऐकत तर नसेच, पण मध्येच अंगावरचं ब्लँंकेट काढून चित्रविचित्र भयानक चेहरे करून सुमीत आणि अमितला दाखवत असे. ६ ऑक्टोबरला अमितकुमार एका कार्यक्रमासाठी लंडनला गेला, तेव्हा किशोरकुमारनं त्याला प्रेमानं रात्री दोन वाजता निरोप दिला. आपल्याला २० तारखेला खंडव्याला जायचंय याची आठवण करून दिली, तसंच अमितनं येताना व्हीडीओ फिल्म आणाव्यात याचीही आठवण केली. इतक्या रात्री खाली गाडीपर्यंत मला पोहोचवायला येऊ नका असं अमितनं सांगूनही किशोरकुमार त्याला बाय करायला गाडीपर्यंत गेला. किशोरकुमारनं बाय केलं. गाडी हलली आणि अमितला आरशातून उभ्या असलेल्या आपल्या वडिलांची मूर्ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत तशीच दिसत राहिली. ती त्या बापलेकाची शेवटची भेट होती!
आर. डी. बर्मन म्हणजे पंचमबरोबर १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘भूतबंगला’ या चित्रपटातल्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग पंचमला किशोरकुमारबरोबर करायचं होतं.
जागो सोनेवालो, सुनो मेरी कहानी
क्या अमिरी क्या गरिबी भुलो बाते पुरानी
हे गाणं महेमूदवर पिक्चराईज होणार होतं. जेव्हा या गाण्याविषयी पंचम आणि किशोरमध्ये चर्चा झाली, तेव्हा किशोरनं हे गाणं गंभीर असलं तरी त्याच्या अंतर्यामध्ये काही बदल पंचमला खूप नम्रपणे न दुखवता सुचवले. एखादं गाणं चांगलं होण्यासाठी हरप्रकारे आपला सहभाग देण्याचं कसब किशोरमध्ये अफलातून होतं! हाफ तिकिट या चित्रपटाच्या वेळी लता आणि किशोर यांना एक ड्युएट सॉंंग गायचं होतं. काही कारणानं रिहर्सलच्या वेळी लता येऊ न शकल्यामुळे किशोरनं सलील चौधरींना आपणच दोन्ही आवाजात रिहर्सल करतो असं सांगितलं. पण सलील चौधरींना तो गंमतच करतोय असं वाटलं. प्रत्यक्षात रिहर्सलच्या वेळी किशोरनं जेव्हा मेल आणि फिमेल दोन्ही व्हॉईसमध्ये ते गाणं गाऊन दाखवलं तेव्हा सलील चौधरीसहित सगळेच चकित झाले आणि अखेर त्याच्याच दोन्ही आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गेलं.
‘पडोसन’ या अतिशय धमाल चित्रपटातलं ‘एक चतुर नार करके सिंगार’ हे गाणं मन्नाडे आणि किशोरकुमारनं गायलं होतं. मन्नाडे शास्त्रीय संगीतातला दादा माणूस आणि किशोरकुमार चुळबुळ्या आणि कुठल्याही गाण्यात नाही नाही ते प्रयोग करणारा! जेव्हा मन्नाडेला कळलं की किशोरकुमारबरोबर आपल्याला गायचंय तेव्हा त्यांना थोडं टेन्शनच आलं. आता हा काय उपद्व्याप करणार याची काळजी मन्नाडेला वाटायला लागली. पण प्रत्यक्ष गाण्याच्या वेळी मन्नाडेला लक्षात आलं की आपल्याला गाण्याचे सूर कळाले असले, तरी त्या गाण्याची सिच्युएशन, त्या गाण्यातलं स्पिरिट आणि त्या गाण्याचा आत्मा खरं तर किशोरकुमारला जास्त चांगला कळाला आहे. हे गाणं महेमूद आणि सुनिल दत्त यांनी चित्रपटात गायलं. या चित्रपटाच्या निमित्तानं किशोरची आणि सुनिल दत्तची घनिष्ठता वाढली. सुनिल दत्त किशोरकुमारला आपला गुरूच मानायला लागला.
एकदा किशोरकुमारला घेऊन सैनिकांसाठी स्टेज शो करायचा असं सुनिल दत्तनं ठरवलं. पण इतर वेळी इतका धुमाकूळ घालणारा किशोरकुमार स्टेजशो करायच्या नुसत्या विचारानंही प्रचंड घाबरला. सुनिल द्त त्याला म्हणाला, ‘‘आजपर्यंत तुझा आवाज लोक दर्याखोर्यातून, पर्वताआडून ऐकताहेत. आज प्रत्यक्ष समोर तुला ऐकू दे की!’’ तब्बल एक वर्ष सुनिल दत्त किशोरकुमारला ना ना प्रकारे मनवत राहिला. शेवटी किशोरकुमारनं काही अटी घातल्या. किशोरकुमार म्हणाला, त्या तिथे एवढ्या बर्फात माझ्या तोंडून थंडीनं शब्दही फुटणार नाही. मग मी कसा गाणार? तू असं कर, त्या पडोसनसारखं स्टेजवर माझ्यासमोर उभा रहा आणि ओठ हलव. मी तुझ्या मागे उभा राहून गात राहीन.’’ सुनिल दत्तनं किशोरकुमारची अट मान्य केली. स्टेज शो सुरू झाला. किशोरकुमार मागे आणि समोर सुनिल दत्त ओठांची हालचाल करत उभा राहिला. समोर मरणाच्या थंडीत लोक हा स्टेज शो ऐकायला आले होते. किशोरकुमारनं डोळे मिटले आणि गायला सुरुवात केली. सुनिल दत्त ओठ हलवत राहिला. एका क्षणी सुनिल दत्तनं हळूच मागे वळून बघितलं. किशोर डोळे मिटून गाण्यात तल्लीन झाला होता. हळूच सुनिल दत्त स्टेजवरून बाजूला झाला. लोकांना आता गाताना प्रत्यक्ष किशोर कुमार दिसत होता. लोकांचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. दुसर्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. किशोरनं डोळे उघडले. लोक बेफान होऊन टाळ्या वाजवत आपला आनंद व्यक्त करत होते. त्या क्षणी तेवढ्या थंडीतही आपलं स्वागत करणारे सैनिक पाहून किशोरला आपण उगाचंच टाळाटाळ करत होतो याचं वाईट वाटलं आणि त्यानं तेवढ्याच उत्साहाने पुढे गाणं सुरू ठेवलं! पुढे किशोरकुमारनं देशविदेशात अनेक स्टेज शो केले. हे स्टेज शो करण्यात कल्याणजी आनंदजी यांचाही सुनिल दत्त प्रमाणेच फार मोठा वाटा होता. नंतर मात्र किशोरकुमार सुटलाच. तो स्टेजवर येताना सायकलवर येई, आल्यावर उलट्यासुलट्या उड्या मारे, अनेक गमतीजमती करत तो लोकांना हसवत असे आणि एवढं सगळं करून त्याचा एक सूरही बेसूर होत नसे हे विशेष!
‘आराधना’ या चित्रपटाद्वारे राजेश खन्नाचा जन्म झाला. या चित्रपटातलं गाणं ‘मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू’ हे किशोर गाणार होता. किशोरनं हे गाणं कोणासाठी गायचं आहे हा प्रश्न केला, तेव्हा त्याला समजलं की कोणीतरी नवा मुलगा फिल्म इंडस्ट्रीत आलाय. किशोर म्हणाला, आधी मला त्याला भेटू द्या मग मी ठरवेन. राजेश खन्ना किशोरला भेटायला त्याच्या घरी गेला. किशोरकुमारनं अर्धा तास त्याला अनेक प्रश्न विचारले. तू फिल्म इंडस्ट्रीत कशाला आलास पासून अनेक. पण अर्ध्या तासानं किशोरकुमारचं समाधान झालं आणि त्यानं राजेश खन्नाला चहा घेणार का कॉफी हा प्रश्न विचारला. तोपर्यंत अर्धा तास त्यानं राजेश खन्नाला पाणी सुद्धा विचारलं नव्हतं. ज्या वेळी राजेश खन्नानं हे गाणं ऐकलं तेव्हा त्याला तो आवाज आपलाच तर नाही ना असं वाटून गेलं. हे गाणं इतकं गाजलं की दो जिस्म एक जान प्रमाणे राजेश खन्नाला ते वाटलं. किशोरकुमारनं देवआनंद, राजेश खन्ना, शशीकपूर आणि अमिताभसाठी जी गाणी गायली, ती जणुकाही त्यांनीच गायली असा भास ऐकणार्याला होतो.
एस. डी. बर्मनबरोबर किशोरकुमार मिली या चित्रपटातल्या ‘बडी सुनी सुनी है जिन्दगी ये जिन्दगी है’ या गाण्याची रिहर्सल करत होता. त्याच्या दुसर्याच दिवशी एस.डी. बर्मन यांना पॅरेलिसिसचा ऍटक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची बातमी किशोरकुमारला कळली. एस.डी. बर्मनचा निस्सिम चाहता असलेल्या किशोरकुमारनं हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, लवकर बरे व्हा. मला माहीत आहे परवा फायनल रेकॉर्डिंग करायचं आहे. तुम्ही समोर नसलात तरी मी तुम्हाला शब्द देतो आणि गाणं पर्फेक्ट होईल याची काळजी घेतो.’’ शब्द दिल्याप्रमाणे किशोरनं हे गाणं इतकं भावविभोर शब्दात गायलं आहे की त्याला तोड नाही! हे एस. डी. बर्मनबरेाबरचं किशोरकुमारचं शेवटचं गाणं ठरलं.
किशोरकुमारनं गायलेलं जिद्दी या चित्रपटातलं ‘मरनेकी दुवा क्यू मॉंगू’ हे पहिलं गाणं होतं. तसंच त्याच्याच फंटूश चित्रपटातलं ‘दुखी मन मेरे’ हे गाणंही तितकंच हृदयाला कातर करून जातं. बप्पी लहरीच्या संगीत दिग्दर्शनाखाली किशोरकुमारनं ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना’ हे गाणं गायलं, तेव्हा ‘आपण गेल्यावर आपल्याला या गाण्यानंच लोकांनी आठवावं’ असं त्यानं म्हटलं! १२ ऑक्टोबरला किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी गाण्याची दिवसभर रिहर्सल केली. तेव्हा मधल्या वेळात आशा भोसलेंना तो म्हणाला, आशा, हे बघ ना, माझ्या हाताची नाडी मधूनच लागत नाही, चक्क गायब होते.’’ आशा भोसलेनं हसत उत्तर दिलं, काहीतरीच काय, असं कुठे होत असतं का?’’ आणि दुसर्याच दिवशी १३ ऑक्टोबर १९८७ साली किशोरकुमारचा हार्टऍटॅकनं मृत्यू झाला, त्याच दिवशी अशोककुमारचा ७७ वा वाढदिवस होता!
देशविदेशके तिरथ घुमे, देखे जंगल पर्बत चश्मे
हात उठा कर बुला रहा घर, चल रे मुसाफिर चल रे
अब अपने घर को चलरे
हीच माझी शेवटची इच्छा आहे असं किशोरनं म्हटलं होतं!
दीपा देशमुख
Add new comment