सर्वांसाठी आरोग्य? होय, शक्य आहे!
सर्वांसाठी आरोग्य? होय, शक्य आहे!
'सर्वांसाठी आरोग्य?' या मनोविकास निर्मित आणि डॉ. अनंत फडके लिखित पुस्तकाचं नुकतंच पुण्यात प्रकाशन झालं. या पुस्तकाचं शीर्षक प्रश्नार्थक असलं तरी 'सर्वांसाठी आरोग्य शक्य आहे' असं ठामपणे लेखकाने म्हटलं आहे. या पुस्तकाचा विषय आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे. खरं तर शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छ पाणीपुरवठा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. पण प्रत्यक्षात या तिन्ही बाबतीत आपली अवस्था दयनीय आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एका जेन साधूचं उदाहरण दिलं आहे त्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसाची आजची आरोग्याबाबतची स्थिती आहे. डॉक्टरी उपचार न घ्यावे तर मृत्यू समोर उभा आहेच आणि उपचार घ्यावे तर त्या महागड्या उपचारांमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला येऊन आर्थिक मृत्यूही ठरलेलाच आहे. अशा परिस्थितीत करावं तरी काय अशी अवस्था सर्वसामान्य माणसाची होते. थोडक्यात, तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला आरोग्यसेवा मिळण्याचा हक्क आहे असंच वाटायला लागलं आहे. अशा निराशा येणार्या परिस्थितीत डॉ. अनंत फडके यांच्यासारखा कार्यकर्ता डॉक्टर सर्वसामान्यांच्या हितासाठी उभा राहतो.
सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारावी म्हणून सतत झटणारे डॉ. अनंत फडके यांनी पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलं आणि दोन वर्षं सरकारी नौकरी करून नंतर पूर्ण वेळ समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला. नवनिर्माण, लोकविज्ञान आणि जनआरोग्य अभियान या संघटनांमार्फत आरोग्याबाबतचं लोकशिक्षण देत जनजागृतीचा प्रयत्न ते गेली अनेक वर्षं सातत्याने करत आहेत. या पुस्तकात काय आहे? तर भारतामध्ये औषधांच्या किमतीवर कुठलंही नियंत्रण नसल्यानं काय परिस्थिती ओढवते, औषधी कंपन्या त्याबाबत कशा पळवाटा शोधतात, औषधांचं मिश्रण करताना कुठले शास्त्रीय निकष पाळायला हवेत, डॉक्टर आणि औषधी कंपन्यांचं साटंलोटं कसं असतं, अनेक औषधी कंपन्या कशा अतिरंजित दावे करतात अणि त्यांची औषधं कशी निरुपयोगी असतात, अनेकदा गरज नसतानाही करायला लागणार्या शारीरिक तपासण्या आणि त्यांचं रॅकेट, (या अनावश्यक तपासण्यांमुळे होणारे तोटे) बहुराष्ट्रीय कंपन्यांचं बाजारपेठेवर असलेलं वर्चस्व ही सगळी वस्तूस्थिती डॉ. अनंत फडके यांनी या पुस्तकात नमूद केली आहे. पण हे सगळं वाचून निराश होण्याची गरज नाही. असं सगळं असलं तरी आपण काय करू शकतो हे त्यांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे.
आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणं, डॉक्टर-रुग्ण संवाद, रुग्णांचे हक्क आणि जबाबदार्या अशा अनेक मुद्दयांवर या पुस्तकामध्ये उहापोह केला आहे. भारताच्या तामिळनाडू राज्यात तिथे अंमलात आणलेलं मॉडेल संपूर्ण भारतभर राबवायला हवं, तामिळनाडू मॉडेल आहे तरी काय? सरकारी आरोग्यसेवा घेणार्या सगळ्या रुग्णांना तामिळनाडू राज्यात १९९५ सालापासून सर्व औषधं मोफत मिळतात. सरकारी आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यासाठी तामिळनाडू मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन नावाचं एक स्वायत्त मंडळ सरकारनं स्थापन केलं. या मंडळाचा कारभार आय. ए. एस. अधिकारी पाहतात. औषधकंपन्यांकडून कुठल्याही मध्यस्थाशिवाय थेटपणे जनरिक नावानं घाऊक भावात औषधं खरेदी केली जातात. सर्वांना परवडेल अशा किमती असलेल्या औषधांना 'जनरिक औषधं' म्हणतात. ही औषधं कोणत्या कंपनीकडून घेतली, किती किमतीत घेतली ही सगळी माहिती वेबसाईटवर टाकली जाते आणि नागरिकांना पारदर्शी कारभाराचा प्रत्यय दिला जातो. हेच मॉडेल २००८ पासून केरळमध्ये तर २०११ पासून राजस्थानमध्ये राबवलं जात आहे. महाराष्ट्रात किंवा इतर सर्व राज्यांमध्ये हे मॉडेल अंमलात आणण्यासाठी सामाजिक दबाव आणि राजकीय इच्छाशक्तीची नितांत आवश्यकता आहे.
'सर्वांसाठी आरोग्य' हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे. याचं कारण आपल्याला आरोग्य व्यवस्थेची सध्याची स्थिती काय आहे, ती कशी असायला हवी, आपण आरोग्याच्या बाबतीत केवळ योग्य माहितीच्या अभावामुळे अनावश्यक तपासण्या आणि भरमसाठ बिलं यांच्या दुष्टचक्रात कसं सापडतो या सगळ्यांचं व्यवस्थित भान हे पुस्तक वाचल्यानं वाचकाला मिळेल. लेखक एक डॉक्टर आहे आणि एक कार्यकर्ताही आहे त्यामुळे डॉ. अनंत फडके यांनी त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून जनकल्याणास्तव, जनजागृतीस्तव हा पुस्तकलिखाणाचा प्रपंच केला आहे. याशिवाय डॉ. रवी बापट यांची 'पोस्ट मार्टेम', 'अचूक निदान' आणि डॉ. अरुण गद्रे यांचं 'कैफियत' ही आरोग्यविषयक पुस्तकं जरूर वाचावीत. इतकं उपयुक्त पुस्तक मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. त्यामुळे डॉ. अनंत फडके आणि मनोविकास प्रकाशन यांचे वाचक म्हणून आणि रुग्ण म्हणून आम्ही खूप खूप आभारी आहोत. मला हे पुस्तक खूप आवडलं.
तुम्हीही जरूर वाचा - ‘सर्वांसाठी आरोग्य?’ होय, शक्य आहे’
दीपा देशमुख
२६ मे २०१८
Add new comment