भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा - प्रफुल्ल बिडवई

भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा - प्रफुल्ल बिडवई

गेल्या काही महिन्यांपासून रोहन प्रकाशनानं 'रोहन साहित्य मैफल' नावाचा छान उपक्रम सुरू केला आहे. यात ज्येष्ठ न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याशी वाचकांना संवाद साधता आला. त्यानंतर तंबी दुराई लिखित दीड-दमडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यातल्या काही लेखांचं वाचन दिलीप प्रभावळकर आणि गिरीश कुलकर्णी या कसलेल्या अभिनेत्यांनी करून या मैफलीत एकच बहार आणली होती. 
नुकतंच पत्रकार भवनमध्ये प्रफुल्ल बिडवई लिखित ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ या पुस्तकाचं प्रकाशन कुमार केतकर, अचिन वनायक यांच्या हस्ते झालं, तर अध्यक्षस्थानी गोपाळ गुरू होते. यानंतर झालेल्या परिचर्चेत सुहास परांजपे, कुमार शिराळकर, उल्का महाजन, सुरेंद्र जोंधळे, संध्या गोखले, जयंत पवार ( त्यांच्या लिखाणाचं वाचन गजानन परांजपे यांनी केलं.) 
आयआयटी बॉम्बेचा प्रफुल्ल बिडवई नावाचा एक अतिशय बुद्धिमान तरुण चळवळीकडे आकर्षिला जातो आणि त्याच वेळी आपलं शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठतो आणि आपल्या मृत्यूपर्यंत पत्रकारिता करतो. त्याची लेखणी आणि पत्रकारिता यांनी आपली मूल्यं कधीच हरवली नाहीत. तो एक निर्भिड, परखड आणि स्पष्टपणे लिहिणारा पत्रकार होता, राजकीय विश्लेषक होता, लेखक होता आणि सामाजिक कार्यकर्ताही होता. इतकंच नव्हे तर साहित्य, संगीत आणि कला यातही त्याला अतोनात रस होता. कुठलीही मतं मांडण्यापूर्वी त्याचा त्या विषयावरचा सखोल अभ्यास झालेला असे. त्याचे लेख हिंदुस्थान टाईम्स, फायनान्शिअल एक्सप्रेस, बिझिेनस इंडिया, टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाईम्स, फ्रंटलाईन, रीडिफ डॉट कॉम, यात तसंच द गार्डियन, द न्यू स्टेट्समेन अँड सोसायटी, द नेशन, ल मोंद डिप्लोमॅटिक, अल मॅनिफेस्टो अशा अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधूनही सातत्यानं प्रसिद्ध होत. 
२३ जून २०१५ या दिवशी प्रफुल्ल बिडवई हे अ‍ॅमस्टरडॅम इथे होणार्‍या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले असताना त्यांचा तिथे आकस्मिक मृत्यू झाला. प्रफुल्ल बिडवई यांनी इंग्रजीतून लिहिलेलं ‘द फिनिक्स मोमेंटः द चॅलेंजेस फेसिंग दी इंडियन लेफट’ या पुस्तकाचा मराठीतून अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी आपल्या सशक्त लेखणीतून ‘भारतीय डाव्या चळवळींचा मागोवा’ या नावानं केला. याच अनुवादित पुस्तकाचा रोहन प्रकाशन, समाजविज्ञान अकादमी आणि परिवर्तनाचा वाटसरू यांनी प्रकाशन सोहळा आणि परिचर्चा यांचं आयोजन केलं होतं. 
प्रदीप चंपानेरकर यांनी रोहन प्रकाशन कशा प्रकारची पुस्तकं काढतं याबद्दलची आपली भूमिका मांडली. आजपर्यंत चरित्रपर, अनुभवपर, राजकीय आणि सामाजिक विषयांवरची अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. दस्तावेजीकरण असणारी पुस्तकं काढण्यातही त्यांना रस असतो. कारण यातून इतिहासाचा मागोवा घेता येतो. विशेषतः मानवी मूल्यांचा सन्मान करणारी पुस्तकं काढण्यात त्यांना स्वारस्य आहे. पुस्तक प्रकाशन हा व्यवसाय नसून एक मोठी सामाजिक जबाबदारी ते मानतात. आपण जे लिखाण प्रकाशित करतो, त्या लिखाणाचा, त्या पुस्तकांचा समाजावर मोठा परिणाम होत असतो किंवा व्हावा असा प्रकाशकाचा उद्देश असतो. त्यामुळे आपण कोणते विचार रुजवणार आहोत याबद्दलचं धोरण रोहनचं स्पष्ट आहे. यांनी घडवलं सहस्त्रक, असा घडला भारत, आधुनिक भारताचे विचारस्तंभ, गूड मुस्लिम, बॅड मुस्लिम, या प्रकारची पुस्तकं करताना खूप समाधान मिळालं असं प्रदीप चंपानेरकर म्हणाले. याच पठडीतलं प्रफुल्ल बिडवई लिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित डाव्या चळवळींचा मागोवा घेणारं पुस्तक प्रकाशित करतानाचा होत असलेला आनंद आणि त्या पुस्तकाची आवश्यकता यावर ते बोलले. ज्यांनी ज्यांनी या पुस्तकासाठी साहाय्य केलं त्या सगळ्यांविषयीची कृतज्ञता देखील चंपानेरकरांनी व्यक्त केली. 
या पुस्तकाचे अनुवादक मिलिंद चंपानेरकर यांना लोकशाही सुदृढ व्हायची असेल तर सर्वसामान्य लोकांना दीर्घ काळ टिकून राहणार्‍या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची माहिती मराठी भाषेतून असणं आवश्यक आहे असं वाटलं. देशातल्या वेळोवेळीच्या राजकारणाविषयी, त्यातल्या बदलत्या घडामोंडींविषयीचं आकलन अशी पुस्तकं वाचल्यानं व्हायला लागतं. या पुस्तकाच्या निर्मितीच्या वेळी हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना समजावं, त्यांना सुलभपण वाचता यावं याची काळजी मिलिंद चंपानेरकर यांनी घेतली आहे. त्यांनी मूळ पुस्तकातल्या अ‍ॅकेडमिक भाषेचा अडसर दूर करून ते वाचनीय कसं होईल याची काळजी घेतली आहे. वेगवेगळ्या लोकचळवळींच्या चढउतारांचं विश्लेषण या पुस्तकात केलं गेलंय. तसंच या पुस्तकातल्या मांडणीमध्ये मानवी ओलावाही बघायला मिळतो. लेखकाचा सूर आणि अभिप्रेत असलेला अर्थ यांना बाधा पोहोचणार नाही याची काळजी मिलिंद चंपानेरकर यांनी घेतली आहे. या पुस्तकाला सुहास परांजपे यांची अतिशय अप्रतिम अशी प्रस्तावना लाभली आहे. तसंच सुलभा ब्रह्मे (आज त्याही हयात नाहीत.) यांनी संदर्भासाठी अनेक पुस्तकं दिली. या सगळ्यांबद्दल मिलिंद चंपानेरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 
या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर सुरेंद्र जोंधळे यांनी आपली आणि प्रफुल्ल बिडवई यांची ओळख ते औरंगाबादला असताना कधी आणि कशी झाली तसंच ही ओळख दृढ कशी होत गेली याविषयी सांगितलं. पुस्तकाबद्दल बोलताना त्यांनी झिजेक या विचारवंतापासून ते मार्क्सबद्दल बोलत अनेक संदर्भ दिले. आज मानवतेचे लढे लढण्यासाठी आधी देशपातळीवरच नव्हे तर जगाच्या पातळीवर ज्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडी घडताहेत त्याचे अन्वयार्थ समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. हे जग समजून घेण्यासाठी, डाव्या चळवळीतला आशावाद, झालेली पडझड याविषयी प्रफुल्ल बिडवई यांनी सविस्तर मांडणी केली आहे ती समजून घेणं आवश्यक असल्याचं सुरेंद्र जोंधळे यांनी म्हटलं. जवळजवळ १५ ते २० वर्षं प्रफुल्ल बिडवई यांनी या पुस्तकावर संशोधनपर अभ्यासपूर्ण असं काम केलं, त्यामुळे हे पुस्तक मराठीतून येण्याची नितांत आवश्यकता होती. या पुस्तकात काय समाविष्ट आहे आणि आजची परिस्थिती काय आहे, तसंच डाव्या चळवळींची व्यूहरचनेची चौकट काय असायला हवी याविषयी देखील त्यांनी सविस्तर मांडणी या पुस्तकात केली आहे. 
डाव्या चळवळींचा मागोवा या प्रफुल्ल बिडवई लिखित पुस्तकाचे संपादन करणारे आणि प्रफुल्ल बिडवई यांचे जवळचे मित्र असणारे सुहास परांजपे यांनी आपलं मनोगत याप्रसंगी मांडलं. आयआयटीचे पदवीधर असलेले सुहास परांजपे यांनी दास कॅपिटल हे पुस्तक मराठीतून अतिशय सुलभ भाषेत लिहिलं. ते मार्क्सवादाचे अभ्यासकही आहेत. 
आपल्या मनोगतात त्यांनी पुस्तक निर्मितीची प्रक्रिया, पुस्तकाचा आढावा आणि आपला जीवलग मित्र या भूमिकेतून मांडणी केली. भारतातल्या कम्युनिस्ट चळवळींबद्दल किंवा पक्षाबद्दल आढावा घेणारं हे एक अत्यंत महत्वपूर्ण पुस्तक असल्याचं ते म्हणाले. हा विषय मराठीतून येणं खूप आवश्यक होतं. या पुस्तकात स्वातंत्र्यापूर्वीपासूनची डाव्या पक्षांची वाटचाल याबद्दल भाष्य केलं आहे. यात भारताच्या दृष्टीनं कम्युनिस्ट पक्षाचं भरीव काम आणि इतिहास, कम्युन्स्टिांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा राज्यातला डाव्यांच्या कामागिरीविषयी आणि उणिवा, झालेल्या चुका सांगत त्यावरच काय उपाय असू शकतात याविषयीची मांडणी या पुस्तकात आहे. डाव्या पक्षावर त्यांनी परखडपणे टीकाही केली आहे. मात्र त्याचवेळी त्यांची निष्ठा आणि त्यांचं योगदान याविषयी प्रफुल्ल बिडवई यांना नितांत आदरही आहे. उपाय सुचवताना त्यांनी एक पंचसुत्री किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पाच अक्ष सांगितले आहेत. व्यवस्थेमधल्या वर्चस्वाला आव्हान देणारं आणि प्रतिवर्चस्व निर्माण करणारं असं पहिलं सूत्र. दुसर्‍या सूत्रात ते अर्थकारणाविषयी बोलतात, ज्यात कामाचा हक्क, अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, वनाधिकार, वेतन, सामूहिक शेती, असंघटित कामगारांचे प्रश्न अशा अनेक गोष्टी सामील आहेत. तिसर्‍या सूत्रात स्थानिक गोष्टी, ज्यात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रश्न उदाहरणार्थ, वायू आणि जल प्रदूषण, कचर्‍याचा प्रश्न आणि त्याचं व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांची स्थिती आणि त्यावरचे पर्याय यावर प्रफल्ल बिडवई लिहितात. चौथ्या सूत्रात लोक आणि लोकप्रतिनिधी आणि विविध पक्ष, त्यांच्यातले परस्परसंबंध याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. पाचव्या सूत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक असं भाष्य केलं आहे. 
या पुस्तकाचं वैशिष्ट्यं म्हणजे यात अनेक संदर्भ सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले आहेत. केरळमध्ये डाव्यांचा प्रभाव किती खोलवर होता हे सांगण्यासाठी तिथली अनेक उदाहरणं प्रफुल्ल बिडवई यांनी या पुस्तकात दिली आहेत. या  पुस्तकासाठी त्यांचं अनेक वर्षं लिखाण सुरू होते, त्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले त्यामुळे हे पुस्तक कुठल्याही अभ्यासकासाठी देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. 
हे पुस्तक फक्त मराठीतूनच नव्हे, तर अन्य भाषांमधूनही प्रसिदृध् होण्याची आवश्यकता असल्याचं सुहास परांजपे म्हणाले. या पुस्तकात डाव्यांच्या चुका, अपयश या सगळ्यांवर टीका केलेली असली तरी बिडवई यांनी चांगलं काहीतरी घडू शकेल असा आपला आशावादही व्यक्त केला आहे. 
सुहास परांजपे यांच्या मनोगतानंतर राज्यसभेचे सदस्य असलेले, ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार असलेले, राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती असलेले पद्मश्री कुमार केतकर यांनी बीजभाषण केलं. त्यांचे अणि प्रफुल्ल बिडवई, सुहास परांजपे आणि सुहास बेडेकर (मागोवा गटाचे संस्थापक) यांच्याशी जवळजवळ ५० वर्षांपासूनचे घनिष्ट संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या वेळी आयआयटीमध्ये कुमार केतकर स्टाफमध्ये काम करत होते, तर बाकी सगळे विद्यार्थी होते. ही सगळी मंडळी कँपसमध्ये असलेल्या कुमार केतकरांच्या खोलीत भेटत, त्यांच्यात नेहमीच वाद-चर्चा होत. आता क्रांती खूपच जवळ आली असल्याच्या अर्विभावात सगळे वावरायचे. चे गव्हेराचे टी-शर्ट्स घालून फिरायचे.  आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या सवयींमध्ये आणि आपल्या शैलीमध्ये बदल केला पाहिजे यावर त्यांचे संवाद व्हायचे. प्रफुल्ल या सगळ्या प्रश्नांमध्ये इतका गुंतला की त्यानं आयआयटीचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि तो पुर्णपणे अ‍ॅक्टिव्हिस्ट झाला. प्रफुल्लचं सगळ्याच विषयातलं ज्ञान प्रचंड होतं. त्याच्या वाचनाचा वेग अफाट होता. त्याचं साहित्यावरचं वाचन प्रचंडच होतं. त्याच्याशा वाद घालणं कठीण असायचं. कारण वाद घालताना त्याबद्दलचा अभ्यास, त्या विषयावरचं संशोधन आणि त्या विषयाचा स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास त्याचा झालेला असायचा. त्यामुळे जवळपास सगळ्याच वादात तोच जिंकायचा. त्या वेळी सत्यजीत रेंचा प्रतिद्वंदी चित्रपट आला होता, तो बघून त्यावर चर्चा करणं ठरलेलं असायचं. प्रफुल्ल बाकी सगळ्यांचा आयकॉन तर होताच, पण त्याच्या बोलण्यावरून स्टॅलिन काय, किंवा माओ काय हे आपल्या पलीकडल्या गल्लीत राहताहेत असं आम्हाला वाटायचं. असं कुमार केतकर म्हणाले.
त्या वेळी होत असलेल्या आमच्या वादांना एक बौद्धिकता होती, एक वैचारिकता होती असं कुमार केतकर म्हणाले. प्रफुल्ल आम्हा सर्वांचा लीडर होता. तो कम्युनिस्ट असला तरी बर्टांर्ड रसेलच्या बाजूचा तो असायचा. तो नक्षलवाद्यांच्या बाजूचा असायचा आणि त्याच वेळी स्टॅलिनच्या विरोधात असायचा. प्रफुल्लचा न्यूक्लिअर पॉवरला विरोध होता. तो परखडपणे आणि स्पष्ट बोलायचा. ज्योती बसूंनी पतंप्रधानपद नाकारलं ही मोठी चूक केली असं सांगत असतानाच त्यातून पुढे कसं जायचं हे प्रफुल्लनं सांगितलं असल्याचंही कुमार केतकरांनी म्हटलं. आपण आपल्या चुकांमधून शिकलो पाहिजेत, या बदलत्या जगाचं आपल्याला भान असलं पाहिजे असं त्याला वाटायचं. 
जगातला सगळ्यात मोठा ओपन माइंडेड थिंकर मार्क्स असल्याचं कुमार केतकरांनी सांगितलं. डाव्या चळवळींचा आढावा प्रफुल्ल बिडवई यांनी घेऊन त्यावर आपली आशावादी भूमिका या पुस्तकातून मांडली आहे.    
दिल्ली विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख  असलेले अचिन वनायक यांचे परराष्ट्र संबंध आणि जागतिक संबंध हे अध्यापनाचे प्रमुख विषय होते. अणुऊर्जा आणि अणुअस्त्रांच्या वापराविरोधात उभ्या राहिलेल्या चळवळीत ते अग्रणी होते. अचिन वनायक आणि प्रफुल्ल बिडवई यांनी काही पुस्तकात एकत्रितपणे काम केलं असून त्यांच्याविषयीचे काही किस्से अचिन वनायक यांनी सांगितले. अचिन वनायक नंतर कुमार शिराळकर यांनी या पुस्तकातल्या नवसंजीवनीच्या वाटेवर या विषयावर मांडणी केली. तसंच उल्का महाजन, संध्या गोखले, गजानन परांजपे यांची व्याख्यान ऐकण्यापूर्वीच मला अपूर्वच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे घरी परतावं लागलं. 
आज आपल्यात प्रफुल्ल बिडवई नाहीत, मात्र पुस्तकातल्या विचारांच्या रुपात ते बरोबर आहेतच हा विचार घेऊन घरी परतले!
दीपा देशमुख, पुणे. 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.