जो भी चाहूँ वो मै पाऊ....

जो भी चाहूँ वो मै पाऊ....

तारीख

बाबा यानेकी अनिल अवचट यांच्या साबुदाण्याच्या खिचडीच्या अनेक कथा मी ऐकलेल्या आहेत. इतकंच नाही तर त्यानं कहर म्हणजे गरमागरम भज्यांबरोबरच साबुदाण्याच्या खिचडीवरही कविता केलेली आहे. ती कविता त्याच्या तोंडून ऐकताच तोंडाला अक्षरश: पाणी सुटतं.  मध्यंतरी बाबाचा फोन आला अणि तो म्हणाला, आज आनंद (नाडकर्णी) इकडंच राहायला आहे आणि उद्या सकाळी मी त्याच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे....सातत्यानं साबुदाण्याच्या खिचडीचे उल्लेख ऐकल्यानं मलाही वाटायचं, की बाबानं म्हटलं पाहिजे, ये दीपा तुझ्यासाठी मी खिचडी बनवतो. अर्थात, मी स्वत:हून त्याला हक्कानं म्हटलं असतं, तर त्यानं मला साबुदाण्याची खिचडी प्रेमानं करून खाऊ घातली असती. पण तेच ना...लहानपणापासूनच...आपल्या मनातलं समोरच्यानं ओळखलं पाहिजे असं वाटणं...त्यामुळे मी आपली शांत.
मध्यंतरी बाबा घरी येऊन गेला, मला काही ऐकवायचं होतं, ते ऐकवून झालं. मी इडली सांबार केला होता आणि त्यानं तो आवडीनं खाल्ला. त्याच्या कॅमेर्‍यातून माझे आणि अपूर्वचे फोटो काढले. अपूर्वचं जरा जास्त कौतुकही केलं.
मग काल बाबाचा फोन, दीपा तुमचे फोटो आलेत. कधी येतेस की मी पोहोचवू? अपूर्वची सोमवारची ऑफिसची वेळ लक्षात घेऊन मी म्हटलं, सकाळी लवकर येते. तो म्हणाला, ये, ये. नाश्त्यासाठीच येतेस का अपूर्वला घेऊन?, मी साबुदाण्याची खिचडी बनवतो. मी तत्काळ हो म्हटलं. मनातल्या मनात आनंदान 10-20 उड्या मारल्या. बाबाच्या हातची साबुदाणा खिचडी खाण्याची मी किती काळापासून, नव्हे किती युगांपासून वाट पाहत होते. 
आता रात्र कधी संपेल .... पहाटेपासून सात कधी एकदाचे वाजताहेत असं मला झालं...मी रस्त्यात असताना पुन्हा बाबाचा फोन, कुठपर्यंत आलात?...मी म्हटलं, विद्यापीठ...पाच मिनिटांत पोहोचतो.....कोरोनामुळे तसा रस्ता रिकामा होता, गाडी पत्रकारनगरच्या आत शिरली. अपूर्वने गाडी पार्क करून येईपर्यंत मी त्याच्यासाठी न  थांबता वार्‍याच्या वेगानं जिन्याच्या पायर्‍या चढून घरात प्रवेश केला. 
इतिहासप्रसिद्घ साबुदाण्याची खिचडी ज्योतीनं प्लेटमध्ये भरली. त्यातून डोकावणारे बटाटे मला ‘ये, लवकर आमची चव बघ‘ असं खुणावत होते. ज्योतीनं त्यावर ओल्या नारळाचा किस घातला, झालंच तर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, जिच्याशिवाय मी जगू शकत नाही... आता बस्स खिचडी खाण्याची मंगल घटिका जवळ आली होती, मी कुणाचीही वाट न बघता, एक घास तोंडात टाकला आणि उदगार बाहेर पडले, अहाहा, अशी खिचडी मी गेल्या 10 हजार वर्षांत खाल्ली नव्हती.
बाबानं काढलेले फोटो सुरेखच येतात, आपण आपल्याच प्रेमात पडावे तसे. फोटो आणि खिचडीची तृप्ती घेऊन मी आणि अपूर्व घराबाहेर पडलो. मन आनंदात गात होतं, जो भी चाहूँ वो मै पाऊँ.....बस इतनासा ख्वाब है.
दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.