'दुर्गा भागवत - बहुरूपिणी'
काल सकाळपासून सुरु असलेला 'पुणे वेध'चा भन्नाट कार्यक्रम, त्यानंतरच्या दोन मिटिंग्ज, नंतर साधना (पुस्तक खरेदी) आणि त्यानंतर वाहनांच्या गर्दीतून धावतपळत गाठलेला ज्योत्स्ना भोळेचा तिसर्या मजल्यावरचा हॉल! निमित्त होतं - 'दुर्गा भागवत - बहुरूपिणी'
या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणार्या पुस्तकाचं. पुस्तक प्रकाशन डॉ. देवदत्त दाभोळकर आणि पद्मश्री कुमार केतकर यांच्या हस्ते होणार होतं.
कार्यक्रम सुरू झाला होता, अंजली कितर्ने पुस्तकाच्या लेखिका आपलं मनोगत व्यक्त करत होत्या. मला पाहताच माझ्या हातातला खरेदी केलेला पुस्तकांचा गठ्ठा आशिशनं काढून घेतला आणि मला समोरच्या रांगेत नेऊन बसवलं. अंजली कितर्ने निर्मितीमागची कथा सांगत होत्या. त्यांचं दुर्गा भागवत यांच्याविषयीचं प्रेम आणि झपाटलेपण त्यांच्या प्रत्येक शब्दांतून जाणवत होतं. 'दुर्गा भागवत यांचा मी अभ्यास केला नसता, तर मला भाषेविषयीचा वेगवेगळ्या अंगानं विचार करता आला नसता, दुर्गाबाईंच्या भाषेनं मला संस्कारित केलं, माझ्या आयुष्यात आलेल्या अशा माणसांनी माझं आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण केलं', असं अंजली किर्तने म्हणाल्या.
पुस्तक प्रकाशन संपन्न झालं आणि डॉ. देवदत्त दाभोळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अंजली किर्तने यांनी ताकदीनं लिहिलं आणि त्याच ताकदीनं मनोविकास प्रकाशनानं हे पुस्तक काढलं याबद्दल डॉ. दाभोळकर यांनी सुरुवातीलाच या दोघांचं अभिनंदन केलं. डॉ. देवदत्त दाभोळकर यांनी त्यांचं आणि दुर्गा भागवत यांचं नातं, त्या नात्यातल्या अतिशय तरल आठवणी उलगडल्या. खरं तर त्या आठवणींमध्ये डॉ. देवदत्त दाभोळकर इतकं बुडाले की त्यांचा आवाज त्यांना बोलू देईना. डॉ. दाभोळकर आणि दुर्गा भागवत यांच्यातला पत्रव्यवहार, दुर्गा भागवत यांची जिद्द, परिश्रम करण्याची तयारी, आणिबाणीच्या वेळी घेतलेली स्पष्ट भूमिका (खरं तर प्रत्येक बाबतीतच त्यांनी अशी स्पष्ट भूमिका घेतली, कधीही आपल्या मूल्यांशी, विचारांशी तडजोड केली नाही.) अशा अनेक गोष्टी त्यांच्या संवादातून व्यक्त झाल्या. दुर्गा भागवत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कॅलिडोस्कोपचा उल्लेख केला. दुर्गा भागवत यांना उलगडून दाखवणं हे अतिशय कठीण काम अंजली किर्तने यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. देवदत्त दाभेाळकर दुर्गा भागवत यांना पत्र लिहिताना, ‘प्रिय दुर्गा’ अशी सुरुवात करून लिहायचे तर त्या 'प्रिय बंडू' म्हणून पत्र लिहायच्या. दाभोळकरांची सर्व पत्रं दुर्गा भागवत यांनी जपून ठेवली होती. दोघंही खूप जवळचे मित्र होते. दाभोळकरांनी दुर्गा भागवत यांच्या पुस्तकात न आलेल्या काही आठवणी सांगितल्या.
कालनिर्णयचे साळगावकर दाभोळकरांचे चांगले मित्र. साळगावकरांना कालनिर्णयचा खप वाढवण्यासाठी स्त्रियांसाठी पाककलेची स्पर्धा घ्यायचा विचार मनात आला. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रिया भाग घेतील आणि त्यांच्यातून एक क्रमांक काढून त्यातल्या एका स्त्रीला एक किलो सोन्याचं बक्षीस जाहीर करायचं असं त्यांना वाटत होतं. मात्र त्याच वेळी त्यांना आपण दिलेल्या निकालावर इतर बक्षीस न मिळालेल्या स्त्रियांनी संशय व्यक्त केला तर, या विचारांनी त्यांचं मन द्विधा झालं होतं. अशा वेळी डॉ. दाभोळकरांनी परीक्षक म्हणून दुर्गा भागवत यांनी ते काम बघावं अशी गळ घातली आणि त्याप्रमाणे या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून दुर्गा भागवत यांनी काम बघितलं आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना दुर्गा भागवत या नावावरच इतका विश्वास होता की आपल्यावर अन्याय झालाय हे कोणालाही वाटलं नाही आणि उलट अनेकींनी आपल्या पदार्थांच्या रेसिपीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का अशा आशयाची पत्रं दुर्गाबाईंना लिहिली. असा विश्वास, अशी खात्री केवळ आपल्या नावातून निर्माण करण्याचं सामर्थ्य दुर्गा भागवत यांच्यात होतं.
डॉ. दाभोळकर यांनी नर्मदा प्रकल्प समजून घेण्यासाठी चार महिने भ्रमंती केली. या प्रकल्पाच्या विरोधात मेधा पाटकर, बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा आणि जगभरातल्या १७ संस्था उभ्या होत्या. अशा वेळी यावरचं लिहिलेलं आणि राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं पुस्तक 'माते नर्मदे' याविषयीची एक आठवण सांगितली. या पुस्तकाच्या वेळी त्यांना सर्वसामान्य, कार्यकर्ते आणि अनेकांचा रोष सहन करावा लागला. मात्र अशा वेळी दुर्गा भागवत यांनी मात्र डॉ. देवदत्त दाभोळकर यांच्या विचारांचं, मांडणीचं आणि भूमिकेचं कौतुक केलं आणि त्या दाभोळकरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. दुर्गा भागवत यांनी या पुस्तकाचं विस्तृत परीक्षण केलं आणि ते महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध केलं.
कुमार केतकर यांनी अंजली कितर्ने यांच्यातल्या संशोधकवृत्तीची प्रशंसा केली. तसंच त्यांची भाषा आणि शैलीतला प्रामाणिकपणा यांच्याविषशी देखील त्यांनी कौतुक केलं. प्रत्येकानं हे पुस्तक आवर्जून वाचायलाच पाहिजे असं सांगितलं. या प्रसंगी त्यांनी दुर्गा भागवत यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणी सांगितल्या. अंजली किर्तने यांची आनंदीबाई जोशी, म. वा. धोंड, पलुस्कर या पुस्तकाविषयीचा विशेष उल्लेख केला. एशियाटिक लायब्ररीमधल्या दुर्गा भागवत यांच्या आठवणी कुमार केतकर यांनी सांगितल्या. दुर्गा भागवत यांचं ग्रंथालीनं काढलेल्या पहिल्या पुस्तकापासूनचा प्रवास त्यांनी उलगडला. कुमार केतकर म.टा.चे संपादक असताना त्यांनी दुर्गा भागवत यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांचं धाडधाड बोलणं, त्यांच्यातला कठोर शिक्षक, त्यांचं फोनवरचं बोलणं....त्या एका फोनवर त्या अनेक विषयांवर कशा बोलत. त्या कधी वर्तमानात, तर कधी भूतकाळात जाऊन पोहोचत कळतही नसे. त्या म्हणत, अरे, त्या टिळकला मी सांगितलं...., अशा वेळी केतकरांना कोण टिळक हे कळतच नसे. पुढे त्या म्हणायच्या, अरे तो लाख लिहील रे केसरीमध्ये....मग केतकरांना कळायचं की त्या लोकमान्य टिळकांबद्दल बोलताहेत. विलक्षण धाडसी अशी ती स्त्री होती. भारतीय साहित्यातला रेनेसान्स जर जपायचा असेल तर अंजली किर्तनेनं जे काम केलंय, तसं काम आज करायची गरज असल्याचं कुमार केतकर म्हणाले.
दाभोळकर आणि केतकर या दोघांचीही भाषणं (खरं तर भाषण म्हणूच नये, ती एक अप्रतिम अशी संवादयात्राच होती) खूपच चांगली झाली. संपूच नये अशी.
त्यानंतर अंजली किर्तने लिखित आणि दिग्दर्शित दुर्गा भागवत यांच्यावरचा लघुपट सादर करण्यात आला. या लघुपटातून दुर्गा भागवत यांचा जीवनपट रेखाटला आहे. या लघुपटाच्या निर्मितीमुळे ज्या नवीन पिढीला दुर्गा भागवत माहीत नसतील, त्यांना या लघुपटाद्वारे एका झुंजार व्यक्तिमत्व असलेल्या विदुषी स्त्रीचं दर्शन घडणार आहे. मंटोनंतर लगेचच एका दिग्गज साहित्यिकाच्या जीवनावरचा हा लघुपट पाहून खूप समाधान वाटलं. लघुपटाची पटकथा लिहिताना अंजली किर्तने यांची अफाट श्रम घेतलेत याची जाणीवही झाली. दुर्गा भागवत यांना इतक्या उलगडून दाखवणं, तेही लघुपटात हे एक फार मोठं आव्हानच होतं आणि त्यात दुर्गा भागवत यांचे बहुतांशी पैलू समोर यायला हवे होते याचं भान ठेवत अंजली किर्तने यांनी ही पटकथा लिहिली आणि दिग्दर्शित केली.
मी व्यासपीठावर बसलेले अरविंद पाटकर यांच्याकडे आणि इतर व्यवस्थेत गुंतलेल्या आशिश आणि रीना पाटकर यांच्या लगबगीकडे पाहत होते. मंत्रालयात पुस्तकांच्या जडच्या जड पिशव्या दोन्ही हातात घेऊन जाणारे अरविंद पाटकर मी बघितलेले आहेत. पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात आपल्या मूल्यांशी तडजोड न करता, आपलं कार्यकर्तेपण जपत त्यांनी केलेला संघर्षातून इथंपर्यंतचा प्रवास मला आठवत राहिला. आज पुण्यातल्या नामवंत प्रकाशन संस्थेच्या यादीत मनोविकास प्रकाशन हे नाव अग्रस्थानी आहे. इथंपर्यंतच्या प्रवासानं त्यांच्यातला एक साधा कार्यकर्ता आजही तसाच आहे. आणि म्हणूनच १९७० सालापासून त्यांना ओळखणारे कुमार केतकर अरविंद पाटकर यांच्या निमंत्रणाला कधीही नकार देत नाहीत असं ते स्वतः या प्रसंगी म्हणाले. असे विषय, अशा व्यक्ती आणि त्यांचं अतुलनीय काम लोकांसमोर आणल्याबद्दल मनोविकास टीमचं देखील या निमित्तानं विशेष अभिनंदन!
'दुर्गा भागवत - बहुरूपिणी' हे पुस्तक जरूर जरूर वाचा आणि संधी मिळाल्यास त्यांच्यावरचा लघुपटही अवश्य पाहा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment